सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • बितनगड किल्ला

    बितनगड किल्ला

    महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात बितनगड किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्यास ‘बितंगा’, ‘बिताका’ या नावांनीही ओळखतात. या गडावर जायचे असेल तर प्रथम ‘घोटी’ गावात जायला हवे. इथून भंडारदरा रस्त्यावर ‘टाकेद’ गावाला जाण्यासाठी एक फाटा आहे. या फाट्यावरून पुढे गेल्यावर ‘बितनवाडी’ हे गाव मिळते. बितनवाडी गाव बितनगडाच्या पायथ्याशी आहे.

    बितनगड हा किल्ला कळसुबाई डोंगररांगेची उपरांग असलेल्या पट्टा डोंगररांगेत आहे. बितनवाडी गावामधून गडाकडे जाणारी पाऊलवाट सुरु होते. वाटेच्या बाजूला वाढलेल्या झाडीमधून वाट काढत गडाकडे जावे लागते. थोडीशी चढाई केल्यानंतर आपल्याला बालेकिल्ल्याच्या पायऱ्या दिसायला लागतात. वाटेत पाण्याच्या टाक्यांचेही दर्शन घडते.

    पायऱ्यांनी चढून वर गेल्यावर एक गुहा दिसते. ही गुहा मोठी आहे, गडावर मुक्कामाच्या हेतूने जाणारे येथे आश्रय घेतात. गुहेतून बाहेर आल्यावर गडमाथ्यावर जावे. एका बाजूला बुरुजाची ढासळलेली वास्तू अस्पष्ट दिसते. गडावरील तोफांना दिशा देण्यासाठी असणारी आरी येथे आहे. धुके नसेल तर किल्ल्यावरुन ‘औंध’ आणि ‘आड’ हे किल्ले देखील दिसतात. ‘अलंग-मदन-कुलंग’ यांचे दर्शन देखील घडते. हे सर्व विहंगम दृश्य इतिहासप्रेमींचे मन हरखून सोडते. इतिहासात डोकावल्यास एका पत्रात या गडाच्या पायथ्याशी बितनवाडी गावाचा उल्लेख आढळतो. हा किल्ला स्वराज्याचा एक भाग होता. या किल्ल्यावर एखाद-दुसरी तोफ असावी. याचा वापर जास्तीत जास्त टेहाळणीसाठीच केला गेलेला असावा असे दिसते.

  • भंडारदरा धरण

    भंडारदरा धरण

    भंडारदरा हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. येथील ‘प्रवरा’ नदीवर सन 1910 मध्ये बांधलेले ‘विल्सन धरण’ हे सर्वात मोठे मातीचे धरण आहे. या धरणाला ‘भंडारदरा धरण’ म्हणूनही ओळखले जाते. हे धरण त्या काळातील अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेबद्दल माहिती देते. या धरणाच्या पायथ्याशी असलेली घनदाट हिरवळ मनमोहक आहे. येथील मोठमोठी झाडे आणि छोटे ओढे यांनी नटलेली सुंदर बाग लक्ष वेधून घेते.

    पावसाळ्यात, जेव्हा पाण्याची पातळी वाढते, तेव्हा मैदानात पाणी सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडतात, त्यावेळी बागेतून पाण्याच्या शिंपडण्याचा आनंद घेता येतो. येथे ‘छत्री धबधबा’ हे आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा धबधबा पावसाळ्यात दिसतो.

    हे स्थान निसर्गसौंदर्याने नटलेले असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा मूळच्या सौंदर्यात अजून भर टाकतात. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाच्या जलाशयास ‘आर्थर लेक’ असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. प्रवरा नदीचे पाणी अमृतासमान असून या नदीला ‘अमृतवाहिनी’ असे म्हटले जाते.

  • काकडीची चटणी

    काकडीची चटणी

    उन्हाळ्याचे दिवस आहेत. आहारातही सौम्य पदार्थ असावेत हे वाटणे स्वाभाविक आहे. आज बनवूया दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारी काकडीची चटणी !

    साहित्य : काकडी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, २ हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, २ लसूण पाकळ्या, २ ते ३ चमचे चिंचेचा कोळ, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा हरभरा डाळ, मीठ चवीनुसार, ओली कोथिंबीर, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, २ चमचे तेल.

    कृती : सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्यावी. नंतर ती किसून घ्यावी. एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात हिरवी मिरची, उडीद डाळ आणि चणाडाळ घालून भाजून घ्यावी. गॅस बंद करून भांडे थंड होऊ द्यावे. हे भाजलेले समान मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यावे. त्यात जिरे, मीठ आणि लसूण पाकळ्या घालून बारीक वाटण बनवावे. या वाटणामध्ये थोडी किसलेली काकडी आणि चिंचेचा कोळ घालावा. चांगले मिसळून घ्यावे. हे वाटण एका भांड्यात काढून घ्यावे. त्यात उरलेली किसलेली काकडी मिसळावी. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावे. काकडीच्या चटणीला तडका देण्यासाठी भांड्यामध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे आणि मोहरी टाकावी. ती तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या टाकाव्यात. आता त्यात चिमूटभर हिंग टाकावा. हा तयार तडका चटणीवर घालून चांगले मिसळून घ्यावे. चटणी तयार !

  • सासू सून नातेसंबंध

    सासू सून नातेसंबंध

    अलीकडे पती-पत्नी दोघेही करिअरला प्राधान्य देऊ लागल्याने संपूर्ण दिवस बाहेर कामात जात असतो. घरी आल्यावर स्वतःबरोबर कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे व्यक्तीकडे नाती जपण्यासाठी वेळ राहिलेला नाही. परिणामी, लोकांच्या मनातील नात्यांचे महत्त्व कमी झाल्याचे तज्ज्ञ म्हणतात. सध्याच्या महागाईत घर चालवण्यासाठी आणि जीवनशैली जपण्यासाठी पती-पत्नी दोघांनी मिळून कमावणे खूप गरजेचे झाले आहे.

    अशा परिस्थितीत अधिकतर समस्या या महिलांना भेडसावतात. लग्नानंतर सासरच्या जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळणे त्यांना अवघड होते. मग घरात विशेषतः सासू आणि सून असे मतभेद सुरू होतात. दोघींच्याही तक्रारी मुलापाशी येतात. कुणाला दुखावणार, या विचारात तो अडकून पडतो.

    आई-वडील आणि पत्नी दोघेही महत्त्वाचे असतात. आई-वडिल महत्त्वाचे असतातच पण त्यांच्या संगोपनामुळे जीवनात सक्षमता आलेली असते. आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची काळजी घेणे ही मुलाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्याच वेळी, आई-वडिलांइतकीच बायकोही महत्त्वाची आहे. कारण ती तुम्हाला आयुष्यभर साथ देणार असते. तुमची सुख-दु:खे प्रत्येक वेळी वाटून घेणारी भागीदार असते. त्यामुळे दोघांनाही सांभाळून घेणे गरजेचे असते.

    लग्नानंतर प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. तो आयुष्यभर तिच्यावर प्रेम करेल, अशी जाणीव त्याने आपल्या पत्नीला करून दिली पाहिजे. पत्नीची सोबत असल्यानेच काम चांगले करू शकतो, असे तिला सांगितले पाहिजे.

    मुलगा पत्नीसाठी भेटवस्तू आणत असेल तर त्याने पालकांसाठीही त्या आणायला हव्यात. जर बायकोला बाहेर फिरायला नेट असेल तर त्याने पालकांनाही फिरायला नेण्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. आई-वडील आणि पत्नीपैकी कोणी आजारी असेल तर त्यांची सारखीच काळजी घेतली पाहिजे.

    नवीन आलेली मुलगी आनंदाने राहत असेल, पण तिच्याकडून काही छोट्यामोठ्या चुका होत असतील तर मुलगी समजून त्या पोटात घालणे ही सासू सासऱ्यांची जबाबदारी असते. ज्या कुटुंबात अशी परिस्थिती असते त्या कुटुंबात कोणत्याही नात्यामध्ये अहंकार कधीच येत नाही. ते कुटुंब नेहमी आनंदात असते.

  • केसांचे पोषण

    प्रत्येक मुलीला तिचे केस निरोगी आणि पोषक असावेत असे वाटते. शेवटी सुंदर केस आत्मविश्वासासोबतच तुमचे सौंदर्य वाढवतात. प्रदूषण, धूळ, माती आणि घाण यांच्या संपर्कात आल्याने केसांचे सौंदर्य नष्ट होते. याशिवाय केसांमध्ये पोषण नसल्यामुळेही केसांचे सौंदर्य हिरावले जाते. त्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. तुम्ही कोरड्या केसांनी त्रस्त असाल तर काळजी करू नका. गुडगावचे आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. रॉबिन शर्मा यांनी इन्टाीधग्रामवर केसांना पोषण देण्यासाठी दोन घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय कोरड्या टाळूचे पोषण करतातच; शिवाय मुळांना आतून मजबूत करतात. सुक्या फळांमध्ये भरपूर पोषणतत्वे असतात. केसांचे आरोग्य राखण्यासाठी येथे सांगितलेला पदार्थ बनवून पहा.

