सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • खाद्य तेल निर्मिती व्यवसाय

    खाद्य तेल निर्मिती व्यवसाय

    भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. येथे गळीत धान्यापासून पारंपरिकपणे तसेच यंत्रांच्या सहाय्याने खाद्य तेल तयार केले जाते. मोहरी, सोयाबीन, कापूस, भुईमूग बियांपासून काढलेले तेल 2 वेळा शुद्ध करून बाजारात आणले जाते. सर्व समाजातील लोकांच्या दैनंदिन आहारात तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कच्चे सोयाबीन तेल खाण्यासाठी हानिकारक असल्याने ते गाळून शुद्ध केल्यानंतर खाण्यासाठी वापरले जाते.

    रिफाइंड तेलाला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. दक्षिण भारतात सोयाबीन तेल, मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल याबरोबरच खोबरेल तेलाचा वापर अन्नात केला जातो. खाद्यतेल उत्पादनात मोठा प्रकल्प सुरू करण्याची क्षमता कच्चा माल, यंत्रसामग्री आणि खर्चाची मर्यादा यावर अवलंबून असते. पारंपरिक तेल गावात मिळते; परंतु रिफाइंड तेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असल्याने बाजारात खूप मागणी आहे.

    खाद्यतेल निर्मिती कारखान्यात तेलबियांपासून जास्तीत जास्त तेल काढले जाते. शुद्धीकरण संयंत्रातून डिंक, प्रोटीनेशियस पदार्थ, म्युसिलेज असे हानिकारक पदार्थ तेल शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे वेगळे केले जातात. शुद्ध तेल तयार केले जाते. या प्रक्रियेत तेल एका टाकीत काही दिवस ठेवले जाते. तेल पाण्यापेक्षा हलके असल्याने तेल वर राहते. टाकीच्या तळाशी पाणी आणि कचरा राहतो. ही एक साधी प्रक्रिया आहे. त्यामुळे वेळेची बचत होते. आज तेल शुद्धीकरणासाठी शुद्धीकरण सयंत्राचा वापर केला जातो.

    तेल उत्पादन आणि शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यापूर्वी शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. पुस्तकांच्या आधारे असे प्रकल्प सुरू करू नका. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने खाद्य तेल निर्मिती प्रकल्प सुरू करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिले जाते. या उद्योगासाठी मंडळाकडून कर्ज स्वरूपात अनुदान दिले जाते. देशातील प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन आहारात तेलाचा वापर करतो.

    आपण बाजारात खाद्यतेल उद्योगांचे अनेक ब्रँड पाहतो. उद्योग – व्यवसायाची स्पर्धा तीव्र असेल, तर ग्राहकांचीही कमतरता नसते. खाद्यतेलाचा पुरवठा घाऊक विक्रेते, साठेबाज त्यांच्या मागणीनुसार करू शकतात. यासोबतच ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक किराणा दुकानात तेलाची विक्री होते. मोठी हॉटेल्स, ढाबा, रेस्टॉरंट, मॉल्स, सुपर मार्केट्स येथे आवश्यक वजनाचे वेष्टनबंद केलेले तेल विकू शकता. या उद्योगासाठी एक्सपेलर मशीन, फिल्टर, ब्लीचिंग आणि पॅकिंग मशीन, हँडप्रेस कॉम्प्रेसिंग मशीन, केज प्रेस, इलेक्ट्रिक मोटर बोर्ड व बॉल कॉम्प्रेसिंग मशीन इत्यादी यंत्रसामग्रीची आवश्यकता असते.

  • पदार्थाला तडका देणारी मोहरी

    पदार्थाला तडका देणारी मोहरी

    पदार्थाला तडका देऊन चव वाढविणारी मोहरी फोडणीच्या तेलात तडतडली की सुरेख वास दरवळतो. मोहरीला हिंदीत ‘राई’, ‘बनारसी राय’, ‘काले सरसों’ म्हणतात. गुजरातीत ‘राई’, काश्मिरीत ‘सरिसा’, तेलुगुमध्ये ‘अवलु’, तमिळमध्ये ‘कडुगो’, मल्याळममध्ये ‘ कडुकू’, तर कन्नडमध्ये ‘सावे’ या नावाने ओळखली जाते.

    भारत मोहरी तेलाच्या लागवडीत जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. तसेच, मोहरी पिकाचा एकूण तेलबिया उत्पादनात 28.6% वाटा आहे. त्यामुळे मोहरी हे भारतातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. शिवाय, मोहरीच्या रोपांचा हिरवी पालेभाजी म्हणून वापर केला जातो. मोहरीचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. गहू, बार्ली, हरभरा, बटाटा इत्यादींसोबत मोहरीची लागवड केली जाते. याला आंतरपीक असे म्हणतात.

    मोहरीच्या बिया भारतात भाज्या, आमटीसाठी मसाला म्हणून वापरल्या जातात. मोहरीचे तेल काढल्यानंतरची पेंड गुरांसाठी उत्तम खाद्य आहे.मुख्यतः राजस्थानमध्ये मोहरीची शेती प्राचीन काळापासून केली जाते. यासह मध्यप्रदेश आणि गुजरातमध्येही मोहरीचे पीक लोकप्रिय आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशसह भारताच्या दक्षिण भागातील शेतकरी मोहरीचे पीक घेतात. आसाम, बिहार, ओडिशा व पश्चिम बंगालमधील रब्बी पिकांचा ‘पिवळा हंगाम’ म्हणून उल्लेख आहे.

    मोहरीची लागवड उपोष्णकटिबंधीय हवामानात सुरू होते. कोरड्या व थंड हवामानात मोहरीची लागवड चांगली होते. मोहरी पिकवण्याचा हंगाम हा प्रामुख्याने रब्बी पीक म्हणून ओळखला जातो. मोहरीसाठी दवमुक्त वातावरणासह निरभ्र आकाश आवश्यक असते.

    भारी चिकणमाती जमिनीत मोहरीची लागवड मोठ्या प्रमाणात करता येते. तथापि, चांगल्या पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते खोल जमीन मोहरी पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे.
    वालुकामय व चिकणमाती वाळूची जमीन या शेतीसाठी योग्य असते. मोहरीचे बियाणे पेरण्यापूर्वी पेरणीपूर्व सिंचन करावे लागते. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी सिंचन व्यवस्थित करावे लागते. जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्तम पिक मिळते. जमिनीतील ओलावा कायम असावा लागतो. मोहरीची काढणी शेंगा पिवळ्या पडताच आणि बियाणे कडक वाळताच करावी लागते. मोहरीचे पीक सुमारे 110 ते 160 दिवसात वाढते. शेंगा फुटू नयेत म्हणून सकाळी लवकर काढणी करावी लागते.

  • संत्र्याचे सिरप

    संत्र्याचे सिरप

    तापमान आधीच वाढले आहे. ते अधिक वाढणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज काहीतरी वेगळे आंबटगोड, गार-गार बनवूया.
    संत्र्याचे सिरप
    लागणारे साहित्य
    ४ संत्री, चवीनुसार साखर, २ बाटल्या सोडा, १ मोठा कप आइस्क्रीम

    कृती
    अगदी सोपी आणि झटकन होणारी आहे. प्रथम संत्री सोलून घ्यावीत. आता या संत्र्यांच्या फोडींचा मिक्सरमधून फिरवून रस काढून घ्यावा. हा रस गाळून घ्यावा. त्यात आपल्या चवीनुसार साखर घालून छान एकजीव करून घ्यावे. नंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करावे. आयत्यावेळी त्यात सोडा ओतून वर आइस्क्रीम घालावे. म्हणजे हे ‘सिरप’ आणखी लज्जतदार लागते.

  • मैत्री ठेवावी जपून

    मैत्री ठेवावी जपून

    आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी असतात. त्यातील एक किंवा दोनच खास असतात. आपली खास मैत्री जपून ठेवणे आयुष्यात फार गरजेचे असते. मैत्रीला मोठे महत्त्व आहे. ती जपून ठेवली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मैत्री हवीच ! मैत्री जपून ठेवण्यासाठी मित्र किंवा मैत्रिणीस कधीतरी घरी बोलवा.

    किंवा बाहेर कुठेतरी भेटण्यास सांगा. स्वत:च्या हातांनी छानसा पदार्थ बनवा. टेबल सुंदरपणे सजवा. मग हसतखेळत, मस्करी करत जेवणाचा आनंद घ्या. कधीतरी जिवलग मित्र किंवा मैत्रिणीसोबत दिवसभर बोहर जाण्याची योजना आखा. यामुळे तुमचे मैत्रीचे बंध आणखी मजबूत होतील.

