
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. बुधवार रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय हवामान खात्याने ब्रुकलिन, स्टेटन आयलंड, क्वीन्स आणि मॅनहॅटन या प्रमुख भागांसाठी पुराचा इशारा जाहीर केला होता.
या भीषण वादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर, विशेषतः भुयारी रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. वाहतूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक स्थानकांमध्ये पाणी साचल्यामुळे ई रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत होत्या. तर एफ रेल्वे मार्ग अंशतः बंद करण्यात आला होता. रेल्वे रुळांवरून आणि स्थानकांमधून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते.
शहरातील रस्त्यांवर अचानक आलेल्या पुरामुळे अनेक वाहनचालक जागच्या जागी अडकून पडले होते. प्रशासनाने नागरिकांना आणि वाहनचालकांना साचलेल्या पाण्यामधून प्रवास न करण्याचा कडक सल्ला दिला होता. ब्रुकलिनमधील किंग्स हायवेवरील एका चौकात अवाढव्य झाड कोसळल्याने तिथली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, तसेच क्वीन्स मधील बेसाइड आणि जमैका या परिसरातही पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते.
न्यूयॉर्कचे महापौर झोहरान म्मदानी यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर सांगितले की, पावसाचा वेग इतका तीव्र होता की शहराची मलनिस्सारण यंत्रणा एकाच वेळी एवढे पाणी वाहून नेण्यास असमर्थ ठरली. ही यंत्रणा ताशी केवळ दोन इंच पाऊस हाताळण्यासाठी सक्षम आहे, मात्र अनेक भागांत त्यापेक्षा कितीतरी अधिक पाऊस पडल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकला नाही. वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून हजारो नागरिकांना वीज पुरवठा खंडित झाल्याचा सामना करावा लागला.
प्रशासनाने बाधित नागरिकांना आपल्या मालमत्तेच्या नुकसानीची नोंदणी करण्यासाठी विशेष संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. भुयारी रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे अशा प्रकारच्या अतिवृष्टीच्या घटना वाढत असल्यामुळे, शहर प्रशासन भविष्यात अतिवृष्टीचे पाणी साठवून ठेवणारे विशेष प्रकल्प उभारण्यावर भर देत आहे.