    सर्वप्रथम खजूर आणि अंजीर एका भांड्यात रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. आता दुस-या दिवशी भोपळ्याचे दाणे, नारळाची शेव, अंबाडीच्या बिया, बदाम, अक्रोड, काळे तीळ आणि काजू समप्रमाणात घ्या. आता त्यांना मिक्सरमध्ये हलके हलवा. नंतर तुपात तळून घ्या. आता भिजवलेले खजूर आणि अंजीर मॅश करुन तुपात तळून घ्या. ड्रायफ्रुट्स आणि बियांच्या मिश्रणात मिसळा. या मिश्रणाने तुम्ही 6 ते 10 ग्रॅमचे लाडू बनवू शकता. तज्ज्ञांच्या मते, सकाळी नाश्त्यात एक ते दोन लाडू खा. हे लाडू चांगले चावून खावेत.

    केस चमकदार करण्यासाठी बाहेरून पोषण मिळणे देखील आवश्यक आहे. यासाठी औषधी वनस्पतींपासून बनवलेले तेल खूप फायदेशीर ठरते. वनौषधी तेल बनवण्यासाठी भृंगराज, मंजिष्ठ, मुळी, अश्वगंधा, आवळा, रोझमेरी, हिबिस्कस आणि चहापत्ती घ्या. हे सर्व खोबरेल तेलात गरम करा. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर ते कोमट झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवा. हे हर्बल तेल तुम्ही केस मजबूत करण्यासाठी रोज वापरू शकता. फक्त २०-३० दिवसांत तुमच्या केसांमध्ये खूप फरक दिसेल.

  • उन्हाळ्यात खावेत असे पदार्थ

    उन्हाळ्यात खावेत असे पदार्थ

    उन्हाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले तर आपण आजारी पडू शकतो. या हंगामात, अशी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त थंडावा मिळतो. उष्माघाताचा प्रभाव कमी होतो. उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.

    नारळ पाणी : उन्हाळ्यात पोषकतत्वांनी युक्त नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर ठरेल. रोज नारळ पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीर उत्साही राहते.

    संत्रे : संत्र्याचे सेवन केल्याने अनेक प्रकारे फायदा होतो. संत्र्यामध्ये 88 टक्के पाणी, ‘सी’ जीवनसत्व, कॅल्शियम आणि फायबर असते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त याचे सेवन करावे.
    लिंबू : उन्हाळ्यात लिंबाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. हे उष्णतेपासून वाचविण्याबरोबरच आतून ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात बाहेरून घरी आल्यावर नेहमी लिंबूपाण्याचे सेवन करावे.

    हिरव्या भाज्या : काही हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. पालेभाज्यांमध्ये भरपूर पाणी असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका होते.

    काकडी : याशिवाय उन्हाळ्यात फायबरयुक्त काकडीचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरेल. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. रोजच्या आहारात काकडीचा समावेश नक्की करावा.
    दही आणि लस्सी : दही आणि लस्सी उष्णतेपासून संरक्षण करते. आपण थेट दही खाऊ शकता; किंवा काकडीसोबत कोशिंबीर बनवून खाऊ शकता.

  • म्हाळसाकोरे मंदिरे

    म्हाळसाकोरे मंदिरे

    नाशिकमधील ‘म्हाळसाकोरे’ गाव मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील हेमाडपंती मंदिरे दुर्मिळ आहेत. ‘म्हाळसाकोरे’ला जायचे झाल्यास नाशिकहून सायखेडामार्गे जाता येते. हे अंतर साधारण ३०-३५ किलोमीटर आहे. नांदूरमध्यमेश्वर येथून हे अंतर अवघे ४-५ किलोमीटर आहे. गावात गेल्यावर डाव्या बाजूला ‘म्हाळसा’ देवीचे मंदिर लागते.

    ‘म्हाळसाकोरे’ निफाड तालुक्यात आहे. ही या गावची मुख्य देवता असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ पहायला मिळते. ‘म्हाळसाकोरे’ या गावाच्या नावामागे 2 देवतांच्या संगमाची आख्या‌यिका प्रसिद्ध आहे. म्हाळसाकोरे गावात एका हद्दीवर ‘म्हाळसादेवी’चे मंदिर आहे. दुसऱ्या हद्दीवर ‘साकरा’ देवीचे मंदिर आहे. एकाच गावातील 2 देवीच्या नावावरून गावाचे नाव पडणे, हे वेगळेपण ‘म्हाळसाकोरे’ गावात पहायला मिळते.

    जेजुरीचे कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या 2 पत्नींपैकी म्हाळसादेवी यांचे माहेर चंदनपुरी तर आजोळ म्हणजे मामाचे गाव म्हाळसाकोरे होय. असे म्हंटले जाते की गावात ‘म्हाळसा’ नावाचा उपद्रवी राक्षस प्रजेला त्रास द्यायचा. त्याचा वध करून प्रजेला सुखी करणाऱ्या गावच्या कन्येला ‘म्हाळसादेवी’ म्हटले जाऊ लागले. मंदिरात म्हाळसादेवीची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या हाताला गणपतीची तर डाव्या हाताला सरस्वतीची मूर्ती आहे.

    म्हाळसादेवी मंदिराच्या शेजारी पुरातन दगडी विहीर असून देवी तेथे स्नान करत असे, अशी आख्यायिका सांगितली जाते. या विहिरीची सध्या दुरवस्था झाली आहे; मात्र त्याचे संवर्धन करून ती सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तेथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले.

    म्हाळसादेवी ही विशेषत: ब्राह्मण, सोनार समाजाची कुलदेवी असल्याने महाराष्ट्र तसेच गुजरातकडून येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. म्हाळसादेवीच्या मंदिराशेजारी श्री संत जनार्दन स्वामी महाराजांचा मठ पाहता येतो. चैत्र पौर्णिमेला देवीच्या यात्रेबरोबर हनुमान जयंती, खंडेराव महाराजांची यात्रा भरते. यावेळी बारागाड्या ओळणे, टांगा शर्यत, कुस्त्यांची दंगल, कलगीतुऱ्यांचा कार्यक्रम असतो. नवरात्रीत हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम गावचे वातावरण भक्तीमय करतात.

    गावाच्या पूर्वेस बाराव्या शतकातील हेमाडपंती नीळकंठेश्वर महादेव मंदिर आहे. म्हाळसाकोरे येथे पुरातन हेमाडपंती शिवमंदिर आहे. मंदिराच्या दक्षिणेस नव्यानेच बांधण्यात आलेले श्रीहरी दत्ताचे मंदिर आहे. मंदिरासमोर आसनस्थ नंदीची दगडी मूर्ती आहे. मंदिराचे काम अतिशय सुंदर पाषाण शिल्पातील आहे. या परिसरात श्रीकृष्ण मंदिरही आहे. मंदिराच्या आवारात इतर लहान मोठी शिल्पे पाहायला मिळतात. पडझड झालेल्या नीळकंठेश्वर महादेव मंदिराचे नंतरच्या काळात दुरूस्तीचे काम करण्यात आल्याने मंदिराचा खालचा भाग पुरातन तर वरचा भाग आधुनिक दिसतो.

    दुरूस्ती करताना मंदिराच्या आतील शिल्पांना सुरक्षित ठेवल्याने त्याचे सौंदर्य मनमोहक ठरते. मंदिरातील मूर्ती वेरूळ, अजिंठ्याच्या लेण्यांतील शिल्पकलेची आठवण करून देतात. नीळकंठेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार सुंदर नक्षीने सजलेले आहे. मांजरगाव रस्त्याला ‘साकरा’ देवीचे मंदिर आहे. हे गाव आणि येथील मंदिरे फार रमणीय आहेत. त्यामुळे येथे भाविकांची गर्दीही असते.

  • वेळणेश्वर समुद्रकिनारा

    वेळणेश्वर समुद्रकिनारा

    महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात ‘वेळणेश्वर’ गावाजवळ ‘शास्त्री’ नदीच्या उत्तरेला वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा फार सुंदर आहे. खडकाळ समुद्र आणि स्वच्छ वातावरणासाठी तो लोकप्रिय आहे. पोहणे, सूर्यस्नान आणि मनमुरादपणे समुद्रकिनाऱ्यावरचे फिरणे यासाठीच पर्यटक या किनाऱ्याला पसंती देतात. या समुद्रकिनाऱ्यावर तयार झालेली ‘ब्राह्मण घळ’ देखील पाहण्यासारखी आहे.

    येथे प्राचीन वेळणेश्वर मंदिर असून ते पाहण्यासारखे आहे. या मंदिरात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते. या किनाऱ्यावर गेल्यास अंजनवाले किल्ला, व्याघ्रंबरी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि उमा महेश मंदिर ही आणखी काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. गुहागरपासून जवळ असलेले ‘हेदवी’ गाव हे समुद्रकिनारे, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध असल्याने ते सुद्धा पाहण्यासारखे आहे.

    या किनार्येजवळची खडकांची रांग तसेच डोंगराच्या पोटात समुद्र घुसल्यानेत्याची झीज होऊन निर्माण झालेले वेगवेगळे आकार, त्यावर समुद्री जीवांनी केलेले नक्षीकाम आणि शिंपले फार सुंदर दिसतात. येथे वळसे घेत येत असलेली नदी समुद्रास मिळते. अशी रमणीय दृश्ये या किनाऱ्यावर पाहता येतात.

  • अर्नाळा किल्ला

    अर्नाळा किल्ला

    ‘अर्नाळा’ किल्ला हा अर्नाळा बेटावर असलेला एक सागरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार-पश्चिम भागातील ‘अर्नाळा’ या लहानशा शहराच्या किनाऱ्यावर तो वसलेला आहे.

