सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • खानदेशातील उनपदेव

    खानदेशातील उनपदेव

    खानदेशातील ‘उनपदेव’ या तीर्थक्षेत्रावर भाविकांची सदैव गर्दी असते. जळगाव जिल्ह्यातील ‘चोपडा’ शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. वैशिष्ट्य म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्धीस पावले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे क्षेत्र म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. येथे असलेल्या स्नानकुंडाच्या वरील बाजूला शरभंग ऋषींची पुरातन गुंफा, श्री महादेव, श्री गणपती, श्रीराम-लक्ष्मण-सीतामाई आणि हनुमान यांची मंदिरे आहेत.

    विविध प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी वनस्पती या परिसरात पाहता येतात. सर्प, हरिण, मोर, तडस, निलगाय, लांडोर आदि पशुपक्ष्यांचा येथे मुक्त संचार असतो. हे तीर्थक्षेत्र प्रभू श्रीराम आणि श्री शरभंग ऋषींच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहे. येथे गोमुखातून वाहणारे गरम पाणी सतत वाहत असते. पाण्याची उष्णता कमी-जास्त होत नाही, यामुळे पर्यटक अचंबित होतात.

    प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवास भोगत असताना येथे आले होते. त्यावेळी त्वचारोगाने पीडित शरभंग ऋषींसाठी बाण मारून श्रीरामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली असल्याची अख्यायिका आहे. या गरम पाण्याने आंघोळ करून शरभंग ऋषींना पूर्ववत शरीर प्राप्त झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. सातपुड्याच्या पर्वतरांगामधील गंधकाच्या साठ्यातून या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती झाली आहे.

    गंधक हे त्वचारोगावरील उपचारांस उपयुक्त असल्याने त्वचारोग नाहीसे करण्यासाठी लोक येथे आवर्जून येतात. संपूर्ण पौष महिन्यात येथे यात्रा भरते. महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, गुजरात येथील भाविक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे उत्सवकाळात स्थानिकांनाही रोजगार मिळतो. या तीर्थक्षेत्रास शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे.

  • सिंधुदुर्गातील मिठबाव किनारा

    सिंधुदुर्गातील मिठबाव किनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड तालुका सागरकिनाऱ्यानीही समृद्ध आहे. येथील मिठबाव किनारा असाच नितांतसुंदर आणि देखणा आहे.

    ‘गजबा’ देवीच्या आशीर्वादाने पुलकित झालेला हा सागरतीर आहे. येथील स्थानिक तसेच आधी येऊन गेलेले पर्यटक संध्याकाळच्या वेळेला येथील मंदिरापाशी जाऊन बसतात. फेसाळणाऱ्या लाटांचे विहंगम दृश्य पाहतात. मावळतीच्या वेळेला येथे बसणे म्हणजे सुखाची अनुभूतीच असते.

    मिठ्बावला केवळ समुद्रांच्या लाटाच नव्हे तर ‘नारिंग्रे’ नदीचा शांत प्रवाहसुद्धा मंत्रमुग्ध करतो. स्वच्छ पांढरी वाळू, हिरव्यागर्द वृक्षांची निसर्गरम्यता यामुळे या किनाऱ्यावरून लवकर जाऊ नये, असे येथे जाणाऱ्यास वाटते. येथील स्थानिक खाद्यसंस्कृतीची चव येथे चाखता येते. पर्यटकांची येथे फारशी वर्दळ नसते. सुट्टीच्या दिवसात देवगडमधील चाकरमानी या किनाऱ्यास आवर्जून भेट देतात.

  • घोडबंदर किल्ला

    घोडबंदर किल्ला

    ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ‘उल्हास’ नदीच्या किनाऱ्यावर घोडबंदर किल्ला आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला नंतर मराठ्यांच्या ताब्यात गेला. याठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत. त्यामुळे या जागेला ‘घोडबंदर’ हे नाव पडले.

    या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव ‘ककाबे दी तन्ना’ असे होते. इसवी सन १७३७ पर्यंत या किल्ल्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. तेव्हा त्यांनी इथे बांधलेले चर्च अजूनही अस्तित्वात आहे. आज त्याचा वापर हॉटेल म्हणून करतात. सध्या या किल्ल्याची अवस्था वाईट आहे. या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काही प्रयत्न शासनाकडून चालू आहेत. हा किल्ला भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येतो.

    घोडबंदर किल्ल्याची पूर्ण तटबंदी आजमितीस शिल्लक नाही. तटबंदीच्या दुरवस्थेमुळे किल्ल्याला किती आणि कुठे प्रवेशद्वारे होती, हे कळणे जरा कठीणच आहे. तथापि किल्ल्यात जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने वर गेल्यानंतर तीन बाजूने इमारत व मधोमध मोकळी जागा असे स्वरुप असलेल्या इमारतीच्या भिंती आहेत.

    हा बुरुज स्पष्टपणे किल्ल्याच्या अंतर्भागात आहे. याचा अर्थ हा बुरुज फक्त टेहळणीसाठीच बांधला गेला असावा. घोडबंदर किल्ल्यातील या बुरुजात वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. पोर्तुगीज शैलीचे दरवाजे असून त्याचे ‘कमानयुक्त’ व ‘वक्राकार शीर्षयुक्त’ असे दोन उपप्रकार पडतात. या दोन्ही प्रकारचे दरवाजे येथे आढळतात. ‘घोडबंदर’ किल्ल्याला लागून असलेल्या खाडीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. वसई ते ठाणे जलमार्गावरील किल्ला म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व होते.

  • कोका अभयारण्य

    कोका अभयारण्य

    निसर्ग पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी अभयारण्य हे उत्तम प्रेक्षणीय स्थळ ठरते. येथे वनस्पतीबरोबरच प्राणी, पक्ष्यांचे दर्शन होते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ‘न्यू नागझिरा’, ‘उमरेड कऱ्हाड’ आणि ‘कोका’ अशी 3 अभयारण्ये आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या ‘न्यू नागझिरा’ अभयारण्याला लागूनच ‘कोका अभयारण्य’ घोषित करण्यात आले.

    डिसेंबर 2013 पासून या अभयारण्याच्या विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली. या क्षेत्रात 25 नैसर्गिक पाणवठे असून ज्याठिकाणी पाणी उपलब्ध नाही, त्याठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. सौरऊर्जेवर चालणारे पंप या टाक्यांवर बसविण्यात आले आहेत.

    हे अभयारण्य म्हणजे वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास आहे. त्यामुळेच या जंगलाला वन्य प्राण्यांसाठी ‘संरक्षित’ केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, काळवीट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर येथे अनेक पक्ष्यांचा अधिवास आहे. समृद्ध जैवविविधतेने हे जंगल श्रीमंत झाले आहे.

    या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूरमध्ये प्रवेशद्वार आहे. पर्यटकांना जंगलसफर करता यावी यासाठी 5-7 गाड्या सोडण्यात येतात. गावातीलच मुलांना मार्गदर्शकाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या अभयारण्यात वन्य प्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळेच पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वळला आहे.

    नागपूर-भंडारा हे 65 कि.मी. अंतर असून भंडाऱ्याहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार 19 कि.मी. आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून वाहनांची व्यवस्था आहे. स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. पर्यटकांना जंगल सफारीकरिता सकाळी 5 ते 9.30 आणि दुपारी 3 ते 6.45 या कालावधीत जाता येते. एकावेळी 5 ते 7 गाड्या सोडण्यात येतात.

