
सणासुदीचा, लग्नसमारंभांचा हंगाम सुरू आहे. या उत्साहाच्या वातावरणात महिलांना वेशभूषा करण्यासाठी निमित्त आणि चांगली संधी मिळते. सणासुदीच्या काळात महिला सुंदर पोशाख आणि दागिन्यांची निवड करतात. पोशाख कितीही जड असला तरी मॅचिंग ज्वेलरी घातल्याशिवाय एकूणच साज अपूर्ण वाटतो. कपड्यांप्रमाणे दागिन्यांचा ट्रेंडही बदलत राहतो. दागिन्यांमध्ये कानातील दागिने सर्वात खास असतात. हे दागिने कानाचे सौंदर्य वाढवतातच, शिवाय व्यक्तीही फार सुंदर दिसते.
‘कुंदन ज्वेलरी’ हा कानातील दागिन्यांचा सदाबहार प्रकार आहे. आपणांस बाजारात आणि ऑनलाइन दागिन्यांच्या संकेतस्थळावर सर्वत्र ‘कुंदन’ कानातल्यांचे नवीनतम प्रकार सहज मिळतील. ‘चांदबाली’ हे चंद्राचे झुमके आहेत. खरे तर चांदबाली प्रकार इतके सुंदर असतात की, बघणारा फक्त बघतच राहतो. ‘चांदबाली’ शैलीचे कानातले सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्याचा आकार अर्ध्या चंद्रासारखा असतो. आपण आपल्या आवडीनुसार जड किंवा हलके चांदबाली निवडू शकता. ‘अमेरिकन डायमंड’ हा एक कानातील दागिन्यांचा प्रकार आहे. सणासुदीच्या काळात, बहुतेक सण रात्री साजरे होतात. अमेरिकन हिरा सर्वोत्तम आहे. त्यामुळे हे दागिने रात्री विशेष खुलतात. विशेष म्हणजे हे दागिने पारंपारिक आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांसोबत वापरता येतात.