
मुंबईतील नेस्को, गोरेगाव येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक या भव्य प्रदर्शनादरम्यान महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत एकूण दोनशे साठ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांवर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
महाराष्ट्र सागरी मंडळाचे हे करार इचइंडिया आणि नॉलेज मरीन या दोन प्रमुख कंपन्यांसोबत करण्यात आले आहेत. या करारांतर्गत हरित टगबोटींसाठी बॅटरी निर्मिती, जहाज बांधणी व दुरुस्ती, तसेच नव्या बंदर उभारणीसंबंधी प्रकल्पांचा समावेश आहे. या करारामुळे सागरी क्षेत्रात हरित तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि राज्यातील बंदर विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी डेन्मार्क येथील सागरी उद्योग प्रतिनिधींशी ग्रीन जहाज बांधणी आणि शाश्वत बंदर विकासाबाबत सविस्तर चर्चा केली. करंजा आणि दिघी बंदरांच्या विकासासाठी गुंतवणुकीस उत्सुक असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबतही त्यांनी संवाद साधला.
या कार्यक्रमास बंदर विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खारा यांच्यासह विविध अधिकारी आणि संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील सागरी क्षमतांचा आढावा घेऊन आगामी प्रकल्पांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मधील “मेरिटाईम एक्सलन्स आचीव्हर्स–२०२५ एक्झिबिशन पुरस्कार” या विशेष सत्रात महाराष्ट्र राज्याला “विविधता आणि प्रभाव” या श्रेणीत राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला. गेल्या दहा वर्षांनंतर महाराष्ट्राला हा पहिला पुरस्कार मिळाल्याने राज्यासाठी ही कामगिरी अत्यंत अभिमानाची ठरली आहे. सागरी क्षेत्रातील शासनाच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांची आणि प्रभावी अंमलबजावणीची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आल्याचे विभागामार्फत सांगण्यात आले.