सह्याद्री मराठी वाहिनी

Author: श्रध्दा

  • बाई तुझ्यापायी – गोष्ट तिच्या संघर्षाची

    बाई तुझ्यापायी – गोष्ट तिच्या संघर्षाची

    सध्या झी5 वर प्रदर्शित झालेली ‘बाई तुझ्या पायी’ ही वेब मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘बाई तुझ्या पायी’ या मराठी वेबमालिकेचा प्रीमियर दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला होता. समाजातील स्त्रियांच्या संघर्षाची, त्यांच्या आयुष्याच्या वळणावर येणाऱ्या निर्णयांची आणि आत्मसन्मान जपण्याच्या लढ्याची ही कथा आहे.

    या मालिकेत साजिरी जोशी आणि क्षिति जोग यांच्या प्रभावी अभिनयाने पात्रांना जिवंतपणा मिळाला आहे. त्यांच्या अभिनयात साधेपणा असूनही भावनांचा गहिरा आविष्कार दिसून येतो. संवाद साधे आहेत, पण थेट मनात उतरतात. दिग्दर्शन वास्तवाला भिडणारं असून यामध्ये कोणतीही दिखाऊ मांडणी नाही फक्त आयुष्याचं खरं रूप आहे.

    ‘बाई तुझ्या पायी’ ही कथा केवळ एका स्त्रीची नाही, तर प्रत्येक त्या स्त्रीची आहे, जी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी झगडते. गावाकडच्या पार्श्वभूमीवर विणलेली ही कहाणी प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याची आठवण करून देते.

    प्रेक्षकांची प्रतिक्रिया देखील अत्यंत सकारात्मक आहे. अनेकांनी सोशल माध्यमांवर लिहिले आहे की, “ही मालिका पाहताना डोळ्यांत पाणी आलं, पण मनात बाई असण्याचा अभिमानही वाटला.” एकूणच ‘बाई तुझ्या पायी’ ही मालिका म्हणजे भावनांचा ओघ, जिद्दीचा प्रवास आणि स्त्री शक्तीला दिलेला सन्मान आहे.

  • कुरुक्षेत्र – आधुनिक काळातील महाभारताचा आरसा

    कुरुक्षेत्र – आधुनिक काळातील महाभारताचा आरसा

    सध्या समाजमाध्यमांवर आणि प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली वेबमालिका म्हणजे ‘कुरुक्षेत्र’. या मालिकेचा पहिला भाग दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता ज्यात नऊ भाग होते तर ह्याच मालिकेचा आणखी दुसरा भाग दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा नवीन नऊ भागांसह प्रदर्शित करण्यात आला असून ह्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कथा पाहताना प्रत्येक भाग नवीन विचार देतो आणि त्यामुळे पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता अधिक वाढते.

    ‘कुरुक्षेत्र’ ही फक्त युद्धाची गोष्ट नाही तर माणसाच्या आयुष्यात चालणाऱ्या संघर्षाची गोष्ट आहे. कुणी आपल्या सत्यासाठी झगडतं तर कुणी सत्तेसाठी तर कुणी आपल्याच भावनांशी झुंज देतो. प्रत्येक पात्राचं आयुष्य वेगळं दिसतं आणि तरीही त्यात आपल्यासारखं काहीतरी ओळखीचं जाणवतं.या मालिकेचं कथानक खूप नीट विणलेलं आहे. कलाकारांचा अभिनय, संवाद आणि दृश्यं यामुळे कथा अधिक जिवंत वाटते. प्रेक्षक मालिकेत एवढे गुंततात की ती संपल्यावरही तिचे प्रसंग डोळ्यासमोर फिरत राहतात.

    लोकांनी या मालिकेला समाजमाध्यमांवर जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी तिला “आजच्या काळाचं महाभारत” असं म्हटलं आहे. काहींनी ती “खऱ्या आयुष्याचं चित्र” असल्याचं सांगितलं आहे. मालिकेच्या शेवटाला पुढे एक विचार असाही येतो की “आपल्या आयुष्यातील खरं कुरुक्षेत्र कोणतं?” आणि हाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतो.

    एकंदरीत पाहता ‘कुरुक्षेत्र’ ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते, विचार करायला लावते आणि मनाला भिडते. कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन आणि कथा या तिन्ही गोष्टी उत्तम जमल्या आहेत. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही या मालिकेला ५ पैकी ४.५ गुण मिळाले असून गुगलवर ८२ टक्के लोकांना ही वेबमालिका पसंत पडली असल्याची माहिती समोर आली आहे.

  • पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची मोठी विक्रमी कमाई

    पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची मोठी विक्रमी कमाई

    महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून थिएटर्समध्ये ‘हाऊसफुल’चे फलक झळकू लागले आहेत.अभिनेता सिद्धार्थ बोडके याने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि प्रेरणेचा मानबिंदू असलेले महाराज आजच्या काळात अवतरतात आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढा देतात.अशी या चित्रपटाची प्रभावी कथा आहे.

    ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ने पहिल्याच दिवशी एकोणीस लाख रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी हा आकडा चौतीस लाखांपर्यंत पोहोचला. अशा प्रकारे केवळ दोन दिवसांत चित्रपटाने त्रेपन्न लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कमाईत आणखी वाढ झाली आहे.चित्रपटात सिद्धार्थ बोडकेसोबत विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, सयाजी शिंदे, तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या भूमिका पाहायला मिळतात. कथा आणि पटकथा स्वतः महेश मांजरेकर यांनी लिहिली असून संवाद सिद्धार्थ साळवी यांचे आहेत.

