पंतप्रधान मोदींचा अठ्ठेचाळीस तासांत आठ देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संपर्क

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण आखाती प्रदेशात पसरला आहे. या युद्धाच्या झळा शेजारील आखाती देशांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्रिय राजकीय पुढाकार घेतला आहे. त्यांनी गेल्या अठ्ठेचाळीस तासांत आखाती प्रदेशातील आठ महत्त्वाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदींनी या संकटकाळात संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत, कतार देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या या संवादाचे मुख्य उद्दिष्ट आखाती देशांची अखंडता आणि तेथील भारतीय समुदायाची सुरक्षा हे होते. पंतप्रधान मोदींनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या देशांच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध केला. या प्रदेशात शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित व्हावी, यासाठी राजनैतिक मुत्सद्देगिरी आणि संवादाची गरज त्यांनी प्रतिपादित केली. आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक नोकरी आणि व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर या भारतीयांच्या सुरक्षिततेबद्दल पंतप्रधानांनी विशेष काळजी व्यक्त केली. कतार, सौदी अरेबिया आणि बहरीनच्या नेत्यांशी बोलताना त्यांनी भारतीय समुदायाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करून घेतली. सौदी अरेबिया आणि बहरीनमध्ये अलीकडे झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधानांनी तीव्र निषेध केला. पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली आणि सर्व पक्षांनी संयम पाळण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींनी जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय यांच्याशीही संवाद साधून जॉर्डनच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. कुवेतच्या क्राउन प्रिन्सशी झालेल्या चर्चेतही त्यांनी प्रादेशिक शांततेसाठी शाश्वत राजकीय संवादाची आवश्यकता अधोरेखित केली.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
21,387 वेळा पाहिलं