    हा किल्ला इसवी सन १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. इसवी सन १८ व्या शतकात मराठा साम्राज्याने तो ताब्यात घेतला. हा किल्ला पोर्तुगीजांसाठी एक सामरिक तटीय संरक्षण होता. मीठ आणि मसाल्यांसारख्या वस्तूंसाठी व्यापारी वखार म्हणून त्याचा वापर करायचे. आज, हा किल्ला एक लोकप्रिय आकर्षण आहे.

    येथून समुद्राचे विहंगम दृश्य न्याहाळता येते. पर्यटक मुख्य भूमीवरून लहान बोटीतून किंवा कमी भरतीच्या वेळी बेटाला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या ‘कॉजवे’वरून किल्ल्यावर चालत जाऊ शकतात. अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम अर्नाळा शहरात जावे लागते. अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी येथून वाहतुकीचे विविध मार्ग आहेत.

    अर्नाळा हे मुंबई आणि ठाणे या जवळच्या शहरांशी रस्त्याने चांगले जोडलेले आहे. मुंबई किंवा ठाणे येथून अर्नाळ्याला बसने किंवा टॅक्सीने जाऊ शकता. विरार रेल्वेस्थानकावरून अर्नाळ्याला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी असतात. विरार रेल्वे स्थानक ते अर्नाळा हे अंतर सुमारे 17 किमी असून रस्त्याने अर्नाळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 30-40 मिनिटे लागतात. या किल्ल्यावर गेल्यास अर्नाळा सागरकिनारा, वसईचा किल्ला, तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान, केळवा किनारा, वज्रेश्वरी धबधबा, सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च ही स्थळेसुद्धा पाहता येतात.

  • नेहरू तारांगण

    नेहरू तारांगण

    मुंबईतील नेहरू तारांगण हे वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय शिक्षणासाठी असलेले एक प्रमुख ठिकाण आहे. नेहरू तारांगण मनोरंजनासोबतच विविध व्याख्याने, कार्यक्रम आणि प्रख्यात अवकाश संशोधकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथे मुलांना प्रत्यक्ष तारे–ग्रह कशा पद्धतीने अंतराळात विहार करतात, हे पाहता येते. हा खूप सुंदर अनुभव असतो.

    याची रचना वास्तुविशारद जे.एम. कादरी यांनी केली आहे. सुंदर घुमटाकार इमारत असलेली दंडगोलाकार रचना अनेकांना आकर्षित करते. विद्यार्थी, खगोलशास्त्रज्ञ आणि इतर अंतराळ संशोधक येथे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना आवर्जून भेट देतात. अधूनमधून, येथे सांस्कृतिक कार्यक्रमदेखील पहायला मिळतात.

    अंतराळ अभ्यासाला वाहिलेली ‘नेहरू तारांगण’ ही संस्था विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांमधील आकर्षणाचे केंद्र आहे. विज्ञान आणि अवकाश याविषयी मुलांच्या मनात आवड निर्माण करण्यासाठी मुंबईतील ‘नेहरू तारांगण’ हे एक चांगले ठिकाण आहे. नेहरू तारांगण विज्ञान आणि मानवतेच्या अभ्यासासाठी स्थापन केले गेले.

    गेल्या काही वर्षांत, नेहरू तारांगण आणि नेहरू केंद्र हे खगोलशास्त्रातील ख्यातनाम शास्त्रज्ञ, संशोधक आणि इतरांसाठी आकाशातील ग्रहांचा आणि सर्व हालचालींचा अभ्यास करण्यासाठी आवडते ठिकाण बनले आहे. येथे विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, खगोलशास्त्रावर आधारित चित्रकला स्पर्धा आणि वादविवादही होतात.

    सूर्यमालेचे दर्शन – नेहरू तारांगणातील “स्टार्स अँड वंडर्स ऑफ द युनिव्हर्स” हा नियमित कार्यक्रम आहे. प्रोजेक्टर प्रतिमा प्रदर्शित करीत असताना निवेदक सूर्यमाला, आपल्या ग्रहाची उत्क्रांती आणि आपल्या विश्वातील इतर रहस्यांबद्दल माहिती देतात. 90 मिनिटांच्या या कार्यक्रमामध्ये दिवसभरात 4 सत्रे असतात. 2 सत्रे हिंदीत दिली तर इतर दोन इंग्रजी आणि मराठीत सांगितली जातात.

    वैश्विक घटनेचे साक्षीदार – जर तुम्ही सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या दिवशी मुंबईत असाल, तर नेहरू तारांगण हे प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचे उत्तम ठिकाण आहे. याठिकाणी तुम्हाला पाहण्याचा अनुभव देण्यासाठी सुविधा आणि आवश्यक उपकरणे आहेत. स्टार गेझिंग – नेहरू तारांगणामध्ये इमारतीच्या बाहेर दुर्बिणी आहेत. दुर्बिणीद्वारे विशाल आकाशगंगेकडे पाहू शकता.

    डिस्कव्हरी ऑफ इंडिया – येथे अनेक प्रदर्शने, गॅलरी आणि प्रेक्षागृहे देखील आहेत. येथे विविध मैफिली आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ग्रंथालय – नेहरू तारांगण ग्रंथालयात सुमारे 30,000 पुस्तकांचा संग्रह आहे. ही पुस्तके धर्मापासून संबंधित विज्ञानांपर्यंत, तत्त्वज्ञानापासून सामाजिक शास्त्रापर्यंत आणि अगदी कला आणि वास्तुशास्त्रापर्यंत ग्रंथ आहेत. विद्यार्थी अनेकदा या ठिकाणी भेट देतात. हे ठिकाण सोमवार आणि काही सण वगळता वर्षभर खुले असते. ते सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुले असते.

    नेहरू तारांगण मुंबईत वरळी येथे आहे. येथून रेल्वे स्थानक व बस डेपो जवळ आहे. वरळीमध्ये दिवसभर बेस्ट बसेस असतात. खासगी कॅब देखील भाड्याने घेऊ शकता. तुम्ही शहरातील कोठूनही तारांगणात जाण्यासाठी मुंबई लोकल ट्रेनमध्ये चढू शकता. महालक्ष्मी, भायखळा आणि चिंचपोकळी ही तारांगणाच्या जवळच्या स्थानकांपैकी एक आहेत.

  • तांदूळ गिरणी उद्योग

    तांदूळ गिरणी उद्योग

    ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कुटुंबातील तरूणांना तांदूळ गिरणी उद्योग कसा सुरू करायचा, याविषयी निश्चित माहिती असेल. या उद्योगाद्वारे ग्रामीण भागातील उद्योजकांबरोबरच शहरी भागातील व्यक्तीनाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून तो माल शहरातील व्यापाऱ्यांना विकता येतो.

    भारताच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून या लोकसंख्येला त्या प्रमाणात अन्नधान्याची गरज आहे. भारताची लोकसंख्या एक अब्जाच्या पुढे गेली असली, तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्यासाठी भारत हा सक्षम आणि स्वयंपूर्ण देश आहे. भारत गहू, मका, तांदूळ, ज्वारी निर्यात करतो. भारत हा साखर निर्यातीचा प्रमुख पुरवठादार आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, बंगाल या राज्यांमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

    पारंपरिक पद्धतीत शेतकरी उकळत्या पाण्यात भात गरम करून घेत. भाताचे कांडप करून सालापासून तांदूळ वेगळा काढला जात असे. आज आधुनिकीकरणाच्या युगात प्रत्येकजण कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळत नाही. तरुणींचे लग्न निश्चित करताना शेतकरी मुले नाकारली जातात. पगारदारांना प्राधान्य दिले जाते. याच कारणामुळे थोडेफार शिक्षण झाल्यावर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणाई शहरात येऊ लागली. नोकरी लागल्यानंतर हा तरुण शहरात राहू लागला.

    या कारणास्तव, शहरी – निमशहरी भागात, मोठ्या महानगरांमध्ये मुख्य अन्नधान्य असलेल्या तांदूळासारख्या धान्यांना मोठी मागणी आहे. तांदूळ गिरण्यांमध्ये दररोज हजारो टन धान्यावर प्रक्रिया केली जाते. भात त्याच्या ग्रेडनुसार वेगळे केले जाते. त्यानंतर तांदूळ ग्राहकांच्या मागणीनुसार 5 किलोपासून 50 किलोपर्यंतच्या पिशव्यांमध्ये भरला जाऊन विक्रीस पाठविला जातो.

    ‘बासमती’, ‘जिरगा’, ‘इंद्रायणी’, ‘आंबेमोहर’ , ‘जया’ , ‘रत्नागिरी’ , ‘कोलम’ , ‘घनसाळ’ हे तांदळाचे प्रमुख मागणी असलेले वाण आहेत. शेतकऱ्यांकडून बाजारभावानुसार सालासह तांदूळ खरेदी करून तो तांदूळ गिरण्यांमध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. अनेक गिरणीमालक विशिष्ट प्रजातीचा तांदूळ खरेदी करतात. त्यावर प्रक्रिया करतात आणि विशिष्ट नावाने ब्रँड करून बाजारात विकतात. या पद्धतीत जास्त फायदा होतो.

    कमी किमतीत तांदूळ खरेदी करणे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करून तो तुमच्या नावाच्या ब्रँडखाली बाजारात आणणे, हे फायदेशीर आहे. अधिकाधिक गिरणी व्यापारी या पद्धतीचा वापर करतात.

