सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • अक्रोडची शेती

    अक्रोडची शेती

    अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, स्नायू तयार करण्यासाठी आणि स्वत:ला सक्रिय आणि उर्जेने परिपूर्ण ठेवण्यासाठी अक्रोड फळांचे सेवन करतात. बदाम, अक्रोड, बेदाणे, काजू असे ड्रायफ्रूट्स अनेक लोक रोज खातात. हा पोषक तत्वांचा खजिना आहे. पण ड्रायफ्रुट्स खाणे जास्त फायदेशीर आहे. त्यांच्याकडून मिळणारी कमाईही तितकीच चांगली आहे. अक्रोड हे असेच एक ड्राय फ्रूट आहे.अक्रोडची शेती करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

    अक्रोडाची लागवड साधारणपणे डोंगराळ भागात केली जाते. अक्रोडाच्या बागा जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात आढळतात. सपाट भागात अक्रोडाची वाढ होत नाही. थंड आणि उष्ण दोन्ही हवामान त्याच्या लागवडीसाठी योग्य आहेत. अक्रोड लागवडीसाठी 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानले जाते. हे कमाल तापमान 35 अंश, तर किमान तापमान 5 अंश सेल्सिअस आहे.

    अक्रोडाचे रोपण करण्यापूर्वी त्याची रोपवाटिका तयार केली जाते. त्याच्या तयारीसाठी येथे कलम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यांना तयार होण्यासाठी 2 ते 3 महिने लागतात. अक्रोडाचे रोप डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये शेतात घेतले जाते. त्याच्या झाडाची उंची साधारणतः 40 ते 90 फूट असावी.

    अक्रोडाच्या एका झाडातून भरपूर उत्पन्न मिळते. साधारणत: अक्रोडाचे झाड हंगामात 40 ते 50 रुपये प्रतिकिलो उत्पन्न देते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाजारात अक्रोड 700 ते 1000 रुपये किलो दराने विकले जाते. एका झाडाला 30 हजार ते 35 हजारांचे उत्पन्न मिळते.

  • महाराष्ट्रातील तळाशील किनारा

    महाराष्ट्रातील तळाशील किनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सागरकिनारे आहेत. यातील काही किनारे आपल्याकडे गर्दी खेचून आणतात, तर काही किनारे आपल्याच मस्तीत एकांतात दिसतात.
    येथील प्रत्येक किनारा अनुपम आहे. मालवणमधील ‘तळाशील किनारा’ हा देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक येत असले, तरीही या किनाऱ्यावर फारशी गर्दी दिसत नाही.

    नारळाच्या झाडांनी आच्छादलेला हा सोनेरी वाळूचा लांब पल्ला आहे. निवांत किनाऱ्यांच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा समुद्रकिनारा एक उत्तम ठिकाण आहे. येथील स्थानिक मंडळी विशेषतः युवा वर्ग आवर्जून या किनाऱ्याला भेट देतात. माडांच्या झाडाखाली बसून मस्तपैकी लाटांचे खेळणे अनुभवता येते. समुद्राची गाज ऐकता येते.
    कधीतरी या किनाऱ्याला नक्की भेट द्यावी. पर्यटकांची गर्दी नसल्याने छानपैकी एकांतात वाळूत चालण्याचा अनुभव घेता येतो.

  • कुणकेश्वर मंदिर

    कुणकेश्वर मंदिर

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात देवगडमध्ये असलेले कुणकेश्वर मंदिर सुप्रसिद्ध आहे. शिवशंभूचे हे देवस्थान भाविकांनी नेहमी गजबजलेले असते. हे मंदिर सागरकिनाऱ्यावर आहे. सागराच्या खळाळणाऱ्या लाटा भाविकांना पर्यटनाचाही मनमुराद आनंद देतात. येथे भाविकांना शांततेचा अनुभव मिळतो. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे मंदिराची उभारणी 10 मीटर दगडी भिंतीने मजबूत केली आहे.

    या ठिकाणाबाबत एक कथा सांगितली जाते. एकाच्या म्हणण्यानुसार, कुणकीच्या जंगलात एक गाय होती. ती दगडावर तिच्या दुधाचा वर्षाव करीत असे. हे वारंवार होऊ लागल्यावर संतप्त गाय मालकाने हातोड्याने दगडावर वार केले. वार करताच त्यातून रक्त वाहू लागले. हा दगड दैवी असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने प्रार्थना केली. त्याच वेळी त्याला साक्षात्कार होऊन हे मंदिर अस्तित्वात आले असल्याचे भाविक सांगतात. भगवान कुणकेश्वरचे निवासस्थान म्हणून हे ओळखले जाऊ लागले.

    आणखी एका कथेनुसार, इराणी खलाशांचे जहाज किनारपट्टीपासून चक्रीवादळात अडकले. किनाऱ्यावरील दिव्याच्या प्रकाशाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तो दैवी प्रकाश असल्याचे खलाशाच्या लक्षात आले. या परिस्थितीतून सुटण्यासाठी त्या प्रकाशाच्या स्त्रोताकडे तो प्रार्थना करू लागला. तेथे मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने त्याचे जहाज कोणत्याही समस्येशिवाय समुद्रकिनारी आले. तेथे आल्यावर टेकडीवर शिवलिंग असल्याचे त्याने पाहिले. खलाशी गैर-हिंदू असल्यामुळे मंदिर बांधल्यानंतर आपला धर्म आपल्याला स्वीकारणार नाही, असे त्याला वाटले.

    त्यामुळे त्याने मंदिराच्या माथ्यावरून आत्महत्या केली. मंदिराच्या परिसरात, नाविकाच्या स्मरणार्थ बांधलेली एक स्मृती पहायला मिळते. येथे सहा दीपमाळा आहेत. नंदीची मूर्ती भाविकांचे स्वागत करते. मंदिराच्या मुख्य शिखरावर कामधेनूच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. कुणकेश्वर हे शिव पंचायतन मंदिर आहे. येथे शिव पिंडी आणि पार्वतीची मूर्ती पहायला मिळते. मंदिरातील गणेश प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण असून तिला 3 हात आहेत. या किनाऱ्यावर डॉल्फिन दिसण्याची शक्यता असते. या मंदिरात शिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवरात्रीला जगाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक खास मंदिराला भेट देतात.

  • भांगसी गड

    भांगसी गड

    छत्रपती संभाजीनगर शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगेपासून वेगळा झालेला एक लहानसा डोंगर आहे. या डोंगरावर कातळात कोरलेला ‘भांगसी गड’ हा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्यावरील कातळात कोरून काढलेल्या भुयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला ‘भांगसाई गड’ या नावानेही ओळखतात. भांगसाई देवी ट्रस्टने भुयारी मंदिरावर नवीन मंदिर आणि गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे या गडावर औरंगाबाद परिसरातील लोकांचा वावर वाढलेला आहे.

    भांगसी गड हा किल्ला औरंगाबाद-देवगिरी रस्त्यावर आहे. हा गड पाहण्यासाठी साधारणपणे १ तास लागतो. भांगसी गडाचा इतिहास उपलब्ध नाही. या गडावर कातळात खोदलेली टाकी आणि गुहा आहे. ‘भांगसी’ गड चढताना गडमाथ्याच्या उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक गुहा आहे. गुहेच्या पुढे सिमेंटच्या पायऱ्या संपून कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर कातळात कोरून काढलेल्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशद्वाराची कमान उध्वस्त झालेली आहे.

    प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस तटबंदीचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर चिंचोळा गडमाथा दिसतो. गडावरील सर्व अवशेष पश्चिमेला असल्यामुळे उजव्या बाजूला भांगसाई देवी मंदिराकडे चालत जावे लागते. वाटेत मंदिरासमोर एक बुजलेली टाकी पहायला मिळते. भांगसाई देवीच्या मुळच्या भुयारी मंदिरावर नवीन मंदिर बांधण्यात आले आहे.

    मुर्तीच्या डाव्या बाजूच्या असलेल्या झरोक्यातून रांगत गेल्यावर प्रशस्त गुहेत पोहोचतो. या कातळात कोरुन काढलेल्या गुहेला २५ खांब आहेत. या गुहेचे तोंड दक्षिणेला आहे. ही गुहा 2 स्तरात खोदलेली आहे. उजव्या बाजूस पाण्याचे विशाल तळे खोदलेले आहे. या रचनेमुळे उन्हाळ्याच्या दिवसात गडावरील शिबंदीला पाणी आणि थंडावा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असे. या गुहेच्या उजव्या बाजूला गणपतीची मुर्ती, शिवलिंगआणि नंदी आहेत.

