क्षयरोग निर्मूलनासाठी शंभर दिवसांची मोहीम

भारताला क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्दिष्टाने केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. देशभरात क्षयरोग मुक्त भारत अभियान – शंभर दिवसांची विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्रात या मोहिमेची अंमलबजावणी अत्यंत व्यापक स्तरावर केली जाणार असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि जनसहभागाच्या जोरावर क्षयरोगाचे पूर्णतः निर्मूलन करण्याचा निर्धार राज्य आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. यावेळच्या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेवरआधारित संवेदनशीलता आराखड्याचा वापर केला जात आहे. राज्यातील अकरा हजार एक्क्याण्णव गावे आणि शहरी प्रभाग शोधून काढण्यात आले आहेत, जिथे क्षयरोगाचा धोका सर्वाधिक आहे. या निवडक जोखीमग्रस्त भागांमध्ये आरोग्य यंत्रणा विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे नेमक्या कोणत्या भागात संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त आहे, याचे अचूक विश्लेषण करणे प्रशासनाला सोपे झाले आहे.

ही शंभर दिवसांची मोहीम केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून तिचे स्वरूप त्रिस्तरीय आहे. जास्तीत जास्त संशयित रुग्णांची तपासणी करून त्यांना त्वरित औषधोपचार सुरू करणे. क्षयरोगामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रुग्णांना वेळेत आणि योग्य दर्जाचे उपचार मिळवून देणे. नवीन रुग्णांना होणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. यासाठी राज्यभरात निक्षय शिबिरांचे आयोजन केले जाणार असून, दुर्गम भागात मोबाईल व्हॅनद्वारे घरपोच तपासणी सुविधा पुरवली जाणार आहे.

केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता या लढ्यात समाजालाही सामावून घेतले जात आहे. निक्षय मित्र ही संकल्पना या मोहिमेचा कणा आहे. स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्ती क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पौष्टिक आहाराच्या टोपल्या आणि मानसिक आधार देतात. आतापर्यंत हजारो रुग्णांना या माध्यमातून मदतीचा हात मिळाला असून, ही संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यात क्षयरोगाच्या अचूक निदानासाठी प्रगत वैद्यकीय चाचण्यांचा वापर केला जात आहे. विशेषतः ज्या रुग्णांमध्ये नेहमीच्या चाचण्यांतून निदान होत नाही, त्यांच्यासाठी या चाचण्या अत्यंत प्रभावी ठरत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये प्रत्येक घरी जावून स्क्रीनिंगवर विशेष भर देण्यात आला आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
6,201 वेळा पाहिलं