  • सासूला खूश ठेवण्यासाठी

    सासूला खूश ठेवण्यासाठी

    सासूला खूश ठेवणे खूप कठीण आहे, असे बऱ्याच सुनांचे मत असते. लग्नानंतर मुलीला सासू-सासऱ्यांची साथ मिळावी यासाठी तिला लग्नाच्या खूप आधी अप्रत्यक्षपणे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये स्वयंपाक, संभाषणाचा स्वर, इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. बदलत्या काळानुसार आणखी काही गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनल्या आहेत. सासूला खूश ठेवण्यासाठी याचा अवलंब सूना करु शकतात.

    आपण सासूच्या आवडीनुसार वस्तू खरेदी करण्याबद्दल ऐकले असेल. सासूला आपला ‘शॉपिंग पार्टनर’ बनवा. आपण खेरदीसाठी जात असाल तर सासूला सोबत न्या. सासूसाठी काही घेत असाल तर सासूला सोबत घेऊन जा. अशा गोष्टी सर्वसामान्य भारतीय कुटुंबात आढळत नाहीत. खरेदीच्या बहाण्याने, आपल्याला सासूसोबत जास्त वेळ घालवण्याची संधी तर मिळेलच, पण तिच्या आवडी-निवडीही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. यामुळे तिचे मन जिंकण्यात मदत होऊ शकेल.

    नवऱ्यासोबत सहल, मित्रांसोबत सहल, भावा-बहिणींसोबत सहल सर्रास घडतेच. कधीतरी फक्त सासूबाईंनाच फिरायला सोबतीस घेऊन चला. यामुळे आपले नातेसंबंध खुलतील. याकरिता सासूला आवडणारी जागा शोधा. यानंतर सहलीची योजना करा. त्यांच्यासोबत प्रवासाला जा. एकीकडे, यामुळे त्यांचे अंतःकरण आनंदी होईल. दुसरीकडे, एकत्र घालवलेला वेळदेखील त्यांच्यातील परस्पर समंजसपणा मजबूत करण्याची संधी देईल. आपण आपल्या सासूसोबत डेटवरही जाऊ शकता. एक साधे दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण घेऊ शकता. सासूला बाहेर नेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे असे जेवण असेल. जेव्हा आपण असे काही वेळा बाहेर पडाल, तेव्हा आपल्यामध्ये एक बंध निर्माण होईल.

    आधुनिक काळात या गरजेच्या बाबी झाल्या आहेत. सासूबाईंना त्यांच्या आयुष्यात घरच्या जबाबदाऱ्यांमधून कधीच वेळ मिळाला नाही. यामध्ये स्मार्टफोनच्या वापरापासून ते नवीन काळातील आरामदायक कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो. नवीन काळातील स्वयंपाकघरातील साधनांचाही यात समावेश करता येईल. यामुळे आपणां दोघांमधील संवाद वाढण्यास मदत होईल. नवनवीन गोष्टींशी जोडण्याचा तुमचा प्रयत्न पाहून तुमच्या सासूबाईंच्या मनात तुमच्याबद्दल नक्कीच स्नेह निर्माण होईल.

  • कैरीचे पन्हे

    कैरीचे पन्हे

    आंबटचिंबट कैरीचे दिवस आहेत, नाही ? झाडाला कोवळ्या-कडक कैऱ्या लगडलेल्या आहेत. आता त्या बाजारातही येऊन दाखल झाल्या आहेत. मग या उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे नको का व्हायला? चला तर मग, आज बनवू कैरीचे पन्हे !
    आवश्यक साहित्य :
    अर्धा किलो कैऱ्या, साखर किंवा गूळ, १ चमचा मीठ आणि आवडत असल्यास वेलचीपूड

    कृती :
    कैऱ्या धुऊन घ्याव्यात. कैरीची साले काढून अख्ख्या कैऱ्या किंवा फोडी करून एका भांड्यातून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर या कैरीचा गर काढावा. हा गर आणि साखर किंवा गूळ मिक्सरच्या भांड्यामधून अथवा पुरणयंत्रामधून छान फिरवून घ्यावे. गराचे गठ्ठे राहू देऊ नयेत.

    जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घातली, तर ते व्यवस्थित गोड होते. हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते. पन्हे बनविताना थोड्या गरात थंड पाणी, किंचित मीठ, हवी असल्यास वेलचीपूड घालून प्यायला द्यावे. आंबटगोड पन्हे पिण्यास तयार आहे.

  • चमकदार त्वचेसाठी

    चमकदार त्वचेसाठी

    आपण सुंदर, मोहक, आकर्षक दिसावे, असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. अनेकजणी त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. निरोगी त्वचा मिळविण्यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करतात; पण एवढे करूनदेखील काही महिलांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी साजूक तूप चांगले आहे.

    आयुर्वेदात साजुक तुपाचा वापर वर्षानुवर्षे विविध आजार दूर करण्यासाठी सांगितलेला आहे. त्वचेसाठी देखील तुपाचा वापर करु शकता. तुपात असलेले ‘जीवनसत्व ए’ आणि ‘ओमेगा -3’ चे प्रमाण त्वचेला नैसर्गिकरित्या कोमल ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेवरील कोरडेपणाची समस्याही दूर राहते. यासाठी घरगुती ‘चेहरा कलप’ अधिक उत्तम ठरू शकतो. तुपाचा वापर करून देखील घरच्या घरी हा कलप तयार करू शकता. स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा कलप तयार करता येतो.

    बनविण्याची पद्धत खालीलप्रमाणे :
    २ चमचे बेसन पीठ, दीड चमचा तूप, १ चमचा गुलाबपाणी या तीन गोष्टी एकत्रित करून चांगले मिश्रण बनवा. त्यानंतर हे तयार मिश्रण चेहऱ्याला लावा. हे मिश्रण सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. तुपामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. नेहमीच तुपाचे २ ते ३ थेंब चेहऱ्याला लावून मसाज केले तर चेहरा अगदी खुलून दिसतो. दररोज चेहऱ्याला देशी तुपाने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते; परिणामी त्वचेवर चमक येते. त्यामुळे चेहऱ्यावर उत्साह टिकवून ठेवण्यासाठी देशी तुपाचा वापर करू शकता. बहुतांश लोक आपल्या ‘डाएट’मध्ये देखील प्राधान्याने तुपाचा समावेश करतात.

  • थंड पाण्याची आंघोळ

    थंड पाण्याची आंघोळ

    व्यक्तीची दिवसाची सुरुवात आंघोळ करून होते. काहीजण उन्हाळ्यात थंड पाण्याने व हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करतात; परंतु थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर असते. थंड पाण्याची आंघोळ मन आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आंघोळीसाठी पाणी किती थंड असावे, तर यासाठी बर्फासारख्या पाण्याची गरज नाही. पाणी इतके थंड असावे की शरीर ते सहन करू शकेल. तज्ज्ञांच्या मते, 21 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेले पाणी थंड मानले जाते. अशा थंड पाण्याने आपण आंघोळ करू शकता.

    हा उपाय करून पाहिल्यास आपले वजन लवकर कमी होऊ शकते. थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्ताभिसरण गतिमान होते. स्नायूंची सूज आणि वेदनांमध्ये हे फायदेशीर मानले जाते. थंड पाणी वेदना कमी करून स्नायूंचे कार्य वाढवण्याचे काम करते. बहुतेक खेळाडू ही पद्धत वापरतात. आपल्या शरीराची क्षमता कोणत्याही प्रमाणात वाढवता येते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने मेंदूवर ‘इलेक्ट्रोशॉक’ थेरपीसारखा प्रभाव पडतो. यामुळे व्यक्तीला आनंदी आणि चांगले वाटते. तसेच व्यक्तीची स्मरणशक्ती, मानसिक क्षमता वाढण्यास मदत होते.