    भांगसाई देवीच्या मंदिरामागे एक कोरडे तळे आहे. गडाच्या दुसर्याध बाजूला दक्षिणाभिमुख दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. या दरवाजासमोर कातळात खोदलेल्या गुहा आहेत. त्यांचा उपयोग देवडीप्रमाणे होत असावा. आज या गुहा बुजलेल्या आहेत.

    छत्रपती संभाजीनगर शहरापासून ‘शरणपूर’ गाव साधारण १० किमीवर आहे. येथून डाव्या बाजूच्या रस्त्याने पलिकडे गेल्यावर ‘भांगसी’ गडाचा एकमेव डोंगर आहे. येथे गडाची दिशा दाखवणारे फलक लावलेले आहेत. या रस्त्यावर डावीकडे जाणारा रस्ता ‘भांगसी’ गडाच्या पायथ्यापर्यंत जातो. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी १५ मिनिटे ते ३० मिनिटे लागतात. छत्रपती संभाजीनगरहून वेरूळ, मनमाड, चाळीसगावकडे जाणाऱ्या एसटीने शरणपूर फाट्याला उतरावे. तेथून चालत पाऊण तासात किल्ल्यावर जाता येते.

  • मयूर अभयारण्य

    मयूर अभयारण्य

    महाराष्ट्रातील बीडमध्ये असलेले नायगावचे मयूर अभयारण्य म्हणजे पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पहाटे पाच-साडेपाचला अभयारण्याजवळच्या नायगाव रस्त्यावरून गेल्यास दुतर्फा मोर-लांडोरांच्या लक्षवेधी जोड्या डोळ्यांना सुखद आनंद देतात. येथे मोरांची संख्या खुप मोठी आहे. त्यामुळेच या अभयारण्याला ‘मयूर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले आहे. येथे १०० हून अधिक प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळतात.

    या अभयारण्यात पाणवठ्यावर आलेले, झाडाच्या फांद्यांवर भला मोठा पिसारा लोंबकळत सोडून आरामात बसलेले मोर दिसतात. डोंगराच्या पायथ्याशी असलेले मोरांचे थवे चित्त आकर्षून घेतात. पिसारा फुलवून थुई-थुई नाचणारे मोरही नकळत चित्त आकर्षून घेतात.

    बीड शहराच्या पश्चिमेस २० किमी अंतरावर डोंगराळ भागात वसलेले हे अभयारण्य आहे. पावसाळ्यात हिरवेगर्द झालेले डोंगर मनास तजेला देऊन जातात. या भागात मुळातच मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या मोरांची संख्या लक्षात घेऊन शासनाने २९.९० चौ.कि.मी चा हा प्रदेश ८ डिसेंबर १९९४ रोजी ‘नायगाव मयूर अभयारण्य’ या नावाने संरक्षित केला. या परिसरात मदरशा दर्गा, डोंगरीचे गुरुकुल, डोंगकरकिन्हीचे नागेश्वर मंदिर ही पाहण्यासारखी स्थळे आहेत.

    हे मयूर अभयारण्य दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीच्या आणि काटेरी वनाच्या प्रकारात मोडते. प्रादेशिक वन विभागाने या क्षेत्रात अंदाजे १२०० हेक्टर क्षेत्रावर विविध झाडांची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, लिंब, ग्लेरिसिडीया, शिरस, बोर, यासारख्या झाडांचा समावेश आहे. नैसर्गिकरित्या दिसणाऱ्या झाडांपैकी बेल, मोहा, आवळा, साग, बहावा, बिबा, पळस, खैर, तेंदू, सालई, मोवई, ऐन, मेडशिंग, बेहडा, चंदन यासारखी झाडे येथे मोठ्या प्रमाणावर आहेत.

    येथे पवना, कुसळी, शेडा यासारख्या गवताच्या प्रमुख जाती असून करवंद, घाणेरीची झडुपे आणि सिताफळाची जाळी दिसून येते. या अभयारण्यात मोराबरोबर कोल्हा, रानमांजर, काळवीट, तरस, लांडगा, ससे यासारख्या वन्यप्राण्यांचे अस्तित्त्व जाणवते.
    उन्हाळ्यात मोरांची तहान भागवण्याचे आणि त्यांची भूक भागवण्याचे काम गावकरी मोठ्या उत्साहाने करतात. नायगाव अभयारण्याचे मुख्यालय बीड येथे आहे. या रस्त्यावर एस.टी. बस सेवा तसेच खासगी वाहनांची नेहमीच वर्दळ असते.

  • ओल्या काजूची भाजी

    ओल्या काजूची भाजी

    ओल्या काजूचे दिवस सुरु आहेत. गावांमध्ये गेल्यावर झाडावर लगडलेले काजू वाऱ्यावर डोलताना दिसतात. अर्थात, बाजारातही ते उपलब्ध आहेत. ओले काजू स्वादिष्ट असतात. आज बनवूया, ओल्या काजूची भाजी.
    साहित्य : पाव किलो सोललेले ओले काजूगर, २ कांदे, २ बटाटे, १ टोमॅटो, अर्धा ओला नारळ किसून, लसुण, आले, गरम मसाला पावडर, तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि तेल.

    कृती : ओले काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून त्यांचे तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, एक बारीक चिरलेला कांदा, लसुण व बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. हे मिश्रण चांगले परतवून घ्यावे. छान मऊ शिजल्यावर त्यात सोललेले काजू आणि बटाट्याचे तुकडे घालावेत. त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.

    आता बारीक उभा चिरलेला कांदा तेलात भाजून घ्यावा. तो लालसर झाला की त्यात ओले खोबरे घालून खरपूस भाजून घ्यावे. या भाजलेल्या कांदा- खोबऱ्याचे मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटण करुन घ्यावे. कढईतील बटाटा, काजू शिजले की त्यात हे मिश्रण घालून मिसळून घ्यावे. एक मस्त वाफ आणावी. यावेळी त्यात गरम मसाला पावडर घालावी. उतरताना बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

  • सकारात्मक नातेसंबंध

    सकारात्मक नातेसंबंध

    मुलांचे भावविश्व नाजूक असते. त्यांच्या मनाची कोरी पाटी सुसंस्कारांनी भरण्यासाठी, तसेच कुटुंबातील इतर सदस्याला आनंदाने जगता येण्यासाठी कौटुंबिक नातेसंबंध मजबूत आणि सकारात्मक असावे लागतात. ते नकळतपणे मुलांच्या मनावर परिणाम करीत असतात. तेव्हाच मुलांना सुरक्षित वाटते.

    सकारात्मक कौटुंबिक नातेसंबंध हे एकमेकांना दिला जाणारा वेळ, संवाद आणि एकमेकांचे कौतुक यावर बांधले जात असतात. सकारात्मक कौटुंबिक संबंध इतर अनेक कारणांसाठी देखील महत्त्वाचे आहेत. यामुळे मुलांना नवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा आत्मविश्वास मिळतो. कुटुंबातील समस्या सोडवणे सोपे होऊन जाते. मुलांना कलाकौशल्यांचेही ज्ञान द्या.

    दर्जेदार कौटुंबिक वेळ म्हणजे कुटुंबीयांनी एकत्र सहवासात घालविलेला जास्तीत जास्त वेळ होय.
    दिवसातील काही वेळ एकत्र बसावे, बोलावे, संवाद साधावेत. हास्यविनोद करावेत. एकमेकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. मुलांना समजून घ्यावे. मुलांसमोर मोठ्या माणसांनी कधीही वाद करू नयेत.

    वैयक्तिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत मनमोकळे बोला. मूल झोपायला जाण्यापूर्वी काही मिनिटे तरी त्याच्याशी संवाद साधा. जसे मोठे म्हणून आपले स्वतःचे जग आहे, तसेच त्यांचेही एक जग आहे. तिथे त्यांचे काय चालले आहे, हे जाणून घ्या. मुलांच्या मित्रमैत्रिणींविषयी जाणून घ्या.तुमच्या जोडीदाराला वेळ द्या. एकत्र कुटुंब म्हणून नियमितपणे मजेदार गोष्टी करा. आठवड्यातून एकदा स्थानिक उद्यान किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाऊन या.