    संगीत हा भावना आणि आठवणी जागृत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मैत्रीशी संबंधित गाण्यांची यादी बनवा. मित्र-मैत्रिणीसोबत बसून बोलण्यासोबतच संगीताचाही आनंद घ्या. मित्रासोबत छायाचित्रे घ्या. तुमच्या मैत्रीच्या प्रवासाचे चित्रण करा. तुमचा जिवलग मित्र एका शहरात नसून दुसऱ्या शहरात असेल तर संपर्कात रहा. मित्र किंवा मैत्रिणीला तुमच्या आयुष्यात किती अर्थ आहे ते कधीतरी सांगा. त्याच्या उपस्थितीत कधीही एकटेपणा जाणवू देवू नका. मित्रत्व हे आयुष्यभर मनुष्याच्या सोबतीला असते, हे लक्षात असू द्या.

  • काळजीपूर्वक करावे नेल एक्स्टेंशन

    काळजीपूर्वक करावे नेल एक्स्टेंशन

    हे फॅशनचे युग आहे ! प्रत्येकजण आपला ‘लूक’ आणि सौंदर्याची विशेष काळजी घेताना दिसतो. मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल याबाबत खूप जागरूक झाले आहेत. विशेषत: महिला प्रत्येक प्रसंगात आकर्षक दिसण्यासाठी फार मेहनत घेतात. त्यांच्या पोशाखांपासून ते केशभूषा, पादत्राणे या सर्व गोष्टी महिलांना परिपूर्ण हव्या असतात. नखे हा सुद्धा सौंदर्याचा एक भाग आहे. आकर्षक नखांमुळे हातांचे सौंदर्य खुलते.

    स्वच्छ-सुंदर, सरळसोट नखे सर्वांनाच हवी असतात. नखे सजविण्यासाठी ब्युटिशियनकडे अनेक उपाय असतात. मुली नखांना छान आकार देतात. शिवाय असे नवनवे ‘ट्रेंड’ सहजपणे स्वीकारतात. आजकाल बऱ्याच मुली नखांना ‘परफेक्ट लूक’ देण्यासाठी ‘नेल एक्स्टेंशन’चा अवलंब करताना दिसतात.

    पावसाळ्यात नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘नेल एक्स्टेंशन’ करतात; म्हणजेच नखे वाढवली जातात आणि त्यांना आकर्षक आकार देऊन ती डिझाईनने सजवली जातात; जेणेकरून ती फार सुंदर दिसतील. आता हे सर्वसामान्य झाले आहे. आपण जर ‘नेल एक्स्टेंशन’ करण्याचा विचार करीत असाल, तर एक आठवड्यासाठी दररोज तेल किंवा ‘मॉइश्चरायझर’ ने नखांना मसाज करा. यासाठी तुम्ही नारळ, बदाम तेल वापरू शकता.

    जर तुम्ही नखावरचे ‘नेल एक्स्टेंशन’ काढून टाकले असेल, तर नक्कीच काही दिवस नखांना ‘नेल पेंट’ वापरू नका. गरजेसाठी ‘नेलपेंट’ लावल्यास रात्री झोपण्यापूर्वी काळजीपूर्वक काढून टाका. हे करणे आवश्यकच असते; कारण नखे वाढवल्यामुळे, नखांना हवा उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत ‘नेल पेंट’ लावल्यास नखे नैसर्गिक हवेच्या संपर्कात येऊ शकणार नाहीत.

    ‘नेल एक्स्टेंशन’ केल्यामुळे नखे पातळ आणि कमकुवत होतात. त्यामुळे जर तुम्ही ‘नेल एक्स्टेंशन’ करीत असाल, तर त्यानंतर नखांवर ‘नेल स्ट्राँगर’ लावा. तसेच ‘नेल पेंट’ लावण्यापूर्वीही त्याचा वापर करा, जेणेकरून नखे मजबूत राहतील.

    नखे सुंदर दिसण्यासाठी आधुनिक कलात्मकता गरजेची आहे. अलीकडे नखे सजविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुली या पर्यायांचा अवलंब करतात. सौंदर्यप्रसाधनाचे हे उपाय करीत असताना त्याचे विपरित परिणाम शरीराच्या त्या अवयवावर होऊ नयेत, याची दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठीच कोणताही उपाय काळजीपूर्वक केलेलाच कधीही चांगला असतो.

  • आरोग्यदायी आले

    आरोग्यदायी आले

    आले हे भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेले मसाल्याचे द्रव्य आहे. त्याचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यदृष्ट्याही फार लाभदायक आहे. आलेमध्ये जिंजेरॉल नावाचे द्रव्य आढळते, जे सूज, वेदना आणि अपचनावर अत्यंत प्रभावी असते.

    गळ्याच्या खवखव, सर्दी-खोकला, थंडी यावर आलेचा काढा रामबाण उपाय मानला जातो. रोज सकाळी कोमट पाण्यात आलेाचा रस आणि लिंबू टाकून घेतल्यास पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. तसेच आले रक्ताभिसरण सुधारण्यात मदत करते आणि हृदयासाठी हितावह ठरते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात आलेचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येतो आणि शरीर तंदुरुस्त राहते.

    त्वचेसाठीही आले फायदेशीर आहे, कारण त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवतात. मात्र आले गरम प्रकृतीचे असल्यामुळे त्याचे प्रमाणित सेवन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आले हे एक बहुगुणी औषधीय द्रव्य असून शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

  • रेल्वे डबे निर्मिती उद्योग

    रेल्वे डबे निर्मिती उद्योग

    भारतीय रेल्वेचा आशिया खंडात पहिला आणि जगात दुसरा क्रमांक लागतो. देशातील बहुतांश लोकसंख्या रेल्वेद्वारे प्रवास करते. भारतातील रेल्वे इंग्रजांनी सन 1853 मध्ये त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी सुरू केली होती. आज ती अपवाद वगळता भारतातील बहुतेक भागात विस्तारित झाली आहे. रेल्वे हे भारतातील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे.

    पूर्वी इंग्लंडमधून रेल्वे इंजिन आयात केले जात होते. सन 1921 मध्ये रेल्वे इंजिन बनविण्यासाठी जमशेदपूरमध्ये ‘पेनिनसुलर लोकोमोटिव्ह कंपनी’ सरकारी प्रोत्साहनाने उघडण्यात आली. आर्थिक संरक्षणाच्या अभावी ती सन 1924 मध्ये बंद करावी लागली. सन 1945 मध्ये भारत सरकारने ही कंपनी जमशेदपूरमधील ‘टाटा लोकोमोटिव्ह आणि इंजिनियरिंग कंपनी’ यांच्याकडे सोपवली.‘कपूरथला’ येथे असलेल्या रेल्वे डबा कारखान्याची स्थापना सन 1986 मध्ये झाली होती. भारतीय रेल्वेचा हा दुसरा रेल्वे डब्यांची निर्मिती करणारा कारखाना आहे.

    तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथे ‘इंटिग्रल डबा कारखाना’ आहे. हा स्वतंत्र भारतातील पहिला अत्यंत आधुनिक कारखाना आहे. येथे आधुनिक तंत्राने डबे तयार केले जातात. भारतातील ‘पेरांबूर’ येथे सन १९५२ मध्ये उभारण्यात आलेला हा पहिला कारखाना होता. या कारखान्याने केवळ रेल्वेचे आधुनिकीकरण केले नाही, तर भारतीय रेल्वेसाठी पहिल्या यशस्वी निर्यातीचा मार्गही मोकळा केला. या कारखान्याने 170 हून अधिक प्रकारचे डबे तयार केले आहेत. प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे डबे, ‘पॅन्ट्री’, ‘किचन कार’, ‘लगेज’ आणि ‘ब्रेक व्हॅन’, सेल्फ-प्रोपेल्ड कोच, इलेक्ट्रिक, डिझेल व मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट्स, मेट्रो यांचा समावेश आहे.

    कपूरथला येथील रेल्वे डबा कारखान्याची स्थापना सन 1986 मध्ये झाली. पंजाब राज्यातील ‘कपूरथला’ येथे जालंधर-फिरोजपूर मार्गावर हा कारखाना आहे. याने स्वयं-चलित प्रवासी वाहनांसह विविध प्रकारचे 30,000 प्रवासी डबे तयार केले आहेत. येथे दरवर्षी सुमारे 1500 डबे तयार केले जातात. या कारखान्याने ‘राजधानी’, ‘शताब्दी’, ‘डबल डेकर’ आणि इतर गाड्यांसारख्या अतिवेगवान गाड्यांसाठी सुमारे 23 विविध प्रकारचे डबे तयार केले आहेत.

