तीळ शेती
पदार्थांना रुचकर बनविणाऱ्या तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. तीळ आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहेत. सौंदर्यप्रसाधनातही हे तेल मोलाची भूमिका बजावते. तीळ लागवडीत राजस्थान अग्रेसर आहेच; परंतु महाराष्ट्रातही तिळाचे उत्पादन विशेषत्वाने घेतले जाते. खरीप हंगाम तीळ लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे मानले जाते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तिळाची लागवड पडिक जमिनीतही केली जाऊ शकते.
तिळामध्ये ‘मोनो-सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ असते. हे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करीत असल्यामुळे येथे तिळाची मागणी वाढत आहे.
तीळ पीक दुहेरी पीक म्हणूनही फायदेशीर आहे. हे 85 ते 90 दिवसात येणारे पीक आहे. सहसा पडिक जमिनीचा वापर होत असल्याने शेतकरी अशा जमिनीत तिळाची लागवड करतात. हलकी रेताड, चिकणमाती असलेली जमीन तीळ उत्पादनासाठी योग्य असल्याचे अनुभवी शेतकरी सांगतात.
दुहेरी पीक याचा अर्थ तूर, मका, ज्वारीसह आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करता येते. तिळाच्या लागवडीतून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. तिळाची पेरणी करण्यापूर्वी 2 ते 3 वेळा जमीन चांगली नांगरून घ्यावी लागते; जेणेकरून उत्तम उत्पादन मिळवता येऊ शकेल. शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात तिळाची पेरणी करणे फायदेशीर ठरते. रेताड आणि चिकण माती असलेल्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास तिथेही पीक चांगले येते. या पिकाला इतर पिकांच्या तुलनेने पाणी कमी लागते.
लागवड केल्यानंतर तिळाची पाऊण भागापेक्षा अधिक पाने आणि देठ पिवळे होतात, तेव्हा ते काढणीसाठी योग्य समजले जातात. पेरणीपासून सुमारे 80 ते 95 दिवसांनी तीळ पूर्ण विकसित होऊन काढणीला तयार होतात. तिळाचे हेक्टरी 6 ते 7 क्विंटल उत्पादन मिळते.