    कुटुंबातील इतर सद्स्यानाही त्यांचे दृष्टिकोन किंवा भावना व्यक्त करण्यासाठी वेळ द्या. कोणाच्याही चुका, राग, आनंद, निराशा, भीती आणि चिंता यासह सर्व प्रकारच्या भावनांबद्दल बोलण्यास मोकळे रहा; परंतु त्यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी क्रोधाला आवर घालणे कधीही चांगले ! उत्स्फूर्त संभाषणांसाठी तयार रहा. उदाहरणार्थ, लहान मुले आंघोळ करीत असताना किंवा अंथरुणावर पडताना त्यांच्या भावनांबद्दल बोला.

    किशोरवयीन मुलांशी लैंगिक जाणीव, ड्रग्ज, अल्कोहोल, शैक्षणिक अडचणी आणि पैसा अशा अनेक विषयांबद्दल आस्थेने बोला. आपल्या मुलांना कौतुकावेळी स्तुतीने प्रोत्साहित करा. कुटुंबातील प्रत्येकाला कळू द्या की, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. त्यांचे कौतुक करता.

  • घामोळ्यापासून सुटकेसाठी घरगुती उपाय

    घामोळ्यापासून सुटकेसाठी घरगुती उपाय

    उन्हाळा म्हटला की येणारा प्रचंड घाम आणि त्या घामामुळे शरीरावर येणारे लाल चट्टे, घामोळी यांमुळे जीव अगदी हैराण होतो. जिथे घाम साचतो त्याठिकाणी हमखास आपल्याला बारीक पुरळ आलेले दिसते. त्या पुरळाला खाज सुटली की माणूस अक्षरशः बेचैन होतो. यावर काही घरगुती उपायांनी मात करता येते. पण याची तीव्रता वाढल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

    ‘मुलतानी माती’ कुठल्याही औषधांच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होते. आवश्यक तेवढी मुलतानी माती एका वाटीत काढायची. तिच्यात पाणी मिसळून गुठळ्या होणार नाहीत ना याकडे लक्ष द्यायचे. तिची पेस्ट बनवायची आणि जिथे घामोळ्या किंवा लाल चट्टे आहेत त्या भागावर लावायची. ती वाळल्यावर थंड पाण्याने धुवायची. एक दिवसाआड हा उपाय केल्यास तुम्हांला फरक जाणवू शकतो.

    ‘चंदन’ तर मूळातच थंड. त्यामुळे चंदन उगाळून किंवा चंदनाच्या पावडरची पेस्ट तयार करायची. चंदन उगाळताना किंवा चंदनाच्या पावडरची पेस्ट तयार करताना तिच्यात गुलाबपाणी मिसळावे. ते शरीराला लावावे. कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवाने. हे आठवड्यातून ३ वेळा केल्यास शरीराची होणारी लाही कमी होते.

    कधी ‘दही’ अंगाला लावलेले पाहिले आहे का किंवा तुम्ही कधी लावले आहे का? जर नसेल, तर हा उपाय नक्की करा. दह्यामध्ये विषाणूंशी लढण्याची सर्वांत जास्त शक्ती असते. एका वाटीत दही घ्यायचे. ते फेटून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि खाज येणाऱ्या शरीराच्या भागाला लावायची. १५ ते २० मिनिटांनी दही लावलेला भाग धुवून टाकायचा. हा उपाय जर रोज केला, तर शरीरामधील उष्णता कमी होण्यास मदत होते.

    ‘कोरफडी’चा गर एका वाटीत काढून घ्यायचा. तो गर जिथे घामोळ्या किंवा लाल चट्टे आले आहेत त्या भागाला लावायचा. अर्ध्या तासानंतर धुवून टाकायचा. हा उपाय तुम्ही दिवसातून कितीही वेळा करू शकतात.
    ‘कच्ची कैरी‘ शिजवून घ्यायची. तिचा गर काढून तो फ्रिजमध्ये ठेवायचा. मग जिथे घामोळे आहे त्या भागावर लावायचा. थोड्यावेळाने धुवून टाकायचा. त्यामुळे घामोळ्यांपासून आराम मिळतो आणि शरीरातील उष्णताही कमी होते.

    ‘कडुलिंब’ हा मूळातच बहुगुणी आणि औषधी आहे. कडुलिंबाची पाने एक लीटर पाण्यात उकळवून घ्या. त्या पाण्याने दररोज आंघोळ केल्यास उन्हाळ्यामुळे येणाऱ्या घामोळ्याचा, लाल चट्ट्यांचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करूनही ती लावू शकतात. ती लावल्यावर १५ मिनिटांनी धुवून टाकायची. आठवड्यातून दोन वेळा ही पेस्ट लावल्यास फरक जाणवेल.

  • सुरळीत श्वसनासाठी

    सुरळीत श्वसनासाठी

    श्वास न घेता जगणे निव्वल अशक्य ! यासाठी आपला श्वसनमार्ग, फुफ्फुसे कार्यक्षम असली पाहिजेत. याकरिता काही कृतींचा अवलंब आपण केला पाहिजे. धुम्रपान टाळलेच पाहिजे. धुम्रपानामुळे श्वसनमार्गावर, तसेच फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होतो. दरवर्षी लाखो लोकांचा धुम्रपानासंबंधित आजारामुळे मृत्यू होतो. त्यामुळे ही गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे.

    हात नेहमी स्वच्छ धुतले पाहिजेत. जेवणापूर्वी, जेवणानंतर, शौचास जाऊन आल्यानंतर, बाळाची शी धुतल्यानंतर तसेच कोणतेही काम केल्यावर हात स्वच्छ धुवावेत. मुलांना तशी सवय लावावी. आपले हात साबण आणि पाण्याने धुवावेत. यामुळे कोणतेही विषाणू पोटात जात नाहीत. फुफ्फुसे हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे.

    दररोज व्यायाम, प्राणायाम करावा. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. फुफ्फुसातील ऊतींना बळकटी मिळते. हृदय, फुफ्फुसे आणि स्नायू एकत्रितपणे कार्य करण्यास मदत करतात. श्वासोच्छवास सुरळीत चालू राहतो.
    याशिवाय धावणे, पोहणे हेसुद्धा उत्कृष्ट पर्याय आहेत. नियमित वेगवान चालणेदेखील फुफ्फुसासाठी उत्तम आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवावा. तेथे प्राणवायू मुबलक मिळतो. त्याचा खूप चांगला परिणाम शरीरावर होतो.

  • मुंबईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडा

    मुंबईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडा

    मुंबई हे शहर गजबजाट आणि उंच उभ्या असलेल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या गजबजाटापासून दूर असलेली आणि खासगीरित्या विकसित केलेली ‘ग्लोबल विपश्यना पॅगोडा’ ही वास्तू गौतम बुद्धांच्या शिक्षण व ध्यान स्वरूपावर केंद्रित आहे.

    हे सुप्रसिद्ध विपश्यना ध्यान गुरु आचार्य एस.एन.गोयंका यांची प्रेरणा आहे. भारतातील बौद्ध धर्माच्या शिकवणीचे संरक्षण आणि जतन करण्यात ही वास्तू मोलाची भूमिका बजावत आहे. ‘ग्लोबल विपश्यना पॅगोडा’ चे सभागृह ३२५ फूट उंच आहे. हे बांधण्यासाठी 11 वर्षे लागली. म्यानमारमधील श्वेडॅगॉन पॅगोडाची ही प्रतिकृती आहे. ‘ग्लोबल विपश्यना पॅगोडा’ बोरीवली-पश्चिम येथे आहे. येथे बुद्धांचे अस्सल केसांचे अवशेष आहेत. यातील काही अवशेष ब्रिटिश सरकारच्या पुरातत्व विभागाने परत मिळवले आहेत. नोंदीनुसार, ‘ग्लोबल विपश्यना पॅगोडा’ हा जगातील सर्वात मोठा स्तंभ नसलेला घुमट आहे.