    आधुनिक डबा कारखाना हा उत्तर प्रदेशातील रायबरेलीजवळील ‘लालगंज’ येथे आहे. हा दक्षिण आशियातील सर्वोत्तम कारखाना आहे. रेल्वे डबे तयार करणारा हा भारतातील तिसरा कारखाना आहे. तो ७ नोव्हेंबर २०१२ रोजी बांधला होता. येथे आधुनिक यंत्रसामग्री आणि सॉफ्टवेअरद्वारे बहुतेक काम केले जाते. या कारखान्यात ‘तोशिबा’ निर्मित अत्यंत आधुनिक संगणक कार्यक्रम आणि सॉफ्टवेअर वापरतात. या कार्यशाळेचा वापर केवळ ‘एलएचबी’ डब्यांच्या निर्मितीसाठी केला जात आहे.

    ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड’ ही भारत सरकारच्या मालकीची भारतातील नवी दिल्ली येथील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि उत्पादन कंपनी आहे. सन 1964 मध्ये ही स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीने भारतीय रेल्वेला हजारो इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह, डीई लोकोमोटिव्ह, इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स, ट्रॅक मेंटेनन्स मशीनचा पुरवठा केला आहे.

    ‘चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स’ हा भारतातील चित्तरंजन – आसनसोल येथे स्थित एक सरकारी मालकीचा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह उत्पादन कारखाना आहे. हा जगातील सर्वात मोठ्या लोकोमोटिव्ह उत्पादकांपैकी एक आहे.

    ‘गोल्डन रॉक’ रेल्वे कार्यशाळा तामिळनाडू राज्यातील ‘तिरुचिरापल्ली’ येथील ‘पोनमलाई’ येथे भरते. भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाला सेवा देणाऱ्या तीन यांत्रिक रेल्वे कार्यशाळांपैकी ही एक आहे. ही दुरुस्ती कार्यशाळा मुळात एक ‘यांत्रिक कार्यशाळा’ आहे जी भारतीय रेल्वेच्या यांत्रिक विभागाच्या नियंत्रणाखाली येते.

    भारतीय रेल्वेसाठी चाके आणि एक्सल तयार करण्यासाठी सन 1984 मध्ये याची सुरुवात झाली होती. रेल्वेच्या चाकांचा कारखाना कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे आहे. हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे ज्यामध्ये रेल्वेची चाके, रेल्वे वॅगन तयार होतात.

  • बांधकाम व्यवसाय

    बांधकाम व्यवसाय

    देशाच्या प्रगतीत बांधकाम विभाग महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या व्यवसायातून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाऊन अर्थव्यवस्थेस चालना दिली जाते. यामध्ये रस्तेनिर्मिती, टोलेजंग इमारतींचे बांधकाम तसेच लहानमोठी घरे, धरणे, पूल बांधकाम यांचा समावेश होतो. बांधकाम व्यवसाय हा एक फायदेशीर असणारा व्यवसाय असला तरीही या व्यवसायाचे उत्तम ज्ञान, अनुभव आणि वित्त नसल्यामुळे पहिल्याच पाच वर्षात जवळपास 60 टक्के बांधकाम व्यवसाय बंद पडत असतात.

    बांधकाम व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास, नियोजन, ज्ञान आवश्यक असते. बांधकामाची इमारती, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक इमारत बांधकाम ही तीन क्षेत्रे आहेत. पायाभूत सुविधांना ‘जड अभियांत्रिक’ देखील म्हटले जाते. धरणे, पूल, महामार्ग, लोहमार्ग, पाणी किंवा सांडपाणी व्यवस्था, किनाऱ्यापासून दूरची बांधकामे, खाणकाम आणि उत्खनन, शुद्धीकरण कारखाने, रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने, वीजनिर्मिती करणारे प्रकल्प यांचा समावेश बांधकाम उद्योग क्षेत्र यामध्ये होत असतो.

    ‘निवासी बांधकाम’ पद्धतीमध्ये वैयक्तिक जमीनमालक स्वतःच बांधणी करू शकतात. घर, किरकोळ व्यापारी जागा, विश्रांती गृह, कार्यालय, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी निवासी व अनिवासी बांधकाम असू शकते.
    इमारतीच्या प्रकारानुसार स्थानिक रहिवासी, शैक्षणिक आणि धार्मिक संस्था, वाहतूक उपक्रम, किरकोळ विक्रेते तसेच वित्तीय संस्था आणि इतर खासगी कंपन्यांकडून निवासी रहिवासी इमारत खरेदी केली जाते.हे अनिवासी बांधकाम या प्रकारात येते. इमारत बांधकाम ही जमिनीवरील रचना उभारण्याची प्रक्रिया आहे. ‘वास्तविक मालमत्ता’ म्हणून देखील ती ओळखले जाते. प्रस्तावित बांधकाम प्रकल्पासाठी नियमांशी बांधील राहून स्थानिक धोरणांचे देखील पालन करावे लागते.

    दरम्यान, जो प्रकल्प आपण हाती घेतला आहे, त्याचे आर्थिक नियोजन प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच केले पाहिजे. संभाव्य अडचणींची यादी देखील आपण तयारी करून ठेवली पाहिजे. आर्थिक समस्येमुळे बांधकाम प्रकल्प ग्रासले जाऊ शकतात; परिणामी व्यवसाय बंद पडू शकतो. त्यामुळे बांधकाम व्यवसायात उतरण्यापूर्वी या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान घ्या. प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्या. ग्राहकास समोर ठेवून त्याला आवडेल अशी नवनिर्मिती करा. आकर्षक कल्पनाशक्तीचा अवलंब करून व्यवसाय उच्च पातळीवर न्या.

  • तीळ शेती

    तीळ शेती

    पदार्थांना रुचकर बनविणाऱ्या तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. तीळ आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहेत. सौंदर्यप्रसाधनातही हे तेल मोलाची भूमिका बजावते. तीळ लागवडीत राजस्थान अग्रेसर आहेच; परंतु महाराष्ट्रातही तिळाचे उत्पादन विशेषत्वाने घेतले जाते. खरीप हंगाम तीळ लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे मानले जाते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तिळाची लागवड पडिक जमिनीतही केली जाऊ शकते.

    तिळामध्ये ‘मोनो-सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ असते. हे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करीत असल्यामुळे येथे तिळाची मागणी वाढत आहे. तीळ पीक दुहेरी पीक म्हणूनही फायदेशीर आहे. हे 85 ते 90 दिवसात येणारे पीक आहे. सहसा पडिक जमिनीचा वापर होत असल्याने शेतकरी अशा जमिनीत तिळाची लागवड करतात. हलकी रेताड, चिकणमाती असलेली जमीन तीळ उत्पादनासाठी योग्य असल्याचे अनुभवी शेतकरी सांगतात.

    दुहेरी पीक याचा अर्थ तूर, मका, ज्वारीसह आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करता येते. तिळाच्या लागवडीतून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. तिळाची पेरणी करण्यापूर्वी 2 ते 3 वेळा जमीन चांगली नांगरून घ्यावी लागते; जेणेकरून उत्तम उत्पादन मिळवता येऊ शकेल. शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात तिळाची पेरणी करणे फायदेशीर ठरते. रेताड आणि चिकण माती असलेल्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास तिथेही पीक चांगले येते. या पिकाला इतर पिकांच्या तुलनेने पाणी कमी लागते.

    लागवड केल्यानंतर तिळाची पाऊण भागापेक्षा अधिक पाने आणि देठ पिवळे होतात, तेव्हा ते काढणीसाठी योग्य समजले जातात. पेरणीपासून सुमारे 80 ते 95 दिवसांनी तीळ पूर्ण विकसित होऊन काढणीला तयार होतात. तिळाचे हेक्टरी 6 ते 7 क्विंटल उत्पादन मिळते.

  • नाशिकचे कपालेश्वर महादेव मंदिर

    नाशिकचे कपालेश्वर महादेव मंदिर

    नाशिक शहरातील प्रसिद्ध ‘पंचवटी’ परिसरात गोदावरीच्या काठी ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. येथे भगवान शिव वास करीत होते, असे पुराणात म्हटले आहे. भगवान शंकरासमोर नंदी नसणारे हे देशातील पहिले मंदिर आहे.

    या मंदिराला खूप महत्त्व आहे. या मंदिराचे निर्माण बारा ज्योतिर्लिंगानंतर असल्याचे मानले जाते. या टेकडीवर पूर्वी भगवान शंकराची पिंडी होती, मात्र आता तेथे मोठे मंदिर आहे. पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या पायऱ्या उतरताच समोर ‘गोदावरी’ नदी वाहताना दिसते. त्यातच प्रसिद्ध ‘राम कुंड’ आहे.

    या कुंडात भगवान श्रीरामांनी आपले वडील राजा दशरथ यांचे श्राद्ध केले होते. याशिवाय या संकुलात अनेक मंदिरे आहेत. कपालेश्वर मंदिरासमोर गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. वर्षातून एकदा येथे ‘हरिहर महोत्सव’ होतो.