    शरीरातील चयापचय क्रिया जलद होते, जी शरीरासाठी आवश्यक आहे. एका संशोधनानुसार थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने चयापचय दर अनेक पटींनी वाढू शकते.
    हिवाळा जवळ आला की थंड पाण्याने आंघोळ केली की शरीराला थंडीची सवय होते. यामुळे थंडीमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते; पण हळूहळू त्याचा अवलंब करावा. थंड पाण्याने आंघोळीचे हे संभाव्य फायदे मिळविण्यासाठी बेफिकीर राहून उपयोग नाही; कारण याचाही विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमचे पाणी अतिथंड नसावे. आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये. आजारी असाल तर थंड पाण्याची आंघोळ टाळावी. अधिक माहितीसाठी आणि याचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर

    सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर

    श्री क्षेत्र औदुंबर हे श्री दत्तात्रेयांचे जागृत स्थान सांगली जिल्ह्यात आहे. तासगाव तालुक्यात ‘भिलवडी’ गावाजवळ ‘कृष्णा’ नदीच्या काठी निसर्गाच्या सहवासात हे सुंदर मंदिर उभे आहे. औदुंबर हे पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. दत्तावतार नृसिंहसरस्वतींचे हे स्थान आहे. याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक विधी संपन्न होतात. अनेक दत्तभक्तांची येथे वर्षभर वर्दळ असते.

    औदुंबर येथील कृष्णेचा डोह सुंदर आहे. डोहातील पाणी कमी झाल्यावर सिध्दनाथाचे मंदिर दृष्टीस पडते. नृसिंह-सरस्वातीच्या निर्वाणदिनी फुलांनी सजविलेला पाळणा या डोहात सोडला जातो. याच्या बाजूस बांधण्यात आलेला सुंदर घाट मनोहर आहे.

    औदुंबरमधील कृष्णेच्या घाटालगत श्रीगुरू शिवशंकरानंद आश्रमाची प्रशस्त वास्तू आहे. या आश्रमात वेदाचे अध्ययन होते. त्यांना पौरोहित्याचे शिक्षण दिले जाते. आश्रमात अनमोल असे संस्कृत ग्रंथ आहेत.

    येथे महायोगी ब्रह्मानंद महाराजांचा जुना मठ आहे. येथे दत्तमूर्ती शिवस्वरूपात प्रतिष्ठापित आहे. येथील शंकराची पिंड वैशिष्टयपूर्ण आहे. येथे श्री भुवनेश्वरी मंदिर आहे. नृसिंह सरस्वती औदुंबर येथे येण्यापूर्वीपासून हे मंदिर भुवनेश्वर येथे आहे. हे मंदिर दगडी असून हेमांडपंथी आहे. मंदिर परिसरात दगडी बुरूज, दगडी दीपमाळा, हनुमान, गणपती,काळभैरव, महादेवाचे छोटे मंदिर या मंदिराचा परिसर विलोभनीय जाणवतो. हे मंदिर म्हणजे वास्तुशिल्पाचा वैशिष्टयपूर्ण नमुना आहे. येथील सौंदर्य अप्रतिम आहे. दर्शनासाठी येणारे भाविक येथे आल्यावर त्यांचे मन प्रसन्न होते.

  • वेंगुर्ल्याचा दाभोळी वायंगणी किनारा

    वेंगुर्ल्याचा दाभोळी वायंगणी किनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील सागरकिनारे मनमोहक आहेत. येथील काही किनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ असते. काही किनारे आल्हाददायक असूनही शांत आहेत. काही किनाऱ्यांवर कोळ्यांची वर्दळ असते. असाच येथील दाभोळी – वायंगणी किनारा आहे. येथे कोळ्यांची लगबग सुरु असते. उतार असलेल्या किनाऱ्यावर लाटांचा फेस, त्याची गाज अनुभवता येते. एखादी होडी वगळली, तर सगळा किनारा मस्त निवांत असतो.

    वेंगुर्ल्याच्या उत्तरेला हा अतिशय सुंदर, गर्दी नसल्याने स्वच्छ आणि शांत सागरतीर आहे. किनारा अगदी छोटासाच असला, तरीही तो नितांत सुंदर आहे. येथून सूर्यास्ताच्या विविध रंगछटा पाहता येतात. सागर पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येतो. ज्यांनी हा किनारा पाहिला त्यांना वेंगुर्ल्यात आल्यावर येथे भेट दिल्यावाचून जावेसे वाटत नाही, यातच त्याचे खरे सौंदर्य दडले आहे.

  • भुदरगड किल्ला

    भुदरगड किल्ला

    महाराष्ट्रातील कोल्हापूर तालुक्यात ‘भुदरगड’ हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला ३६ मैलावर आणि गारगोटीपासून ५ मैलावर सह्याद्री पर्वतरांगेत हा किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी २६०० फूट आणि रूंदी २१०० फूट आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत. भुदरगड तालुक्याचे सगळे महसुली कामकाज भुदरगडावरून पाहिले जात होते. अलिकडे शासकीय यंत्रणेच्या सोयीसाठी तहसीलदार कार्यालय गारगोटीला स्थलांतरीत करण्यात आले.

    राजा भोज दुसरा याने इसवी सन ११८७ मध्ये शिलाहार राजघराण्याची राजधानी वाळव्याहून पन्हाळ्यास आणली. राजा भोजने दक्षिण महाराष्ट्रात जे किल्ले निर्माण केले, त्यात ‘भुदरगड’ असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते. गडावरील भैरवाच्या देवालयासमोर एक दीपमाला आहे. तिच्या बाजूला इतिहासाची साक्षीदार म्हणून एक तोफ आहे. या गडावर दोन मोठे तलाव असून ते किल्ल्याच्या सौंदर्यात भार घालतात.

  • फणसाड अभयारण्य

    फणसाड अभयारण्य

    महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘मुरुड’ गावाच्या अलीकडे ‘फणसाड वन्यजीव अभयारण्य’ आहे. हे पर्यटकांचे खास आकर्षण ठरले असून जगभरातील प्राणी-पक्षीप्रेमी येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वर्षभर येथे भेट देत असतात.

    मुंबईपासून 154 कि.मी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर हे अभयारण्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘फणसाड अभयारण्याचे हे क्षेत्र म्हणजे मुरुड जंजिरा संस्थानाचे राखीव शिकार क्षेत्र होते. संस्थानाचे नवाब सिद्दी यांच्या मालकीचे हे शिकारस्थळ होते. महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रुवारी 1986 रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले.

    येथे शुष्क पानगळीची वने, सदाहरित वने, मिश्र सदाहरित वने व नदीकाठची वने अशी वैविध्यपूर्ण झाडे आहेत. 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात.

    साग व निलगिरीची वने यासह दुर्मिळ व औषधी वृक्ष आढळतात. यामध्ये प्रामुख्याने एैन, किंजळ, जांभूळ, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक ‘नरक्या’ वनस्पती आढळते. यासह उक्षी, सर्पगंधा, कुरडु मोठ्या प्रमाणात आहेत. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेलींचा समावेश आहे. जगातील सर्वांत लांबीची ‘गारंबीची वेल’ हे येथील वैशिष्ट्य आहे.