    विशेषत: ध्यानासाठी हा बनविलेला आहे. मध्यभागी असलेल्या मुख्य सभागृहाचा व्यास 280 फूट आहे. त्याची आसन क्षमता 8,000 आहे. मुख्य पॅगोडासह, उत्तर आणि दक्षिणेला बांधलेले 60 फूट 2 लहान पॅगोडा आहेत. उत्तर पॅगोडामध्ये ध्यान शिकवण्यासाठी एक ध्यान कक्ष आहे. दक्षिणेकडे सुमारे 108 ध्यान कक्ष आहेत. शिवाय, भव्य संकुलात ‘धम्मपट्टण’ नावाचे विपश्यना केंद्र आहे, जेथे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम दररोज चालवले जातात. या केंद्रामध्ये सुमारे 100 वातानुकूलित खोल्या, दृकश्राव्य केंद्र आणि एक ध्यान सभागृह आहे. तळमजल्यावर स्वच्छतागृहे, कार्यालये अशा सुविधा आहेत.

    कोरीवकाम केलेले म्यानमार गेट, बुद्धाची एक विशाल संगमरवरी मूर्ती, बेल टॉवर आणि गोंग टॉवर हे ग्लोबल विपश्यना पॅगोडाचे मुख्य आकर्षण आहे. ग्लोबल विपश्यना पॅगोडा बनविण्याची योजना सन 1997 मध्ये सुरू झाली; परंतु बांधकाम 2000 मध्ये सुरू झाले. पॅगोडाचे 3 उपविभाग आहेत. घुमट या तिघांपैकी पहिला आणि सर्वात मोठा असून सन 2006 मध्ये पूर्ण झाला. पहिला घुमट म्हणजे बुद्धाचे अवशेष असलेली जगातील सर्वात मोठी रचना आहे. तिसऱ्या घुमटाचे बांधकाम 21 नोव्हेंबर 2008 रोजी संरचनात्मकदृष्ट्या पूर्ण झाले. 8 फेब्रुवारी 2009 रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पॅगोडाचे उद्घाटन झाले.

  • वसईतील सुरूची समुद्र किनारा

    वसईतील सुरूची समुद्र किनारा

    वसईतील सुरूची समुद्र किनारा हा सुरूची बीच म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुची बीच हा एक पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. वसई नगर मध्ये स्थित, सुरुची बीच हा समुद्रकिनार्यावरील प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे ज्यांना जीवनातील रोजच्या धावपळीपासून दूर वेळ घालवायला आवडते. हे ठिकाण आश्चर्यकारक सूर्यास्त आणि सूर्योदयाची दृश्ये देते, म्हणून ते नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले असते. तुम्ही दिवसभराच्या सहलीची योजना देखील करू शकता. सुंदर संध्याकाळ किंवा मॉर्निंग वॉकसाठी हा उत्तम पर्याय आहे.

    संध्याकाळी येथे खाण्यापिण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. चौपाटी वर जाऊन खाद्यभ्रमंती करण्यात वेगळीच गंमत येते . किनाऱ्याच्या आसपास बरीच झाडे आहेत ज्यामुळे या समुद्र किनाऱ्याचे सौन्दर्य अगदी खुलून दिसते.
    येथील अतिशय नयनरम्य वातावरणाने मन प्रफुल्लित होते. आजूबाजूचा स्वच्छ परिसर आणि मनमोहून टाकणारा असा हा समुद्र किनारा एक वेगळाच आनंद देतो.

  • मकरंदगड किल्ला

    मकरंदगड किल्ला

    महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पुण्यापासून १५६ किमी अंतरावर ‘मकरंदगड’ किल्ला आहे.किल्ल्याच्या पायथ्याचे गाव घोणसपूर हे प्रतापगडापासून २७ किमी अंतरावर आहे. प्रतापगड किल्ल्याजवळील प्रसिद्ध जावळीच्या जंगलात हा किल्ला आहे. ‘हातलोट’ आणि ‘घोणसपूर’ गावातून किल्ल्यावर जाता येते. हा किल्ला इसवी सन १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधतानाच बांधला होता. या किल्ल्याला कोणतेही व्यापारी मार्ग किंवा खिंड नव्हती, परंतु ‘प्रतापगड’ आणि ‘किल्ले वासोटा’ यांना जोडणारा हा दुवा होता. या किल्ल्यापासून सर्वात जवळचे शहर ‘महाबळेश्वर’ आहे. ‘घोणसपूर’ पासून तो 37 किमी अंतरावर आहे.

    महाबळेश्वरमध्ये चांगली उपहारगृह आहेत. घोणसपूरच्या पश्चिमेकडील टेकडीवरून ट्रेकिंगचा मार्ग सुरू होतो. हा मार्ग अतिशय सुरक्षित आणि अरुंद आहे. ट्रेकिंगच्या मार्गावर घनदाट जंगल आहे. उजव्या वाटेने गेल्यावर मलिकार्जुन मंदिर आणि गडावरील पाण्याचा झरा आहे. गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने गडावर रात्रीचा मुक्काम करता येत नाही. गावातील ग्रामस्थ माफक दरात रात्रीचा मुक्काम आणि भोजन व्यवस्था करतात. दुसरा मार्ग हा ‘हातलोट’ गावातून आहे.

    किल्ल्यामध्ये ‘मधुशिखर’ आणि ‘मकरंदगड’ असे 2 भाग असल्याचे सांगितले जाते. ‘मधुशिखर’ ही सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील भौगोलिक सीमा आहे. ‘मकरंदगड’ किल्ल्याचा ताबा एका छोट्याशा शिवारावर आहे. या किल्ल्यावर काही इमारतींचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्या दिसतात. किल्ल्याला वळसा घालायला अर्धा तास लागतो. किल्ल्याची तटबंदी मोडकळीस आली आहे.

  • वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान

    वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान

    मुंबईच्या मध्यवर्ती भागात 60 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात ‘राणीची बाग’ हे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वात जुने सार्वजनिक उद्यान आहे. सन 1861 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. मुंबईतील या आकर्षक ठिकाणाला भारताच्या तत्कालीन सम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले. त्यामुळे ‘व्हिक्टोरिया गार्डन’ किंवा ‘राणी बाग’ या नावानेच पुढे कित्येक वर्षे ती सुपरिचित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई भोसले यांच्या नावावरून अलीकडे या उद्यानाचे ‘जिजामाता उद्यान’ असे नामकरण करण्यात आले.

    या उद्यानामध्ये प्राणीसंग्रहालय, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय आणि इंग्लंडचा राजा एडवर्ड सातवा यांचा पुतळा आहे. मुंबईत भायखळा येथे हे उद्यान आहे. येथे विविध प्रकारच्या वनस्पती आणि पक्षी-प्राणी आढळतात. वनस्पतींच्या 800 पेक्षा जास्त प्रजाती आणि 3,000 पेक्षा जास्त झाडे येथे आहेत. येथील जैवविविधतेमुळे ते निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.

    हे उद्यान म्हणजे 330 प्राणी आणि पक्ष्यांचे घर आहे. राणीबाग हे असे ठिकाण आहे, जिथे तुम्ही पेंग्विन, मगरी, बिबट्या, हत्ती, जिराफ आणि हरिण पाहू शकता. रहिवाशांच्या समृद्ध विविधतेमुळे, प्राणीसंग्रहालयाला सर्व वयोगटातील लोक वारंवार भेट देतात. हे प्राणीसंग्रहालय लोकांसाठी सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत नाममात्र शुल्कासह खुले असते. येथे हरीण, हत्ती, पाणघोडे, निळा बैल आणि इतर अनेक प्राणी आहेत.

    प्राणीसंग्रहालयात मगरी, अजगर बघायला मिळतील. हे 24 विविध प्रजातींच्या पक्ष्यांचेही घर आहे. येथे पेंग्विनसुद्धा पहायला मिळतात. तुम्ही लहान मुलांना सोबत घेऊन जात असाल तर खाण्याचे पदार्थ घेऊन जा. पाण्याची बाटली सोबत ठेवण्याचे लक्षात ठेवा.

  • बांबूच्या कलाकृतींचा उद्योग

    बांबूच्या कलाकृतींचा उद्योग

    बांबूवर आधारित वस्तूंचा वापर अलीकडे वाढू लागला आहे. घराच्या सजावटीकडे नवीन पिढी बारकाईने लक्ष देत असते. सजावटीमध्ये त्यांचा वापर केला जातो. या वस्तू नाजूक आणि आकर्षक दिसत असल्याने तसेच पर्यावरणपूरक असल्याने लोकांची याला पसंती मिळत आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार ही उत्पादने घेतली जातात. बांबूपासून सुमारे 15 प्रकारचे आकाशकंदील, पन्नास प्रकारच्या फुलदाण्या, दहा प्रकारच्या दागिनेपेट्या तयार केल्या जातात. या कलाकृती तयार करण्यासाठी बहुला, बिजली, मकल, कळक, मेसकाठी, टल्ला आदी प्रकारच्या बांबूंचा वापर केला जातो.