    हा बारा महिने चालणारा व्यवसाय आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व किराणा दुकानात तांदूळ विकला जातो. त्यासोबतच मोठमोठे मॉल्स, सुपर मार्केट, किरकोळ आणि घाऊक धान्याचे व्यापारी यांना त्यांच्या मागणीनुसार माल देऊ शकतात.

    आठवडी बाजार आणि तांदूळ प्रात्यक्षिके येथे माल विकू शकता. हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये याठिकाणी मागणीनुसार वस्तू विकू शकतात. तांदूळ विकण्यासाठी ग्राहक शोधण्याची गरज नाही. ‘बासमती’, ‘इंद्रायणी’, ‘कोलम’, ‘रत्नागिरी-24’, ‘आंबेमोहर’, ‘जया’, ‘जिरगा’, ‘घनसाळ’ या तांदूळाला बाजारात मागणी आहेत. यासाठी आपणास भात कांडप यंत्र, मोठी भांडी, पिशव्या, कामगार यांची गरज लागेल.

  • झाडू बनविण्याचा व्यवसाय

    झाडू बनविण्याचा व्यवसाय

    झाडू बनविण्याचा व्यवसाय हा सर्वत्र चालणारा एक व्यवसाय आहे. मागणी, पुरवठा, किंमत, स्पर्धक, ग्राहक सर्वेक्षण या व्यवसायासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचे संशोधन करणे गरजेचे असते. घर,व्यवसाय, कार्यालय अशा प्रत्येक ठिकाणी झाडूची गरज असते. झाडू ही अगदी प्राथमिक गरज आहे. स्वच्छतेच्या कामात झाडू मोलाची भूमिका बजावते. झाडूचे उत्पादन करणाऱ्या खूप साऱ्या उत्पादन कंपन्या आहेत. त्यामुळे तुम्ही या व्यवसायात इच्छुक असाल तर तुम्हाला ग्राहकांची मागणी लक्षात घेणे गरजेचे आहे. ग्राहक किती सहजतेने तुमचे उत्पादन वापरू शकतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञान या उत्पादनामध्ये वापरू शकता, याचा विचार केला पाहिजे.

    कॉर्न ब्रूम, पुश ब्रूम, प्लॅस्टिक ब्रूम, स्टॅंडर्ड ब्रूम, अँगल ब्रूम, रबर ब्रूम, वॉटर ब्रूम इत्यादी प्रकारच्या झाडू असतात. वेगवेगळे झाडू असतात. त्यातील तुम्ही विशिष्ट अशा 1-2 झाडूचे उत्पादन करू शकता. किंवा सगळ्या प्रकारामध्ये उत्पादन करू शकतात. वेगवेगळ्या झाडूंच्या प्रकारानुसार कच्चा माल आवश्यक असतो. चांगल्या प्रतिच्या झाडूसाठी सुकलेला हिर लागेल. तुम्ही प्लास्टिकची झाडू बनवत असाल तर त्यानुसार वेगळी सामग्री लागेल. हा कच्चा माल तुम्हाला स्थानिक बाजारपेठ आणि ऑनलाईन दोन्हीकडे उपलब्ध आहे. या व्यवसायात कटर, स्वयंचलित ब्रूम मशीन, बिंडर, इतर टूल्स आणि उपकरणे आवश्यक असतात. यंत्रसामग्रीमध्ये अर्धस्वयंचलित आणि स्वयंचलित अश्या 2 प्रकारची यंत्रसामग्री गरजेची असते. या व्यवसायात तुम्ही 3 ते 8 लाख रुपये गुंतवणूक करून मध्यम आकाराचा व्यवसाय सुरू करू शकता. या गुंतवणुकीमध्ये परवाना खर्च, खेळते भांडवल, पगार, कच्च्या मालाची किंमत, यंत्रसामग्री खर्च, इतर गुंतवणूक खर्च यात समाविष्ट आहे.

    जर तुम्हाला कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला 50 हजार ते 1 लाख रुपये इतकी गुंतवणूक करावी लागेल. एखाद्या कंपनीला विशिष्ट प्रकारची झाडू बनवून पाहिजे असेल, तर त्यांना त्यांच्या गरजेनुसार झाडू बनवून देऊ शकता. झाडू बनविण्याच्या व्यवसायासाठी लागणारी जागा आणि मनुष्यबळ हे उत्पादनाच्या प्रमाणावर आणि कोणत्या प्रकारचे झाडू तयार केले जात आहे, यावर अवलंबून असते. तथापि, ढोबळमानाने किमान 700 ते 1000 चौरस फूट जागा आणि 5 ते 10 कामगार लहान आकाराचा झाडू बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे असतील. आपल्याला कुशल कामगारांची आवश्यकता असेल जे यंत्रे-उपकरणे चालवू शकतील. या व्यवसायासाठी उद्योग आधार, जीएसटी क्रमांक, ट्रेडमार्क, विद्युत परवाना, इतर दस्तऐवजीकरण या गोष्टी आवश्यक आहेत.

  • कमळ शेती

    कमळ शेती

    ‘कमळ’ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. अनेक औषधी आणि पौष्टिक गुणधर्मामुळे कमळाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जाते. भारतात गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची मनमोहक कमळाची फुले आढळतात. साधारणपणे कमळाच्या पाकळ्यांची संख्या 16 ते 36 पर्यंत असते. कमळात अनेक औषधी आणि पौष्टिक गुणधर्म आहेत. प्राचीन आयुर्वेदात मधुर, शीतल, तुरट, अशक्तपणा, आमांश, अतिसार आणि खोकला व सर्दी बरे करण्यासाठी उपयुक्त असे कमळाचे वर्णन केले गेले आहे. कमळाचे बियाणे गर्भधारणा, रक्त विकारात अत्यंत मूल्यवान आहे. मूळव्याधवर या बिया अत्यंत गुणकारी आहेत. कमळाच्या बिया खाल्ल्याने मेंदू सक्रिय राहतो. त्याशिवाय ते आपल्या रक्तदाबाचे नियमन करण्यास मदत करते. कमळाच्या बिया सुकवून चूर्ण करून मधात चाटल्याने खोकल्यावर याचा उपचार होतो.

    अनेक स्वादिष्ट पदार्थांमध्ये या बियांचा वापर केला जातो. काही ठिकाणी कमळाचे पान आणि पानांचे देठ भाजी म्हणून खातात. पानांचा वापर ग्रामीण भागात भोजनाचे ताट म्हणूनही केला जातो. कमळाच्या फुलांना बाजारामध्ये मोठी मागणी आहे. कमळाच्या पानांचा वापर ताट, बॉक्स आणि वेष्टन साहित्य बनविण्यासाठी केला जाऊ शकतो. वाळलेल्या पाकळ्या आणि बियांच्या शेंगांचा कलाकुसर करण्यासाठी वापर करता येतो.

    ‘कमल’, ‘पद्म’, ‘पंकज’, ‘पंकरुह’, ‘सरसिज’, ‘सरोज’, ‘सरोरुह’, ‘सरसिरुह’, ‘जलज’, ‘जलजात’, ‘नीरज’, ‘वारिज’, ‘अंबुज’ इ. कमळाची काही नावे आहेत. कमळांना पर्शियनमध्ये ‘निलोफर’ आणि इंग्लिशमध्ये ‘इंडियन लोटस’ किंवा ‘सेक्रेड लोटस’, ‘चायनीज वॉटर-लिली’, ‘इजिप्शियन’ किंवा ‘पायथागोरियन बीन’ म्हणतात. कमळाची वनस्पती केवळ पाण्यात आढळते. भारतातील सर्व उष्णकटिबंधीय प्रदेशात तसेच इराण आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळते.

    कमळाचे फूल पांढरे किंवा गुलाबी रंगाचे असते. मंदिरातील दिवे बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कमळाच्या पानांचा लांब देठ आणि शिरा यामध्ये एक यबर असतो. या साहित्यापासून बनवलेले कपडे परिधान केल्याने अनेक आजार बरे होत असल्याची माहिती आहे. कमळाचे दांडे लांब, सरळ आणि पोकळ असतात व ते पाण्याखाली चिखलात पसरतात. देठाच्या गाठीतून मुळे निघतात.

    कमळांना दिवसातून कमीत कमी 6 तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. कमळ हे केवळ भारताचेच नाही, तर व्हिएतनामचेही राष्ट्रीय फूल आहे. कमळाच्या मधाने डोळ्यांच्या विविध समस्यांवर उपचार करता येतात. कमळाच्या फुलाची कोवळी पाने, बिया आणि बहर हे सर्व खाण्यायोग्य भाग आहेत. कमळाची वनस्पती साधारणपणे १५० सेमी उंचीपर्यंत वाढते. कमळाच्या फुलाचा व्यास २० सेमी पर्यंत असू शकतो. पानांचा व्यास अंदाजे ६० सेमी असतो. ही पाने नैसर्गिकरित्या स्वतःला स्वच्छ करतात. ती जलरोधक असतात.

    हिमालय, काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा आणि महाराष्ट्र येथील जलाशयांमध्ये कमळे आढळतात. याव्यतिरिक्त दक्षिण भारतातही कमळे आढळतात. तज्ज्ञांच्या मते, कमी वेळात कमळाची लागवड करून शेतकऱ्यांना खर्चापेक्षा कितीतरी पट अधिक नफा मिळू शकतो. कमळाची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती फक्त ३ ते ४ महिन्यांत तयार होतात. या कारणास्तव, कृषी तज्ज्ञांनी त्याची गणना कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या श्रेणीत केली आहे. कमळाची यशस्वी वाढ होण्यासाठी 21 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाण्याचे तापमान आवश्यक आहे. कमळाचे थंडीपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. कमळाच्या लागवडीसाठी पाण्याने भरलेल्या हलक्या काळ्या मातीच्या तलावाची आवश्यकता असते, ज्यामध्ये दीर्घकाळ पाणी साठवता येते. ते लागवडीसाठी योग्य मानले जाते.

