राधानगरीत वाघांचा संचार वाढला
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. या निसर्गरम्य पट्ट्यात आता रायबा आणि सरदार या दोन नवीन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. या नवीन नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी परिसरातील वाघांची एकूण संख्या आता नऊवर पोहोचली आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी अभयारण्यात गेल्या काही महिन्यांपासून दोन पूर्णतः प्रौढ नर वाघांचा वावर दिसून येत होता. ट्रॅप कॅमेरे आणि पाऊलखुणांच्या वैज्ञानिक विश्लेषणातून या वाघांची ओळख पटवण्यात आली आहे. रायबा हा वाघ साधारण चार ते पाच वर्षांचा असून तो राधानगरीच्या जंगलात स्थिरावला आहे. सरदार या वाघानेही या परिसरात आपले स्वतंत्र क्षेत्र निर्माण केले आहे. याशिवाय राणोजी नावाच्या तिसऱ्या नर वाघाचीही नोंद झाल्याने राधानगरीत आता एकाच वेळी तीन नर वाघांचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीनंतर वाघांच्या संख्येबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, ताज्या गणनेनुसार या क्षेत्रात आता एकूण नऊ वाघांचे अस्तित्व आहे. सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, सरदार, शिलेदार अशी या वाघांची नावे आहेत. राधानगरी अभयारण्य हे कर्नाटकचा काली व्याघ्र प्रकल्प आणि गोव्यातील मोलेम अभयारण्याला जोडणारा एक महत्त्वाचा वन्यजीव मार्गिका आहे. सावंतवाडी-दोडामार्ग ते राधानगरी आणि पुढे चांदोली-कोयना असा हा मार्ग वाघांच्या स्थलांतरासाठी अतिशय सुरक्षित मानला जातो. या कॉरिडॉरमध्ये वाघांची संख्या वाढणे, हे निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने यश मानले जात आहे.
राधानगरीत वाघांचे अस्तित्व केवळ पर्यावरण संतुलनासाठीच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचे आहे. वाघांच्या दर्शनामुळे या भागात पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सध्या राधानगरीत नर वाघांची संख्या समाधानकारक असली, तरी तिथे कायमस्वरूपी मादी वाघिणीची नोंद अद्याप झालेली नाही. जर एखाद्या मादी वाघिणीला येथे स्थलांतरित केले किंवा नैसर्गिकरीत्या येथे मादी स्थिरावली, तर राधानगरी हे वाघांचे प्रजनन केंद्र बनू शकते.