    महेश मांजरेकर म्हणतात, “शेतकरी आत्महत्येचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या विषयावर बोलणं आणि तो समाजासमोर मांडणं ही काळाची गरज आहे. आजच्या काळातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून महाराज किती संतप्त होतील, हे प्रेक्षकांना या चित्रपटातून दिसेल. हा प्रत्येक मराठी माणसाचा चित्रपट आहे.” चित्रपटाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील जनतेला तो पाहण्याचं आवाहन केलं आहे. दमदार विषय, ऐतिहासिक संदर्भ आणि आधुनिक वास्तव यांचा संगम असलेल्या या चित्रपटाची ‘माऊथ पब्लिसिटी’मुळे ही कमाई मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.

    सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी सिद्धार्थ बोडके यांच्या अभिनयाचं आणि चित्रपटातील संवादांचं विशेष कौतुक केलं आहे. आयएमडीबीवर सध्या या चित्रपटाला दहा गुणांपैकी सात पूर्णांक आठ रेटिंग मिळालं असून गूगलवर अठ्याऐंशी टक्के प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

  • हक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    हक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    भारतीय चित्रपटसृष्टीत समाज, धर्म, स्त्री-पुरुष समानता आणि न्यायव्यवस्था या विषयांवर आधारित चित्रपटांची संख्या अत्यल्प आहे. अशाच काही ठळक आणि अर्थपूर्ण सिनेमांपैकी एक ठरणारा चित्रपट म्हणजे ‘हक’. येत्या दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा सिनेमा केवळ कथानकापुरता मर्यादित नाही तर एका स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या अधिकाराचा आणि समाजाने लादलेल्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या शक्तीचा जिवंत आवाज आहे. सुपर्ण वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली आणि जंगली पिक्चर्स, इन्सोम्निया फिल्म्स तसेच बावेजा स्टुडिओज यांच्या संयुक्त निर्मितीत हा चित्रपट साकारला असून मुख्य भूमिकांमध्ये यामी गौतम आणि इमरान हाश्मी यांच्या प्रभावी जोडीचा समावेश आहे.

    या चित्रपटाची कथा शाझिया बानो या सामान्य मुस्लिम स्त्रीभोवती फिरते. शाझिया आपल्या पती अहमद खान सोबत साधं, शांत आयुष्य जगत असते. मात्र तिचं आयुष्य एका क्षणात बदलून जातं जेव्हा अहमद तिला सोडून जाण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर शाझिया समाज, धर्म आणि कायदा या तिन्ही आघाड्यांवर न्यायासाठी उभी राहते. तिचा संघर्ष फक्त स्वतःच्या आयुष्यासाठी नसतो तर त्या सर्व स्त्रियांसाठी असतो ज्यांचा आवाज काळ आणि प्रथा यांनी दाबून ठेवला आहे.

    ‘हक’चा मूळ गाभा सुप्रसिद्ध शाह बानो प्रकरणावरून प्रेरित आहे. या ऐतिहासिक घटनेने भारतात स्त्रियांच्या अधिकारांविषयी धार्मिक कायद्यांच्या मर्यादांविषयी आणि न्यायव्यवस्थेतील समतेविषयी मोठी चर्चा रंगली होती. या चित्रपटात हाच संघर्ष नव्या काळाच्या पार्श्वभूमीवर साकारला आहे. पण ह्या चित्रपटात प्रश्न उभा राहतो न्याय म्हणजे नेमकं काय? धर्म आणि कायदा यांच्या सीमेवर स्त्रीचा खरा हक्क कुठे उभा आहे?

    यामी गौतम हिने शाझियाच्या भूमिकेतून एक धाडसी, आत्मसन्मान जपणारी आणि निर्धाराने जगणारी स्त्री साकारली आहे. तिच्या नजरेतून उमटणारी वेदना, राग आणि ठामपणा प्रेक्षकांच्या मनात घर करतो. इमरान हाश्मीने साकारलेला अहमद खान हा पात्र गुंतागुंतीचा असून समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेचं प्रतिबिंब दाखवतो. या दोघांमधील न्यायालयीन संवाद आणि भावनिक संघर्ष हे चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांनी या विषयाला संवेदनशील आणि वास्तवदर्शी पद्धतीने सादर केलं आहे. प्रत्येक दृश्यात सत्याचा शोध, प्रत्येक संवादात प्रश्न आणि प्रत्येक भावनेत एक संघर्ष जाणवतो. छायाचित्रण, पार्श्वसंगीत आणि अभिनय यांचा सुंदर संगम या चित्रपटाला अधिक प्रभावी बनवतो.

    ‘हक’ हा केवळ स्त्री-पुरुष समानतेबद्दलचा सिनेमा नाही, तर मानवी हक्कांचा आणि आत्मसन्मानाचा जिवंत दस्तऐवज आहे. नोव्हेंबर महिन्यात अनेक मनोरंजनप्रधान चित्रपट प्रदर्शित होणार असले तरी ‘हक’ हा सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि विचारांना चालना देणारा सिनेमा ठरेल. एकूणच ‘हक’ हा भावनिक, प्रबोधनात्मक आणि अर्थपूर्ण असा सिनेमा आहे जो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. “न्याय फक्त कायद्यात आहे की तो प्रत्येकाच्या अंतःकरणातही असायला हवा?” आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस कितपत उतरतो हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे.

  • नरसी मंदिर

    नरसी मंदिर

    संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील एक महान भक्त, कवी आणि कीर्तनकार होते. त्यांचा जन्म इ.स. १२७० शके ११९२ मध्ये हिंगोली जिल्ह्यातील नरसी- बामणी या गावी झाला. त्यांचे मूळ नाव दामाजी रेलेकर होते. संत नामदेवांचे जीवन भक्तिरसाने आणि विठोबाच्या भक्तीने भरलेले होते. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. महाराष्ट्रातील भक्त परंपरेत आपला अमोल ठसा उमठवला.