    कमळाची लागवड जुलै महिन्यात केली जाते. कमळ चिखलात लावले जाते. त्यासाठी शेतात सेंद्रिय पद्धतीने तलाव तयार केला जातो, जो प्रथम माती खोदून तयार केला जातो. खोदल्यानंतर तयार केलेल्या तलावात पाणी भरले जाते. त्यानंतर त्या तलावात माती आणि पाणी मिसळून गाळ तयार करावा लागतो. या चिखलात कमळाची मुळे किंवा बिया लावल्या जातात. त्यानंतर सुमारे 2 महिने शेतात पाणी ठेवले जाते; कारण पाणी आणि गाळ या दोन्ही गोष्टी या पिकासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे कमळाची झाडे झपाट्याने वाढतात.

    कमळाची लागवड जुलै-ऑगस्टमध्ये केली जाते. बिया पेरल्यानंतर एक ते दीड महिन्यात रोपे वर येतात. त्याच्या मुळांमध्ये जितक्या जास्त गाठी असतील तितकी जास्त झाडे बाहेर येतात. त्याच्या बियांचा घडही झाडांवरच तयार होतो. दरम्यान झाडांमध्ये फुलांची प्रक्रिया सुरू होते. अशाप्रकारे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुले तोडता येतात. 1 एकर कमळाच्या शेतात सुमारे 6 हजार झाडे लावता येतात. त्याच वेळी त्याची फुले सुमारे 12 हजार रुपयांना मोठ्या प्रमाणात विकली जातात. त्याच्या बिया, पाने, कमळाचे फूल स्वतंत्रपणे विकले जाते. अशा परिस्थितीत लागवडीनंतर केवळ 3 महिन्यांनी 55 हजार रुपयांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.

  • सौंदर्यप्रसाधने निर्मिती उद्योग

    सौंदर्यप्रसाधने निर्मिती उद्योग

    सौंदर्यप्रसाधने निर्मिती व्यवसाय’ हा जागतिक बाजारपेठेत हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणारा एक व्यवसाय आहे. सध्या भारतीय सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याचे दिसते. भारताची प्रचंड लोकसंख्या पाहता या व्यवसायात नवनिर्मितीसाठी चांगली संधी असल्याचे दिसून येते. भारतीय सौंदर्यप्रसाधनांना परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने सौंदर्यप्रसाधने ग्राहक विकत घेतात. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता जास्त असते.

    ही उत्पादने ग्राहकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने सौंदर्यप्रसाधने उत्पादित करताना शासनाने तयार केलेले सर्व नियम, अटी आणि मानकांची पूर्तता करून उत्पादने बाजारात आणावीत. निर्मात्याचे नाव, उत्पादन प्रक्रियेत सामील असलेले घटक, त्यांचा वापर करण्याचे सूत्र, नियम, सुरक्षितता माहिती, उत्पादनाची तारीख, बॅच नंबर, हेल्पलाइन नंबर अशी माहिती त्यावर असावी लागते.

    सौंदर्यप्रसाधन व्यवसायातही सरकार औषधांच्या उत्पादनासाठी असलेले नियम लागू करते. सौंदर्यप्रसाधन उत्पादन ‘औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायदा, 1940’ नुसार करावे लागते. उत्पादन सुरू होण्यापूर्वी आरोग्य विभागाची परवानगी घ्यावी लागते.

    सौंदर्यप्रसाधने उत्पादनांची ठिकाणे स्वच्छ असणे आणि निवासी वस्त्यांपासून दूर असणे आवश्यक असते. सौंदर्यप्रसाधने उत्पादनांची मान्यता घेणारा उत्पादक स्वतः ‘डी-फार्मसी’ डिप्लोमा किंवा रसायनशास्त्रातील पदवी किंवा इंटरमिजीएट उत्तीर्ण असावा. ज्यांना सौंदर्यप्रसाधने उद्योग सुरू करायचा आहे त्यांनी सर्वप्रथम ‘द ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट’ या अधिकृत पुस्तकाचा अभ्यास करून सविस्तर माहिती मिळवावी.

    सौंदर्यप्रसाधने उत्पादनाचा मानवी आरोग्याशी जवळचा संबंध आहे. उद्योग सुरू करण्यापूर्वी सरकारच्या सर्व मान्यता, नियम, कायदे, अटी आणि मानकांची पूर्ण पूर्तता करूनच उत्पादन घेणे आवश्यक आहे.

    सौंदर्यप्रसाधने उत्पादनांच्या यादीत शेकडो उत्पादनांची नावे दिसतात. सर्वप्रथम आपण यापैकी कोणते उत्पादन सुरू करायचे ते ठरवायला हवे. उदा. टाल्कम पावडर, स्नो, क्रीम, बेबी पावडर, सुगंधित केसांचे तेल, फेस पावडर, काटेरी उष्णता पावडर, बदाम तेल, तिळाचे तेल, वनस्पती तेल, कोप्रा तेल, टूथपेस्ट, टूथपाऊडर, व्हॅनिशिंग क्रीम, कोल्ड-क्रीम,इ.

    विविध तेलापासून बनवलेली उत्पादने, नेलपॉलिश, लिपस्टिक, बॉडी-स्प्रे, शाम्पू, आंघोळीचा साबण, चेहऱ्यावर लावलेली विविध क्रीम्स, मेक-अपसाठी वापरलेली उत्पादने, विविध सौंदर्यप्रसाधने या वस्तू स्थानिक बाजारात किंवा जवळपासच्या ठिकाणी उपलब्ध आहेत का, याची खात्री करावी.

    सौंदर्यप्रसाधन उत्पादन घ्यायचे असेल, तर बाजारात किती स्पर्धात्मक उत्पादने आहेत, त्यांच्या किंमती किती आहेत, त्यांच्या जाहिराती कशा आहेत, त्यांची वितरण व्यवस्था कशी आहे, वितरकांना किती टक्के मार्जिन दिले जाते, या सर्वांचा अभ्यास करून घ्यावा. तज्ज्ञांसोबत बाजारपेठ सर्वेक्षण करावे. प्रत्येक मनुष्य आंघोळीनंतर चेहऱ्यावर पावडर लावतो. या कारणास्तव, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती आपली ग्राहक असते, हे लक्षात घ्यावे.

    ज्या उत्पादनाला बाजारात जास्त मागणी असेल आणि स्पर्धा कमी असेल, तर असे उत्पादन करून ते ब्युटी पार्लर, स्टेशनरी दुकाने, औषधांची दुकाने, विशेष सौंदर्य प्रसाधनांची दुकाने, विक्री-प्रदर्शन, मॉल्स, सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेऊ शकता. यासोबतच सौंदर्यप्रसाधनांच्या घाऊक व्यापाऱ्यांनाही माल देता येईल. घरोघरी मालाचे विपणन करताना सौंदर्यप्रसाधनांची विक्रीही जास्त आहे. जो उत्पादन करायचे ठरवेल त्यानुसार कच्चा माल वापरला जाईल. नखांचा रंग तयार करण्यासाठी अमाइल अल्कोहोल, इथाइल एसीटेट, नायट्रो सेल्युलोज, मिथाइल इथर, इस्टर गम, आयसो प्रोफाइल अल्कोहोल, रंग इत्यादी कच्चा माल आवश्यक आहे. या उत्पादनासाठी स्वयंचलित यंत्रांची आवश्यकता असेल.

  • सिद्धनाथ मंदिर खरसुंडी

    सिद्धनाथ मंदिर खरसुंडी

    सिद्धनाथ हा शंकर देवांचा अवतार मानला जातो. सिद्धनाथ हा आटपाडी आणि लगतच्या प्रदेशांचा संरक्षक देव आहे व महाराष्ट्रातील अनेक प्रादेशिक क्षेत्रपाल देवांपैकी एक आहे. सिद्धनाथांचे ऐतिहासिक मंदिर, 450 वर्षांपूर्वी बांधलेले मोठे मंदिर आहे.

    या मंदिरातील शंकराचा पुनर्जन्म आहे ज्याला नाथबाबा असे म्हणतात. या देवाला दोन पत्नी होत्या एक देवी जोगेश्वरी आणि दुसरी पत्नी म्हणजे देवी जकाबाई खरसुंडीपासून काही अंतरावर राहत होत्या. नाथबाबा देवी जकाबाई यांना 3 वर्षातून एकदा भेटू शकतात आणि ही अट त्यांची पहिली पत्नी देवी जोगेश्वरीने ठेवली होती.
    खरसुंडी जवळ गोहदापूर नावाचे एक ठिकाण आहे जिथे पाण्याचा नैसर्गिक झरा युगानुयुगे वाहत आहे आणि कोरडा पडत नाही.

  • आंजर्ले सागरकिनारा

    आंजर्ले सागरकिनारा

    महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ अप्रतिम असा ‘आंजर्ले’ सागरकिनारा आहे. आपली सुट्टी कोकणात आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवायची असेल तर ‘आंजर्ले’ समुद्रकिनाऱ्याची निवड करायला काहीच हरकत नाही. या किनाऱ्यावर काळ्या आणि पांढऱ्या वाळूचे एकत्रीकरण दिसते. आंजर्लेतील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘काड्यावरचा गणपती मंदिर’ हे आहे. हे मंदिर गणेशमूर्ती आणि मंदिरासमोर भव्य बांधलेले तलाव यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरातून तुम्ही समुद्रकिनाऱ्याचे उत्तम दर्शन होते.

    आंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून जवळ श्री व्याघ्रेश्वर आणि श्री केशवराज यांची प्राचीन मंदिरे आहेत. जी आंजर्लेपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहेत. परशुराम भूमी हे येथील आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. येथे श्री परशुरामांची मोठी मूर्ती आहे. येथील भिंतीवर श्री परशुरामावरील संस्कृत श्लोक दिसतील. वर्षभरात कधीही आंजर्ले समुद्रकिनाऱ्याला भेट देऊ शकता, परंतु याठिकाणी भेट देण्याची सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आहे.

    हिंदू ‘माघ’ महिन्यात ‘काड्यावरचा गणपती’ मंदिरात गणपतीचा उत्सव आयोजित केला जातो. या कालावधीनंतर भेट देण्याची योजना आखल्यास, मार्चमध्ये होळीचा रंगीबेरंगी सण अनुभवता येईल. आंजर्लेच्या किनाऱ्यावर रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने पोहोचता येते. दापोली हे आंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून जवळचे प्रमुख शहर आहे. येथून आपण बसने जाऊ शकता. रेल्वेने गेल्यास खेडला उतरावे लागेल. दापोली ते खेड हे अंतर २९ किलोमीटर आहे. आंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. हे प्रवासाचे अंतर अंदाजे 230 किलोमीटर आहे.

  • मांजरसुभा किल्ला

    मांजरसुभा किल्ला

    अहमदनगर जिल्ह्यात ‘मांजरसुंभा’ हा किल्ला आहे. पुण्याहून हा किल्ला १४२ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. ‘वांबोरी’ घाटातील पायथ्याशी श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण सुरु झाल्यावर ‘मांजरसुभा’ गाव मिळते. ‘मांजरसुभा’ गावातून डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर किल्ल्याकडे जाणारा सिमेंटचा रस्ता लागतो. पुढे शनीमारुतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या आसपास गडाच्या खालच्या तटबंदीचे काही अवशेष सापडतात. काही काळापूर्वी इथे चुन्याचा घाना देखील बघायला मिळत होता; परंतु आत्ता तो सध्या तिथे नाही.

    गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी वाट चांगली केली आहे. १५ मिनिटामध्ये गडावर सहज पोहोचता येते. गडाचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेर २ देवड्या आहेत. आत प्रवेश केल्यावर २ भव्य दालने आहेत. या दालनांना प्रकाश येण्यासाठी झरोके आहेत. आत गेल्यावर जिना मिळतो. या जिन्याने प्रवेशद्वारावर जाऊन परिसर न्याहाळू शकता.

    प्रवेशद्वारातून आत गेल्यावर गडावर प्रवेश करतो. समोरच एक तुटलेल्या अवस्थेतील इमारत बघायला मिळते. या इमारतीच्या अगदी समोर प्रचंड मोठा हौद अथवा पाण्याची टाकी आहे. या टाकीची खोली जवळपास ५ ते ६ फुट आहे. राणी महालाच्या भिंतीच्या मागे गेल्यावर काही दालने आहेत. एका दालनात दर्गा आहे. या दर्ग्याच्या समोर हौदांची रचना असून त्यात तांब्याच्या पाईपलाईन दिसतात. तिथून थोडे पुढे गेल्यावर बुरुज दिसतो. दुमजली इमारत इथे बघायला मिळते. दुमजली इमारतीपासून पूर्वेला गेल्यावर गडाचा दुसरा दरवाजा लागतो. अनेक साहसी पर्यटक या मार्गाने गडाकडे येतात.

  • सोनावळेतील गणेश लेणी

    सोनावळेतील गणेश लेणी

    ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ‘सोनावळे’ गावाजवळ प्राचीन गणेश लेणी अथवा ‘गणेश गडद’ या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहेत. सोनावळे गावापासून साडे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे.

    इसवी सन १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची नोंद घेतली. ‘गणेश लेणी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दगडी गुहेत विविध दालने आहेत. त्यात हिंदू देवदेवतांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. पावसाळ्यात लेण्यांच्या वरच्या भागावरून कोसळणारा धबधबा फार मनमोहक असतो.

    पूर्वी हे पर्यटनस्थळ दुर्लक्षित होते; मात्र आता वन विभाग आणि सोनावळे ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लेण्यांमध्ये नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. सौर पथदिवे बसवून इथल्या दालनांमध्ये रात्री मुक्काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सोय करण्यात आली आहे.

    ग्रामस्थ आणि वन विभागाने लेण्यांकडे जाणारी पायवाट दुरूस्त केली आहे. कठीण चढ काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांची इथे सुलभ सोय झाली आहे. मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखालील ग्रामस्थांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारला जात आहे. पर्यटक आणि ग्रामस्थांच्या सूचना विचारात घेऊन याठिकाणी अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

    पाणी, वीज, चांगले रस्ते या सोयींमुळे आता ‘गणेश लेणी’ परिसरात पर्यटक येतात. वाटेत जैवविविधतेने श्रीमंत झालेले जंगल आहे. येथे अनेक दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती, रंगीबेरंगी फुले आणि फुलपाखरे आहेत. त्यातून सोनावळे ग्रामस्थांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

  • रवा इडली

    रवा इडली

    साहित्य : अर्धा किलो रवा, १ लहान चमचा मीठ, अर्धा लहान चमचा मोहरी, १०-१२ कढीपत्त्याची पाने, ३०० ग्रॅम आंबट दही, १ लहान चमचा खाण्याचा सोडा आणि तेल.

    कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि चिरलेला कढीपत्ता व रवा घालावा. थोडासा भाजून गॅस बंद करावा. गार झाल्यावर एका भांड्यात दही घेऊन त्यात रवा भिजवावा. मीठ घालून १ तास झाकून ठेवावा. हे मिश्रण जास्त पातळ असू नये. इडली पात्रांना तेल लावून ठेवावे. एका वाटीत तेल गरम करून त्यात १ लहान चमचा खाण्याचा सोडा घालून गरम करावे. हे रव्याच्या मिश्रणात घालून झटपट ढवळत रहावे. म्हणजे मिश्रण फुलून जाईल. आता हे मिश्रण पात्रामध्ये घालावे आणि नेहमीप्रमाणे इडल्या बनवाव्यात. इडली खोबऱ्याची चटणी आणि सांबारबरोबर वाढावी.

  • कानातील आकर्षक दागिने

    कानातील आकर्षक दागिने

    सणासुदीचा, लग्नसमारंभांचा हंगाम सुरू आहे. या उत्साहाच्या वातावरणात महिलांना वेशभूषा करण्यासाठी निमित्त आणि चांगली संधी मिळते. सणासुदीच्या काळात महिला सुंदर पोशाख आणि दागिन्यांची निवड करतात. पोशाख कितीही जड असला तरी मॅचिंग ज्वेलरी घातल्याशिवाय एकूणच साज अपूर्ण वाटतो. कपड्यांप्रमाणे दागिन्यांचा ट्रेंडही बदलत राहतो. दागिन्यांमध्ये कानातील दागिने सर्वात खास असतात. हे दागिने कानाचे सौंदर्य वाढवतातच, शिवाय व्यक्तीही फार सुंदर दिसते.

    ‘कुंदन ज्वेलरी’ हा कानातील दागिन्यांचा सदाबहार प्रकार आहे. आपणांस बाजारात आणि ऑनलाइन दागिन्यांच्या संकेतस्थळावर सर्वत्र ‘कुंदन’ कानातल्यांचे नवीनतम प्रकार सहज मिळतील. ‘चांदबाली’ हे चंद्राचे झुमके आहेत. खरे तर चांदबाली प्रकार इतके सुंदर असतात की, बघणारा फक्त बघतच राहतो. ‘चांदबाली’ शैलीचे कानातले सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्याचा आकार अर्ध्या चंद्रासारखा असतो. आपण आपल्या आवडीनुसार जड किंवा हलके चांदबाली निवडू शकता. ‘अमेरिकन डायमंड’ हा एक कानातील दागिन्यांचा प्रकार आहे. सणासुदीच्या काळात, बहुतेक सण रात्री साजरे होतात. अमेरिकन हिरा सर्वोत्तम आहे. त्यामुळे हे दागिने रात्री विशेष खुलतात. विशेष म्हणजे हे दागिने पारंपारिक आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांसोबत वापरता येतात.

  • बाळाची आंघोळ

    बाळाची आंघोळ

    बाळाची त्वचा नाजूक असल्याने त्याला आंघोळ घालताना आईला फार भीती वाटत असते. काळजी करू नका. आंघोळीसाठी वापरलेल्या साबणाने तसेच बाळाच्या अंगावरील तेलामुळे हात चटकन निसटू शकतो. त्याबाबत सावध रहा. बाळाला आंघोळीसाठी घेऊन जाण्यापूर्वी त्याला तेलाने छान हलक्या हाताने मसाज करा. आंघोळीसाठी आणि आंघोळीनंतर आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी नेऊन ठेवा.