    त्यावेळी ‘कपालेश्वर’ आणि ‘सुंदर नारायण’ या दोघांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात. तिथे त्यांची एकमेकांशी भेट घडवून अभिषेक केला जातो. याशिवाय महाशिवरात्रीला कपालेश्वर मंदिरात मोठा उत्सव असतो. श्रावण महिन्याच्या सोमवारी येथे मोठी गर्दी असते. पर्यटकसुद्धा येथे आवर्जून येतात.

  • कुणकेश्वर सागरकिनारा

    कुणकेश्वर सागरकिनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणकेश्वर सागरकिनारा हे एक सुंदर ठिकाण आहे. येथील प्राचीन शिवमंदिरामुळे या किनाऱ्यास धार्मिक अधिष्ठान लाभले आहे.

    हा भाग स्वच्छ आणि वालुकामय किनारे तसेच डोंगराळ परिसरासाठी ओळखला जातो. स्वच्छ पांढरी वाळू व नयनरम्य दृश्यांसह लांब-स्वच्छ समुद्रकिनारा डोळ्यांना न्याहाळता येतो. आपल्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालविण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

    कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असून हे गाव ‘हापूस आंब्या’साठीसुद्धा प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावर दरवर्षी देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे १०० शिवलिंगे कोरलेली आहेत. ओहोटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात. हा फार सुंदर, स्वच्छ , कमी वर्दळ असणारा समुद्रकिनारा आहे.

    सूर्यस्नान, पोहणे तसेच जलक्रीडा यांचाही आनंद येथे घेता येतो. एका बाजूला विशाल अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला सह्याद्री डोंगर असे नयनरम्य दृश्य येथे असते. खाण्यासाठी येथील चविष्ट स्थानिक पदार्थ तयारच असतात. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद याठिकाणी घेता येतो.

  • माहिमचा किल्ला

    माहिमचा किल्ला

    मुंबईत माहिमच्या खाडीजवळ माहिमचा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. सभोवतालच्या झोपडपट्ट्या व सततच्या अतिक्रमणामु़ळे हा किल्ला सध्या सुस्थितीत नाही.

    पोर्तुगीज अधिकारी दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश करून माहीमचा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप चकमकी झाल्या. पोर्तुगीजानी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला हा किल्ला दिला. शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षणासाठी हा किल्ला ताब्यात असणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

    माहिमचा किल्ला पाहण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘माहिम’ रेल्वे स्थानकावर उतरून टॅक्सी किंवा बसने माहीम समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता येते. स्वतःची गाडी असेल तर थेट जाता येते. माहीम समुद्रकिनाऱ्याच्या मुखाशी भक्कम तटबंदी असलेला हा किल्ला आजही उभा आहे. प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्यासाठी माहीम-कोळीवाड्यातील छोट्या गल्ल्यांमधून वाट काढत जावे लागते.

    मुंबईतील प्रसिद्ध ‘मिठी’ नदीच्या तीरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावरून माहीम खाडी, अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसतो. मागच्या बाजूला मकदूमबाबाचा दर्गा आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूचे दर्शन होते. अलीकडे लोकवस्तीतून किल्ल्याचे अस्तित्व शोधून काढणे नवीन लोकांसाठी खूप जिकिरीचे काम आहे.

    माहीतगार व्यक्ती सोबत असल्यास दोन एकरवर पसरलेल्या या किल्ल्यावरील तटबंदीवर तोफा ठेवण्यासाठी असणाऱ्या खाचा, दिवे लावण्याची सोय, युरोपियन पद्धतीचे स्तंभ, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी असणारी व्यवस्था, सैनिकांची निवासस्थाने, छोटेखानी धान्यकोठार, पाण्याची विहीर इत्यादींचे अवशेष शोधून पाहता येऊ शकतात. येथे कोळी-आगरी लोकांची वस्ती आहे. आजही हे ऐतिहासिक ठिकाण दुर्लक्षित आहे. अतिक्रमणामुळे किल्ल्याची रया पार गेली आहे.

    मुंबईच्या खुल्या समुद्रावर असलेला हा पहिला किल्ला होय. एके काळी लष्करीदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणावर असणारा हा किल्ला मुंबईतील समुद्रीमार्गाचा संरक्षक शिलेदार समजला जाई. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या वास्तूला आवर्जून भेट द्यायला हवी.

  • भामरागड अभयारण्य

    भामरागड अभयारण्य

    समृद्ध निसर्गसंपदा, हेमलकसाचा ‘लोकबिरादरी प्रकल्प’, बाबा आमटेंचा ‘आनंदवन’ आश्रम अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनी भामरागड अभयारण्याला भेट द्यायला हवी. येथील स्थानिक ‘गोंड’ आणि ‘माडिया’ जमातीच्या आदिवासींची संस्कृती मन भारावून सोडते.

    चंद्रपूर जिल्ह्यात हे अभयारण्य आहे. याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.किमी. इतके आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्ग आहे. या अभयारण्यातून ‘पार्लोकोटा’ आणि ‘पामलगौतम’ नद्या वाहतात. अभयारण्यातील वन्यजीव आणि राहणाऱ्या ‘गोंड’-‘माडिया’ आदिवासी बांधवांसाठी हा पाण्याच्या प्रमुख स्रोत आहे.

    रानडुक्कर, बिबट्या, ससे, भुंकणारे हरीण, मुंगूस, अस्वल, खार, उडणारी खार, नीलगाय, जंगली कोंबडी, मोर अशा असंख्य पक्षी आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे हे ठिकाण आहे. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी इथे पहायला मिळतात.

    ‘माडिया’ आणि ‘गोंडी’ या स्थानिक भाषा येथे बोलल्या जातात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या या आदिवासींचे जंगलावरचे अवलंबित्व कमी व्हावे, त्यांना सुरक्षित आयुष्य जगता यावे यादृष्टीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना येथे सुरू केली आहे.

    अभयारण्यात जाताना कोरडे अन्नपदार्थ सोबत नेणे गरजेचे आहे. येथे आसपास पाहण्यासारखे अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये वरोऱ्याचा आनंदवन आश्रम, चंद्रपूरच्या प्राचीन लेण्या, चंद्रपूरचा किल्ला, माणिकगड किल्ला, बल्लारपूर किल्ला, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प अशी बरीच स्थळे आहेत.

    भामरागड अभयारण्य जवळपास सर्व राष्ट्रीय महामार्गानी जोडले गेले असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भेट देणे सहज शक्य होते. ‘अहेरी’ हे येथील सर्वात जवळचे बसस्थानक आहे.
    आरोग्य आणि शिक्षण आदिवासींना मिळावे याकरिता लोकबिरादरी प्रकल्प येथे कार्यान्वित करण्यात आला. आज ही समाजसेवेची धुरा त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून मंदाकिनी आमटे यांनी यशस्वीरित्या पुढे नेत आहेत.

  • मोती निर्मिती उद्योग

    मोती निर्मिती उद्योग

    शिंपल्यामध्ये तयार होणारे मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे. स्त्रियांच्या आभूषणातील महत्वाचा आकर्षक घटक आहे. दुर्मिळ असल्याने म्हणा, किंवा सहज उपलब्ध होत नसल्याने त्याचे बाजारमूल्य जास्त आहे. त्यामुळे पाण्यात शिंपले पाळून मोत्यांचे उत्पादन घेण्यासाठी मोती निर्मिती उद्योग सुरु करणे फायदेशीर आहे. मोती हे रत्न दागिने बनविण्यासाठी वापरले जाते. हा मोती शिंपल्यात तयार होतो.

    हा उद्योग करणाऱ्या उद्योजकास आठ ते दहा महिने शिंपले पाळावे लागतात. हा शिंपला म्हणजे गोगलगायीचे एक घर आहे. जेव्हा गोगलगाय अन्न खाण्यासाठी घरातून बाहेर पडते, तेव्हा काही सूक्ष्म परजीवी तिला चिकटून शिंपल्याच्या आत प्रवेश करतात. त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी गोगलगाय स्वतःवर एक संरक्षक कवच बनवते. याचेच रुपांतर मोत्यात होते. मुळात, मोत्यांची निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा ही प्रक्रिया आपण कृत्रिमरित्या करतो, तेव्हा त्याला ‘मोती निर्मिती उद्योग’ असे म्हणतात. एका मोत्याची किंमत दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत असते. मोती उच्च दर्जाचा असेल तर त्याची किंमत लाखांपर्यंत असू शकते.

    मोती निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी खोली ५ ते ६ फूट खोली असणारा २० x १० आकारमानाचा तलाव आवश्यक असतो. प्रगत तंत्रज्ञानाद्वारे घरच्या घरी टाकी बनवून मोत्याची शेती करता येऊ शकते.