    फुलदाण्या, पेन स्टॅंड, दागिनेपेटी, पक्ष्यांचे घर, भोजनासाठीच्या टेबल-खुर्च्या, आरामखुर्च्या, सोफा सेट, पलंगड, चटई, पडदे, फळे ठेवण्यासाठी पात्रे, टोप्या, आकाशदिवे, झुले, इ. प्रकारच्या अनेक आकर्षक वस्तू बांबूपासून बनविल्या जातात. या वस्तूंमध्ये छान प्रकारची कलाकुसर असते. अनेक कारागीर असे उत्पादन घेऊन चांगला नफा कमवितात. पूर्वी हा एक बलुतेदारीचा व्यवसाय होता. आता त्याकडे सजावटीच्या दृष्टीकोनातून आणि पर्यावरणपूरक म्हणून पहिले जाते. हा व्यवसाय करायचा झाल्यास आधी त्या वस्तू कशा बनवितात, हे शिकून घ्यावे. बांबूंची खरेदी शक्यतो शेतकऱ्यांकडून करावी. बांबूचे आकार व लांबीनुसार दर असतात. आवश्यकतेनुसार उत्पादने घेत असल्याने तेवढ्याच कच्च्या मालाची खरेदी करावी.

    बांबूवर प्रक्रिया करणे हे कष्टाचे काम असते. बांबू तोडणी करून त्यानंतर बांबूवरील गाठी काढून घेतल्या जातात. त्याला पॉलिश करून आपणास हवे तसे विविध आकार दिले जातात. बांबूला कीड-रोग लागू नये यासाठी काळजी घ्यावी लागते. त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया केली जाते. पॉलिश किंवा गरजेनुसार रंग दिला जातो. बांबूच्या चिवा फोडून पट्ट्या तयार केल्या जातात. ‘कळक’ प्रकरच्या बांबूपासून विविध क्षेत्रफळांचे पलंग तयार करतात. लग्नसराईत रुखवतात सजावटीसाठी बांबूच्या विविध वस्तूंचा वापर होतो. दीपावलीच्या काळात आकाशकंदिलांना मागणी असल्याने आकाशकंदील तयार केले जातात.

    विश्रामगृहे,तंबू, कृषी हाऊस, पर्णकुटी, रिसॉर्ट, पर्यटन स्थळावरील हॉटेल्स, रेस्टॉरंट, आदींकडूनही सजावटीसाठी या उत्पादनांना मागणी असते. अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी विविध प्रदर्शनांमध्ये ते विक्रीस ठेवल्यास त्याचा लाभ होतो. महानगरे तसेच शहरातील मॉल्स, मोठे स्टोअर्स येथे बांबूची उत्पादने विकणे योग्य ठरते. या उद्योगात सातत्य ठेवल्यास, त्यात झोकून देत काम केल्यास लाखो रूपयांची उलाढाल होते, असे यामध्ये तरबेज असलेले कारागीर सांगतात. त्यात मागणीनुसार चढ-उतार राहतात.

    दरम्यान, या उद्योगात संयम राखणेसुद्धा फार महत्त्वाचे असते. बांबूच्या उत्पादनांना लाकडी वस्तूंच्या तुलनेत ग्राहकांकडून त्वरित पसंती मिळणे कठीण असते. ग्राहकांना आपल्या उत्पादनाचे महत्त्व चांगल्या प्रकारे पटवून द्यावे लागते. या उत्पादनांच्या किमतीही सर्वसामान्य ग्राहकांना महाग वाटतात. बांबूची उत्पादने दीर्घकाळ टिकतील का, याबाबत ग्राहक साशंक असतात. कारागीरांच्या अनुभवानुसार बांबूच्या वस्तू पंधरा वर्षे टिकतात. जंगलतोडीच्या आजच्या युगात बांबूच्या वस्तू अधिक फायदेशीर आहेत. बांबूचे महत्त्व व्यवसायाच्या माध्यमातून वाढविणे शक्य आहे.

  • सायबर कॅफे व्यवसाय

    सायबर कॅफे व्यवसाय

    जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती झाली. सर्व कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला संगणक आणि इंटरनेटची गरज जाणवू लागली. ‘डिजीटल इंडिया’च्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. अशावेळी इंटरनेटची सोय प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असणे ही मानवाची मूलभूत गरज बनू लागली आहे. सायबर कॅफेमध्ये एकाच वेळी असंख्य संगणक इंटरनेटच्या सुविधेसह उपलब्ध असतात. या सुविधेचा वापर कोणीही कितीही वेळ करू शकते. ही सेवा वापरण्यासाठी तासाप्रमाणे रक्कम ठरलेली असते.

    एकूण ४ प्रकारची सायबर कॅफे आपल्याला पाहायला मिळतात. ‘इंटरनेट कॅफे’ जिथे इंटरनेटची सेवा पुरविली जाते. जिचा वापर करून आपण आपले काम करू शकतो, खेळ खेळू शकतो, चित्रपट पाहू शकतो. ‘गेमिंग सायबर कॅफे’ यामध्ये फक्त ऑनलाइन किंवा ऑफलाइन संगणकीय खेळ खेळायला मिळतात. ‘सायबर कॅफे’ हे सुसज्ज असे इंटरनेट कॅफे आहे. येथे ऑनलाइन इंटरनेट सेवा, प्रिंटींग, फॅक्स, अल्बम मिक्सिंग, लॅमिनेशन यांसह इतर अन्य सॉफ्टवेअरही आपण वापरू शकतो. येथे वापरकर्त्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात. जागतिक पातळीवर सायबर कॅफे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालवला जातो. जरी प्रत्येकाच्या घरी इंटरनेटच्या सोयी – सुविधा उपलब्ध असल्या, तरी बऱ्याचदा अनेक मंडळी कामासाठी सायबर कॅफेचा पर्याय निवडताना दिसतात.

    हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातूनही परवानगी आवश्यक असते. सायबर कॅफेसाठी एक ‘युनिक सायबर कॅफे आयडी’ दिला जातो. त्याचप्रमाणे सायबर कॅफे चालवणारी व्यक्ती ही डिजीटल पेमेंट, पॅन कार्ड पोर्टल, रेल्वे तिकीट पोर्टल, आधार कार्ड पोर्टल, नोकरभरतीचा प्रवेश अर्ज यांसारख्या सुविधाही अधिकृत नोंदणी परवान्याने राबवू शकते. संगणक, इंटरनेट, टेबल, खुर्ची, एसी, प्रिंटर यांसह इतर आवश्यक गोष्टी बघितल्यास किमान १००० स्वे. फूटांची जागा आणि किमान १० लाख रुपये गुंतवणूक हा व्यवसाय सुरू करण्यास आवश्यक ठरते. जेणेकरून एका वेळी अनेक मंडळी आपल्या सायबर कॅफेचा लाभ घेऊ शकतील

  • बासमती तांदूळ लागवड

    बासमती तांदूळ लागवड

    बासमती तांदूळ जगभरात प्रसिद्ध आहे, एवढेच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेत या धान्याला मागणी आहे. भारत आणि पाकिस्तान हे देश बासमती तांदूळाचे जनक मानले जातात. भात हे जगातील महत्त्वाच्या अन्नधान्य पिकांपैकी एक आहे. जगात सुमारे 150 दशलक्ष हेक्टर आणि आशियामध्ये 135 दशलक्ष हेक्टरमध्ये भाताची लागवड केली जाते.

    भारताच्या समुद्रकिनारील राज्यांमध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार आणि अलीकडे कृत्रिमरीत्या सिंचनाच्या सोयी सुविधांमुळे पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यातही भाताची लागवड केली जाते. भारत हा बासमती तांदूळांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. भारत दरवर्षी ३० हजार कोटींहून अधिक किंमतीचा बासमती तांदूळ निर्यात करतो.