    बाळाच्या आंघोळीसाठी कोमट पाणी वापरा. बाळाला आंगोळीसाठी नेण्यापूर्वी बादलीत पाणी भरून ठेवा. आंघोळीपूर्वी पाणी किती गरम आहे, हे बघून घ्या. बाळाची त्वचा फुलासारखी नाजूक असते. कुठल्याही रसायनांच्या संपर्कात आल्याने बाळाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे अगदी नैसर्गिक साबण वापरा. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

    बाळाला आंघोळ घालताना त्याला योग्य पद्धतीने धरणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपणास सोयीस्कर पडेल अशा बेताने बाळाला गुडघ्यावर धरा. सावकाशपणे अंगावर पाणी घालून बाळाचे केस धुवा. त्यानंतर त्याचा चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. बाळाला एका हाताने आधार द्या. दुसऱ्या हाताने आंघोळ घाला. पाटावर बसून समोर पाय सोडून बाळाला पायावर ठेवून आंघोळ घालावी. शांतपणे, धीराने, न घाबरता हे काम करावे.

    जर बाळाला ‘बाथटब’मध्ये आंघोळ घालायची असेल तर त्याच्या डोळ्यात, नाकात आणि कानात पाणी जाणार नाही, याची विशेष काळजी घ्या. चुकूनही बाळाला ‘बाथटब’मध्ये एकटे सोडू नका. बाळाची आंघोळ झाल्यावर सर्वप्रथम बाळाला मऊ सुती टॉवेलमध्ये गुंडाळून घ्या. बाळाचे संपूर्ण अंग हलक्या हाताने मऊ टॉवेलच्या सहाय्याने पुसून कोरडे करून घ्या. सैल सुती स्वच्छ कपडे घाला. आंघोळ केल्यावर बाळाला भूक लागते. यावेळी बाळाला पोटभर स्तनपान करा. बाळाचे पोट भरल्यावर ते छान झोपी जाईल.

  • पेन्सिल निर्मिती व्यवसाय

    पेन्सिल निर्मिती व्यवसाय

    लाकडी पेन्सिल किंवा शिसे पेन्सिल ही प्रत्येक घरातील अत्यावश्यक गोष्ट आहे. ती अनेकदा शिक्षक, विद्यार्थी, कलाकार वापरतात. साधारणपणे, बहुतेक लोक ‘एचबी’ आणि ‘२ बी’ पेन्सिल वापरत असतील, कारण त्या भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध असून त्यांची लोकप्रियता जास्त आहे. टॅब्लेट, सेलफोन, कॉम्प्युटर, प्रिंटर आणि इतर उपकरणांच्या आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत युगातही पेन्सिलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पेन्सिल बनविन्याच्या व्यवसायासही मागणी वाढत आहे.

    पेन्सिल हा एक शिशाचा पदार्थ आहे, जो लाकडात घातला जातो किंवा ‘मेटल होल्डर’मध्ये ठेवला जातो. मुख्यतः चित्र काढण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी याचा वापर केला जातो. पेन्सिल हे एक उपयुक्त साधन आहे. ते सर्व शाळांमध्ये आणि विविध कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये देखील आवश्यक असते. पेन्सिल गुळगुळीत लाकूड आणि शिसे या धातूपासून बनवतात. हा अतिशय स्पर्धात्मक व्यवसाय बनला आहे.

    अनेक उद्योजक गुणवत्ता आणि खर्चावर लक्ष केंद्रित करून विविध प्रकारच्या पेन्सिलचे उत्पादन करीत आहेत. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी दर्जेदार उत्पादन आणले पाहिजे. पेन्सिल ही सर्व स्तरावरील शाळा, सर्व प्रकारचे व्यवसाय आणि सरकारी संस्थांसाठी एक आवश्यक वस्तू आहे.

    पेन्सिल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कार्बन सामग्रीच्या प्रकारानुसार त्यांचे ‘मऊ’ आणि ‘कठोर’ माध्यमात वर्गीकरण केले जाते. विशेषत: लहान मुलांमध्ये रंगीत पेन्सिलने रेखाचित्र काढले जाते. पेन्सिलला पेनच्या तुलनेत सकारात्मक मागणी आहे. तिचा टिकाऊपणा, किंमत, तसेच खोडण्याची क्षमता यामुळे पेन्सिलला मागणी आहे. पेन्सिलद्वारे कागदाचाही पुनर्वापर करता येऊ शकतो. लिहिलेले पुसून इतर गोष्टी लिहिण्यासाठी कागद पुन्हा वापरता येतात. भारतात 1.5 दशलक्ष शाळा आणि 315 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीवनात पेन्सिल आवश्यक असते. भारतीय शिक्षण व्यवस्थेत आजही चौथीपर्यंत पेन्सिल वापरणे बंधनकारक आहे.

    भारतातील लेखन साधन विभाग सुमारे 2600 कोटी रुपयांचा असून तो खूप मोठा आहे. या क्षेत्रात दरवर्षी वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे. बाजारात दिवसेंदिवस लाकडी पेन्सिलची मागणी वाढत आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सरकारी कार्यालये, व्यावसायिक आस्थापने, स्वयंसेवी संस्था, बांधकाम क्षेत्र, कलाकार आणि इतर विविध उपक्रमांमध्ये पेन्सिलसाठी ग्राहक मिळू शकतात.

    वापरलेल्या कार्बनच्या प्रकारानुसार, पेन्सिलचे वर्गीकरण ‘मऊ’, ‘मध्यम’ आणि ‘कठोर’ असे केले जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिलमध्ये HB, B, 2B, 3B, 4B, 5B, 6B, 7B, 8B, 9B आणि 10B यांचा समावेश होतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी गुंतवणुकीची माहिती करून घ्यावी. आवश्यक खर्च, आवश्यक संसाधने, आवश्यक कर्मचारी, अडचणी आणि अनेक तपशील याबाबतची माहिती घ्यावी. लहान आकाराची लाकडी पेन्सिल बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नोंदणी आणि परवाने घेणे आवश्यक आहे. राज्याचे त्याबाबतचे नियम जाणून घ्यायला हवेत. आपल्या आवडीच्या व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेकडे व्यवसाय परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी उद्योग आधार नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तुम्हाला जीएसटी नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल. तुम्हाला तुमच्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही ना परवाना पत्र घेणे आवश्यक आहे तुमच्या व्यवसायासाठी जीएसटी क्रमांक मिळवा. आयईसी क्रमांक मिळवा. बीआयएस प्रमाणपत्र मिळवा. ट्रेडमार्क नोंदणी करून घ्या.

    पूर्णपणे स्वयंचलित मशीनद्वारे केवळ लाकडी पेन्सिल तयार केल्या जातात. यासाठी मशीन बॉल मिल, नीडिंग मशीन, फिल्टर प्रेस, स्लॅट्ससाठी स्वयंचलित आकार आणि ग्लूइंग मशीन आवश्यक असतात. पेंटिंग मशीन, एम्बॉसिंग मशीन, एंडकटिंग मशीन, डाय, कटर, टूल्स आणि इतर विविध यंत्रसामग्री गरजेची असते. आवश्यक कच्च्या मालामध्ये लाकडी स्लेट, बॉल क्ले, ग्रेफाइट, गोंद, पेंट, ड्रायर, वार्निश, लाह यांचा समावेश आहे. तुम्ही जवळपास 1500 स्क्वेअर फूट परिसरात लहान आकाराचा पेन्सिल बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला वीज आणि पाणीसुद्धा आवश्यक असेल. तसेच, वाहतूक शक्य आहे का याचीही पडताळणी करून घ्यावी.

    भाड्याने घेतलेल्या जागेत व्यवसाय सुरु करू शकता. यामुळे एकूण प्रकल्प खर्च कमी होतो. तुम्ही व्यवसाय विकास आणि विपणन उद्देशांसाठी पैसे वापरू शकता. शिसे उत्पादनासाठी, तुम्हाला मानकांनुसार योग्य प्रमाणात ‘बॉल क्ले’ सह उच्च दर्जाची ग्रॅफाइट पावडर मिसळणे आवश्यक आहे. नंतर ‘बॉल मिल’मध्ये पुरेसे पाणी घालून नंतर ओले मिश्रण बारीक केले जाते. नंतर मळणीच्या मशीनमध्ये कोरडे घटक एकसंध करण्यासाठी टाकले जाते. पेन्सिल बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. यात खूप सोप्या पायऱ्या आहेत. चांगल्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आपण हा व्यवसाय सुरु करू शकता.

  • सुगंधित सोनचाफा

    सुगंधित सोनचाफा

    सोनचाफा हे सर्वात लोकप्रिय फुलझाडांपैकी एक आहे. खोली सुगंधित करण्यासाठी, फुलांच्या हारात, तसेच धार्मिक समारंभांमध्ये, सुशोभिकरणासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. जमिनीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी हे झाड उपयुक्त आहे.

    या झाडाची पाने पालापाचोळा देतात. या झाडांमुळे जमिनीचा सामू सुधारतो. मातीतील सेंद्रिय कार्बन आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढून झाडाखालील माती सुधारते. म्हणून याची लागवड जमिनीच्या पुनर्वसनासाठीही केली जाते. त्याची पाने ही रेशीम किडे आणि फुलपाखरांच्या अळ्यांचे खाद्य आहे. या झाडांना भरपूर प्रकाश आणि उबदारपणा हवा असतो. सकाळचा सूर्यप्रकाश आणि उर्वरित वेळेत आंशिक प्रकाश असल्यास तो उत्तम असतो.