    मोती निर्मिती उद्योगासाठी प्रौढ शिंपल्याची गरज असते. हे शिंपले नदी, तलाव, कालवे इत्यादी ठिकाणांहून गोळा केले जाऊ शकतात; अन्यथा आपणास खरेदी करता येतात. या शिंपल्याचा आकार सुमारे 8-10 सेमी. असावा लागतो. उद्योगासाठी जिवंत, प्रौढ शिंपल्याची अत्यंत काळजीपूर्वक निवड करायला हवी.

    प्रत्यक्ष प्रक्रिया करताना मोत्याच्या आकारानुसार बी निवडावे लागते. या बिया एका विशिष्ट पद्धतीने शिंपल्यामध्ये घातल्या जाते. 10 दिवस नायलॉन पिशवीत ठेऊन नंतर तपासणी केली जाते. या काळात नैसर्गिक खाद्य देणे फार महत्वाचे असते. मृत पावलेले शिंपले फेकून द्यावे लागतात. शेणखत, केळीची साल हे या शिंपल्यांचे अन्न असते.

    उद्योग सुरु करीत असताना निश्चितपणे भांडवलाची आवश्यकता असते. यासाठी तलाव निर्मिती, ‘सर्जिकल हाऊस’ उभारणे जरुरीचे असते. या ‘सर्जिकल हाऊस’ मध्ये काही टेबल आणि खुर्च्यांचीही गरज असते. याशिवाय तलावात वेळोवेळी खत घालावे लागते. तलावातील मृत शिंपले वारंवार बाहेर पडत राहतात. या सगळ्यासाठी भांडवलाची आवश्यकता आस्ते. कुशल कामगार गरजेचे असतात. त्यांना मजुरी द्यावी लागते. हा उद्योग केवळ आर्थिकच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठीही अनुकूल आणि गरजेचा आहे. यामुळे जलप्रदूषण होत नाही, उलट ते रोखले जाते. शिंपले पाणी स्वच्छ करण्याचे काम करतात.

    निधी जमविणे हे या उद्योगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. सरकार लघुउद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देते. ‘नाबार्ड’ सारख्या ग्रामीण बँकेतूनही कर्ज मिळू शकते. त्यांना आपल्या उद्योगाचे महत्व पटवून द्या.

    आपणास हा उद्योग करायचा असल्यास देशात अशी प्रशिक्षण केंद्रे आहेत, तिथे जाऊन मोतीपालन उद्योग शिकून घ्या. जे आधीच मोत्यांचा रोजगार करीत आहेत त्यांनाही भेट देऊन शिकता येईल. स्वत:ची जमीन नसेल, तर जमीन किंवा तलाव भाडेतत्त्वावर घेऊ शकता. त्याचा खर्च वाढेल, पण आंतरिक इच्छा प्रबळ असेल तर आपण त्यात नक्कीच यशस्वी होऊ शकता.

    कोणत्याही व्यवसायाच्या साफल्यासाठी प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून पुरेशी माहिती मिळवा. मानसिक तयारी करा. या उद्योगाबाबत सुमारे 15 दिवस प्रशिक्षण दिले जाते, ते शिकल्यानंतर हे काम सुरू करता येते. त्यासाठी शिकण्याची, मेहनतीची तयारी ठेवा.

  • कॅटरिंग व्यवसाय

    कॅटरिंग व्यवसाय

    खाद्यपदार्थ बनविण्याची आवड असणाऱ्यांसाठी कॅटरिंग व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय आहे. हा सुरु करायचा असल्यास आपल्याला कोणते खाद्यपदार्थ बनविणे आवडते, याचा आधी विचार करा. इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच यामध्येदेखील वास्तविक रुची आणि आवड असणे आवश्यक आहे.

    आपण कोणत्या प्रकारचे पदार्थ बनविणार आहात, हे ठरवा. भोजन थाळी बनवीत असाल तर या थाळीत कोणते पदार्थ असतील हे ठरवा. हा व्यवसाय एकदा करू लागलात की बाहेरच्या मागण्यासुद्धा आपोआपच येतात. आपण पुरस्कार सोहळे, शालेय कार्यक्रम, बैठका अशा ठिकाणी कामे घेऊ शकता. याकरिता आपली भोजन थाळी मात्र स्वादिष्टतेने भरलेली परिपूर्ण असायला हवी.

    जर आपल्याला ‘बेकिंग’ करणे आवडत असेल, जमत असेल तर ‘कुकीज’ आणि ‘केक्स’ बनवू शकता. मग आपण केवळ बेकिंग कॅटरिंगचा विचार करा. जर आपणास थंड पेये बनविण्यामध्ये स्वारस्य असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारची उत्तम पेये बनवून त्याची विक्री करू शकता. विविध फळांचा वापर करून स्वतःचे उत्तम पेय ग्राहकांना देऊ शकता. याकरिता आधी आपणास काय करायचे आहे, हे निश्चित करावे. आर्थिकदृष्ट्या त्याची सांगड घालता आली पाहिजे. सुरुवातीला यासाठी जागा निश्चित करावी लागेल. स्वतःची जागा नसल्यास एखादी जागा भाड्याने घ्यावी लागेल.

    आपल्या या व्यवसायात भिन्न अभिरुचीनुसार विविध वस्तू आणण्याचा प्रयत्न करा. आपण ज्या पाककलेत निपुण आहात त्याच कलेकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिल्यास त्याचा या व्यवसायात लाभ होऊ शकतो. शाकाहारी आणि मांसाहारी असे पुन्हा दोन प्रकार आहेत. यापैकी आपण काय करणार आहात हे ठरवायला हवे. या व्यवसायात केवळ एकाच पदार्थावर कुटुंबाचा उत्तम चरितार्थ चालवून यशस्वी झालेली माणसे या समाजात आहेत. यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेले असते. अखंड तप केलेले असते.

    एकदा आपण आपल्याला नेमके काय आणि कसे करायचे आहे, हे ठरविल्यावर ते पदार्थ स्वतः बनवून पहा. आपल्या कुटूंबातील मंडळींना, मित्रमैत्रिणीना चव चाखण्यास द्या. त्यांच्याकडून प्रामाणिक अभिप्राय मागा. त्यानुसार पदार्थामध्ये बदल घडवीत चला. सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो स्वतःचा अभिप्राय ! त्यामुळे ऐकावे जनाचे करावे मनाचे हेसुद्धा लक्षात असू द्या.

    आपण बनविलेले पदार्थ देताना ते सुंदर दिसण्यासाठी त्याची सजावट करा . सरावाने परिपूर्णता येते. आपण आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे तंत्र, वेळ आणि आवड असली पाहिजे. व्यवसायाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याकडे आवश्यक परवानग्या आणि परवाने असल्याची खात्री करून घ्या. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) कडून अन्न आणि सुरक्षा परवाना मिळवा. तथापि, ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांच्यासाठीच तो अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या.

    आपल्या पदार्थांच्या किंमती निश्चित करा. आपली कागदपत्रे नीट ठेवा. आपला जमा-खर्च, पावत्या आणि उत्पन्नाचा मागोवा ठेवण्यासाठी स्वतःची एक पुस्तिका ठेवा. जम बसू लागला की अन्न वाहतुकीसाठी गाडी खरेदी करा. कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करा. हे सेवा क्षेत्र आहे. आपण दिलेल्या चांगल्या सेवेमुळेच आपल्याकडे ग्राहक आकर्षित होणार, हे लक्षात ठेवा. सकारात्मक रहा. आपल्या सेवेच्या जाहिरातीसाठी समाजमाध्यमे व गुगलचा चांगला उपयोग करून घ्या.

  • सूर्यफूल

    सूर्यफूल

    सूर्याचे अनुसरण करून त्याच्या थेट किरणांच्या दिशेने वळत असल्याने या फुलास ‘सूर्यफूल’ म्हणतात. हे देशातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. हलका रंग, सौम्य चव आणि हृदयाच्या रुग्णांसाठी चांगले असणारे उच्च पातळीचे लिनोलिक ॲसिड यामुळे सूर्यफूल तेल सर्वात लोकप्रिय आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये सुमारे ४८ ते ५३ टक्के खाद्यतेल असते. सूर्यफूलाचे उत्पादन मुख्यत्वेकरून तेलनिर्मितीसाठी घेतले जाते. साबण व सौंदर्यप्रसाधने करणे तसेच स्वयंपाकासाठी या तेलाचा उपयोग केला जातो. तेल काढल्यानंतर मिळणाऱ्या पेंडीत प्रथिने भरपूर असतात. त्याचा उपयोग गुरे आणि कोंबड्यांचे खाद्य म्हणून केला जातो.

