
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आणि प्रतिनिधींची भेट घेतली. भारताच्या अध्यक्षतेखाली यंदा ही संघटना बहुपक्षीयता बळकट करण्यासाठी आणि सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणण्यासाठी आणि विकसनशील देशांच्या आकांक्षांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ब्रिक्स ही एक महत्त्वाची संस्था म्हणून आकारास आली असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
या बैठकीच्या उद्घाटन सत्रात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या महत्त्वावर भर दिला. सध्याच्या जागतिक संघर्षांच्या पार्श्वभूमीवर संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानातील प्रगतीचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक विकासासाठी व्हायला हवा, असे सांगतानाच त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सर्व देशांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. अन्न, ऊर्जा आणि आरोग्य सुरक्षेची आव्हाने पेलण्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला ब्राझील, रशिया, इराण, इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. ‘लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद पार पडली. ही संकल्पना पंतप्रधानांच्या ‘मानवता प्रथम’ आणि ‘लोक-केंद्रित’ दृष्टिकोनातून प्रेरित आहे. उद्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ब्रिक्सच्या वीस वर्षांच्या वाटचालीवर आणि जागतिक प्रशासकीय सुधारणांवर विशेष चर्चा सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
डॉ. जयशंकर यांनी ब्रिक्सच्या विस्तारावर भाष्य करताना सांगितले की, बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार या संघटनेने आपले सदस्यत्व आणि कार्यक्षेत्र विस्तारले आहे. ब्रिक्सची ताकद ही तिथल्या विविधतेत आणि स्वातंत्र्यात आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक यांसारख्या संस्थांनी जगासमोर सक्षम पर्याय उभा केला आहे. तसेच कृषी, आरोग्य आणि व्यापार क्षेत्रातील भागीदारीमुळे सदस्य देशांमधील परस्पर संबंध अधिक दृढ झाले आहेत, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
ब्रिक्स देशांमधील लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सुरू करण्यात आलेले नवीन व्यासपीठ या संघटनेसाठी लाभदायक ठरेल. शिवाय कृषी क्षेत्रातील सहकार्यामुळे येणाऱ्या काळात ही संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय सामंजस्य, मोकळेपणा आणि सर्वांच्या सहमतीने घेतलेले निर्णय हेच ब्रिक्सचे मूळ आधारस्तंभ आहेत. या प्रयत्नांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण होईल आणि सर्वसमावेशक विकासाला गती मिळेल, असे सांगून त्यांनी या सत्राचा समारोप केला.