अकरावी प्रवेश नोंदणीला मुदतवाढ
राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय संगणकीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नियमित फेरी क्रमांक एकसाठीची नोंदणी मुदत वाढविण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना 23 मे २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
शैक्षणिक वर्ष २०२६ -२७ साठी सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २१ मे २०२६ पर्यंत तब्बल नऊ लाख शहाण्णव हजार सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी संगणकीय नोंदणी पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने तसेच कोणीही प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार २१ ते २३ मेदरम्यान विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरणे, त्यात दुरुस्ती करणे तसेच दुसऱ्या भागात किमान एक आणि जास्तीत जास्त दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. याच कालावधीत व्यवस्थापन, अंतर्गत आणि अल्पसंख्याक आरक्षण कोट्यांतील पसंतीक्रम निश्चित करून टाळेबंद करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 24 मे ते २६ मेदरम्यान विद्यार्थ्यांचे गुण, पसंतीक्रम आणि आरक्षणानुसार संगणकीय पद्धतीने गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
२७ मे रोजी सकाळी अकरा वाजता पहिली महाविद्यालय वाटप यादी आणि प्रवेशासाठीची किमान गुणमर्यादा जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संदेश सेवेद्वारेही माहिती पाठवली जाणार आहे. त्यानंतर २७ मे ते २९ मेदरम्यान विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात मूळ कागदपत्रे आणि शुल्कासह उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या फेरीनंतर उर्वरित रिक्त जागांची माहिती १ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असून त्याच दिवशी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले जाणार आहे.
दरम्यान, प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांना अर्ज भरताना अडथळ्यांचा सामना करावा लागला. मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी प्रवेश झाल्याने संगणकीय प्रणालीवर ताण आल्याचे सांगण्यात आले. यामुळे निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेऊनच मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अधिकृत प्रवेश संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच शिक्षण विभागाच्या मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.