    या पिकाला उगवण आणि रोपांच्या वाढीदरम्यान थंड हवामान, रोपांच्या अवस्थेपासून फुलोऱ्यापर्यंत उबदार आणि ढगाळ नसलेले हवामान आणि फुलोऱ्यापासून परिपक्वतेपर्यंत सूर्यप्रकाशाचे दिवस आवश्यक असतात. खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या हलक्या तसेच भारी जमिनीत हे पीक चांगले येते. जमीन तयार करण्यासाठी तीन ते चारवेळा चांगली नांगरणी करावी लागते. पेरणीपूर्वी माती किमान 10 सेमी खोल ओलसर असावी लागते. मातीच्या ओलाव्यासाठी पेरणीपूर्वी चांगला पाऊस किंवा सिंचन आवश्यक आहे. दर हेक्टरी 8-10 किलो चांगले भरलेले बियाणे आवश्यक असते.

    हे बियाणे 12 ते 24 तास आधी भिजवून ठेवल्यावर त्याची उगवणक्षमता वाढते. सेंद्रिय आणि अजैविक अशा दोन्ही खतांमुळे पीक उत्तम जोमाने येते. सूर्यफूल पीक 90 ते100 दिवसात परिपक्व होते. कापणी झाल्यावर वरच्या बाजूला बिया राहतील अशा प्रकारे सूर्यफूल वाळवले जाते. त्यानंतर बियाणे स्वच्छ केली जातात. ही बियाणे चांगले वाळवून गोणीत साठवली जातात. चांगला पाऊस, उत्तम मशागत असल्यास हे पीक उत्तम उत्पादन देते.

  • बटण निर्मिती उद्योग

    बटण निर्मिती उद्योग

    ‘बटण’ ही घराघरात वापरली जाणारी सार्वत्रिक वस्तू आहे. शर्ट, पँट, लहान मुलांचे कपडे, महिलांचे रेडिमेड कपडे, ब्लाऊज यासाठी प्लॅस्टिकची बटणे आवश्यक असतात. कपड्यांसाठी बटणे तयार करून ती बटणे रेडिमेड कपड्यांच्या उत्पादकांना देण्याचा उद्योग सुरू केल्यास चांगला फायदा होतो. प्लॅस्टिकची बटणे बनविण्यासाठी इलेक्ट्रिक स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. हा उद्योग अल्प प्रमाणात सुरू करायचा असेल, तर बाजारात उपलब्ध असलेली नायलॉन किंवा ॲक्रेलिक बटणे स्वयंचलित यंत्राद्वारे तयार केली जाऊ शकतात.

    ‘हँडमोल्डिंग’, ‘इंजेक्शन मोल्डिंग’, ‘कॉम्प्रेशन मोल्डिंग’ द्वारे प्लॅस्टिकची बटणे तयार केली जातात. ॲक्रेलिक बटणे बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्या देशात उपलब्ध नसल्याने तो विदेशातून आयात केला जातो. पॉलिस्टर – नायलॉन बटणे तयार करण्यासाठीची यंत्रसामग्री भारतात उपलब्ध आहे.

    नायलॉन, ॲक्रेलिक शीट्स घेऊन बटणाच्या आकाराचे तुकडे केले जातात. ‘डिझायनिंग’ यंत्रांच्या मदतीने त्यांना इच्छित आकार दिला जातो. बटणांना छिद्रे पाडून चमक आणण्यासाठी बटणे एका मोठ्या ड्रममध्ये ठेवून पॉलिश केली जातात. ‘कॉम्प्रेशन’ पद्धतीने प्लास्टिकची बटणे तयार करण्यासाठी, कच्चा माल ‘मोल्डिंग बॅरल’ मध्ये ओतला जाऊन ‘हीटर’द्वारे गरम केला जातो.

    ‘मल्टी कॅविटी मोल्ड्स’ तयार करायच्या बटणांच्या आकारानुसार आणि डिझाइननुसार बसवले जातात. स्वयंचलित यंत्र सुरू करून कच्चा माल ‘मोल्डिंग’च्या साच्यात जातो. बसवलेल्या मोजमापानुसार, डिझाइननुसार बटणे तयार केली जातात.

    ‘हँडमोल्डिंग यंत्राद्वारे बटणे तयार करण्यासाठी ज्या रंगाची बटणे बनवायची आहेत, त्या रंगाच्या गोळ्या घ्याव्यात. त्या साच्यात टाकाव्यात. ‘डाय’ला उष्णता दिल्यानंतर जितकी बटणे तयार करायची आहेत, त्या संख्येनुसार ‘हॉट डाय’ मध्ये प्लॅस्टिकचे गोळे टाकावेत. तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या डिझाइनमध्ये बटणे तयार केली जातील.

    कमीत कमी रकमेत आणि कमी जागेत घरबसल्या सुरू करता येईल असा हा उद्योग आहे. प्लॅस्टिकची बटणे किंवा कच्चा माल खराब होत नसल्यामुळे बटण निर्मिती उद्योगांचे नुकसान होण्याची शक्यता नाही.

    फॅशनच्या आधुनिक युगात फॅन्सी वस्तूंना जास्त मागणी असल्याने रंगीबेरंगी, विविध आकर्षक डिझाईनची बटणे बनविण्याच्या व्यवसायामुळे संपूर्ण कुटुंबाला रोजगार मिळतो.प्लॅस्टिक बटणांचे सर्वात मोठे ग्राहक हे वस्त्रोद्योग आहेत. जेथे रेडिमेड कपडे बनवले जातात, अशा कंपन्यांकडे जा. त्यांना अनुरूप अशी रंगीबेरंगी आकर्षक डिझाइनची बटणे तयार करून वस्त्र उत्पादकांना द्या.

    त्यांच्या कंपनीत जाऊन त्यांना आकर्षक नमुने दाखवा. त्यांच्याकडून मागणी घेऊन त्यांना हव्या त्या डिझाईनची बटणे तयार करून द्या. यासोबतच बटणांचे घाऊक विक्रेते, किरकोळ व्यापारी, शिंपी, लहान – मोठी दुकाने यांना बटणे देऊ शकता. उत्तम रोजगार निर्माण करू शकता.

  • धूतपापेश्वर मंदिर

    धूतपापेश्वर मंदिर

    रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये धूतपापेश्वर मंदिर आहे. धोपेश्वर गावात असणारे हे प्रसिद्ध शिवमंदिर राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.
    हे मंदिर ‘मृडानी’ नदीच्या काठावर आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून हे मंदिर प्राचीन आहे. प्रशस्त सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखानाआणि आवारात दीपमाळा आहेत.

    मंदिराचा लाकडी सभामंडप आणि त्यावरील नक्षीकाम लक्षवेधी आहे. मंदिराच्या सभामंडपात तसेच छतावर, खाबांवर प्राण्यांची,वनस्पतींची, फुलांची नयनरम्य चित्रे काढली आहेत. शंकराला वहिल्या जाणाऱ्या ‘कैलासचाफा’ या फुलाचे झाड येथे चित्ररुपात पहायला मिळते. विशेष म्हणजे, चित्रांसाठी वापरलेले रंग पूर्णपणे नैसर्गिक म्हणजे पाने, फुले झाडाची साल यांपासून तयार केलेले आहेत. दररोज रात्री येथे शेवटची महापूजा होते.

    शंकर-पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा खेळ मांडून गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. बहूते वेळा दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात, तेव्हा या सोंगट्या विखुरलेल्या दिसतात. भगवान शंकर-पार्वती सारीपाट खेळून जात असल्याची येथील भाविकांची श्रद्धा आहे.

    मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा ‘मृडानी’ नदीचा प्रवाह आहे. येथे पावसाळ्यात सुंदर अशा धबधब्याचे दर्शन होते. धबधब्याचे पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे, त्याला ‘कोटितीर्थ’ असे म्हणतात. पावसाळ्यात येथे भाविक आणि पर्यटकांची फार गर्दी असते. गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे.

    थोरल्या माधवराव पेशव्यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यांनी मंदिरासाठी शाळिग्राम भेट दिला होता. पेशवेकाळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकूट अर्पण केला होता. तो आजही पुजेत वापरतात. येथे जायचे झाल्यास मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे, तर राजापूर हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.

  • सिंधुदुर्गातील निवती किनारा

    सिंधुदुर्गातील निवती किनारा

    सिंधुदुर्गातील निवती हा एक अप्रतिम समुद्रकिनारा आहे. कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी तसेच माडा-पोफळीच्या सहवासात असलेल्या ‘निवती’ या गावाकडील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो.

    येथे डॉल्फिन माशांना बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची रेलचेल असते. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाची छान छायाचित्रे मिळतात. येथे गेल्यावर निवती व भोगवे या दोन समुद्र किनाऱ्यांच्या मध्ये असलेल्या एका डोंगरावर बांधलेला ‘किल्ले निवती’ पाहून मन हरखून जाते. आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ चे मानांकन मिळालेला हा शुभ्र वाळूचा किनारा पहायला सर्वात योग्य जागा म्हणजे ‘किल्ले निवती’चा उत्तरेकडे असलेला बुरुज होय. तेथून हा किनारा फार मनोहर दिसतो.

    निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अतिजवळून ‘डॉल्फिन’ माशाच्या झुंडी पाहता येतात. यांत्रिकी होड्यांमधून समुद्रसफर करत डॉल्फिनचे नृत्य पाहण्याचा आनंदही अनुभवता येतो. उंच उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन पाहणे पर्यटकांसाठी आनंदी ठरते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा असणारे बीच रिसॉर्टही येथे आहे. अथांग पसरलेला सागर, निळेशार पाणी, किनाऱ्यावरील स्वच्छता आणि अर्थातच येथे येताच छत्रपती शिवरायांची होणारे स्मरण यामुळे या किनाऱ्याकडे पर्यटक वळतात.

  • पद्मदुर्ग किल्ला

    पद्मदुर्ग किल्ला

    महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘पद्मदुर्ग’ ऊर्फ ‘कासा’ हा एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला ‘मुरूड’ गावाजवळील समुद्रात आहे. ‘मुरुड’ हे रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘जंजिरा’ आणि ‘सामराजगड’ किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.
    ‘राजपुरी’ खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येला साधारण ३ किमी. अंतरावरील एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला.

    निजामशाहीच्या काळात सिद्दी लोकांनी ‘कुलाबा’आणि ‘रत्नागिरी’ या जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यावर आपली सत्ता स्थापन केली. तेथे काही जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले बांधले. ‘दांडा राजपुरी’ हा त्यांपैकीच एक किल्ला होता. हा किल्ला घेण्याचा शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केला; पण तो घेणे त्यांना शक्य झाले नाही.

    ‘दांडा राजपुरी’ कडील सिद्दींची सत्ता वाढू नये, म्हणून शिवाजी महाराजांनी ‘दांडा राजपुरी’ समोर सिद्दीला जरब बसविण्याच्या उद्देशाने नवीन भुईकोट किल्ला बांधला, आणि त्यास ‘पद्मदुर्ग’ हे नाव ठेवले. या किल्ल्याच्या आश्रयाने ‘दांडा राजपुरी’ काबीज करण्याच्या हेतूने पेशवे मोरोपंत पिंगळे सन १६६९ मध्ये ‘दांडा राजपुरी’वर चालून गेले असता, त्या प्रदेशातील शिवाजी महाराजांच्या सुभेदाराने मोरोपंतास आवश्यक सामग्री पुरविली नाही. त्यामुळे ही मोहीम फसली. सुभेदाराने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुढे शिवाजी महाराजांनी एका पत्रातून त्याची खरमरीत शब्दात कानउघाडणी केली.

    या किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला असून त्यासमोर पडकोट आहे. पडकोट नामशेष होत आला आहे. मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तम आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्यासारखा आहे. या किल्ल्याच्या बांधकामात तटबंदीच्या 2 दगडांमध्ये चुना वापरलेला आह. सागरी लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. 2 दगडांमधील चुना अजूनही आहे.

    पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष दिसतात.
    पद्मदुर्गावर महाद्वारातून जाण्यासाठी 4 – 5 पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतील बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे होते. हे कार्यालय येथून हलल्यावर देखभाल नसल्याने हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्यासाठी 4 टाक्या केलेल्या दिसतात.

  • गुगामल राष्ट्रीय उद्यान

    गुगामल राष्ट्रीय उद्यान

    गुगामल राष्ट्रीय उद्यान’ हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात स्थित असलेल्या भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. सन 1973-74 मध्ये हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्पा’चा एक भाग म्हणून ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. हे उद्यान सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे. याला ‘गाविलगड हिल्स’ असेही म्हणतात. हे उद्यान महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय वन्यजीव अभयारण्यांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात.

    ‘गुगामल राष्ट्रीय उद्याना’ची स्थापना प्रथम सन 1974 मध्ये ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्प’ म्हणून व्याघ्र संचालनालयाने केली होती. या प्रकल्पाचे उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी या प्रदेशातील समृद्ध परिसंस्थेचे संवर्धन करण्यासाठी म्हणून करण्यात आले. आजूबाजूच्या परिसरातील वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतू लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला 5 सप्टेंबर 1975 रोजी ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हापासून ते वाघांसह अनेक धोक्यात असलेल्या वन्यजीवांच्या प्रजातींचे संरक्षक म्हणून काम करीत आहे.

    ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ हे दक्षिण कोरड्या पानझडी वन श्रेणीत येते. ‘ऐन’, ‘टेक्टोना ग्रॅंडिस’, ‘लेंडिया’, ‘तिवस’, ‘आओला’, ‘धवडा’ आणि ‘कुसुम’ ही मुख्य झाडे येथे आढळतात. याव्यतिरिक्त आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. येथे एकूण 90 विविध प्रकारची झाडे, 300 हून अधिक प्रकारची वनौषधी तसेच 750 हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ किंवा

    ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्प’ हे वन्यजीवांच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
    येथे आढळणाऱ्या प्रमुख वन्यप्राण्यांमध्ये ‘बंगाली वाघ’, ‘आळशी अस्वल’, ‘उसुरी ढोल’, ‘भारतीय कोल्हा’, ‘पट्टेदार हायना’, ‘भारतीय पँथर’, ‘चौसिंगा’, ‘सांबर’), ‘गौर’, ‘बार्किंग डीअर’, ‘रॅटलस्नेक’, ‘मकाक’, ‘उडणारी खार’, ‘चितळ’, ‘नीलगाय’, ‘अजगर’, ‘रानडुक्कर’ आणि ‘लंगूर’ असे विविध प्राणी आढळतात. येथे 25 हून अधिक प्रकारचे मासे आहेत. मोठ्या संख्येने फुलपाखरे आहेत. मार्च 1990 मध्ये ‘ढाकना’ जवळील ‘गडगा’ नदीतील ‘सिद्धूकुंडा’त आणि फेब्रुवारी 1991 मध्ये ‘डोलार’ नदीतील ‘हत्तीकुंड’ मध्ये अनेक मगरी सोडल्या गेल्या. ‘गुगामल राष्ट्रीय उद्याना’त 260 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती देखील आढळतात. येथे छायाचित्रकारांना काही दुर्मिळ प्रजातींचे पक्षी टिपण्याची उत्तम संधी मिळते.

    ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ येथे गेल्यावर ‘कोरकू’ आदिवासींबद्दल जाणून घेता येईल. त्यांची संस्कृती, त्यांच्या प्रथा आणि परंपरा पाहता येतील.
    जर तुम्ही लहान मुलांसोबत जात असाल, तर मुलांना एकटे सोडू नये. पर्यटकांसाठी खुले नसलेल्या भागात राहू नये. ‘गुगामल राष्ट्रीय उद्याना’त धूम्रपान करू नये; कारण तेथे आग लागण्याचा धोका असतो. उद्यानाच्या कोणत्याही प्रतिबंधित भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये. सफारी दरम्यान, आपल्या मार्गदर्शकाच्या परवानगीशिवाय जीपमधून बाहेर पडू नये. येथे जाताना कॅमेरे, दुर्बीण आणि इतर आवश्यक गोष्टी सोबत ठेवाव्यात. उद्यानातील कोणत्याही प्राण्याला खायला घालण्याचा किंवा त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.

  • केरळची कोळंबी कढी

    केरळची कोळंबी कढी

    केरळ हे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य राज्य आहे. येथील खाद्यसंस्कृती अर्थातच मासे या घटकाभोवती फिरते. केरळमधील असाच एक लोकप्रिय पदार्थ !

    साहित्य : 200 ग्रॅम कोळंबी, अर्धा लहान चमचा हळद पावडर, दीड लहान चमचा मिरची पावडर, 2 मोठे चमचे स्वयंपाकाचे तेल, मूठभर कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या, एक चमचा मोहरी, अर्धा कप चिरलेला कांदा, अर्धा कप चिरलेला टोमॅटो, एक चमचा आले-लसूण वाटण, अर्धा लहान चमचा धणे पावडर.

    कृती : कोळंबी स्वच्छ करून वाहत्या पाण्याखाली धुवा. कोळंबीला मीठ आणि हळद घालून बाजूला ठेवा. एक पॅन गरम करून घ्या. त्यात 2 चमचे तेल घाला. नंतर मोहरी, कढीपत्ता,धणे पावडर आणि लाल मिरच्या घाला. आता यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. 3-4 मिनिटे परतून घ्या. त्याच टोमॅटो-कांद्याच्या मिश्रणात एक चमचा आले-लसूण वाटण आणि 1 चमचा लाल तिखट घाला. एकत्र करण्यासाठी चांगले मिसळून घ्या. मसाल्याचा कच्चा वास निघून गेला की, एक कप पाणी घालून एक उकळी आणा. ही केरळची प्रसिद्ध कढी भात किंवा पराठ्यांसोबत खाण्यास द्या.