    येथे आढळणाऱ्या वन्य प्राण्यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर, बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले ‘शेकरु’ हमखास दृष्टीस पडते. नाग, फुरसे, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, तस्कर यासारखे अनेक बिनविषारी साप येथे आढळतात.
    ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला, सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे इत्यादी शिकारी पक्षी व सातभाई, बुलबुल, रातवा, रानकोंबड्या, धनेश, कोतवाल यासह वेडाराघू, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, हरीयाल, कोकीळ यासारखे गाणारे व रंगीबेरंगी पक्षी येथे पहायला मिळतात. पर्यटकांचे खास आकर्षण असलेला बिबट्या येथे अगदी सहजपणे पहावयास मिळतो. याव्यतिरीक्तही येथे अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

  • नारळ तेल उद्योग

    नारळ तेल उद्योग

    नारळाच्या झाडावर उगवणाऱ्या पिकलेल्या नारळाच्या लगद्या किंवा रसातून नारळाचे तेल काढले जाते. संपूर्ण उष्णकटिबंधीय जगामध्ये पिढ्यानपिढ्या लाखो लोकांच्या आहारात चरबीचा मुख्य स्त्रोत आहे. त्यात अन्न, औषध आणि उद्योगात विविध उपयुक्तता आहेत. खोबरेल तेल हे उष्णतेचे उत्तम वाहक आहे, म्हणून ते शिजवण्यासाठी आणि तळण्यासाठी उत्कृष्ट तेल आहे.

    ओल्या नारळाचे दूध प्रथम प्रक्रियेत तयार केले जाते आणि नंतर त्या दुधापासून तेल काढले जाते. नारळाचा कोळ काढून त्यात थोडे पाणी टाकले जाते आणि नंतर ते पिळून किंवा दाबून तेल काढले जाते. तेल आणि पाण्याचे मिश्रण तेलाच्या टक्केवारीनुसार नारळाचे मलई किंवा नारळाचे दूध तयार करते. नंतर नारळाचे दूध नैसर्गिकरित्या वेगळे होऊ दिले जाते. पाण्यापेक्षा हलके असल्याने तेल पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते. यास 12 ते 24 तास लागतात. यानंतर तेल काढता येते.

    नारळाच्या दुधापासून खोबरेल तेल काढण्याची ही पारंपारिक पद्धत आहे आणि बरेच लोक या पद्धतीचा वापर घरी तेल काढण्यासाठी करतात. इतर पद्धतींमध्ये पाण्यापासून तेल वेगळे करण्यासाठी किरकोळ गरम करणे, अतिरिक्त ओलावा काढून टाकण्यासाठी आणि अधिक शुद्ध उत्पादन तयार करण्यासाठी यांचा समावेश होतो.कोरड्या प्रक्रियेत तेल थेट कर्नलमधून काढले जाते. प्रथम नारळाचे तुकडे केले जातात आणि ओव्हनमध्ये सुमारे 10 ते 12% ओलावा वाळवले जातात. त्यानंतर सुक्या खोबऱ्याला दाबून शुध्द तेल काढले जाते.

  • इंटेरिअर डिझायनिंग व्यवसाय

    इंटेरिअर डिझायनिंग व्यवसाय

    ‘इंटेरिअर डिझायनिंग’ हा अलीकडच्या काळातील विकसनशील व्यवसाय आहे. इमारतीमध्ये कार्यात्मक जागा निर्माण करणारा हा व्यवसाय आहे. घर अथवा कार्यालयाच्या आतील सजावट म्हणजे त्या जागेस विशिष्ट सौंदर्य प्राप्त करून देणारा हा व्यवसाय आहे. बांधलेली वास्तू आकर्षक आणि उठावदार दिसण्यासाठी जी सजावट केली जाते, ते म्हणजे ‘ इंटेरिअर डिझायनिंग’!

    व्यावसायिक किंवा निवासी जागेत इंटेरिअर डिझायनर्स सर्जनशीलतेने काम करतात. या सर्जनशीलतेमुळे कमी जागेत अधिक काम करता येते. त्या जागेच्या रहिवाशांना आनंद आणि प्रसन्नता लाभते. जीवनशैलीची गुणवत्ता वाढविणारा हा एक व्यवसाय आहे. ज्याठिकाणी सजावट करायची आहे, त्या प्रकल्पाचे भौतिक स्थान आणि सामाजिक संदर्भ लक्षात घेतले जातात. त्यावर विचारपूर्वक उपाय अंमलात आणून इंटेरिअर डिझायननर उत्तम प्रकारे मोकळ्या जागा तयार करू शकतात.

    कमी जागेतही उत्तम संरचना करून मोकळी जागा निर्माण करणे, पाहताक्षणी वास्तू एखाद्याला आवडेल अशा प्रकारची सुंदर सजावट करतात. तिथे राहणाऱ्या लोकांना त्यामुळे समाधानाची अनुभूती मिळते. उदाहरणार्थ, आरोग्यसेवा संस्थांमध्ये रचना करीत असताना रुग्णांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर कसा परिणाम होईल याचा विचार केला जातो. याबद्दल बरेच संशोधनही झाले आहे. इंटेरिअर डिझायनिंग व्यवसायासाठी परवाना आवश्यक नसतो. येथे कल्पनाशक्तीला मोठा वाव आहे.

    काही प्रशिक्षण संस्थामध्ये याकरिता प्रशिक्षणही राबवले जाते. हे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. त्यांना नियामक आवश्यकतांचे पालन करावे लागते. जागेची सजावट करताना पर्यावरणीय तत्त्वांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते. इंटेरिअर डिझायनर्सकडे सर्जनशीलपणे विचार करण्याची क्षमता असावी लागते, नसल्यास ती अभ्यासाने विकसित करावी लागते. ज्यामुळे लोकांचे जीवन खरोखरच सुधारू शकेल, अशा कार्यात्मक जागा तयार करणे फार गरजेचे आहे. हा व्यवसाय स्वारस्यपूर्ण वाटत असल्यास प्रशिक्षण घेऊन समृद्ध बना !

    वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांप्रमाणेच इंटिरिअर डिझायनिंग हादेखील एक कोर्स आहे. तुम्हाला पदवी दिली जाते. इंटेरिअर डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर तुम्ही घर, कार्यालय, क्लिनिक इत्यादी सजावट करू शकता. याशिवाय तुम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही काम करू शकता.

  • हरभरा शेती

    हरभरा शेती

    हरभरा’ अर्थात ‘चणा’ हे सामान्यतः ‘बंगाल हरभरा’ म्हणून ओळखले जाणारे भारतातील सर्वांत महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. चणा कडधान्याखालील सुमारे 35-40 टक्के क्षेत्र व्यापतो. भारताच्या एकूण डाळी उत्पादनात जवळपास 50 टक्के योगदान देतो. मानवी वापरासाठी, तसेच प्राण्यांचे खाद्य म्हणूनही हरभऱ्याचा उपयोग केला जातो. चण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अंदाजे 21 टक्के असते. ज्यात 61.5 टक्के कर्बोदके आणि 4.5 टक्के चरबी असून कॅल्शियम, लोह आणि नियासिनचे प्रमाण जास्त असते.

    चणे हे ‘इजिप्शियन वाटाणा’ या नावांनेही ओळखले जातात. हे थंड हंगामातील एक पीक आहे. भारतात ‘देशी चणे’ मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. या जातीमध्ये लहान आकार, गडद बिया आणि उग्र आवरण असते. हे चणे काळे, हिरवे किंवा ठिपकेदार असू शकतात. ‘काबुली चणा’ हा फिकट रंगाचा, मोठा आणि गुळगुळीत आवरणाचा असतो.

