भामरागड अभयारण्य

समृद्ध निसर्गसंपदा, हेमलकसाचा ‘लोकबिरादरी प्रकल्प’, बाबा आमटेंचा ‘आनंदवन’ आश्रम अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनी भामरागड अभयारण्याला भेट द्यायला हवी. येथील स्थानिक ‘गोंड’ आणि ‘माडिया’ जमातीच्या आदिवासींची संस्कृती मन भारावून सोडते.

चंद्रपूर जिल्ह्यात हे अभयारण्य आहे. याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.किमी. इतके आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्ग आहे. या अभयारण्यातून ‘पार्लोकोटा’ आणि ‘पामलगौतम’ नद्या वाहतात. अभयारण्यातील वन्यजीव आणि राहणाऱ्या ‘गोंड’-‘माडिया’ आदिवासी बांधवांसाठी हा पाण्याच्या प्रमुख स्रोत आहे.

रानडुक्कर, बिबट्या, ससे, भुंकणारे हरीण, मुंगूस, अस्वल, खार, उडणारी खार, नीलगाय, जंगली कोंबडी, मोर अशा असंख्य पक्षी आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे हे ठिकाण आहे. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी इथे पहायला मिळतात.

‘माडिया’ आणि ‘गोंडी’ या स्थानिक भाषा येथे बोलल्या जातात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या या आदिवासींचे जंगलावरचे अवलंबित्व कमी व्हावे, त्यांना सुरक्षित आयुष्य जगता यावे यादृष्टीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना येथे सुरू केली आहे.

अभयारण्यात जाताना कोरडे अन्नपदार्थ सोबत नेणे गरजेचे आहे. येथे आसपास पाहण्यासारखे अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये वरोऱ्याचा आनंदवन आश्रम, चंद्रपूरच्या प्राचीन लेण्या, चंद्रपूरचा किल्ला, माणिकगड किल्ला, बल्लारपूर किल्ला, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प अशी बरीच स्थळे आहेत.

भामरागड अभयारण्य जवळपास सर्व राष्ट्रीय महामार्गानी जोडले गेले असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भेट देणे सहज शक्य होते. ‘अहेरी’ हे येथील सर्वात जवळचे बसस्थानक आहे.
आरोग्य आणि शिक्षण आदिवासींना मिळावे याकरिता लोकबिरादरी प्रकल्प येथे कार्यान्वित करण्यात आला. आज ही समाजसेवेची धुरा त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून मंदाकिनी आमटे यांनी यशस्वीरित्या पुढे नेत आहेत.






543 वेळा पाहिलं