    बासमती तांदूळाची जागतिक मागणी आणि त्याची निर्यात क्षमता लक्षात घेता बासमती भातशेती अत्यंत महत्त्वाची बनली आहे. मे महिन्यापासून शेतकरी बांधव भाताच्या लागवडीची तयारी सुरू करतात. भात हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. शेतकऱ्याला या पिकापासून चांगले उत्पादन घ्यायचे असेल, तर त्याने सुरुवातीपासूनच काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. बासमती तांदूळ हा तांदळाच्या सर्वोत्कृष्ट जातींपैकी एक आहे. हा तांदूळ त्याचा अनोखा सुगंध आणि चवीमुळे जगभर ओळखला जातो. बासमती तांदूळाच्या अनेक जाती आहेत. बासमती भातलागवडीसाठी शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे; जेणेकरून त्यांची उत्पादकता वाढू शकेल. धान्याची उत्पादकता वाढवायची असेल, तर माती आणि हवामानाचा योग्य विचार करून वाण निवडणे सर्वांत महत्त्वाचे आहे.

    सुधारित तंत्रज्ञानानुसार, बासमतीचे विविध गुण लक्षात घेऊन अनेक जाती करण्यात आल्या आहेत. मान्यताप्राप्त वाणांमध्ये ‘कस्तुरी’, ‘बासमती 198’, ‘बासमती 217’, ‘बासमती 370’, ‘बासमती 385’, ‘बासमती 386’, ‘कर्नल कस्तुरी’, ‘माही सुगंध’, ‘पुसा’, ‘रणबीर’, ‘तरोरी’ यांचा समावेश आहे. यामध्ये ‘बासमती-370’, ‘बासमती-385’ आणि ‘बासमती-रणबीर सिंगपुरा’ आणि इतर संकरित वाण आहेत.

    बासमती भातशेतीसाठी चांगली पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली गुळगुळीत किंवा चिकणमाती योग्य आहे. भातशेतीसाठी 2 ते 3 वेळा नांगरणी करावी लागते. यासोबतच शेताला मजबूत कुंपण घालावे लागते. या प्रक्रियेद्वारे पावसाचे पाणीही जास्त काळ शेतात साठवता येते. दुसरीकडे हिरवळीचे खत म्हणून ‘धिंच’ आणि ‘सनई’ वापरतात. भाताची पेरणी करण्याआधी शेताला एक आठवडा आधी पाणी द्यावे लागते. शेतात खुरपणी केल्यानंतर पेरणीच्या वेळी शेतात पाणी भरून नांगरणी करावी. रोपवाटिका लागवड करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे; अन्यथा, काही भातबिया निरुपयोगी असल्याने त्याचा त्रास होऊ शकतो. जातीनुसार बासमतीसाठी हेक्टरी 25 ते 30 किग्रॅ. बियाणे पुरेसे असते.

  • गुलाबाचे सरबत

    गुलाबाचे सरबत

    साहित्य : १ किलो साखर, ४०० मिली. पाणी, अर्धा लहान चमचा सायट्रिक ॲसिड, पाव लहान चमचा रासबेरी लाल रंग, अर्धा चमचा रोझ इसेन्स.

    कृती : प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी मिसळावे. त्यात अर्धा चमचा सायट्रिक ॲॅसिड घालावे. सर्व एकत्र करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत ठेवावे. गार झाल्यावर त्यात रंग व इसेन्स घालावा. नंतर हे गाळून बाटलीत भरावे. सरबत देताना पाव भाग तयार केलेले द्रावण आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध घालून पिण्यास द्यावे.

  • मुलींना सक्षम बनविताना

    मुलींना सक्षम बनविताना

    अनेक वर्षापूर्वीपासून महिला विषमतेच्या बळी ठरत आहेत. लिंगभेद ही तर महिलांसाठीची शतकानुशतके मोठी समस्या आहे. अलिकडे लैंगिक समानतेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत मुलींच्या हिताच्या अनेक योजना सुरू झाल्या आहेत. यामध्ये पालकांनी अधिक योगदान देणे गरजेचे आहे. मुलीच्या सक्षमतेसाठी पालकांनी दक्ष राहणे कधीही चांगलेच ! मुला-मुलींना समानतेनेच वागवले पाहिजे.

    त्यांच्यात कोणत्याही गोष्टीसाठी कधीही तुलना करु नये. मुलगा आणि मुलगी यांच्यातील फरक ही पालकत्वादरम्यान झालेली सर्वात मोठी चूक आहे. आजच्या आधुनिक काळातही अशी अनेक कुटुंबे आहेत, जिथे मुलांना प्राधान्य दिले जाते, आणि मुलींना चांगली वागणूक दिली जात नाही. याचा विपरित परिणाम मुलींच्या मानसिक आरोग्यावर होतो. हा फरक न केल्यास मुलांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात.

    काही घरांमध्ये मुलींना फारसे महत्त्व दिले जात नाही, पालक त्यांच्यावर अनेक प्रकारची बंधने घालतात, शाळेत कसे जायचे, कसे खेळायचे, कसे कपडे घालायचे, याविषयी बंधने घालून जास्त हसायचे नाही, जास्त बोलायचे नाही असे नियम लावतात. अशा गोष्टींपासून मुले पूर्णपणे मुक्त राहतात. या सर्व गोष्टी मुलींच्या विकासात अडथळा आणू शकतात. त्यांना भीती आणि खोटे बोलण्याच्या सवयी लागू शकतात. आजही अनेक ठिकाणी मुलींना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, यामुळे अनेक वेळा मुली शोषणाच्या बळी ठरतात, मात्र त्या कोणाला सांगू शकत नाहीत. लहानपणीच्या या सवयी त्यांना मोठे झाल्यावरही सहन कराव्या लागतात. त्यांना कौटुंबिक हिंसाचार आणि अत्याचार सहन करावे लागतात, पण आवाज उठवायला त्या घाबरतात.

    काही पालक मुलींची तुलना मुलांशी करू लागतात. त्यांच्या तुलनेत मुलींचा स्वाभिमान दुखावला जातो. सक्षम असूनही ती स्वत:ला कमकुवत समजू लागते. या तुलनेमुळे अनेकवेळा आयुष्यात काही करण्याची इच्छाही मरून जाते. मुलींना लहानपणी फक्त बाहुल्यांशी खेळण्याचा पर्याय असतो. मुलांकडे अनेक पर्याय असतात. हे देखील मुला-मुलींमध्ये भेदभाव निर्माण करण्याचे काम करते. पालकांनी मुलींना मजबूत बनवायला सुरुवात केली पाहिजे. त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करायला हवे. या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण आपल्या मुलींना अधिक शक्तिशाली आणि आत्मविश्वासू बनवू शकता. ज्याची त्यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गरज असते.

  • केसांचे पोषण असे करा

    केसांचे पोषण असे करा

    आपले केस जाड आणि सुंदर असावेत असे प्रत्येक मुलीला वाटते. यासाठी ती बाजारातून अनेक महागडे पदार्थ खरेदी करते, आणि स्पाही घेते; परंतु या सर्वांमध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे केस मुळांपासून कमजोर होऊन कोरडे होतात. काही घरगुती उपाय आहेत, जे केसांच्या पोषणासाठी फायदेशीर आहेत.

    एरंडेल तेल
    एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ‘ई’ असते. हे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एरंडेल तेल आपल्या केसांवर व्यवस्थित लावायचे आहे. अर्ध्या तासानंतर केस धुवू शकता.

    संत्र्यांची प्युरी
    केस जाड करण्यासाठी संत्र्याची प्युरी प्रभावी ठरू शकते. संत्र्याच्या प्युरीने केसांना मसाज करावे. अर्ध्या तासाने केस धुवावेत.

    अंडी
    एक ते दोन अंडी फेटून हे मिश्रण केसांना ३० मिनिटे लावावे. केस धुतल्यानंतर, तुम्हाला आपोआप सकारात्मक परिणाम दिसू लागतील.

    मेथीदाणे
    केसांसाठी मेथीदाणे फार उपयोगी आहेत. भिजवलेल्या मेथीदाण्यांची पेस्ट करुन ती केसांचया मुळांना लावावी. यामुळे केसांचे पोषण होईल.

    हे घरगुती उपाय आजीच्या अनुभवांतून आलेले आहेत. त्यांचा अवलंब केल्यास नक्कीच चांगले परिणाम दिसतील. तरीही वैद्यकीय सल्ला घेतल्यास कधीही चांगलेच !