    चण्याच्या उत्पादनासाठी थंड हवामानात किमान 6 ते 8 तास सूर्यप्रकाश मिळू शकेल अशी जागा प्रथम निवडली जाते. पाण्याचा चांगला निचरा होणारी पोषक आणि समृद्ध माती असणारी जमीन निवडली जाते.

    चणा हे शेंगायुक्त पीक आहे. म्हणून पेरणीच्या तीन ते चार आठवड्यांपर्यंत ते नायट्रोजनची गरज पूर्ण करून घेते. तथापि, कमी सेंद्रिय पदार्थ आणि कमी नायट्रोजन पुरवठा असलेल्या जमिनींना 20 ते 25 किलो प्रति हेक्टर नायट्रोजनची आवश्यकता भासू शकते. नायट्रोजन व्यतिरिक्त कडधान्ये फॉस्फरसच्या वापरास अनुकूल प्रतिसाद देतात.

    जेथे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, तेथे पेरणीपूर्व सिंचन आवश्यक असते. त्यामुळे योग्य उगवण होऊन पिकाची वाढ सुरळीत होते. हरभरा पिकाला फुलोऱ्याच्या वेळी पाणी देऊ नये, तसेच जास्त सिंचन हरभरा पिकासाठी नेहमीच हानिकारक असते; कारण जास्त सिंचनामुळे वनस्पतीवृद्धी वाढून पीक उत्पादनात घट होते. त्यामुळे हलके पाणी द्यावे.

    तण नियंत्रण ही एक महत्त्वाची क्रिया आहे. या पिकासाठी तणांचा प्रादुर्भाव ही प्रमुख समस्या आहे. साधारण 25 ते 30 दिवसांनी तण काढावे लागतात. तणनाशकांच्या सहाय्याने तण काढणे हे तणनाशकांच्या वापरापेक्षा श्रेयस्कर आहे. शेतकऱ्यांना साधारणपणे प्रति एकर 8 क्विंटल धान्य मिळते.

  • जेजुरीचा खंडोबा

    जेजुरीचा खंडोबा

    पुणे जिल्ह्यातील जेजुरी या गावी खंडोबाचे देवस्थान आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून ते ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने परिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने मंदिर होते, इसवी सन १७१२ मध्ये जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. या देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत.
    सुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावर ‘मल्हारी मार्तंड’ म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. या देवस्थानच्या डोंगरास ‘नवलाख पायरीचा डोंगर’ असेही म्हटले जाते. हे देऊळ अतिशय सुंदर आहे.

    मंदिरातील सभामंडप आणि गाभारा प्रेक्षणीय आहे. मंदिरात म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा 3 मुर्त्या आहेत. तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वास्तू जतन करून ठेवल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ येथे दरवर्षी खेळला जातो. जास्तीत जास्त वेळ तलवार उंच धरून ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जाते. चैत्री पैर्णिमा, विजयादशमी, चंपाषष्ठी आणि सोमवती अमावस्या या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. तसेही भाविक दर्शनासाठी नेहमी गर्दी करतात.

    खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी आणि इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत आहे. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे लक्ष वेधून घेणारी आहेत. हे ठिकाण पुण्यापासून ५२ किमी. अंतरावर आहे. येथील मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा दैवत महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही विशेष प्रसिद्ध आहे.

    पायऱ्यांच्या दुतर्फा अनेक दीपमाळा दिसतात. देवळाभोवती फरसबंदी आवार आणि तट आहे. दुसरा बाजीराव आणि अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले तलाव प्रेक्षणीय असून मल्हारराव होळकरांच्या स्मरणार्थ बांधलेले महादेवाचे मंदिरही सुंदर आहे. येथील राममंदिरात एक शिलालेख आहे. आजूबाजूचा प्रदेश सुपीक आहे. येथे नगरपालिका असून धर्मशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वगैरे आवश्यक सोयी आहेत.

  • सिंधुदुर्गातील घडीवाडीचा किनारा

    सिंधुदुर्गातील घडीवाडीचा किनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात देवगडमध्ये असलेला विजयदुर्ग किल्ला म्हणजे देवगड तालुक्याचे उत्तर टोक आहे. या किल्ल्यासमोर असलेला किनारा सुंदर आहेच; परंतु येथून दक्षिणेच्या दिशेने गेल्यावर ‘दामलेमळा’, ‘कोठारवाडी’, ‘कालवशी’ वगैरे किनारे असून येथील ‘घडीवाडीचा किनारा’ प्रसिद्ध आहे.

    गिर्ये गावाच्या रामेश्वर मंदिरामागे असलेला एक कच्चा रस्ता आपल्याला याठिकाणी घेऊन जातो. हा किनारा म्हणजे ही वाळूची पुळण नाही. हा खडकाळ किनारा आहे; परंतु इतर किनाऱ्यापेक्षा वेगळा असल्याने मनाला मोठा आनंद देऊन जातो. समुद्रापर्यंत असलेली लाल माती आणि जांभा खडकाचे वेगवेगळे आकार येथे दिसतात. हे खडकाळ किनारे आणि तिथली डबकी हे जैववैविध्याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठिकाण आहे. येथे प्रवाळ, शैवाल, कालवे, विविध प्रकारचे खेकडे, समुद्री गोगलगायी यांचा मुक्त अधिवास असतो.

    येथील लाटांची खळखळ अगदी सौम्य असते. तो आवाज मन वेडावून सोडणारा असतो. हा किनारा पर्यटकांच्या गर्दीपासून खूप दूर आहे. एकांत देणारा, मन लुब्ध करणारा हा किनारा नक्की पहावा.

  • वरळी किल्ला

    वरळी किल्ला

    मुंबई परिसरात ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे काही किल्ले आहेत. एके काळी हे किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय खात्याने या किल्ल्यांचे नुतनीकरण केल्यामुळे आजही हे किल्ले दिमाखात उभे अहेत. वरळी-कोळीवाड्यामध्ये आदर्श नगरच्या बसथांब्यावरुन समुद्रकिनाऱ्याकडे जाणारी एक अरुंद गल्ली आहे. या गल्ल्लीतून सुमारे 10 मिनिटे चालत गेल्यानंतर वरळीचा किल्ला लागतो.

    हा किल्ला पोर्तुगीजांनी इसवी सन 1561 साली बांधला. या किल्ल्याच्या भिंती तळभागाकडे अधिकाधिक जाड होत जाणाऱ्या आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेस त्रिकोणाकृती बुरुज असून या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी असलेला मनोरा ही खास पोर्तुगीज स्थापत्याची वैशिष्ट्ये या किल्ल्यामध्ये दिसून येतात.

    मुंबईच्या बेटांवर एकूण ११ किल्ले होते. त्यापैकी वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याशा टेकडीवर इंग्रजांनी ‘वरळीचा किल्ला’ बांधला. या किल्ल्याचा उपयोग समुद्रीमार्गाने होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी केला गेला.

    या भागातून लहान होड्या, जहाजे यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि या भागाचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांनी इसवी सन १६७५ साली वरळीचा किल्ला बांधला. या किल्ल्याची डागडुजी पुरातत्व खात्याने केली असून त्यामुळे किल्ला सुस्थितीत आहे. किल्ल्यावर पाण्याची विहीर असून त्याच्या बाजूला छोटे मंदिर आणि व्यायामशाळा आहे. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी जिना बांधलेला आहे.

