संकल्प – सत्तेच्या राजकारणात गुरू शिष्याचा संघर्ष

नाना पाटेकर हे नाव समोर आले की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे त्यांचा करारी अभिनय, धारदार संवाद आणि पडद्यावरची त्यांची जबरदस्त ऊर्जा. ‘संकल्प’ या वेब सिरीजच्या माध्यमातून नानांनी डिजिटल विश्वात पाऊल ठेवले खरे, मात्र ज्या अपेक्षेने प्रेक्षक या सिरीजची वाट पाहत होते त्या कसोटीवर ही मालिका काहीशी मागे पडताना दिसत आहे. ११ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेली ही सिरीज राजकीय रणनीती आणि ‘गुरू-शिष्य’ यांच्यातील संघर्षावर भाष्य करते, परंतु यातील विस्कळीत मांडणी प्रेक्षकांचा उत्साह कमी करणारी ठरली आहे.

या मालिकेची कथा ‘कन्हैया लाल’ या पात्राभोवती फिरते, ज्यांना सत्तेचा मोठा खेळाडू आणि रणनीतीकार मानले जाते. कन्हैया लाल यांनी युपीएससी (UPSC) परीक्षेसाठी एक अचूक रणनीती तयार केली आहे, ज्याद्वारे ते प्रशासकीय व्यवस्थेवर आपली पकड मजबूत करू पाहतात. मात्र, प्रत्येक साम्राज्यात एक बंडखोर असतोच, तसाच इथे ‘आदित्य’ नावाचा एक तरुण त्यांच्या या व्यवस्थेला आव्हान देतो. गुरू आणि शिष्य यांच्यातील हा वैचारिक आणि राजकीय लढा म्हणजे ‘संकल्प’ आहे. मात्र ही कथा कागदावर जितकी रंजक वाटते, तितकी ती पडद्यावर प्रभावीपणे उतरलेली दिसत नाही.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर नाना पाटेकर यांनी आपल्या पद्धतीने भूमिका सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्या नेहमीच्या आक्रमक आणि ऊर्जावान शैलीची इथे कमतरता जाणवते. सिरीजची पटकथा इतकी संथ आहे की नानांसारखा दिग्गज कलाकारही याला गती देऊ शकलेला नाही. मोहम्मद जीशान अय्यूब याने आपल्या वाट्याला आलेली भूमिका प्रामाणिकपणे निभावली आहे आणि कुब्रा सैतचा अभिनयही उल्लेखनीय आहे. मात्र, या सर्व तगड्या स्टारकास्टला एकत्र बांधून ठेवणारा जो एक ‘संवाद’ हवा असतो, तो इथे कुठेेतरी हरवल्यासारखा वाटतो.

दिग्दर्शक रेशू नाथ यांनी एक महत्त्वाचा आणि गंभीर विषय हाताळला असला तरी, सिरीजमध्ये सुसंगततेचा मोठा अभाव आहे. कथानक अनेक ठिकाणी भरकटलेले वाटते आणि ज्या राजकीय थ्रिलरची अपेक्षा प्रेक्षक करत होते, तो थरार यात शोधूनही सापडत नाही. अनेक प्रसंग विनाकारण ओढून ताणून मोठे केल्याचे जाणवते, ज्यामुळे प्रेक्षकांची मालिकेवरील पकड ढिली होते. तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केला तर पार्श्वसंगीत आणि मांडणी सरासरी दर्जाची आहे.

सध्याच्या काळात जेव्हा ओटीटीवर एकापेक्षा एक सरस राजकीय ड्रामे उपलब्ध आहेत, अशा वेळी ‘संकल्प’ ही सिरीज प्रेक्षकांना फार काळ खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. ज्यांना केवळ नाना पाटेकर यांच्यासाठी ही सिरीज पाहायची आहे, ते कदाचित एकदा पाहू शकतात, पण एक दर्जेदार राजकीय थ्रिलर म्हणून ही सिरीज निराशा करते. जर या सिरीजची पटकथा अधिक घट्ट असती आणि मांडणीत वेग असता, तर नानांचे हे पदार्पण अधिक गाजले असते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
20,536 वेळा पाहिलं