बितनगड किल्ला

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात बितनगड किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्यास ‘बितंगा’, ‘बिताका’ या नावांनीही ओळखतात. या गडावर जायचे असेल तर प्रथम ‘घोटी’ गावात जायला हवे. इथून भंडारदरा रस्त्यावर ‘टाकेद’ गावाला जाण्यासाठी एक फाटा आहे. या फाट्यावरून पुढे गेल्यावर ‘बितनवाडी’ हे गाव मिळते. बितनवाडी गाव बितनगडाच्या पायथ्याशी आहे.

बितनगड हा किल्ला कळसुबाई डोंगररांगेची उपरांग असलेल्या पट्टा डोंगररांगेत आहे. बितनवाडी गावामधून गडाकडे जाणारी पाऊलवाट सुरु होते. वाटेच्या बाजूला वाढलेल्या झाडीमधून वाट काढत गडाकडे जावे लागते. थोडीशी चढाई केल्यानंतर आपल्याला बालेकिल्ल्याच्या पायऱ्या दिसायला लागतात. वाटेत पाण्याच्या टाक्यांचेही दर्शन घडते.

पायऱ्यांनी चढून वर गेल्यावर एक गुहा दिसते. ही गुहा मोठी आहे, गडावर मुक्कामाच्या हेतूने जाणारे येथे आश्रय घेतात. गुहेतून बाहेर आल्यावर गडमाथ्यावर जावे. एका बाजूला बुरुजाची ढासळलेली वास्तू अस्पष्ट दिसते. गडावरील तोफांना दिशा देण्यासाठी असणारी आरी येथे आहे. धुके नसेल तर किल्ल्यावरुन ‘औंध’ आणि ‘आड’ हे किल्ले देखील दिसतात. ‘अलंग-मदन-कुलंग’ यांचे दर्शन देखील घडते. हे सर्व विहंगम दृश्य इतिहासप्रेमींचे मन हरखून सोडते. इतिहासात डोकावल्यास एका पत्रात या गडाच्या पायथ्याशी बितनवाडी गावाचा उल्लेख आढळतो. हा किल्ला स्वराज्याचा एक भाग होता. या किल्ल्यावर एखाद-दुसरी तोफ असावी. याचा वापर जास्तीत जास्त टेहाळणीसाठीच केला गेलेला असावा असे दिसते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
517 वेळा पाहिलं