ब्रिटनमध्ये वेळेआधीच उन्हाळ्याची चाहूल

ब्रिटनमध्ये या आठवड्यात हवामानात बदल झाला असून इंग्लंड आणि वेल्स भागात तापमान सुमारे एकवीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशभरात उच्च दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोरडे, स्थिर आणि उबदार वातावरण तयार झाले आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस इथे साधारण तापमान दहा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास असते. एकवीस अंश सेल्सिअस हे तापमान ब्रिटनमधील उन्हाळ्यात म्हणजेत जून ते ऑगस्ट दरम्यात असते. आता एवढी उष्णता जाणवणे ही एक वेगळी बाब मानली जात असून, यामुळे ब्रिटनमध्ये उन्हाळ्याची चाहूल वेळेआधीच लागल्याचे चित्र दिसत आहे.

या उष्ण हवामानाचा सर्वाधिक परिणाम दक्षिण इंग्लंड आणि वेल्स या भागांत जाणवत आहे. अनेक ठिकाणी निरभ्र आकाश, भरपूर ऊन आणि सौम्य वारे वाहत असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने समुद्रकिनारे, उद्याने आणि विविध पर्यटनस्थळांकडे धाव घेत आहेत. काही शहरांमध्ये तापमान एकोणीस ते एकवीस अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, यामुळे वातावरणात सुखद उबदारपणाही निर्माण झाला आहे.

हवामानातील या बदलामागे दक्षिणेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा आणि स्थिर उच्च दाब प्रणालीचा मोठा प्रभाव असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या प्रणालीमुळे ढगांची संख्या कमी झाली असून सूर्यप्रकाश थेट जमिनीपर्यंत पोहोचत आहे, परिणामी तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. ही उष्ण लाट आणखी काही दिवस कायम राहू शकते आणि नागरिकांना सरासरीपेक्षा जास्त तापमान अनुभवायला मिळू शकते, असेही हवामान खात्याने नमूद केले आहे.

दुसरीकडे, देशाच्या उत्तरेकडील भागात मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. स्कॉटलंड आणि उत्तर प्रदेशांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागात समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान तुलनेने कमी राहू शकते. तसेच, रात्रीच्या वेळी काही भागांत थंडावा निर्माण होऊन दव किंवा धुक्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या उबदार हवामानामुळे पर्यटन क्षेत्राला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. नागरिक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. हवामान खात्याने नागरिकांना या सूर्यप्रकाशाचा आनंद घेताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, तसेच पुढील काही दिवसांत हवामानात पुन्हा अचानक बदल होऊ शकतो, याची जाणीव ठेवण्यासही सांगितले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
20,187 वेळा पाहिलं