दक्षिण भारत सफरीसाठी सुवर्ण रथ सज्ज

भारतीय रेल्वेच्या पर्यटन विभागाने २०२६ –२७ या पर्यटन हंगामासाठी सुधारित आणि अधिक आलिशान ‘सुवर्ण रथ’ पर्यटन रेल्वेगाडी सुरू करण्याची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत भारतीय रेल्वे भोजन व पर्यटन महामंडळाने या विशेष रेल्वेगाडीचे नवे रूप सादर केले आहे. दक्षिण भारतातील ऐतिहासिक वारसा, निसर्गसंपन्न प्रदेश आणि सांस्कृतिक वैभव अनुभवण्यासाठी ही रेल्वेगाडी प्रसिद्ध मानली जाते. नव्या रूपात या गाडीमध्ये पारंपरिक ऐश्वर्याबरोबर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

या आलिशान रेल्वेगाडीत नव्याने सजवलेले अंतर्गत भाग, आकर्षक लाकडी सजावट, आरामदायी गाद्या, उच्च प्रतीची स्नानसुविधा आणि आधुनिक मनोरंजन व्यवस्था देण्यात आली आहे. प्रत्येक कक्षात स्मार्ट दूरचित्रवाणी संच, इंटरनेट सुविधा आणि सुरक्षिततेसाठी आधुनिक अग्निसूचना यंत्रणा तसेच सीसीटीव्ही प्रणाली बसवण्यात आली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी प्रशिक्षित आदरातिथ्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. भोजनासाठी उत्कृष्ट दर्जाची भांडी आणि आकर्षक भोजन व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

‘सुवर्ण रथ’मध्ये एकूण चाळीस आलिशान कक्ष असून त्यात ऐंशी प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये तेरा दुहेरी खाटांचे कक्ष, सव्वीस स्वतंत्र खाटांचे कक्ष आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुसज्ज एक कक्ष समाविष्ट आहे. रेल्वेगाडीत रुची आणि नलपका ही दोन उत्कृष्ट भोजनगृहे असून येथे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. ‘मदिरा’ नावाचा विश्रांती कक्षही तयार करण्यात आला आहे. तसेच ‘आरोग्य’ उपचार व व्यायाम केंद्रात आयुर्वेदिक उपचार, मर्दन आणि आधुनिक व्यायाम साधनांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या पर्यटन हंगामात तीन प्रमुख प्रवास आराखडे जाहीर करण्यात आले आहेत. ‘कर्नाटक गौरव’ हा पाच रात्री आणि सहा दिवसांचा प्रवास बेंगळुरू, बांदीपूर, म्हैसूर, हळेबीडू, चिक्कमगळूर, हम्पी आणि गोवा या ठिकाणांना जोडणार आहे. ‘दक्षिणेची रत्ने’ या प्रवासात बेंगळुरू, म्हैसूर, कांचीपुरम, महाबलीपुरम, तंजावूर, चेट्टीनाड, कोची आणि चेरतला या ठिकाणांचा समावेश आहे. ‘कर्नाटक दर्शन’ हा तीन रात्री आणि चार दिवसांचा प्रवास आहे. यात बेंगळुरू, बांदीपूर, म्हैसूर आणि हम्पी या स्थळांना भेट देता येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी निवडक प्रवासांवर विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. काही प्रवासांवर प्रकाशित दरांवर वीस टक्के सवलत देण्यात येणार आहे. आगाऊ संपूर्ण भरणा करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे.

या प्रवास संकुलात रेल्वेतील निवास, भोजन, निवडक पेये, वातानुकूलित वाहनांतून पर्यटन, स्मारक प्रवेश शुल्क आणि नियोजित स्थळांवरील भोजनाचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२६ पासून मार्च २०२७ पर्यंत विविध प्रवास फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
2,665 वेळा पाहिलं