रत्नागिरीच्या पोलीस ताफ्यात अत्याधुनिक नौका
रत्नागिरी पोलीस दलाच्या सागरी सुरक्षा ताफ्यात अत्याधुनिक वेगवान नौका दाखल करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीची सुरक्षा अधिक मजबूत आणि जलद करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. जुन्या वेगवान नौकेची दुरुस्ती करून तिला नव्या स्वरूपात पुन्हा सेवेत आणण्यात आले आहे. यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या नौकेमुळे समुद्रातील गस्त अधिक वेगवान आणि प्रभावी होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते या नौकेचे पूजन करून ती अधिकृतपणे पोलीस सेवेत दाखल करण्यात आली. या वेगवान नौकेमुळे रत्नागिरीच्या विस्तीर्ण समुद्र परिसरात पोलिसांची उपस्थिती अधिक सक्षम होणार असून, किनारपट्टीवरील सुरक्षाव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण आणि संवेदनशील समुद्रकिनाऱ्यामुळे सागरी सुरक्षा राखणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत असते. यापूर्वी पोलीस दलाला मिळालेल्या आठ वेगवान नौकांपैकी अनेक नौका तांत्रिक बिघाडामुळे निष्क्रिय झाल्या होत्या. त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने टप्प्याटप्प्याने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सहा महिन्यांपूर्वी पाठवण्यात आलेली ही नौका आता नव्या क्षमतेसह पुन्हा सेवेत दाखल झाली आहे.
या वेगवान नौकेचा वापर नियमित सागरी गस्तीसह आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी केला जाणार आहे. विशेषतः पावसाळ्यात किंवा वादळी हवामानात समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांना मदत पोहोचवणे, दुर्घटनांमध्ये बचावकार्य करणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे यासाठी ही नौका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे समुद्रातील मदतकार्य अधिक जलद आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या नौकेच्या तांत्रिक क्षमतांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी घेतली. किनारपट्टीवरील नागरिक, मच्छीमार आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ही नौका प्रभावी संरक्षण कवच ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. या नव्या सुविधेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली असून, समुद्रातील संकटांचा सामना करण्यासाठी रत्नागिरी पोलिस अधिक सज्ज झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.