ताम्हिणी अभयारण्य

ताम्हिणी अभयारण्य हे पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर आहे. मनावर मोहिनी घालणारे असे अप्रतिम निसर्गसौंदर्य येथे पाहता येते. मुंबई-गोवा मार्गाने ‘कोलाड’पर्यंत गेल्यावर पुढे ‘कुंडलिका’ नदी मिळते. तिच्यावर बांधलेला पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरण आहे. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट असून याच घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य आहे. दिनांक 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हे क्षेत्र आहे. हे अभयारण्य सदाहरित आणि निमसदाहरित वनांनी वेढलेले आहे.

ताम्हिणी अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या 28 प्रजाती आहेत. स्थानिक पक्ष्यांच्या 12 प्रजातींसह 150 प्रकारचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. येथे मुक्तपणे विहरणारी फुलपाखरेही लक्ष वेधून घेतात. ही 72 प्रकारची फुलपाखरे, 18 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 33 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतीदेखील येथे आहेत. माणसांची श्रद्धा असणाऱ्या अनेक देवराया या अभयारण्यात दिसून येतात. त्यातही ‘वरदानी’ आणि ‘काळकाई’ देवराई या प्रसिद्ध आहेत. ‘ताम्हिणी’ गावातच ‘विंझाई’ ग्रामदेवतेचे भव्य मंदिर आहे. अनेक अभ्यासक, संशोधक आणि गिर्यारोहकसुद्धा येथे आवर्जून येतात.

शेकरू, पिसोरी, भेकर, सांबर, खवल्या मांजर, उदमांजर, जावडी मांजर, वाघाटी, बिबट्या रानमांजर, साळींदर रानडुक्कर आणि वानर या वन्यजीवांचा या अभयारण्यात वावर आहे. अजगर, नाग, घोणस, चापडा, हरणटोळ, खापरखवल्या, दिवड, धामण, सापसुरळी, घोरपड या अभयारण्यात दिसतात. वनस्पतींमध्ये पारजांभूळ, बेहडा, ऐन, नाना, भोमा, उंब, अंजनी, रान जायफळ, गेळा, हिरडा, कुंभा, काटेसावर, उडाळी, बोक, काटेकुंबळ, पळस, घोळ, आंबा, वारस यासारख्या प्रजाती आहेत. पेंडकुळ, वाटोळी, करटुली, गारंबी, कडुकारंदा, पहाडवेल, बेडकीचा पाला, घोटवेल, ओंबळ, आंबगुळी, तोरण, ऐरण, कुसर, खरपूडी अशा अनेक वेली या परिसरात आहेत.

शेवाळ, कवक, दगडफुले व नेच्यांच्या अनेक जाती विपुल प्रमाणात दिसून येतात. पाचुकवडा, धनेश टकाचोर, पर्वत कस्तूर, रानकस्तूर, स्वर्गीय नर्तक, सर्पगरूड, गिधाड, निखार, कोतवाल, शमा, नवरंग, माळखरूची, रातवा, श्रृंगी घूबड, नारद बुलबूल, हळद्या, कुरटुक असे अनेक पक्षी आणि प्राणी या अभयारण्यात आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरु म्हणून घोषित केलेले ‘ब्ल्यू मॉरमॉन’ हे फुलपाखरू आपल्याला येथे पाहता येते. मुळशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर ‘पळसे’ येथील मोठा धबधबा दिसतो.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
778 वेळा पाहिलं