टीबीमुक्त मुंबईसाठी लोकसहभाग आवश्यक

मुंबईला क्षयरोगमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे, असे वक्तव्य राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. क्षयरोग मुक्त भारत अभियान कानाकोपऱ्यात प्रभावीपणे पोहचवण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी सायन येथील पालिका रुग्णालयात विशेष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच क्षयरोग मुक्त मुंबई अभियानावर आधारित एका महत्त्वपूर्ण माहिती पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि महानगरपालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या आता जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. या वाढत्या आणि दाट लोकवस्तीमुळे क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे लोकभवनच्या पुढाकाराने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

मुंबईला क्षयरोगमुक्त करण्यात यश मिळवले, तर ते संपूर्ण जगासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईची प्रतिमा अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. या अभियानाचा विस्तार करण्यासाठी आणि ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, रेड क्रॉस सोसायटी, राष्ट्रीय छात्र सेना, ‘माय युवा भारत’चे स्वयंसेवक, स्काऊट व गाईड, स्वयंसेवी संस्था तसेच इतर सामाजिक संघटनांना मोठ्या प्रमाणावर सहभागी केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी संपूर्ण देश क्षयरोगमुक्त होणे गरजेचे असून, त्या दृष्टीने मुंबईतील हे अभियान मैलाचा दगड ठरेल.

क्षयरोगावर जर योग्य आणि अचूक वेळी उपचार केले, तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या आजाराच्या प्रतिबंधासाठी आणि उपचारासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या तपासण्या व औषधोपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जातात. ही मोलाची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची आज मोठी आवश्यकता आहे. जेव्हा सरकार आणि संपूर्ण समाज एकत्रित येऊन एखाद्या संकटाविरोधात कार्य करतो, तेव्हा त्यात हमखास यश लाभते, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना दिला.

या मुख्य कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी धारावी येथील एकनाथराव गायकवाड आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील क्षयरोग अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेविकांशी थेट संवाद साधला; तसेच तेथील क्षयरुग्णांना पोषण आहार संचाचे वाटप केले. या सामाजिक कार्यात स्वतः पुढाकार घेत राज्यपालांनी तीस क्षयरुग्णांच्या संपूर्ण पोषण आहाराची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली. राज्यपालांच्या या अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद निर्णयाबद्दल महापौर रितू तावडे यांनी त्यांना ‘निक्षय मित्र’ प्रमाणपत्र प्रदान करून गौरविले. शेवटी राज्यपालांच्या हस्ते भारत पेट्रोलियम, न्यारा एनर्जी, अदाणी फाउंडेशन आणि मेट्रोपोलीस हेल्थ या नामांकित संस्थांना क्षयरोग निर्मूलन अभियानातील त्यांच्या महत्त्वपूर्ण आर्थिक व सामाजिक सहभागाबद्दल विशेष प्रशस्ती प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,693 वेळा पाहिलं