    नरसी हे संत नामदेवांचे जन्मस्थान असून येथे त्यांचे मंदिर स्थापन आहे. हे मंदिर कयाधू नदीच्या काठावर वसलेले असून ते हिंदू तसेच शीख धर्मीयांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. येथे नियमित पूजा, अभंगवाचन आणि भक्तिपर कार्यक्रम पार पाडले जातात. तसेच संत नामदेव यांच्या मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार सुरू आहे. य मंदिरात नव्याने उभारण्यात आलेली संत नामदेवाची पूर्णाकृती मुर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. मूर्ती दृष्टीस पडल्यानंतर प्रत्येक भाविकाला संधान मिळते. तसेच मंदिराचे  नक्षीकाम भाविकांना आकर्षित करीत आहे.  

    येथे दरवर्षी संत नामदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठा मेळा आयोजित केला जातो, ज्यामध्ये भक्तगण कीर्तन, अभंगवाचन, भजन आणि पूजा यांमध्ये भाग घेतात. या धार्मिक मेळ्यामुळे नरसी गावाला धार्मिक पर्यटनाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, येथे येणाऱ्या पर्यटकांना आध्यात्मिक अनुभवाबरोबरच परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंदही मिळतो.

    नरसी गाव हे आज धार्मिक पर्यटनाचे केंद्र मानले जाते. येथे संत नामदेवांच्या जीवनकार्याशी संबंधित विविध स्थळे आहेत आणि राज्य सरकारने गावाला ‘पवित्र स्थान’ म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी धार्मिक पर्यटनाची सुविधा वाढवण्यासाठी सतत उपाययोजना चालू आहेत. संत नामदेव संस्थान हे भक्तिरसिकतेचे प्रतीक असून दरवर्षी होणारे कार्यक्रम भक्तांच्या श्रद्धेला वाव देतात. संत नामदेवांच्या जीवनकार्यामुळे नरसी गावाला एक विशेष धार्मिक ओळख प्राप्त झाली आहे.

    संत नामदेवांनी पंढरपूरच्या विठोबा मंदिराच्या महाद्वाराजवळील पहिल्या पायरीवर समाधी घेतली, ज्याला आज ‘नामदेव पायरी’ म्हणून ओळखले जाते. या पायरीवर भक्त विठोबाच्या चरणधूळीचा लाभ घेण्यासाठी येतात. येथे नित्य पूजा, नैवेद्य अर्पण आणि कीर्तन आयोजित केले जाते. संत नामदेवांच्या कीर्तनामुळे पंढरपूर मंदिरात भक्तिरसाचा महापूर आला आणि त्यांच्या अभंगांमधून भक्तांना ‘नामवेद’ व ‘नामविद्या’ यांचे महत्त्व समजते.

    संत नामदेवांचे योगदान आजही महाराष्ट्रातील भक्तिरसिकतेत जिवंत आहे. नरसी व पंढरपूर येथील त्यांच्या समाधी स्थळांवर त्यांचा भक्तिरस अनुभवता येतो. संत नामदेव महाराज हे भक्तिरसिकतेचे प्रतीक असून त्यांच्या जीवनामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा समृद्ध झाला आहे.

  • नांदगाव समुद्रकिनारा

    नांदगाव समुद्रकिनारा

    रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा किल्ल्याजवळ वसलेले नांदगाव हे कोकणातील एक सुंदर व शांत गाव आहे. येथे असलेला नांदगाव समुद्रकिनारा हा लांबच लांब पसरलेला, पांढऱ्या वाळूमुळे आकर्षक दिसणारा आणि गर्दीपासून दूर असा किनारा आहे. अलिबागपासून सुमारे पन्नास किलोमीटर व मुंबईपासून अंदाजे एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर असल्याने मुंबई व पुण्यातील पर्यटक इथे सहज पोहोचू शकतात.

    हा किनारा गर्दीच्या गजबजाटापासून दूर असल्याने इथे शांत वातावरण अनुभवायला मिळते. नारळ, सुपारी व काजूच्या झाडांच्या रांगा किनाऱ्यावरची शोभा वाढवतात. सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, फोटोग्राफीसाठी आणि समुद्रसफरीसाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते.

    नांदगाव गावाला सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. आजही त्यांची परंपरा, संस्कृती आणि जीवनशैली नांदगाव गावात दिसून येते. त्यामुळे किनाऱ्याबरोबरच गावाचे ऐतिहासिक महत्त्वही पर्यटकांना आकर्षित करते.

    नांदगाव समुद्रकिनाऱ्याजवळच अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. मुरुड-जंजिरा किल्ला, रेवदंडा किल्ला, काशिद समुद्रकिनारा, श्रीवर्धन-हरिहरेश्वर ही ठिकाणे सहज गाठता येतात. त्यामुळे नांदगावला भेट देताना जवळपासची अनेक ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणेही पाहण्याची संधी मिळते. पावसाळ्यात व हिवाळ्यात किनाऱ्याचे सौंदर्य अधिक खुलते.

    येथे थांबण्यासाठी छोटे होम-स्टे, गेस्ट हाऊस तसेच मुरुड किंवा अलिबागमधील हॉटेल्स व रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. स्थानिक खानावळीत पारंपरिक कोकणी जेवण, विशेषतः मासेमारीतून मिळणारे ताजे मासे व नारळावर आधारित पदार्थ पर्यटकांच्या पसंतीस उतरतात.

    मुंबईहून येथे पोहोचण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा जेट्टीपर्यंत फेरीबोट सेवा उपलब्ध असून, तेथून रस्त्याने अलिबागमार्गे नांदगाव गाठता येते. पनवेलमार्गेही थेट रस्त्याने प्रवास करता येतो. रेल्वेने जाणाऱ्यांसाठी पेण हे जवळचे स्थानक आहे.

