सुधागड अभयारण्य

पुण्यापासून साधारण 135 कि.मी अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुधागड अभयारण्य वसलेले आहे. येथे असलेल्या सुधागड या गडावरुन हे नाव देण्यात आले आहे. गडाच्या सभोवतालचे 76.88 चौ.कि.मी. क्षेत्र सन 2014 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. सुधागडच्या या परिसरात दाट वनश्री आहे. सुधागड परिसरात हजारो वर्षांपूर्वीची ठाणाळे लेणी आहेत. येथे अनेक तलाव आहेत. या अभयारण्यात अनेक औषधी वनस्पती आणि प्राणीसंपदा आहे. येथे भोराई देवीचे मंदिर आहे. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना केली, असे म्हणतात. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. एकूणच, हे अभयारण्य पर्यटकांना आवडेल असेच आहे.

पर्वतकस्तूर, युवराज, स्वर्गीयनर्तक, चंडोल, सर्पगरूड,हळद्या, कुरटूक, निखार, शमा, नवरंग, टकाचोर, मोरघार हे पक्षी या वनात विहार करतांना दिसतात. महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेल्या ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराबरोबर अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आहेत. वैभव, कारवी, करवंद, धायटी, रामेठा, मुरूडशेंग, फापट, कुडा, दिंडा सारखी झुडूपे आढळतात. उक्षी, पिळुकी, मालकांगोणी, खाज कोयली, वाटोळी, ओंबळ, पहाडवेल, घोटवेल, कडुकारंदा, आंबगुळी, तोरण, कुसर, बेडकीचा पाला, कर्टुली अशा वेली येथे मुबलक प्रमाणात आहेत. साग, खैर, काटेसावर, बीजा, कुंभा, आष्टा, अंजनी, जांभूळ, पिसा, वारस, आसाना, ऐन, बेहडा, पारजांभूळ, नाना असे मोठे वृक्ष येथे पहायला मिळतात. हे वन निम्न सदाहरित, सदाहरित आणि आर्द्र पानझडीचे वन या प्रकारातील आहे.

येथे बिबट्या, भेकर, उदमांजर, रानमांजर, खवल्या मांजर, मुंगूस, साळींदर, वानर, शेकरू हे वन्यजीव पहायला मिळतात. अजगर, नाग, धामण, चापडा, हरणटोळ, कवड्या दिवड, व घोरपड हे सरपटणारे प्राणीही येथे आहेत. सुधागड अभयारण्य मुंबई-पुण्यापासून जवळ आहे. येथे वृक्ष,प्राणी व पक्षी पाहता येतातच; शिवाय ऐतिहासिक किल्लाही पाहता येतो. या किल्याक्वर बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. गडावर असलेल्या टकमक टोकावरुन समोर धनगड, कोरीगड तेलबैला दिसतो. येथील पंच सचिवांचा वाडा व भोराई देवी मंदिरात 50 ते 60 लोकांची निवास व्यवस्था आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,069 वेळा पाहिलं