    या जिन्यावरून किल्ल्याच्या तटबंदीवर जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीवरुन बांद्रा, माहीमपर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या बाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले ३ चौथरे दिसतात. इसवी सन १७ व्या शतकाच्या अखेरीस समुद्री चाच्यांच्या वाढलेल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी तोफांची योजना केली होती. या किल्ल्यावरून वरळी-बांद्रे सागरी पुल पाहता येतो.

  • टिपेश्वर अभयारण्य

    टिपेश्वर अभयारण्य

    विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे मनसोक्त दर्शन घडविणारे टिपेश्वर अभयारण्य आहे. मुख्यालयापासून अवघ्या ८० किलोमीटर अंतरावर ही अभयारण्य आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत संरक्षित क्षेत्रामध्ये या अभयारण्याचा समावेश होतो. येथील ‘तिपाई’ देवीच्या नावावरून या अभयारण्याला ‘टिपेश्वर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. अभयारण्यात टेकडीवर हे तिपाईचे मंदिर आहे. हे अभयारण्य जैवविविधतेने समृद्ध आहे.

    या अभयारण्यात पट्टेदार वाघांचे वास्तव्य आहे. वाघांसोबतच अस्वल, चांदी अस्वल, नीलगाय, रोही, सांबर, चितळ, काळवीट, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, सायाळ, काळतोंड्या माकड, रानमांजर, खवले मांजर इत्यादी प्रकारचे प्राणीसुद्धा येथे आढळतात. याशिवाय मोर, हरीयाल, पोपट, गरूड, घार, गिधाड, ससाणा, घुबड, तीतर, पानकोंबडी इत्यादी प्रकारचे पक्षीही मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात.

    वनस्पतींचा विचार करता साग या जातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. नीम, भुईनीम, बेल, वड, पिंपळ, बेहाळा, चंदन, पळस, खैर, धावडा, सालई, अंजन, आवळा, चिंच, बोर, जांभुळ इत्यादी प्रकारच्या वृक्षांसह मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतीही येथे मुबलक प्रमाणात आहेत.

  • मार्कंडेश्वर देवस्थान

    मार्कंडेश्वर देवस्थान

    महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात वास्तुशिल्प शैलीसाठी प्रसिद्ध असलेले फार सुंदर मंदिरांचा समूह आहे. येथील श्रीमार्कंडेश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. ‘वैनगंगा’ नदीच्या डाव्या तीरावर ‘चामोर्शी’ या गावाच्या पश्चिमेला हे मंदिर उभे आहे. येथील अन्य मंदिरे आणि त्यांवरील शिल्पकला पाहण्यासाठी आवर्जून येथे पर्यटक येत असतात. महाशिवरात्रीला तर येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते.

    वैनगंगेच्या तीराजवळ उंच खडकावर हे प्राचीन श्री मार्कंडेश्वर देवस्थान आहे. आयताकार प्रकारामध्ये हा नागरशैलीत बांधलेला हा एक मंदिर-समूह आहे. एका सर्वेक्षणात येथे चोवीस मंदिरे असल्याचा उल्लेख आढळतो. सद्यस्थितीत या समुहात १८ मंदिरे आहेत. मार्कंडेय ऋषी, यमधर्म, मार्कंडेयाचा पिता मृकंड ऋषी आणि शिवशंकर अशी 4 मंदिरे अप्रतिम आहेत.

    मार्कंड मंदिराला अर्धमंडप असून सभामंडप, अंतराल आणि गर्भगृह असे इतर भाग आहेत. पूर्वेला नंदीमंडप आहे. पावणेतीनशे वर्षापूर्वी वीज पडून या मंदिराचे फार नुकसान झाले. शिखर सभामंडपावर कोसळून त्याचेही नुकसान झाले. तत्कालीन गोंड राजांनी त्याचा जिर्णोद्धार केला; परंतु पूर्ववत छत आणि शिखर ते बंधू शकले नाहीत.

    मुख्य मंदिरातील शिल्पे पाहण्यासारखी आहेत. शिखरांवर वानरांच्या क्रीडा, बदकांचे खळप, हत्तिणींची प्रसूती, पक्ष्यांची शिकार वगैरे दृश्ये दाखविली आहेत. या मंदिरांच्या स्तंभांवर, छतावर तसेच अधिष्ठान व शिखर यांमधील भागावर तीन रांगांमध्ये सुमारे चारशे स्वतंत्र शिल्पे आहेत. त्यांत देवदेवता, प्राणी यांची शिल्पे आहेत. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, गोंड यांच्या आधिपत्याखाली हा प्रवेश असल्याचे उल्लेख ताम्रपट व शिलालेख यांतून मिळतात.

    वाली-सुग्रीव युद्ध, लव-कुश आणि अश्व, भीम-दुर्योधन मल्लयुद्ध यांसारखे प्रसंग काही ठिकाणी दाखविले आहेत. मंदिरांच्या परिसरात एक शिल्पखंड आहे. त्यावर मुरलीधर कृष्ण, राम-लक्ष्मण, सती जाणारी स्त्री वगैरे प्रतिमा आहेत. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला आदिशक्ती महिषासुरमर्दिनी व पूर्वेला नंदिकेश्वराचे छोटे मंदिर आहे. दशावताराचेही एक सुंदर मंदिर आहे. याशिवाय या समूहात घृणेश्वर, भुवनेश्वर, गणपती वगैरे अन्य मंदिरे आहेत. निसर्गसौंदर्याने भारलेली ही मंदिरे पाहण्यासाठी भाविकांचा येथे विशेष ओढा असतो.

  • हेदवीचा सागरकिनारा

    हेदवीचा सागरकिनारा

    शांत, रम्य असणारा रत्नागिरीच्या गुहागरजवळचा किनारा म्हणजे ‘हेदवीचा सागरकिनारा’ होय. हा किनारा आकर्षक आहेच; शिवाय किनाऱ्यावरच सुंदर असे ‘उमामहेश्वर मंदिर’ आहे. हेदवी समुद्र किनाऱ्याचा खडकाळ भाग सुरु होतो, तिथेच हे मंदिर आहे. या मंदिरामागे एक झरा आहे.

    येथे बसून शांतपणे समुद्राची गाज ऐकता येते. सभामंडपाच्या सावलीत बसून लाटांचे खेळ पाहता येतात. ‘रोहिले’चा छोटासा किनाराही येथून पाहता येतो. समुद्राच्या लाटांमुळे हेदवीजवळच्या खडकाळ किनाऱ्यावर एक घळ तयार झाली आहे. समुद्राच्या लाटा वेगाने या घळीत शिरतात. लाटा तिथे आपटल्या की 3 ते 4 मीटर उंचीचा फवारा या घळीतून उंच उडतो. फवाऱ्याची उंची ही लाटांच्या जोरावर अवलंबून असते. त्यामुळे उधाणाच्या वेळी पाण्याच्या उंच फवाऱ्याचे दृश्य मन लुब्ध करते. असा हा वैशिष्ट्यपूर्ण किनारा पहावाच!

  • मलंगगड किल्ला

    मलंगगड किल्ला

    ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सुमारे 15 कि.मी. अंतरावर ‘मलंगगड’ किल्ला आहे. एका उंच डोंगरावर शिलाहार राजाने हा किल्ला बांधलेला असून तो पनवेल-वरुण-वावंजे गावापासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे. हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. मलंगगड हे धार्मिक स्थान आहे. ते ‘श्री मलंग’ किंवा ‘हाजी मलंग’ या नावाने ओळखले जाते. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.