  • सेमिनरी हिल्स

    सेमिनरी हिल्स

    सेमिनरी हिल्स हे नागपूर शहराच्या पश्चिमेस सुमारे सहा किमी अंतरावर वसलेले एक निसर्गरम्य डोंगररांगा असलेले ठिकाण आहे. हे ठिकाण निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, फोटोग्राफर्स आणि भक्तांसाठी आदर्श ठिकाण मानले जाते. सेमिनरी हिल्सचे नाव ‘सेंट चार्ल्स सेमिनरी’ या धार्मिक शिक्षण संस्थेवरून पडले आहे, जी ब्रिटिश काळात येथे स्थापन केली गेली होती. या सेमिनरीच्या स्थापनेमुळे या परिसराला धार्मिक तसेच शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आजही या परिसरात सेंट फ्रान्सिस झेव्हियर कॉलेज आणि ऑर लेडी ऑफ द रोजरी चर्च ,हनुमान मंदिर यांसारखी प्रतिष्ठित शैक्षणिक आणि धार्मिक स्थळे आहेत.

    सेमिनरी हिल्सचे निसर्ग सौंदर्य अतुलनीय आहे. या डोंगररांगेवर चढाईसाठी चांगले मार्ग असून शिखरावरून नागपूर शहराचे विहंगम दृश्य पाहता येते. परिसरात जपानी बाग  आणि सत्तपूरा वनस्पती उद्यान सारखी आकर्षणे आहेत, ज्यामुळे येथे पर्यटकांना विविध अनुभव घेता येतात. पावसाळ्यात परिसरात भरपूर हिरवाई, घनदाट जंगल आणि लहान धबधबे परिसराचे सौंदर्य अधिक खुलवतात.

    सेमिनरी हिल्स परिसरात शैक्षणिक महत्त्व देखील आहे. सेंट फ्रान्सिस झेव्हियर कॉलेज येथे स्थित असून, या परिसरात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी तसेच अभ्यासकांसाठी येथे शांतता आणि नैसर्गिक सान्निध्य लाभदायक ठरते.

    निसर्ग आणि वन्यजीवांच्या दृष्टीने देखील सेमिनरी हिल्स महत्त्वाचे आहे. येथे विविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी आणि प्राणी आढळतात. अलीकडेच परिसरात अल्बिनो पाच पट्टी असलेली पाम स्क्विरल दिसली होती, जी या परिसरातील जैवविविधतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

    या जागेला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी सहा ते सायंकाळी सहा अशी आहे. येथे प्रवेश शुल्क नाही, त्यामुळे पर्यटकांना येथे सहजपणे भेट देता येते. सेमिनरी हिल्स नागपूर शहरापासून जवळ असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी किंवा खाजगी वाहनांचा वापर करून येथे पोहोचणे सोपे आहे.

    एकंदरीत, सेमिनरी हिल्स हे नागपूरकरांसाठी तसेच शहराबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी धार्मिक, शैक्षणिक आणि निसर्गसौंदर्याचा मिलाफ अनुभवण्याचे आदर्श ठिकाण आहे. येथे येऊन पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवू शकतात, भव्य दृश्यांचे फोटो काढू शकतात आणि धार्मिक स्थळांचा आध्यात्मिक अनुभव घेऊ शकतात.

  • रांगणा किल्ला

    रांगणा किल्ला

    रांगणा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात, महाराष्ट्र–गोवा सीमेवर वसलेला आहे. तो समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार दोनशे पन्नास फूट उंचीवर आहे. सह्याद्री पर्वतरांगांतील हा एक महत्त्वाचा व उंच गड मानला जातो. किल्ल्यावरून कोकण किनारपट्टी, गोवा भाग आणि आजूबाजूचा डोंगर परिसर नजरेत भरतो.

    ऐतिहासिक महत्त्व :

    या किल्ल्याचा उल्लेख चौदाव्या शतकापासून आढळतो. यादव, बहामनी, आदिलशाही, मराठेशाही व इंग्रज अशा विविध सत्तांनी या किल्ल्यावर आपला ताबा ठेवला. इ.स. १६५८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रांगणा किल्ला जिंकला. पुढे संताजी घोरपडे यांनी इ.स. १७०१ मध्ये किल्ला पुन्हा मराठ्यांच्या अखत्यारीत आणला. अखेरीस इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

    किल्ल्याची रचना :

    रांगणा किल्ल्याला दुहेरी तटबंदी, बुरुज आणि मजबूत दरवाजे आहेत. महाद्वार, गणेशद्वार, अंबाबाईचे मंदिर, पाण्याच्या टाक्या व इतर अवशेष आजही पाहायला मिळतात. किल्ल्यावर अनेक नैसर्गिक झरे आहेत.

    नैसर्गिक व धार्मिक वैशिष्ट्ये :

    किल्ल्याभोवती दाट जंगल असून विविध झाडे, औषधी वनस्पती व वन्यजीव आढळतात. पावसाळ्यात किल्ला धुक्याने वेढलेला दिसतो आणि निसर्गरम्य दृश्य मन मोहून टाकते. किल्ल्यावर श्री रांगणादेवीचे मंदिर असून त्यावरूनच या किल्ल्याला रांगणा नाव मिळाले आहे. याशिवाय अंबाबाई व गणेश मंदिरेही येथे आहेत.

