
न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनमध्ये सोमवारी २० एप्रिल रोजी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे भीषण पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने वेलिंग्टनमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. मुसळधार पावसमाळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, शहराच्या अनेक भागांत पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
न्यूझीलंडच्या हवामान विभागाने वेलिंग्टन आणि वैरापा भागात पावसाचा लाल इशारा जाहीर केला आहे. महापौर अँड्र्यू लिटल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलिंग्टनमध्ये एका तासापेक्षा कमी वेळात तीन इंच पावसाची नोंद झाली आहे, जो आतापर्यंतचा एक विक्रम आहे. वाढत्या धोक्यामुळे हा लाल इशारा कायम ठेवण्यात आला असून, हवामान अधिक बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती व्यावसायिक क्षेत्रासह दक्षिण उपनगर व्होगेलटाऊन, न्यूटाऊन, बेरहॅम्पोर आणि आयलँड बेमध्ये भीषण पूर आला आहे. अनेक भागात दरडी कोसळल्यामुळे रस्ते बंद झाले असून किमान एका घराला दरडीचा तडाखा बसला आहे. बेसिन रिझर्व्ह जवळील दोन मार्ग आणि स्टेट हायवे दोन वरील काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. हट्ट नदीची पातळी वाढत असल्याने केनेडी गुड आणि मेलिंग पूल रात्री आठ वाजेपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोरी उपनगरातील एका पूरग्रस्त घरातून साठ वर्षीय फिलिप सटन नावाची व्यक्ती बेपत्ता झाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वेलिंग्टन प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने सखल आणि पूरप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. विस्थापित झालेल्या लोकांसाठी वेलिंग्टन सिटी मिशन येथे आपत्कालीन मदत केंद्र उभारण्यात आले आहे. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक आपत्कालीन फोनला प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे, या संकटकाळात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संपही मागे घेतला आहे. वैनीओमाता मधील कोनिनी, वेदरबी आणि राटा स्ट्रीटवरील रहिवाशांना वाढत्या पाणी पातळीमुळे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि शक्य असल्यास लवकर घरी परतण्याचे आवाहन केले आहे. पुराच्या पाण्यातून गाडी चालवण्याचा किंवा चालत जाण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला धोका जाणवत असेल, तर अधिकृत इशाऱ्याची वाट न पाहता तातडीने उंचावर असलेल्या सुरक्षित ठिकाणी जा, अशा सूचना प्रशासनाने यांनी दिल्या आहेत.