महाराष्ट्रात काश्मिरी केशराचे उत्पादन

केशराचे पीक मुख्यतः काश्मीर राज्यामध्येच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशराचे यशस्वी उत्पादन घेण्याचा प्रयोग पुण्यात करण्यात आला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शैलेश मोडक या तरुणाने भन्नाट प्रयोग केला आहे. आणखी विशेष म्हणजे ही केशराची शेती कंटेनरमध्ये केली आहे. त्याला ‘कंटेनर फारमिंग’ असेही म्हणतात. शैलेश हे मूळचे नाशिकचे राहणारे असून त्यांनी हा प्रयोग पुण्यात यशस्वी करून दाखवला आहे. शैलेशच्या या आगळ्या वेगळ्या शेतीची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. हा प्रयोग राज्यातला पहिलाच प्रयोग असून या केशर शेतीसाठी मातीची आवश्यकता भासत नाही.
केशर हे फार दुर्मिळ आणि अत्यंत महाग असते. प्रतिग्रॅम 300 ते 1500 रुपयांपर्यंत याची विक्री केली जाते. काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी थंड आणि बर्फाळ प्रदेशात केशरचे उत्पादन केले जाते. त्यामुळे केवळ मागणीच्या फक्त 3 ते 4 टक्केच उत्पादन भारतात घेतले जाते. या सर्व गोष्टींचा विचार करून शैलेश मोडक यांनी हा कंटेनर फार्मिंगचा प्रयोग पुण्यात राबवला असून तो यशस्वी देखील केला आहे.
एअरपोनिक पद्धत वापरून हा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. 320 वर्गफूटाच्या कंटेनरमध्ये केशराची लागवड करून त्यासोबत इतर भाज्यांचे पीक घेतले आहे. यात वेगवेगळ्या औषधी वनस्पती, परदेशी भाज्या, मसाले या पिकांना पर्याय शोधत शैलेश मोडक यांनी केशर हे पीक घेण्याचे ठरविले.
काही दिवस काश्मीरमध्ये राहून केशर पिकाच्या लागवडीची पद्धत समजून घेतली. त्यानंतर सुरुवातीला कंटेनरमध्ये केशर लावण्याचा निर्णय शैलेशने घेतला. त्यानुसार कंटेनरमध्ये केशर लावले. तसेच काश्मीरप्रमाणे कंटेनरमध्ये तापमान नियंत्रित करण्याकरता एअर सर्क्युलेटर, चिलर, एसी, डीह्युमिडिफायर, आद्रता कमी – जास्त करण्याकरता चारकोलवर आधारित तंत्र अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर शेलेशने या कंटेनरमध्ये तयार करण्यात आला. तसेच कृत्रिम प्रकाश संश्लेषणाकरता त्याच्या अवस्थेनुसार लाल, पांढरा आणि निळ्या रंगाचा प्रकाशही याठिकाणी पुरविला जातो. सध्या शैलेश यांनी पुण्यातील वारजे परिसरात हा कंटेनर तयार केला असून एका ट्रेमध्ये आकारानुसार 400 ते 600 कंद बसवले जातात.
ही शेती पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत आहे. हा कंटेनर फार्मिंगचा आगळा वेगळा प्रयोग सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे. आजच्या युवा शेतकऱ्याने देखील आधुनिक शेतीकडे उतरावे आणि शेतीचे वेगळे प्रयोग करून आधुनिक शेती करावी, अशी अपेक्षा शैलेश मोडकने व्यक्त केली आहे.