    आजची स्थिती व पर्यटन :

    आज किल्ल्याचा काही भाग जीर्ण झाला असला तरी दरवाजे, मंदिरं आणि पाण्याच्या टाक्या चांगल्या स्थितीत आहेत. पायथ्यापासून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारण दोन तासांची चढाई करावी लागते. इतिहासप्रेमी व गिर्यारोहकांसाठी हा गड आजही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

  • हिरण्यकेशी मंदिर

    हिरण्यकेशी मंदिर

    हिरण्यकेशी मंदिर हे महाराष्ट्रातील शांत आणि निसर्गरम्य आंबोली गावात वसलेले एक पवित्र मंदिर आहे, जे शंकराला समर्पित आहे. हे मंदिर फक्त धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वासाठीच नाही तर त्याच्या नयनरम्य परिसरासाठीही प्रसिद्ध आहे. मंदिर हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळ स्थित आहे, जी पश्चिम घाटातील हिरवळीतून सुंदर प्रवाहाने वाहते. विशेषतः नवरात्र, महाशिवरात्र यांसारख्या सणांमध्ये मंदिर भाविकांनी भरलेले असते आणि परिसरात एक पवित्र धार्मिक  वातावरण तयार होते.

    मंदिराची वास्तुकला बाराव्या शतकातील हेमाडपंती शैलीत केलेली आहे, जी काळ्या दगडाच्या नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात गणपती ,देवी हिरण्यकेशी आणि शंकर यांच्या मूर्त्या प्रतिष्ठित आहेत. प्रवेशद्वाराजवळील दगडी शिल्पकला आणि भिंतीवरील कोरीव नक्षीकाम पाहणे अत्यंत मनोहारी आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने हे मंदिर त्या काळातील उत्कृष्ट दगडी बांधकामाचे नमुने दर्शवते. सभोवतालचा परिसर शांत आणि निसर्गरम्य असून, ध्यान आणि साधनेसाठी आदर्श वातावरण निर्माण करतो.

    हिरण्यकेशी नदीचा उगम या मंदिराच्या गुहेतून होतो. ही नदी पश्चिम घाटातील महत्त्वाची जलस्रोत आहे.सभोवतालच्या भागात पायवाटा आणि नैसर्गिक चढ-उतार असलेले रस्ते आहेत, जे भक्त आणि पर्यटकांना मंदिरापर्यंत पोहोचण्यास सोयीस्कर आहेत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी झाडांनी रांगाने छाया दिलेली असते, ज्यामुळे उन्हाळ्यातही येथे चालणे आरामदायी ठरते. परिसरात आंबोलीतील स्थानिक पक्षी, कीटक आणि प्राणीही सहज दिसतात, जे निसर्गप्रेमींसाठी अनुभवला जाणारा आनंद वाढवतात.

    मंदिराजवळील परिसरात काही खुल्या मैदाने देखील आहेत, जिथे भक्त बैठकीसाठी येतात किंवा ध्यान आणि प्रार्थनेसाठी वेळ घालवतात. या मैदानी भागातून संपूर्ण परिसराचे दृश्य, हिरण्यकेशी नदीचा शांत प्रवाह आणि आसपासच्या पर्वतरांगा एकत्र दिसतात. पावसाळ्यात परिसरात धबधबे भरलेले असतात, जे दृश्याला जिवंत आणि रोमांचक बनवतात.हिरण्यकेशी मंदिर आणि आंबोली परिसर एकत्रितपणे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठिकाण ठरतात. येथील शांत वातावरण, निसर्गरम्य सौंदर्य आणि प्राचीन स्थापत्यकला एकत्र येऊन पर्यटकांना आणि भक्तांना अविस्मरणीय अनुभव देतात. मंदिराजवळील रस्ते आणि सुविधा पर्यटकांना आरामदायी प्रवास सुनिश्चित करतात, तसेच भक्त आणि पर्यटक या ठिकाणी वेळ घालवताना आध्यात्मिक तसेच मानसिक समाधान अनुभवतात.

  • ‘ये रे ये रे पैसा ३’

    ‘ये रे ये रे पैसा ३’

    ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. त्यानंतर या चित्रपटाने ‘ये रे ये रे पैसा २’ सुद्धा

    आणला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा

    करण्यात आली आहे.      

    या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते. दि. १ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून

    हसायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमावर जोडण्यात आले आहे. ‘ये रे ये रे पैसा ३’

    या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची असून संवाद

    लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे.

  • चित्रपट आणि दूरदर्शन संस्था

    चित्रपट आणि दूरदर्शन संस्था

    ‘भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था’ (एफटीआयआय) ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेली आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने स्थापन केलेली एक चित्रपट संस्था आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात ती आहे. ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. संस्थेची स्थापना पुण्यातील ‘प्रभात स्टुडिओ’ संकुलात झाली. ही पुण्यातील पूर्वीच्या ‘प्रभात फिल्म’ कंपनीच्या आवारात आहे. संस्थेची स्थापना सन 1960 मध्ये झाली.

    संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगातील तंत्रज्ञ, अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा समावेश आहे. चित्रपट पुरस्कार देखील प्रायोजित करते. संस्थेची स्थापना सन 1960 मध्ये होऊन सन 1961 मध्ये विविध अभ्यासक्रम सुरू झाले. ‘टेलिव्हिजन ट्रेनिंग विंग’ पूर्वी नवी दिल्लीत कार्यरत होती. 1974 मध्ये पुण्यात स्थलांतरित झाले. त्यानंतर, संस्थेला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पूर्ण सहाय्य मिळाले. जुलै 2011 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी सांगितले की, या संस्थेला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून विकसित करण्यासाठी संसदेत विधेयक सादर केले जाईल. यामुळे संस्थेला विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि विशेषाधिकार मिळतील.

    ‘एफटीआयआय’ची टी नोंदणी सोसायटी कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. ‘गव्हर्निंग कौन्सिल’ची स्थापना सोसायटीच्या सदस्यांमधून निवडून केली जाते. ‘गव्हर्निंग कौन्सिल’ ही ‘एफटीआयआय’ची सर्वोच्च संस्था आहे. संस्थेचे सर्व प्रमुख धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ती जबाबदार आहे. एक संचालक संस्थेचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो. त्याची धोरणे आणि कार्यक्रम राबवतो.