    रायगड जिल्ह्यातील अन्य किल्ल्याप्रमाणेच माथ्यावर अवघड सुळका आणि खाली थोडी माची आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या या किल्यावर बाबामलंग यांची समाधी आहे. किल्ल्यावर तटबंदी, प्रवेशद्वार, पाण्याची तळी, बुरुज आढळतात. किल्ल्याचा शिरोभाग तसा लहान आहे. छप्पर उडालेले, भिंती शाबूत असलेला एक वाडा येथे दिसतो. त्याच्या मागे खोदलेल्या 7 टाक्या आहेत. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराचे झाड आहे. श्री गणेश मंदिर असून काही ठिकाणी तटबंदीही आहे.

    बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते, असे मानतात. अगदी उंचावरुन सभोवताली पाहिल्यास कुर्ला-मुंबईचा परिसर, पनवेलपर्यंतचा प्रवेश तसेच माथेरानचा प्रदेश दिसतो. कल्याण स्थानकावरुन गडाच्या पायथ्याशी बसने जाता येते. मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाहून अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते.

  • नांदूरमधमेश्वर अभयारण्य

    नांदूरमधमेश्वर अभयारण्य

    नांदूर मधमेश्वेर हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर अगदी मंत्रमुग्ध झालेला असतो. त्यांच्या हालचाली, त्यांचे मंजूळ आवाज आणि एकंदरच निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबर विदेश पक्षीही पाहता येतात.
    हिमालय, काश्मीर, युरोप खंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, पाकिस्तान या भागांतून हजारो किलोमीटर अंतर कापून हे पक्षी येथे दाखल होतात. वन खाते आणि पक्षी निरीक्षकांनी आतापर्यंत 240 ते 250 वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे.

    ब्रिटीशांनी एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात ‘कडवा’ आणि ‘गोदावरी’ नदीच्या संगमावर नांदूर मधमेश्वरला एक उत्कृष्ट धरण बांधले. शंभर वर्षापासून अनेकांची तृष्णा भागवणारे हे जलाशय हजारो स्थलांतरीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले असते. जांभळी पाणकोंबडी, लाल डोक्याची टिटवी, चक्रवाक, तरंग, वैष्णव, हळदीकुंकू, चांदवा, नयनसरी, तलवार, पांढरा शरारी, मोरशरारी मुग्धबलाक, चिमण्या, नदी सूर्य, खंड्या असे हजारो पक्षी येथे वास्तव्यासाठी असतात.

    व्हिसलिंग डक, मलार्ड पोचार्ड, गढवाल, मिनटेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड, रिव्हर टर्न, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, इंडियन सिल्व्हर बिल, ग्रीन बिटर, कॅपविंग, ओरियन्टल, हनी बझार्ड, इंडियन रोलर, किंग फिशर, पाईड किंगफिशर, मार्शल हेरियर, स्पूनबिल, कुट, कॉमनटिल, पिग्मी गुस, ग्रेटर फ्लेमिंगो, कॉमन क्रेन, व्हाईट नेक्ड स्टॉर्क, ओपन बिल स्टॉर्क, स्पॉड बिल डक, ब्राह्मणी डक, कोम डक, जिकाना, लेटर, असे काही विदेशी पक्षी येथे येतात.

    पक्षी निरीक्षकांना या रंगीबेरंगी, मनमोहक पक्ष्यांचे मनसोक्त निरीक्षण करता यावे, त्यांच्या छबी टिपता याव्यात यासाठी वन विभागाने 5 मनोऱ्यांच्या परिसरात ‘नेचर ट्रॅक’ ची निर्मिती केली आहे. या परिसरात पक्ष्यांना बसण्यासाठी कृत्रिम दगडी उंचवटे निर्माण केले आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षकांच्या दृष्टीक्षेपात पक्षी येतात. येथे जायचे झाल्यास आधी नाशिकला जावे लागेल.

  • वेल्डिंग उद्योग

    वेल्डिंग उद्योग

    ‘फॅब्रिकेशन’ हा एका लोखंडावर आधारित उद्योग आहे. लोखंडी वस्तूंपासून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तू बनविणे, तुटलेल्या लोखंडी वस्तू ‘वेल्डिंग’द्वारे जोडणे, नवीन वस्तू बनविणे, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात वस्तू आणि अवजारे तयार करणे, शेतीसाठी अवजारे तयार करणे असे प्रकार या उद्योगात येतात. शारीरिक कष्टाची तयारी असेल, तर ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार तरुण, उद्योजक यांना फॅब्रिकेशनचा व्यवसाय आयुष्यभरासाठी चांगले काम देऊ शकतो.

    मोठमोठ्या कंपन्या, कारखाने, उद्योग यांना ‘वेल्डिंग’ किंवा ‘फॅब्रिकेशन’च्या कामाची नेहमीच गरज भासते. वेल्डिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, कटर आणि टूल्स घेऊन हा व्यवसाय सुरू करता येतो. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला किमान एक वर्ष एकाच ‘फॅब्रिकेशन’मध्ये प्रत्यक्ष काम करून अनुभव घ्यावा लागेल.

    यानंतर एक किंवा दोन अकुशल मदतनीस घेऊन व्यवसाय सुरू करू शकता. खेड्यापाड्यात, शहरात तोडफोड झालेल्या वाहनांचे काम, दैनंदिन गरजेच्या वस्तू जसे की, तिजोरी, झुले, खुर्च्या, खाटा इत्यादी बनविण्याचे काम ‘फॅब्रिकेशन’च्या उद्योगात केले जाते. कच्चा माल आणून तिजोरी, खाटा, खुर्च्या यांसारख्या वस्तू आपण बनवून त्यावर स्वत:च्या ब्रँडचे लेबल लावून फॅब्रिकेशन कारखान्यांसमोर तुमचे स्वतःचे दुकान सुरू करू शकता.

    असा माल देणाऱ्या व्यापाऱ्यांना घाऊक किंमतीत माल देऊ शकता. फॅब्रिकेशन व्यवसायात ग्राहक शोधण्याची गरज भासत नाही. ग्राहक तुम्हाला शोधत येतो. वेल्डिंग, फॅब्रिकेशनच्या कामाचे मजुरी दर जास्त असल्यामुळे, केलेल्या कामाची चांगली किंमत देखील मिळते. फॅब्रिकेशनच्या कामात ‘गॅस वेल्डिंग’ आणि ‘इलेक्ट्रिकल वेल्डिंग’ हे दोन प्रकारचे वेल्डिंग आहेत. या प्रकारच्या वेल्डिंगचा वापर दोन धातूंना जोडण्यासाठी केला जातो.

    स्टेनलेस स्टील, पोलाद, लोखंड हे धातू चांगल्याप्रकारे ‘वेल्ड’ करू शकतात. दैनंदिन जीवनातील धातूच्या सामग्रीची झीज झाल्यानंतर ते पुन्हा ‘वेल्डेड’ केले जातात. वेल्डिंगचा वापर व्यावसायिक कारणांसाठीही केला जातो.

    बहुमजली इमारती बांधताना तसेच मोठी घरे, बंगले, त्यांची दारे, खिडक्या, ग्रील्स, कात्री, शटर इ. गोष्टी वेल्डिंगद्वारे केली जातात. ‘आर्क वेल्डिंग’चा वापर वस्तू जोडण्यासाठी किंवा संयुक्त काम करण्यासाठीदेखील केला जातो.

