मयूर अभयारण्य

महाराष्ट्रातील बीडमध्ये असलेले नायगावचे मयूर अभयारण्य म्हणजे पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पहाटे पाच-साडेपाचला अभयारण्याजवळच्या नायगाव रस्त्यावरून गेल्यास दुतर्फा मोर-लांडोरांच्या लक्षवेधी जोड्या डोळ्यांना सुखद आनंद देतात. येथे मोरांची संख्या खुप मोठी आहे. त्यामुळेच या अभयारण्याला ‘मयूर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले आहे. येथे १०० हून अधिक प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळतात.

या अभयारण्यात पाणवठ्यावर आलेले, झाडाच्या फांद्यांवर भला मोठा पिसारा लोंबकळत सोडून आरामात बसलेले मोर दिसतात. डोंगराच्या पायथ्याशी असलेले मोरांचे थवे चित्त आकर्षून घेतात. पिसारा फुलवून थुई-थुई नाचणारे मोरही नकळत चित्त आकर्षून घेतात.

बीड शहराच्या पश्चिमेस २० किमी अंतरावर डोंगराळ भागात वसलेले हे अभयारण्य आहे. पावसाळ्यात हिरवेगर्द झालेले डोंगर मनास तजेला देऊन जातात. या भागात मुळातच मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या मोरांची संख्या लक्षात घेऊन शासनाने २९.९० चौ.कि.मी चा हा प्रदेश ८ डिसेंबर १९९४ रोजी ‘नायगाव मयूर अभयारण्य’ या नावाने संरक्षित केला. या परिसरात मदरशा दर्गा, डोंगरीचे गुरुकुल, डोंगकरकिन्हीचे नागेश्वर मंदिर ही पाहण्यासारखी स्थळे आहेत.

हे मयूर अभयारण्य दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीच्या आणि काटेरी वनाच्या प्रकारात मोडते. प्रादेशिक वन विभागाने या क्षेत्रात अंदाजे १२०० हेक्टर क्षेत्रावर विविध झाडांची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, लिंब, ग्लेरिसिडीया, शिरस, बोर, यासारख्या झाडांचा समावेश आहे. नैसर्गिकरित्या दिसणाऱ्या झाडांपैकी बेल, मोहा, आवळा, साग, बहावा, बिबा, पळस, खैर, तेंदू, सालई, मोवई, ऐन, मेडशिंग, बेहडा, चंदन यासारखी झाडे येथे मोठ्या प्रमाणावर आहेत.

येथे पवना, कुसळी, शेडा यासारख्या गवताच्या प्रमुख जाती असून करवंद, घाणेरीची झडुपे आणि सिताफळाची जाळी दिसून येते. या अभयारण्यात मोराबरोबर कोल्हा, रानमांजर, काळवीट, तरस, लांडगा, ससे यासारख्या वन्यप्राण्यांचे अस्तित्त्व जाणवते.
उन्हाळ्यात मोरांची तहान भागवण्याचे आणि त्यांची भूक भागवण्याचे काम गावकरी मोठ्या उत्साहाने करतात. नायगाव अभयारण्याचे मुख्यालय बीड येथे आहे. या रस्त्यावर एस.टी. बस सेवा तसेच खासगी वाहनांची नेहमीच वर्दळ असते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
641 वेळा पाहिलं