
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करताना एका गंभीर जागतिक संकटाकडे लक्ष वेधले आहे. पश्चिम आशियात, विशेषतः इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगावर पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईचे सावट निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या कठीण काळात भारतीयांनी एकजूट दाखवावी आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधानांनी नमूद केले की, मार्च महिना जागतिक स्तरावर अत्यंत उलथापालथीचा ठरला आहे. कोरोना संकटातून सावरल्यानंतर जग प्रगतीच्या पथावर जाईल अशी अपेक्षा होती, मात्र विविध भागांतील युद्धजन्य परिस्थितीने नवीन आव्हाने उभी केली आहेत. ज्या भागात सध्या युद्ध सुरू आहे, तो भाग जगाच्या ऊर्जा गरजा पूर्ण करणारे मुख्य केंद्र आहे. यामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून पेट्रोल-डिझेलचे संकट गडद होत आहे. युद्धाचा परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीवर झाला असून, तिथून होणारी कच्च्या तेलाची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पंतप्रधानांनी देशवासियांना आश्वस्त केले की, अशा आव्हानात्मक परिस्थितीतही भारत खंबीरपणे उभा आहे. गेल्या दशकात भारताने विकसित केलेले जागतिक संबंध आणि आपली अंतर्गत क्षमता यामुळे आपण या संकटाचा सामना करण्यास सज्ज आहोत. आपल्या परराष्ट्र धोरणामुळे आणि विविध देशांकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे भारत या संकटावर यशस्वीपणे मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटीहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. युद्धाच्या या भीषण परिस्थितीतही तिथल्या सरकारांनी भारतीय नागरिकांना दिलेले सहकार्य आणि त्यांच्या सुरक्षिततेची घेतलेली काळजी, याबद्दल पंतप्रधानांनी विशेष आभार मानले. अनेक भारतीयांचे नातेवाईक या भागात राहत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची केंद्र सरकारला काळजी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
राजकारण आणि अफवांना आळा घालण्याचे आवाहन इंधन संकटाच्या मुद्द्यावरून काही घटकांकडून केल्या जाणाऱ्या राजकारणावर पंतप्रधानांनी कडक शब्दांत टीका केली. हा विषय एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या हिताचा आहे, यात स्वार्थी राजकारणाला जागा नाही, असे ते म्हणाले. पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा देशाचे नुकसान करू शकतात. नागरिकांनी केवळ सरकारी यंत्रणांनी दिलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. याच भागात पंतप्रधानांनी मेरा युवा भारत उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, देशातील प्राचीन हस्तलिखितांची माहिती गोळा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ज्ञान भारतम सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे सांगितले. जर कोणाकडे जुनी हस्तलिखिते असतील, तर त्याचे फोटो ज्ञान भारतम ॲपवर शेअर करण्याचे आवाहन त्यांनी केले.