  • ऑनलाइन टी-शर्ट

    ऑनलाइन टी-शर्ट

    ऑनलाइन टी-शर्ट व्यवसाय अलीकडे चांगला वाढताना दिसत आहे. विशिष्ट लक्ष्यित व स्वारस्य आणाऱ्या गटाला हा व्यवसाय सेवा देतो. सामान्यतः ज्यांना मजेदार घोषणा आवडतात, अशा लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्टस असतात. अनेक व्यवसायांशी संबंधित घोषणा असलेल्या टी-शर्टसना मागणी असते. याशिवाय वेगवेगळ्या उत्सवावेळी, सार्वजनिक उपक्रमांमध्ये अशी टी-शर्टस बनवून घेतली जातात आपणांस टीशर्ट विक्री व्यवसाय करायचा असल्यास एक व्यवसाय आराखडा तयार करा. हा आपले उद्देश आणि सानुकूल टी-शर्ट विकण्याच्या विविध संधी देईल. ऑनलाइन टी-शर्ट व्यवसाय कसा सुरू करण्यासाठी पुढची पायरी म्हणजे पुरवठादार शोधणे. सर्व टी-शर्ट सारखे नसतात, आणि त्यावरील सर्व छापाईही सारखी नसते. आपल्या ब्रँडसाठी आणि त्याच्या यशासाठी गुणवत्ता आवश्यक आहे. म्हणून स्वतःला शिक्षित करणे आणि कोरे शर्ट हुशारीने निवडणे महत्त्वाचे आहे.

    तुम्ही ऑनलाइन शर्ट व्यवसाय सुरू करता तेव्हा उच्च नफ्यासाठी गुणवत्तेचा त्याग करण्याचा मोह होऊ शकतो. परंतु तुमचा ब्रँड शेअर करण्याच्या आणि तुमच्याकडून पुन्हा खरेदी करण्याच्या ग्राहकाच्या निर्णयावर गुणवत्तेचा कसा परिणाम होईल याचा विचार करणे आवश्यक आहे. कोणता कोरा टी-शर्ट वापरायचा हे ठरवण्यासाठी उत्तम प्रारंभ बिंदू म्हणजे टी-शर्ट मुद्रणासाठी काही सर्वात लोकप्रिय कोऱ्या टी-शर्टचे पुनरावलोकन तपासणे. तुमच्या टी-शर्टच्या बिझनेस डिझाईन्सवर तुम्ही सुरुवातीला काम करावे. एकदा तुम्हाला काही टी-शर्ट डिझाईन्सची कल्पना आली की, तुम्हाला ते प्रत्यक्षात डिझाइन करावे लागतील. तुमच्याकडे ॲडॉब फोटोशॉप किंवा तत्सम प्रोग्राम असल्यास, तुम्ही स्वतःहून काही उत्तम डिझाइन तयार करू शकता. तथापि, आपल्याला कल्पना नसल्यास आपल्याला जाणकारांकडून मदत घ्यावी लागेल.

    योग्य ग्राफिक डिझायनर शोधण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारची साधने आणि मार्केटप्लेस वापरू शकता. ‘ड्रिबल’ हा अनेक अद्वितीय प्रतिभा असलेला एक डिझायनर समुदाय आहे. त्यात तुम्ही शोधत असलेली शैली शोधा. ते फ्री लान्स प्रकल्पांसाठी उपलब्ध आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला आवडणारे डिझाइनर संदेश पाठवा.

  • आनंदी स्वामी मंदिर

    आनंदी स्वामी मंदिर

    जुन्या जालन्यात आनंदी स्वामी मंदिर हे एक आकर्षक मंदिर आहे. येथे संत आनंदी स्वामींनी समाधी घेतली. हे मंदिर दर्शनासाठी सकाळी सहा पासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असते. आषाढी एकादशीला येथे मोठी जत्रा भरते. येथे जाण्यासाठी मात्र नियोजन करावे लागते.

    मराठा सरदार महादजी शिंदे यांनी हे मंदिर बांधले. या मंदिराला ऐतिहासिक वारसा असून हे मंदिर दोनसे पन्नास वर्षे जुने आहे. येथे जवळपास अनेक धार्मिक स्थळे असून मंदिरात गेल्यावर अन्य ठिकाणी भेट देऊ शकता. येथे जाण्यासाठी जालना रेल्वे स्थानक सर्वात जवळ आहे. तेथून स्वामींच्या मंदिरापर्यंत वाहतुकीची चांगली सोय आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा या मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो.

    याच ठिकाणी श्री संत आनंदी स्वामींनी समाधी घेतली. जालना रेल्वे स्थानकापासून आनंदी स्वामींच्या मंदिरापर्यंत वाहतुकीची चांगली सोय आहे. येथून औरंगाबाद हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. येथून जवळपास जाळीचा देव, मम्मादेवी मंदिर, काली मशीद इ. धार्मिक स्थळे आहेत.

  • सिंधुदुर्गातील गावपळण

    सिंधुदुर्गात गावपळण ही एक पारंपरिक प्रथा आहे. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात ही प्रथा सुरू आहे. सध्या या गावातील गावपळणीला सुरुवात झाली आहे. आता हे गाव पाच दिवस निर्मनुष्य असणार आहे. येथील ग्रामस्थ पाच दिवस वेशीबाहेर वसणार आहेत. हा गाव चारशे पन्नास वर्षांची परंपरा जपत आहे. सध्या शिराळेवासीय सोबत धान्य, पाळीव प्राणी घेऊन गावातून बाहेर पडले आहेत. आता ते गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी राहुट्या घालून त्यात विसावले आहेत. विशेष म्हणजे गावात शाळासुद्धा भरत नाही. ती सुद्धा गावाबाहेर भरवली जाते.

