घरांच्या बाजारमूल्य दरात बदल नाही

महाराष्ट्र सरकारने नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील वार्षिक बाजारमूल्य दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एक एप्रिल २०२६ पासून लागू होणारे हे दर गेल्या वर्षीप्रमाणेच जैसे-थे राहणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे घर खरेदी करणारे सामान्य नागरिक आणि मंदीचा सामना करणाऱ्या बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि विशेषतः पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदी: गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या विक्रीत झालेली घट आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे विकासक अडचणीत होते. क्रेडाई सारख्या संघटनांनी सरकारकडे दरवाढ न करण्याची सातत्याने विनंती केली होती. महागाईच्या काळात घर खरेदी करणे आवाक्याबाहेर जाऊ नये, यासाठी सरकारने दरवाढीचा टक्का शून्य ठेवला आहे.

बाजारमूल्य दरात वाढ केलेली नसली तरी, नोंदणी व मुद्रांक शुल्कातून मिळणाऱ्या महसुलात राज्याने चांगली झेप घेतली आहे. ३० मार्च २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, सुमारे साठ हजार पाचशे अडुसष्ट पूर्णांक चौऱ्यांण्णव कोटी रुपये जमा झाले आहेत. आय-सरिता या ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्वाधिक एकोणपन्नास हजार पाचशे चौतीस कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. संगणकीय सादरीकरण आणि ऑनलाइन भाडेकरार नोंदणीतूनही कोट्यवधींचा महसूल जमा झाला आहे.

दर स्थिर ठेवले असले तरी, सरकारने मूल्यन तक्त्यामध्ये काही तांत्रिक बदल केले आहेत. यात नवीन विकास आराखडे आणि प्रादेशिक योजनांनुसार झोनिंगमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नवीन सर्व्हे नंबरचा समावेश करणे आणि गावांमधील विसंगती दूर करणे यांमुळे दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वास्तववादी होणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात सरासरी तीन पूर्णांक एकोणनव्वद टक्के दरवाढ करण्यात आली होती. त्यात ग्रामीण भागात तीन पूर्णांक छत्तीस टक्के, नगरपालिका क्षेत्रात चार पूर्णांक सत्त्याण्णव टक्के तर महानगरपालिका क्षेत्रांत पाच पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ झाली होती. मुंबईसाठी ही वाढ तीन पूर्णांक एकोणचाळीस टक्के होती. मात्र, २०२६-२७ साठी संपूर्ण राज्यात कुठेही दरवाढ न झाल्याने मागील वर्षाचेच दर कायम राहतील. या निर्णयामुळे आता नवीन आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त बोजा पडणार नसल्याने, घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
8,828 वेळा पाहिलं