    ही वनस्पती लहान असताना त्याची मूळप्रणाली विकसित होण्याकरिता या झाडाला भरपूर पाणी द्यावे. मोठ्या झाडांना माफक प्रमाणात पाणी द्यावे. वसंत ऋतूमध्ये खतमात्रा द्यावी. हिवाळ्यात रोपांची छाटणी करावी. ही वनस्पती पोषक परिस्थितीत 30 मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. या वनस्पतीला आंब्याच्या पानांसारखी मोठी पाने असतात. मे ते ऑक्टोबर या कालावधीत ही झाडे फुलांनी बहरतात. या फुलांचा मोहक सुगंध संपूर्ण परिसराला सुगंधित करतो. सोनेरी – पिवळी, सोनेरी – नारिंगी आणि मलईदार – पांढरी अशा रंगांमध्ये ही फुले असतात.

    व्यावसायिकदृष्ट्या या वनस्पतीचे लाकूड वस्तू बनविण्यापासून ते सरपणापर्यंत वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरले जाते. या फुलांचा अर्क प्रसिद्ध ‘जॉय’ परफ्यूम तयार करण्यासाठी वापरला जातो. फुलांपासून काढलेले तेल संधिवातासाठी, डोळ्यांचा त्रास दूर करण्यासाठी वापरले जाते.

  • रेनकोट कव्हर निर्मिती

    रेनकोट कव्हर निर्मिती

    प्रत्येक व्यक्ती आपले वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत असते. चारचाकी गाड्या झाकण्यासाठीचे प्लास्टिक आच्छादन, तसेच पावसाळ्यात शरीर भिजू नये यासाठी वापरले जाणारे रेनकोट बनवून ते विकणे हा एक उत्तम चालणारा उद्योग आहे. शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये राहतात. बहुमजली इमारतींमध्ये प्रत्येक वाहन इमारतीच्या पार्किंगमध्ये लावले जाते. वाहनांच्या गर्दीत आपले वाहन सुरक्षित राहावे म्हणून ते कव्हरने झाकून ठेवले जाते. यामुळेच बाराही महिने कव्हरची मागणी असते.

    वाहन कव्हर किंवा रेनकोट तयार करण्यासाठी वॉटरप्रूफ कापड खरेदी करावे लागते. रेनकोट बहुधा पावसाळ्यापूर्वी तयार करून बाजारात विक्रीस ठेवावे लागतात. हा उद्योग करण्यापूर्वी उत्पादन कुठे विकायचे, त्या आवारात कोणत्या कंपनीचे, कोणत्या आकाराचे रेनकोट जास्त मागणी मिळविणारे ठरू शकतात, या पार्श्वभूमीचा अभ्यास करायला हवा. त्यानंतर आपली उत्पादने तयार करावीत. एकाच आकाराच्या पण वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसतात. त्यामुळे वाहनांची कव्हर्स बनविताना ‘फ्री साइज’ कव्हर तयार केल्यास अनेक कंपन्यांच्या मॉडेल्सना एकच कव्हर बसू शकेल.

    वाहन कव्हर बनविताना आपण आपल्या आवडीची कव्हर विविध आकर्षक रंगांमध्ये देऊ शकता. वाहन कव्हर तयार करण्यासाठी, आपणास कापणे आणि शिवणे याबाबत प्रशिक्षण घ्यावे लागेल. एक अकुशल आणि एक कुशल मजूर इतके मनुष्यबळ आपणास लागेल. शिंपी ज्या पद्धतीने कपडे शिवतात, त्या कृतीनुसार ‘फ्री साइज’ वॉटरप्रूफ रेनकोट बनवावेत. मागणीनुसार विविध वयोगटातील मंडळींसाठी रेनकोट शिवावेत.

    तुमच्याकडे असलेल्या आकारानुसार कापड कापल्यानंतर विशिष्ट शिवणयंत्रावर तुम्हाला हव्या त्या आकारानुसार शिलाई करा. पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक रेनकोट खरेदी करतात. जेणेकरून ते स्वतः आणि त्यांचे कपडे ओले होत नाहीत. त्यामुळे रेनकोट तयार करताना त्याच्या ‘वॉटरप्रूफिंग’चीही काळजी घ्यावी लागते. या व्यवसायाच्या यशासाठी ‘वॉटरप्रूफिंग’ हीच मूलभूत संकल्पना आहे. रेनकोट शिवल्यानंतर ‘हिट-प्रोसेस’ पद्धतीने त्याला चेन आणि बटणे जोडा. तयार रेनकोट वेष्टनबंद करून बाजारात न्या.

    प्रशिक्षण घेतल्यावर रेनकोट किंवा कार कव्हर तयार करण्याचे काम सहज शिकता येते. कमी भांडवलात ग्रामीण किंवा शहरी बेरोजगारांना व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करता येते. तुम्ही कोणत्याही राज्यात कुठेही हा व्यवसाय सुरू केलात, तरी यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. विक्रीसाठी रस्त्यालगत एखादे छोटे दुकान लावून वाहनांची कव्हरही विकता येतात. त्यासोबतच घाऊक व्यापारी, कपड्यांची दुकाने, सुपर मार्केट, मॉल्स या ठिकाणी रेनकोट किंवा कार कव्हर विकले जातात. विक्री प्रतिनिधी नियुक्त करून आपण आपले उत्पादन विकू शकतात.

    गॅरेज, शोरूम, सेवा केंद्रे मालकांना चांगले मार्जिन देऊन कार कव्हरसाठी विक्री केंद्रही सुरू करू शकतात. पॉलिथिनच्या आकर्षक रंगांच्या शीट, वॉटरप्रूफ प्लास्टिककोटेड कापड, धागा, बटणे, चेन,इ. कच्चा माल या उद्योगासाठी लागतो. शिवणयंत्र, काज-बटणे लावण्यासाठी हीट प्रोसेस मशीन ही यंत्रसामग्री आणि कटिंग टेबल, टेलरिंग मटेरियल, टूल्स हे साहित्य यासाठी आवश्यक असते.

  • टायर पुनर्निर्मिती व्यवसाय

    टायर पुनर्निर्मिती व्यवसाय

    नव्याने विकसित केलेले वाहनांचे टायर 6 महिने ते वर्षभर वापरले जाऊ शकतात. चारचाकी वाहनांच्या किंमती जास्त असतात, तसेच नवीन टायरच्या किंमतीही जास्त असतात. त्यामुळे जुने टायर प्रक्रिया करून नव्यासारखे केले जातात आणि पुन्हा वापरात आणले जातात. टायर झिजल्यावर नवीन टायर बसवणे आर्थिक दृष्टिकोनातून प्रत्येक वाहनधारकाला महागात पडते. त्यामुळे 80 टक्के वाहनधारक वाहनांचे टायर अशा पद्धतीने पुन्हा वापरतात.

    या व्यवसायात जीर्ण टायरचा बाह्य भाग घासला जातो आणि उर्वरित उंची कापली जाते. टायर पूर्णपणे मऊ केला जाऊन नवीन रबर तयार केले जाते. ‘बफिंग मशिन’च्या सहाय्याने टायरच्या बाहेरील भागाला ॲब्रेड करतात. त्यानंतर नवीन रबराचे टायर मॅट्रिक्समध्ये सेट करून 2.5 ते 3 तास रिमोल्डिंग मशीनमध्ये ठेवतात. हे टायर किमान 6 महिने ते वर्षभर वापरता येतात. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याने टायर रिट्रेडिंगचा हा व्यवसाय जोरात सुरू आहे.

    टायर योग्य प्रकारे विकसित केल्यास ग्राहक असे टायर खरेदी करू शकतात. जुने जीर्ण झालेले मऊ टायर खूप स्वस्त असतात आणि स्वतः विकसित केल्याने तुमचा प्रक्रिया खर्च खूप वाचतो. त्यामुळे या पद्धतीमुळे चांगला नफा मिळतो. लहान कंपन्या, वाहतूक कंपन्या, साखर कारखाने असे टायर खरेदी करतात. टायर रिट्रेडिंग व्यवसायाच्या ठिकाणी ‘ व्हल्कनाइझिंग’ आणि पंक्चर काढणे यासारखे सह-व्यवसाय देखील केले जाऊ शकतात.

    तांत्रिक व्यवसाय असल्याने कृपया एकाच रिमोल्डिंग कंपनीकडे काम करून टायर रिमोल्डिंगचे थेट ज्ञान घ्या. हा व्यवसाय अनुभवातून शिकायचा असल्याने प्रत्यक्ष ज्ञान घेऊन तुम्हाला व्यवसाय सुरू करावा लागेल. सर्व वाहने रोज रस्त्यावर धावतात आणि त्यांचे टायर काही दिवसातच झिजतात. या कारणास्तव प्रत्येक चारचाकी चालकाचा आपला ग्राहक म्हणून विचार करा. या व्यवसायात फारशी स्पर्धा नसल्याने ग्राहक शोधण्याची गरज नाही. कंपन्या, कारखाने, वाहतूक कंपन्या, ट्रॅव्हल्स कंपन्या, कार्यालये त्यांच्या प्रमुखांना आपण भेटू शकता. त्यांच्या वतीने त्यांच्या कंपनीचे जुने टायर पुन्हा तयार करण्याचे काम मिळवू शकता. गिंडर, कटर, वॉटर पंप मोटर, कॉम्प्रेसिंग टेस्टिंग गेज, मॅट्रिक्स, लहान क्रेन इ. प्रकारची यंत्रसामग्री या व्यवसायासाठी गरजेची आहे.