    ही गावपळण करण्यापूर्वी ग्रामस्थ देवाला कौल लावतात. त्यानंतर सर्व लोक गावाबाहेर बाहेर पडतात. गावपळणीच्या वेळी देवाला कौल लावूनच गावाबाहेर लोक पडतात. ही गावपळण तीन, पाच किंवा सात दिवसांची असते. शिराळे गावच्या प्रथेनुसार वर्षातून एकदा गाव सोडावा लागतो. पाच दिवस गावात कोणीही माणूस थांबत नाही. यावेळी जनावरे, पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरेढोरे, यांना सर्व वेशींबाहेर घेऊन जावे लागते. या गावपळणीसाठी चाकरमानी, माहेरवाशीणी येतात. गावपळणीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमानी, माहेरवाशीणी देखील उपस्थित असतात. अर्थात, या गावपळणीचा आनंद सगळेजण अगदी आनंदाने घेत असतात.

  • लिपस्टिक शेडची निवड

    लिपस्टिक शेडची निवड

    जेव्हा ओठांवरची लिपस्टिक चेहऱ्याला शोभत नाही तेव्हा चेहऱ्याचे सर्व सौंदर्य व्यर्थ ठरते. अशा परिस्थितीत, त्वचेनुसार लिपस्टिकचा रंग निवडणे खूप महत्त्वाचे ठरते. प्रत्येकाला ते माहीत असणे आवश्यक नाही. कपडे, दागिने किंवा सौंदर्य उत्पादने सर्व बदलत्या फॅशन आणि हवामानानुसार असले पाहिजेत. ओठांचा कोणता रंग आपल्याला शोभेल याबद्दल आपल्यापैकी बरेचजण गोंधळलेले असतात. त्यामुळे बदलत्या काळात फॅशनमध्ये जे काही बदल झाले आहेत त्यानुसार लिपस्टिकच्या शेड्स निवडा. सध्या ट्रेंडिंग असलेल्या लिपस्टिक शेड्स पहायच्या झाल्या तर त्यात पर्पल शेड लिपस्टिकचा समावेश होतो. कधी-कधी डार्क शेडची लिपस्टिक ओठांवर चांगली दिसत नाही.

    अशा परिस्थितीत फिकट रंगाची लिपस्टिक शेड वापरू शकता. यासाठी तुम्ही पर्पल, व्हायलेट, माउव्ह, लव्हेंडर आणि प्लम शेड्स ट्राय करू शकता. गौर वर्णाच्या मुली आणि महिला न्यूड शेड लिपस्टिक लावू शकतात. ही लिपस्टिक आपणांस अप्रतिम लुक देईल. ही लिपस्टिक पारंपरिक आणि पाश्चिमात्य पोशाख दोन्हींसाठी वापरू शकता.लाल शेडची लिपस्टिक बहुतेक मुली आणि स्त्रियांना खूप सुंदर दिसते. हा रंग देखील ट्रेंडी आहे. आपला लुक अप्रतिम ठेवण्यासाठी आपण ब्लड रेड आणि टोमॅटो रेड वापरून पाहू शकता. यासोबतच हे रंग कोणत्याही गडद रंगाच्या आउटफिटसोबत वापरू शकता.

    आपल्यापैकी फार कमी महिलांना तपकिरी रंगाची लिपस्टिक वापरायला आवडते. अशा परिस्थितीत कॉफी ब्राऊन लिपस्टिक शेड त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. विशेष लुकसाठी हा देखील एक चांगला पर्याय आहे, जो सध्या ट्रेंडमध्ये आहे. गुलाबी रंगाची, किरमिजी रंगाची लिपस्टिक सावली गडद त्वचा असलेल्या मुलींना शोभते. फिकट फ्युशिया गुलाबी लिपस्टिक शेड ही कोलेजन समृद्ध पाणी प्रतिरोधक आहे. ही सुद्धा खूप चांगली आहे.

  • मूग शेती

    मूग शेती

    मुगाच्या पिकासाठी जास्त पाऊस हानिकारक असतो. ज्या भागात साठ ते पंचाहत्तर सेमी पाऊस पडतो, तो कालावधी मूग लागवडीसाठी योग्य आहे. या पिकाला उष्ण हवामान लागते. मुगाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे केली जाते, मध्यम चिकणमाती, पाण्याचा योग्य निचरा होणारी चिकणमाती त्यासाठी उत्तम आहे.

    मुगाच्या शेतीसाठी सर्वप्रथम शेतजमीन तयार करावी लागते. शेताची पहिली नांगरणी नांगराच्या सहाय्याने करावी ज्यामुळे माती चांगली फिरते. यानंतर मशागतीने दोन-तीन नांगरणी करून जमीन चांगली बारीक करुन घ्यावी. शेवटच्या नांगरणीमध्ये लेव्हलर वापरणे महत्वाचे आहे, यामुळे शेतातील ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.

    ‘पुसा’ , ‘बैसाखी’, ‘मोहिनपंत’, ‘वर्षा’, ‘सुनयना’, ‘जवाहर’ या मुगाच्या काही जाती आहेत. खरीप हंगामात बारा ते पंधरा किलो प्रति हेक्टरी मूग बियाणे लागते. प्रति किलो तीनग्रॅम थायरम बुरशीनाशक बियाण्यांवर प्रक्रिया केल्याने बियाणे आणि मातीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. तसेच जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करण्यासाठी सहाशे ग्रॅम रायझोबियम कल्चर व दोनशे पन्नास ग्रॅम गूळ एक लिटर पाण्यात टाकून गरम करावे. थंड झाल्यावर हे बियाणे प्रक्रिया करून सावलीत वाळवून पेरणी करावी. असे केल्याने नत्राचे स्थिरीकरण चांगले होते. खरीप व रबी या दोन्ही काळांमध्ये पेरणी वेगवेगळ्या वेळी केली जाते. खरिपात पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करावी. रबीमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करावी.

