महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेची नवी योजना

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता आणि अविवाहित अशा एकट्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. महिलांना स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानी जीवन जगता यावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण, अल्पदरात कर्ज, व्यवसायासाठी उपकरणे आणि बाजारपेठेची सुविधा दिली जाणार आहे. तसेच काही निवडक व्यवसायांसाठी थेट आर्थिक मदतही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, पंचायत समित्या आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना विविध शासकीय योजनांची जोडही दिली जाणार आहे.
योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे एकट्या महिलांना आर्थिकदृष्ट्या उभं करणं, त्यांना उद्योजकतेकडे वळवणं आणि समाजात त्यांना सन्मानाने जगता येईल असा विश्वास निर्माण करणं. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून, अशा योजनांमुळे सामाजिक न्यायाची खरी व्याख्या प्रत्यक्षात उतरते, अशी प्रतिक्रिया महिलांच्या संघटनांकडून व्यक्त होत आहे.