  • उन्हाळ्यात ताक हवेच

    उन्हाळ्यात ताक हवेच

    उन्हाळ्यात सतत थंड पदार्थ खाण्यापिण्याला प्राधान्य दिले जाते. लिंबू सरबत, उसाचा रस, नारळपाणी याबरोबरच आणखी एका पेयाला प्राधान्य दिले जाते, ते म्हणजे ताक. सामान्यपणे ताकाचे सेवन केले जाते; कारण ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत.

    वजन कमी करण्यासाठी ताकात काळे मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात जीरे पूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. उच्च रक्तदाब असल्यास ‘गिलोय’ चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे. ताक पिण्याने स्मरणशक्ती वाढते.

    मळमळणे, उलटी येणे असे लक्षण असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो. शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो. ताकाचे असे अनेक फायदे आहेत त्याचबरोबर ताकापासून ताकाची कढी, चविष्ट लस्सी असे विविध चवदार पदार्थही बनवता येतात.

  • समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती

    समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती

    समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात मारुती मंदिरांची स्थापना केली. यापैकी सातारा जिल्ह्यात ७ मारुती मंदिर आहेत. लोकांमध्ये परस्परांविषयी आत्मियता निर्माण करण्यासाठी रामजन्म आणि हनुमान जन्म सोहळे सुरु झाले. ही मंदिरे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. या मंदिरातील हनुमंताच्या मुर्त्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळ्या आहेत. या मंदिरांमध्ये रामजन्म तसेच हनुमान जयंतीला मोठी गर्दी असते.

    साताऱ्यात कराड-मसूर रस्त्यावर सुमारे 9 ते 10 कि.मी अंतरावर शहापूरचा फाटा आहे. शहापूरमध्ये इसवी सन १५६६ मध्ये मंदिराची स्थापना झाली आहे. शहापूरच्या मारुतीची मूर्ती चुन्यापासून बनविलेली असून ६ फूट उंच आहे, म्हणून याला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते.

    दुसरे मंदिर महारुद्र मारुती हे असून ते मसूरच्या ब्रम्हपुरीभागात आहे. चाफळ येथील ‘दास मारुती’ मंदिरात श्रीरामासमोर दोन्ही कर जोडून उभा असलेली मारुती आहे. दास स्वरूपातील हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. इसवी सन १५७१ मध्ये खडीचा मारुती शिगणवाडी मंदिराची स्थापना केली. या मारुतीला ‘खडीचा मारुती’ अथवा ‘बालमारुती’ असेही म्हणतात.

    उंब्रज येथील मठातील मारुतीची स्थापना इसवी सन १५७० मध्ये झाली. समर्थ रामदास चाफळहून रोज उंब्रज येथे स्नानाला जात होते. म्हणून येथे मारुतीची स्थापना झाली. माजलगावचा मारुती हा चाफळपासून दीड मैलाच्या अंतरावर आहे.

    श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे ३०० फूट अंतरावर चाफळ येथे प्रताप मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला ‘भीम मारुती’ किवा ‘वीर मारुती’ असेही म्हटले जाते. या मंदिराला ५० फूट उंच शिखर आहे. मूर्तीची उंची 7 ते 8 फूट आहे. ही मूर्ती ‘भीमरुपी महारुद्र’ या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे या स्थितीत आहे. याव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडळे, पारगाव, सांगली जिल्ह्यातील शिराळे, बहे बोरगाव याठिकाणी 4 मारुती मंदिर आहेत.

  • मालगुंडचा किनारा

    मालगुंडचा किनारा

    रत्नागिरीतील ‘गणपतीपुळे’ समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या 1 किलोमीटरवर असलेले एक छोटे आणि मनोहर असे ‘मालगुंड’ गाव आहे. प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांचे हे जन्मस्थान आहे. अशा या मालगुंडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नयनरम्य, विस्तीर्ण असा स्वच्छ समुद्रकिनारा आहे. हा किनारा नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहेच; सोबत जलक्रीडा, पॅरा मोटरिंगचा आनंदही येथे पर्यटकांना घेता येतो. ‘केशवसुतांची भूमी’ म्हणून येथे अनेक पर्यटक भेट देतात.

    या किनाऱ्यावर पर्यटकांची ये – जा असते. मालगुंडमध्ये ‘कवी केशसुत स्मारक’ उभारले आहे. तसेच येथील शांततेमुळे आणि येथे फारसे व्यापारीकरण नसल्यामुळे अनेक पर्यटक गणपतीपुळ्याऐवजी मालगुंडमध्ये राहणे पसंत करतात. मालगुंडमध्ये अनेक खासगी एमटीडीसी मान्यताप्राप्त निवास उपलब्ध आहेत. मालगुंडचा किनारा आल्हाददायक असाच आहे. सागराच्या फेसाळत्या लाटांची गाज ऐकत हे कोकणातील लहानसे गाव शांतपणे कवी केशवसुतांच्या आठवणी गोंजारत उभे आहे.

  • केंजळगड किल्ला

    केंजळगड किल्ला

    केंजळगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई येथे आहे. हा किल्ला महादेव डोंगररांगेतील मांढरदेव डोंगरावर वसलेला आहे. जुन्या रायरेश्वराच्या जवळ असलेला हा केंजळगड भोर गावापासून थोड्याच अंतरावर असणारा एक आगळावेगळा असा छोटेखानी किल्ला आहे. वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या एका उत्तुंग शिखरावर हा किल्ला वसलेला आहे. उभ्या कातळात खोदून काढलेल्या ५७ पायऱ्या हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. केंजळगडची किल्लेदारी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद मिळते. हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच परिसरात झाली. एकनिष्ठ गोळे घराण्याने या गडासाठी भरपूर योगदान दिले आहे.

    केंजळगडास भेट देण्यासाठी प्रथम भोर या गावी जावे लागते. भोरवरुन केंजळगडाच्या पायथ्याच्या कोर्ले गावात जायला हवे. त्यासासाठी 2- 2 तासाच्या अंतरावर बस आहेत. हा १९ कि.मी. अंतराचा प्रवास करून आपण कोर्ले गावात उतरायचे येथून चालण्यास सुरुवात करावी.

    साधारण दीड तासाच्या वाटचालीनंतर केंजळगडाच्या पायथ्याला असलेल्या ‘केंजळमाची’ या गावात पोहोचाल. येथे असलेल्या मंदिरात तुम्ही मुक्काम करू शकता. इथे देवळात मुक्कामाला जागा आहे, .गडावर मात्र रहाण्यास जागा नाही. माचीहून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते. इथूनच दगडात खोदून काढलेल्या प्रशस्त चौपन्न पायऱ्या आहेत. हा एक अतिशय उत्तम कोरीव जिना आहे. डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छिन्नीम लावून व्यवस्थित केली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र दरी आहे. या अशा रानात पायऱ्या कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते. त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत.

    एका बाजूने पायऱ्या आणि दुसऱ्या बाजूस दरी अशी ही बाट चढताना आपली चांगली दमछाक होते. पायऱ्यांच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंना देवड्याचे अवशेष आहेतगडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर बहुतांश ठिकाणी गवत वाढलेले दिसते. त्यामुळे गडावरून फिरत असताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. वर डावीकडेच एक मध्यम आकाराचे पाण्याचे तळे असून या तळ्यापलीकडे केंजळाई मातेचे छप्पर नसलेले छोटे देऊळ आहे. गडाच्या पश्चिम बाजूला जाताना वाटेवर चुना मळण्याच्या घाणीचे रिंगण आणि दगडी चाक पहावयास मिळते. यावरून या गडावर शिवकाळात बऱ्यापैकी बांधकामे झाली असावीत असे अनुमान आपल्याला काढता येते.

    पुढे दगडात बांधलेले दारूकोठाराचे बांधकाम नजरेस पडते. परतीसाठी पलीकडच्या ‘खवली’ गावात उतरून तेथून वाईला जावू शकता. याच डोंगरसोंडेवरुन सरळ रायरेश्वर देवस्थान गाठू शकतो. केंजळगडाच्या भेटीत वाटेवरील ‘कारी’ गावातील कान्होजी जेधेचा ऐतिहासिक वाडा पहायला मिळतो. ‘आंबवडे’ येथील कान्होजी जेधे आणि जिवा महालेंची समाधी पाहता येते.

