तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचा प्रवेश

तमिळनाडूच्या राजकारणात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. तब्बल एकोणसाठ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाने तमिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या आमदारांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील सत्ताधारी आघाडी अधिक मजबूत झाली आहे.

मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या ऐतिहासिक मंत्रिमंडळ विस्तारात प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे आमदार एस. राजेश कुमार आणि पी. विश्वनाथन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. चेन्नई येथील लोकभवन येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी या नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन १९६७ मध्ये काँग्रेस पक्षाची राज्यातील सत्ता गेली होती. त्यानंतर द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रादेशिक पक्षांनीच आलटून-पालटून राज्याची सत्ता सांभाळली. गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि द्रमुक एकत्र मिळून निवडणूक लढवत असले, तरी काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी न होता बाहेरून पाठिंबा दिला होता. मात्र, आता एकोणसाठ वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटल्यानंतर काँग्रेस थेट सत्तेत सहभागी झाली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, मित्रपक्षांना सत्तेत वाटा देऊन मुख्यमंत्री विजय यांनी आघाडीतील एकजूट दाखवून दिली आहे. नवीन मंत्र्यांना लवकरच त्यांच्या खात्यांचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या गोटात या निर्णयामुळे कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, यामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला नवीन उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नवीन मंत्रिमंडळ आता राज्यातील जनतेच्या विकासासाठी आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
6,574 वेळा पाहिलं