    फॅब्रिकेशनचे काम शिकण्यासाठी सरकारी किंवा खासगी आयटीआय संस्थांमध्ये शीट मेटल, वेल्डरचा अभ्यासक्रम शिकवला जातो. हे एक वर्षाचे प्रशिक्षण घेऊन किंवा फॅब्रिकेशन कारखान्यामध्ये कमीत कमी एक वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन व्यवसाय सुरू करता येतो. फक्त स्थानिक कंपन्या, कारखाने त्यांचे फॅब्रिकेशनचे काम देऊ शकतात. त्यासोबत स्थानिक किंवा शहरातील लोखंडाच्या व्यापाऱ्यांना तिजोरी, खाटा, झुले, कपाटे, खुर्च्या बनवून देता येतील. गावातील घरे, बंगल्यांचे ग्रील, खिडक्या, दरवाजे बनवून देता येतील.

    दुकानाचे शटर, लोखंडी कॅबिनेट तयार करून देता येतील. लोखंडी पत्रे, कोन, वेल्डिंगसाठी रॉड, लोखंडी पट्ट्या हा यासाठी लागणारा कच्चा माल असेल. वेल्डिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, कटर, गॅस वेल्डिंग, ग्रीप, केबल्स, होल्डर, इलेक्ट्रो रॉड्स, गॅस कटर, मापन टेप, वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारी छोटी मोठी साधने अशी यंत्रसामग्री आपणास लागेल.

  • चिक्की व्यवसाय

    चिक्की व्यवसाय

    चिक्की हा अनेकजणांचा आवडता पदार्थ आहे. शेंगदाणे, अक्रोड, बदाम, काजू अशा सुक्या मेव्यात गूळ किंवा साखर मिसळून चिक्की बनविली जाते. चिक्की बनविण्यासाठी गूळ किंवा साखरेचा पाक करून त्यात विविध घटक मिसळले जातात. या मिश्रणाचे छोटे तुकडे करून बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात.

    चिक्की उत्पादन प्रक्रियेत कच्चा माल म्हणून शेंगदाणे, काजू, तीळ, सुक्या नारळाचे तुकडे, सुका मेवा इ. पदार्थ वापरले जातात. विशेषतः शालेय मुलांमध्ये चिक्की लोकप्रिय आहे. अशा प्रकारचे उत्पादन देशाच्या कोणत्याही भागात तयार केले जाऊ शकते.

    भारतातील अनेक प्रदेशात चिक्कीला ‘गुडपट्टी’ म्हणूनही ओळखले जाते. चिक्की प्रथिने, मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचा समृद्ध स्रोत आहे. चिक्की कॅलरीजच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक म्हणून ओळखली जाते. चिक्की आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता वाढल्याने चिक्की उत्पादन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. विशेषत: भुईमुगापासून बनवलेली चिक्की, ज्याला पाश्चात्य देशांमध्ये ‘पीनट ब्रिटल’ म्हणूनही ओळखले जाते, हा एक पारंपरिक ‘रेडी टू इट’ असा गोड नाश्ता आहे.

    चिक्की उत्पादन व्यवसायात कोणत्याही मोठ्या ब्रँडने प्रवेश केलेला नाही. त्यामुळे चिक्कीची बहुतांश मागणी स्थानिक उत्पादकच पूर्ण करतात. या औद्योगिक क्षेत्रात फार कमी मोठे ब्रँड आहेत. चिक्कीची बाजारपेठ पूर्णपणे असंघटित क्षेत्रांच्या नियंत्रणाखाली आहे. यामध्ये किरकोळ विक्रेते महत्त्वाची भूमिका बजावतात. खाद्यतेल, बियाणे आणि गुळापासून बनविलेली उत्पादने आरोग्यदायी, पौष्टिक आणि ऊर्जावान मानली जातात. चिक्की हेदेखील या उत्पादनांपैकी एक आहे. चिक्कीची बाजारपेठेतील मागणी सातत्याने वाढत आहे. उद्योजक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या कोणत्याही स्तरावर चिक्की उत्पादन व्यवसाय सुरू करू शकतो. या व्यवसायात वापरली जाणारी यंत्रसामग्री आणि उपकरणांची किंमत त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार बदलते.

    त्यामुळे या प्रकारचा व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकाला प्रथम कोणत्या स्तरावर व्यवसाय सुरू करायचा आहे, हे ठरवावे लागेल. त्याच आधारावर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जमीन, यंत्रसामग्री, कच्चा माल, वित्त, परवाना आणि नोंदणी इत्यादी व्यवस्थापित करू शकेल. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी उद्योजकाला अनेक गोष्टींची माहिती मिळण्यासाठी स्थानिक संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरते. ज्यामुळे उद्योजकाला पुढील निर्णय घेणे आणि आव्हाने पेलण्यास मदत होते.

    याशिवाय गूळ, साखर, शेंगदाणे, काजू, तीळ इत्यादींचा वापर चिक्की उत्पादन व्यवसायात मुख्य कच्चा माल म्हणून केला जातो. त्यामुळे स्थानिक पातळीवर कच्च्या मालाच्या उपलब्धतेचा अभ्यास केला पाहिजे. उद्योजकाने स्पर्धेचेही मूल्यमापन करणे गरजेचे आहे. शक्यतो कमी भाड्याची जागा पहावी. पाणी, रस्ता आणि मजुरांची उपलब्धता सुलभ असावी. कमी उत्पादन क्षमता असलेल्या युनिटला कमी यंत्रसामग्रीची आवश्यकता असू शकते. जास्त क्षमतेच्या युनिटला जास्त किंमतीची यंत्रसामग्री आवश्यक असू शकते.

    या व्यवसायासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि उपकरणांची यादी खालीलप्रमाणे आहे. सिरप बनवणारी वेसल्स, चिक्की कुकिंग आणि मिक्सिंग पॅन, चिक्की रोलिंग, शीटिंग आणि कटिंग लाइन, फ्लो रॅप पॅकिंग मशीन आणि इतर उपकरणे गरजेची असतात. ही यंत्रसामग्री खरेदी करण्यापूर्वी, उद्योजकाने विविध पुरवठादारांकडून दरपत्रक मागवून घ्यावे. तुलनात्मक मूल्यांकन करून पुरवठादार निवडला पाहिजे.

    कच्च्या मालामध्ये साखर, भाजलेले शेंगदाणे, गूळ, द्रव ग्लुकोज, वेष्टन साहित्याची गरज असते. खरे तर, बरेच लोक त्यांच्या स्वयंपाकघरातूनच चिक्की बनवतात. ही प्रक्रिया सोपी आहे. चिक्की बनवण्याच्या प्रक्रियेत सर्व घटकांचे वजन योग्यरित्या केले जाते. नंतर गूळ वितळवून पाक बनविला जातो. या प्रक्रियेदरम्यान त्यात थोडे पाणीही टाकले जाते, आवश्यकतेनुसार साखरही घालतात. आणि मग या तयार पाकात भाजलेले शेंगदाणे किंवा ज्याची चिक्की बनविणार असतील तो पदार्थ टाकला जातो. तयार वस्तुमान गुंडाळले जाऊन आवश्यक जाडीची ‘शीट’ तयार केली जाते. नंतर या ‘शीट’चे लहान तुकडे केले जातात. या तयार पट्ट्यांची कूलिंग प्रक्रिया सुरू केली जाते. थंड झाल्यावर ते वेष्टनबंद करून विक्रीस पाठविले जातात.