भारताने पाकिस्तानचा डाव उधळला

अरबी समुद्रात वाढत्या सामरिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली सागरी सुरक्षा आणि टेहळणी यंत्रणा अधिक कडक केली आहे. पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने आपले अत्याधुनिक टेहळणी जहाज आयएनएस ध्रुव अरबी समुद्रात तैनात केले होते. भारताच्या या पावलामुळे शेजारील देशांच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र हालचालींवर लक्ष ठेवण्याची भारताची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

आयएनएस ध्रुव हे केवळ एक जहाज नसून, ते भारताचे एक अत्याधुनिक तरंगते संवेदक आहे. हे जहाज लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यात अत्यंत कार्यक्षम आहे. जेव्हा पाकिस्तानने आपली क्षेपणास्त्र चाचणी करण्याची तयारी सुरू केली, तेव्हा भारतीय संरक्षण यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून ‘ध्रुव’ला योग्य ठिकाणी तैनात केले. या जहाजावर बसवलेले अत्याधुनिक रडार आणि सेन्सर्स क्षेपणास्त्राचा मार्ग, त्याचा वेग आणि ते नेमके कोठे पडणार आहे, याची अचूक माहिती गोळा करण्यास सक्षम आहेत.

पाकिस्तानकडून वारंवार त्यांच्या विविध क्षेपणास्त्र प्रणालींची चाचणी केली जाते. मात्र, अरबी समुद्रातील ही चाचणी भारताच्या सामरिक दृष्टीने महत्त्वाची होती. भारताने या चाचणीचा केवळ मागोवाच घेतला नाही, तर त्या क्षेपणास्त्राच्या तांत्रिक क्षमतांची माहितीही गोळा केली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारताची ही सक्रियता दर्शवते की, हिंद महासागर आणि अरबी समुद्रात होणाऱ्या कोणत्याही संशयास्पद किंवा लष्करी हालचालींकडे भारत दुर्लक्ष करणार नाही.

दक्षिण आशियाई प्रदेशात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. अशा परिस्थितीत क्षेपणास्त्र चाचण्या या केवळ लष्करी सराव नसून त्या शक्ती प्रदर्शनाचा एक भाग असतात. आयएनएस ध्रुव’च्या तैनातीमुळे भारताने पाकिस्तानला आणि पर्यायाने चीनलाही एक स्पष्ट संदेश दिला आहे की, भारताची नजर सीमेपलीकडील प्रत्येक हालचालीवर आहे. डीआरडीओ आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे या मोहिमेवर देखरेख केल्याचे समजते. गेल्या काही काळापासून अरबी समुद्रात चाचेगिरी आणि इतर देशांच्या नौदलांचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यातच पाकिस्तान आणि चीनची वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आयएनएस ध्रुव सारखी जहाजे भारताला पूर्वसूचना प्रणाली पुरवतात. यामुळे शत्रूच्या क्षेपणास्त्राचा मागोवा घेणे आणि आवश्यक पडल्यास त्याला नष्ट करणे सोपे होते.






16,497 वेळा पाहिलं