  • ओठांची काळजी घ्यावी

    ओठांची काळजी घ्यावी

    ओठांचे फुटणे सामान्य आहे. अशा वेळी व्हॅसलीन किंवा लिप बाम वापरले जातात. काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास निश्चित चांगला परिणाम जाणवतो. हिवाळ्यात कोरडे वारे वाहत असतात. त्यामुळे त्वचा कोरडी होते, ओठांनाही भेगा पडतात. ओठांची त्वचा अतिशय नाजूक असते.

    त्यामुळे या बदलत्या ऋतूमध्ये ओठांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा फाटलेले ओठ चेहऱ्याच्या सौंदर्यावर डाग पाडण्याचे काम करतात. शिवाय ते वेदनाही देतात. लिप बाम आणि व्हॅसलीन लावल्याने विशेष असा फायदा होत नाही. त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे ॲलर्जी किंवा चिडचिड होऊ शकते. कोरडेपणा आणखी वाढू शकतो.

    हिवाळ्यात ओठ फुटण्याचा त्रास होत असेल तर रोज झोपण्यापूर्वी बदामाचे तेल ओठांवर लावा. ५ मिनिटे ओठांना हलके मसाज करा. यामुळे संपूर्ण हिवाळ्यात आपले ओठ गुलाबी आणि मुलायम राहतील. फाटलेले ओठ बरे करण्यासाठी खोबरेल तेल हा एक चांगला उपाय आहे. जे लोक ओठ आणि त्वचेवर खोबरेल तेल लावतात, त्यांना कोरड्या ओठांची समस्या जाणवत नाही. दिवसातून २-३ वेळा ओठांवर खोबरेल तेल लावावे.

    यामुळे ओठांच्या दुखण्यापासून आराम मिळेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना क्रीम लावून मसाज करावे. याने ओठ 2-3 दिवसात मऊ आणि कोमल होतील. ओठ फुटण्याची समस्या असणाऱ्यांनी मध वापरावे. यामुळे ओठ मऊ होतील. भेगा कमी होतील. हिवाळ्यात खूप थंड किंवा गरम पाण्याने चेहरा वारंवार धुवू नये. जास्त रंग, वास किंवा अल्कोहोल असलेली उत्पादने वापरणे टाळावे. ओठांभोवतीची त्वचा स्वच्छ करावी. ओठांना व्यवस्थित मसाज करावा. रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम वापरावा.

  • डोळ्यांचे आरोग्य

    डोळ्यांचे आरोग्य

    बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना चष्मा लावावा लागत आहे. पूर्वी ही समस्या फक्त वयोवृद्धांमध्ये होती. आता लहान वयात चष्मा लावण्याची पाळी येते. कॉम्प्युटर स्क्रीनवर काम करणाऱ्या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. जेव्हा तुमचे डोळे कमकुवत होतात तेव्हा तुमच्या डोळ्यातील बाहुल्यांना त्यांचा आकार बदलण्यास त्रास होतो. अशा स्थितीत चष्मा लावणे काहीसे उपयोगी ठरते. या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

    आवळा डोळ्यांसाठी वरदान आहे. आवळा भरपूर पोषक आणि ‘सी’ जीवनसत्वयुक्त असून आरोग्यास फायदेशीर आहे. आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन केले जाऊ शकते. आपण कच्चा आवळा, आवळा मुरंबा, आवळा रस, आवळा कँडी यांचे सेवन करू शकता. याशिवाय आवळ्याच्या पाण्यानेही डोळे धुवू शकता.

    अक्रोड तेल शरीरासाठीच नाही तर डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. या तेलाने डोळ्यांना मसाज करावे. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होईल. पोषकतत्वांनी युक्त अक्रोड तेलामध्ये काही गुणधर्म आहेत, जे डोळे चांगले ठेवण्यास मदत करते.

    प्राचीन काळापासून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. तांब्यामध्ये काही घटक असतात, जे दृष्टी सुधारण्यास मदत करतात. हे पाणी पिऊन चष्मा काढण्यास मदत होऊ शकते. यासाठी रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे. सकाळी उठल्यावर भांड्यातील सर्व पाणी प्यावे. पायाच्या तळव्याचे मसाज करावे.

    प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी व्यायाम हा एक प्रभावी मार्ग मानला जातो. वेळोवेळी डोळे मिचकावत रहावे. 2-3 तास सतत काम केल्यानंतर काही वेळ डोळे बंद करावेत. पायाचे बोट डोळ्यांच्या मध्यभागी ठेवून त्यावर लक्ष केंद्रित करावे. असे केल्याने दृष्टीची शक्ती वाढते. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्याला मोहरीच्या तेलाने मसाज करावे. यामुळे डोळ्यांवरील ताण दूर होईल. हिरव्या गवतावर चालण्याचासुद्धा डोळ्यांना फायदा होतो. हिरव्या गवतावर सकाळी अनवाणी चालावे. तुमची दृष्टी झपाट्याने सुधारेल. डोळ्यांव्यतिरिक्त मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर ठरू शकते.

  • सुतारकाम

    सुतारकाम

    सुतारकाम हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. आजही बरेच लोक परंपरागत व्यवसाय म्हणून सुतारकाम करतात. प्राचीन काळी लाकडाचा उपयोग घर बांधण्यासाठी व इंधन म्हणून केला जात होता. त्यानंतर जलप्रवासासाठी लागणाऱ्या नौका, शेतीची अवजारे, वाहने, क्रीडासाहित्य, विविध कारखान्यांसाठी कच्चा माल, प्लायवुड, कागद वगैरे गोष्टीसाठी त्याचा उपयोग करू लागला.

    सुतारकाम म्हणजे लाकडाचा वापर करून मानवोपयोगी वेगवेगळ्या वस्तु तयार करण्याची कला होय. उत्तम कारागीर असलेला सुतार अतिशय सुंदर, आकर्षक आणि कलाकुसरीच्या लाकडी वस्तु बनवितो. सुतार लाकडाचा वापर करून नवनवीन कलाकृती बनवतात. या वस्तु बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड वापरले जाते.

    सुतारकामात केवळ घरकामासाठीच आवश्यक वस्तु बनवतात असे नाही, तर नाविन्य, कल्पना वापरून इतरही आकर्षक कलाकृती बनविल्या जातात. शेतीसाठी लागणारी अवजारे लाकडापासून बनविली जातात. सुतार या व्यवसायातून जवळपास 10,000 ते 20,000 रुपये देखील कमवू शकतो. उत्तम कला असेल तर तो व्यक्ती स्वतःचा मोठा उद्योग देखील चालू करू शकतो.

    सुतारकाम ही एक कला आहे. ती जर अंगी असेल तर सरकारच्या संबंधित विभागामध्ये सरकारी नोकरीदेखील मिळू शकते. फर्निचरच्या कारखान्यात देखील व्यक्ती काम करू शकते. एवढेच नाही, तर हा व्यवसाय केवळ पुरुषच करू शकतात असे नाही. महिला देखील सुतारकाम करू शकतात. आजच्या या वैशिष्ट्यपूर्ण जगात सुतार कारागिरांची कमतरता जाणवत आहे.

    सुतारकाम व्यवसायात मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे आणि कंपनीच्या कामासाठी साधने तयार करणे याचा समावेश होतो. रेल्वेगाड्या, आगबोटी आणि विमान यामध्ये लागणारी लाकडी साधने, बैलगाड्या, हातगाड्या तसेच घोडागाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने, लाकडी भागावरील नक्षीकाम-कलाकुसर, कपाटे, बेंच, टेबल, खुर्ची अशा प्रकारचे साधे आणि मानवोपयोगी तसेच शोभिवंत आणि ऊंची फर्निचर तयार करणे, पिंजरे,दरवाजे, खिडक्या, कमानी, अशा प्रकारचे साहित्य बनविणे, शेतकामासाठी लागणारे औत, नांगर, अशी लाकडी अवजारे बनविणे, जुन्या पद्धतीच्या कौलारू घराला लागणारे खांब, चौकटी, कैच्या आणि तुळ्या असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे, आदी क्मांचा सुतारकामात समावेश होतो.

    सुतारकाम व्यवसायासाठी करवत, डबरी करवत, रंधा, पटाशी, अंबर, हॅमर, राऊंड फाइल, आदी साधनांची आवश्यकता असते. सुतारकाम हा व्यवसाय आता विरळ झाला आहे. लाकडी आकर्षक वस्तूंची गरज मात्र समाजाला आहे. सुतारकाम करणारा कारागीर मिळणे आता दुर्लभ झाले आहे. ज्याठिकाणी हा व्यवसाय व्यवस्थित सुरु आहे ते कारागीर प्रामाणिकपणे मन लावून काम करीत असल्याने या व्यवसायावर आपले जीवन चालत असल्याचे सांगतात.