ट्रम्प यांचा मित्रराष्ट्रांना कडक इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांद्वारे मित्रराष्ट्रांना उघडपणे सुनावले आहे. स्वतःच्या तेलाची सुरक्षा आता स्वतःच करा. अमेरिका मदतीला येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे विधान केले आहे. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. या मार्गातून जगातील एकूण खनिज तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे वीस टक्के व्यापार होतो. हा मार्ग बंद झाल्यामुळे ब्रिटन, फ्रान्स, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ब्रिटनमध्ये विमान इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ट्रम्प यांनी ब्रिटन आणि फ्रान्सवर विशेष टीका केली आहे. ज्या देशांना होर्मुझ बंदमुळे इंधन मिळत नाहीये, विशेषतः ब्रिटन, ज्यांनी इराणविरुद्धच्या कारवाईत सहभागी व्हायला नकार दिला होता, त्यांना माझा सल्ला आहे की, एकतर अमेरिकेकडून तेल खरेदी करा, कारण आमच्याकडे मुबलक साठा आहे किंवा थोडे धैर्य दाखवून स्वतः सामुद्रधुनीमध्ये जा आणि ताबा मिळवा, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ट्रम्प यांनी ब्रिटनला टोला लगावला की, तुम्ही आमच्यासाठी तिथे नव्हता, तर आता अमेरिकाही तुमच्या मदतीला येणार नाही. तसेच इस्रायलला लष्करी मदत घेऊन जाणाऱ्या विमानांना आपली हवाई हद्द वापरू न दिल्याबद्दलही त्यांनी फ्रान्सचा निषेध केला.

ट्रम्प यांनी इराणलाही शेवटचा इशारा दिला आहे. त्यांनी इराणला दिलेली दहा दिवसांची सवलत सहा एप्रिल रोजी संपत आहे. जर त्यावेळेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली केली नाही आणि कोणताही करार झाला नाही. तर अमेरिका इराणचे तेल विहिरी, वीज प्रकल्प हे मुख्य तेल निर्यात केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त करेल, अशी धमकी त्यांनी दिली आहे. या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दर प्रति बॅरल एकशे सात डॉलरच्या पार गेले आहेत. इंधन महागल्यामुळे जगभरात मालवाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. या घडामोडींमुळे सहा एप्रिलच्या डेडलाईनकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जर तोपर्यंत तोडगा निघाला नाही, तर आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,059 वेळा पाहिलं