  • ताम्हिणी अभयारण्य

    ताम्हिणी अभयारण्य

    ताम्हिणी अभयारण्य हे पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर आहे. मनावर मोहिनी घालणारे असे अप्रतिम निसर्गसौंदर्य येथे पाहता येते. मुंबई-गोवा मार्गाने ‘कोलाड’पर्यंत गेल्यावर पुढे ‘कुंडलिका’ नदी मिळते. तिच्यावर बांधलेला पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरण आहे. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट असून याच घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य आहे. दिनांक 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हे क्षेत्र आहे. हे अभयारण्य सदाहरित आणि निमसदाहरित वनांनी वेढलेले आहे.

    ताम्हिणी अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या 28 प्रजाती आहेत. स्थानिक पक्ष्यांच्या 12 प्रजातींसह 150 प्रकारचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. येथे मुक्तपणे विहरणारी फुलपाखरेही लक्ष वेधून घेतात. ही 72 प्रकारची फुलपाखरे, 18 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 33 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतीदेखील येथे आहेत. माणसांची श्रद्धा असणाऱ्या अनेक देवराया या अभयारण्यात दिसून येतात. त्यातही ‘वरदानी’ आणि ‘काळकाई’ देवराई या प्रसिद्ध आहेत. ‘ताम्हिणी’ गावातच ‘विंझाई’ ग्रामदेवतेचे भव्य मंदिर आहे. अनेक अभ्यासक, संशोधक आणि गिर्यारोहकसुद्धा येथे आवर्जून येतात.

    शेकरू, पिसोरी, भेकर, सांबर, खवल्या मांजर, उदमांजर, जावडी मांजर, वाघाटी, बिबट्या रानमांजर, साळींदर रानडुक्कर आणि वानर या वन्यजीवांचा या अभयारण्यात वावर आहे. अजगर, नाग, घोणस, चापडा, हरणटोळ, खापरखवल्या, दिवड, धामण, सापसुरळी, घोरपड या अभयारण्यात दिसतात. वनस्पतींमध्ये पारजांभूळ, बेहडा, ऐन, नाना, भोमा, उंब, अंजनी, रान जायफळ, गेळा, हिरडा, कुंभा, काटेसावर, उडाळी, बोक, काटेकुंबळ, पळस, घोळ, आंबा, वारस यासारख्या प्रजाती आहेत. पेंडकुळ, वाटोळी, करटुली, गारंबी, कडुकारंदा, पहाडवेल, बेडकीचा पाला, घोटवेल, ओंबळ, आंबगुळी, तोरण, ऐरण, कुसर, खरपूडी अशा अनेक वेली या परिसरात आहेत.

    शेवाळ, कवक, दगडफुले व नेच्यांच्या अनेक जाती विपुल प्रमाणात दिसून येतात. पाचुकवडा, धनेश टकाचोर, पर्वत कस्तूर, रानकस्तूर, स्वर्गीय नर्तक, सर्पगरूड, गिधाड, निखार, कोतवाल, शमा, नवरंग, माळखरूची, रातवा, श्रृंगी घूबड, नारद बुलबूल, हळद्या, कुरटुक असे अनेक पक्षी आणि प्राणी या अभयारण्यात आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरु म्हणून घोषित केलेले ‘ब्ल्यू मॉरमॉन’ हे फुलपाखरू आपल्याला येथे पाहता येते. मुळशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर ‘पळसे’ येथील मोठा धबधबा दिसतो.

  • मसाले उद्योग

    मसाले उद्योग

    स्वयंपाकात वापरले जाणारे नेहमीचे पदार्थ आर्थिक मिळकत करून देतात. फक्त त्या पदार्थांकडे त्यादृष्टीने पहावे लागते. दौंड तालुक्यातील खुटबावमधील कमलताई शंकर परदेशी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मसाला उद्योगामध्ये मोठी झेप घेतली. शेतीमध्ये मोलमजुरी करणाऱ्या या महिलांनी स्वतःच्या कार्यक्षमतेवर स्वतःचा रोजगार निर्माण केला आहे.

    त्यांनी सुरुवातीला ‘अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थे’ची स्थापना करून त्याद्वारे मसाले बनविण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे जवळपास 32 प्रकारचे घरगुती मसाले तयार होतात. उच्च गुणवत्तेमुळे त्यांना बाजारपेठही चांगली मिळत आहे. या महिला आधी शेतात मोलमजुरी करीत होत्या. पुढे महिलांचा गट स्थापन करण्याचे ठरवून त्यांनी 10 निरक्षर महिलांना एकत्र आणले. कमल शंकर परदेशी, स्वाती मनोहर चव्हाण, शोभा पुंडलिक कांबळे, रेखा राजेंद्र सकट, चंद्रकला सुरेश चव्हाण, लक्ष्मीबाई दिगंबर फणसे, सिंधूबाई आनंदा जाधव, सिंधूबाई रामभाऊ गदादे, राणी सतीश वाघमारे, सुशीला अंकुश खरात या महिला यात कार्यरत आहेत.

    पंचायत समितीत सन 2004 मध्ये ‘अंबिका महिला बचत गटा’ची नोंदणी केली. प्रत्येक महिला महिन्याला 100 रुपये बॅंक खात्यात जमा करू लागली. 3 महिन्यांत 3 हजार रुपये जमा झाले. या भांडवलातून त्यांनी मसाला उद्योग सुरू केला. तत्कालीन गटविकास अधिकारी राजेंद्र पोकरे यांनी त्यांना अन्य मसालेनिर्मितीचे प्रशिक्षण घेण्यास सुचविले. एका महिलेकडून या महिलांनी तसे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला चक्क झोपडीवजा घरात त्या मसाले करू लागल्या. परिसरातही भरतगाव, खुटबाव, यवत परिसरातील 8 बचत गटांच्या महिलांना त्यांनी संघटित केले. तेव्हा 103 महिलांची ‘अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्था’ स्थापन केली. राष्ट्रीय बॅंकेने त्यासाठी कर्ज दिले.

    कमलताई म्हणतात, ”मसाले तर बनविले, पण विक्री कशी करायची हे ठाऊक नव्हते. पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या बाहेर विक्री सुरू केली. दुपारच्या सुट्टीत तेथील अधिकाऱ्यांना मसाले दाखविले. अनेक कारणांमुळे अनेकांनी नापसंती दाखविली. तसा तसा बदल करीत गेलो. नंतर उत्तम प्रतिसाद मिळू लागला.

    त्यांनी मुंबईत ‘महालक्ष्मी सरस’ या बचत गटांच्या प्रदर्शनात पाच किलो कांदा-लसूण मसाला विकला. विक्रीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आला. मसाला विक्रीसाठी त्या थेट दादरला जाऊन पोहोचल्या. गर्दीच्या ठिकाणी उभ्या राहून त्या माल विकू लागल्या. दर 10-15 दिवसांनी 12 ते 15 किलो मसाला मुंबईला नेऊन विकण्याचे गणित ठेवले. मसाल्याच्या वेष्टनावर संपर्क क्रमांक असल्याने अनेकजण मोबाईलवरून मागणी करू लागले. अशांना कुरिअरने घरपोच सेवा दिली. सन 2006 मध्ये ‘दख्खन जत्रा प्रदर्शना’सारख्या अनेक प्रदर्शनांत सहभागी झाल्या.

    या महिला पुणे बाजार समितीतून कच्चा माल घाऊक दरात घेतात. धने शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. प्रशिक्षणाप्रमाणे मसाले तयार करण्यासाठी त्यांच्याकडे जिन्नस प्रमाण आणि कृतीची वही आहे. गुणवत्तेसाठी एका दिवसात एकच प्रकारचा मसाला तयार केला जातो. यासाठी त्या यंत्रसामग्रीचा वापर करतात. हे काम करीत असताना त्या प्रत्येकाची मजुरी बाजूला काढतात. कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, गोडा मसाला, मटण मसाला, गरम मसाला, छोले मसाला, चहा मसाला, पावभाजी आणि सांबार मसाला असे अनेक प्रकारचे मसाले त्या बनवतात. आकर्षक वेष्टणबंद करून बाजारात विक्रीसाठी पाठवितात. त्यांनी अन्नभेसळ परवाना घेतला असून जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणीही केली आहे. त्या पारंपरिक पद्धतीने मसाला बनवितात. त्यामुळे त्यांना ग्राहकही चांगले लाभले आहेत.