    खते वापरण्यापूर्वी मातीची चाचणी घ्यावी. मूगासाठी वीस किलो नायट्रोजन, चाळीस किलो स्फुरद, वीस किलो पालाश, पंचवीसकिलो गंधक आणि पाच किलो झिंक प्रति हेक्टरी लागते. खरीप पिकाला सिंचनाची गरज नसते, परंतु फुलोऱ्याच्या अवस्थेत दुष्काळ पडल्यास सिंचनाची गरज असते. असे केल्याने उत्पन्न वाढते. खरीप पिकामध्ये पाऊस असल्याने मूग तयार होण्याच्या वेळी एक पाणी द्यावे लागते. रबी पिकामध्ये पहिले पाणी पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी आणि त्यानंतर दर दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने द्यावे; जेणेकरून चांगले उत्पादन मिळू शकते. मूग काळे होऊन कोरडे पडल्यावर पिकाची काढणी करावी. खूप कोरडे झाल्यास मूग तडकण्याची भीती असते. मळणी किंवा काडीच्या साहाय्याने मूग मिळवले जातात.

  • उन्हाळ्यात नारळ पाण्याचे फायदे

    उन्हाळ्यात नारळ पाण्याचे फायदे

    उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अशा परिस्थितीत, बहुतेक लोकांना पिंपल्ससारख्या समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करू शकता. असे केल्याने उन्हाळ्यात तुमची त्वचा आणि शरीर दोघांनाही अनेक फायदे होतील. चला नारळ पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

    उन्हाळ्यात नारळ पाणी शरीर आणि मनाला थंडावा देते, ते एक थंड पेय आहे. याचे फक्त एकच नाही तर अनेक फायदे आहेत, जसे नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि पाणी भरपूर असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग देखील दूर करते. त्यात अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून आराम देतात.

    नारळाच्या पाण्यामुळे त्वचा शांत राहते आणि ती मऊ होण्यास मदत होते. चेहरा उजळण्यासाठी नारळपाणी देखील उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास असेल तर तुम्ही नारळ पाण्याचे सेवन करू शकता. हे वजन कमी करण्यास मदत करते आणि पचनसंस्था देखील मजबूत करते, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून आराम देते. नारळाच्या पाण्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर झटपट चमक आणू शकता. यामुळे तुमचा चेहरा चमकदार आणि मुलायम होईल.

  • नारळ रबडी

    नारळ रबडी

    साहितय : 1 लिटर फुल क्रीम दूध, अर्धा कप किसलेले खोबरे, अर्धा कप खवा, साखर चवीनुसार, काजू, वेलचीपूड, बदामाचे काप, पिस्ता आणि 10 केशर धागे, सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या.

    कृती : सर्वप्रथम एका छोट्या भांड्यात १०-१५ काजू गरम पाण्यात भिजत घालून 15 मिनिटे बाजूला ठेवा. एक भांडे घ्या. त्यात फुल क्रीम दूध घाला. उकळी येईपर्यंत गरम करत रहा. आच मंद करुन दूध पाऊण प्रमाणात कमी होईपर्यंत शिजवत रहा. ते तळाला चिकटू नये, यासाठी ते सारखे ढवळत रहा. आता या दुधात केशराचे धागे आणि खवा घालून काही मिनिटे ढवळत रहा. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू घालून बारीक वाटण तयार होईपर्यंत मिसळा. आता या मिश्रणात साखर आणि किसलेले खोबरे घालून चांगले मिसळून घ्या. दूध घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. त्यात काजूचे वाटण घाला. चांगले शिजवून गॅस बंद करा. आणि थंड होऊ द्या. नारळाची रबडी तयार आहे.

  • एकटेपणा टाळण्यासाठी

    एकटेपणा टाळण्यासाठी

    एकटे रहायला कोणालाही आवडत नाही. पण आयुष्य कधी-कधी माणसाला अशा वळणावर घेऊन जाते, जिथे सोबत कुणीच असत नाही. जर आपणासही एकटेपणाचा त्रास होत असेल, किंवा आपला जोडीदार आणि मित्रमंडळी आपल्यापासून दूर गेली असतील तर एकटेपणा टाळण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करायला हव्यात. स्वत:ची लोकांशी तुलना केल्याने तुम्ही नेहमी असमाधानी राहाल. हे लक्षात ठेवा की प्रत्येकजण प्रत्येक बाबतीत सर्वोत्कृष्ट असू शकत नाही, म्हणून स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. इतरांशी तुलना करीत बसू नका. आपली कौशल्ये ओळखून त्यांना पुढे नेण्याचा विचार करा.

    काही वेळा जीवनातील घाई-गडबडीतून स्वत:साठी वेळ काढणे देखील तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकते. अशा परिस्थितीत निसर्गासोबत वेळ घालवा. या जगात काहीही शाश्वत नाही हे सत्य स्वीकारण्याचा प्रयत्न करा. एकट्याने सहलीला जाणे देखील तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले असू शकते.

    समाजमाध्यमेच लोकांच्या मनातील तणाव आणि वाईट विचारांना कारणीभूत ठरतात. समाजमाध्यमापासून थोडा वेळ बाजूला राहून आपण आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारू शकता. सारखेच आयुष्य जगूनही लोक अनेकदा तणावाचे शिकार होतात. अशा परिस्थितीत तुम्ही आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, उदाहरणार्थ, जर तुम्ही एकाच मार्गाने महाविद्यालय किंवा कार्यालयात जात असाल तर त्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरून पहा. याव्यतिरिक्त, व्यायाम आणि काही भिन्न क्रिया करून तुम्ही स्वत: च्या दिनचर्येत बदल घडवून आणू शकता. तुमच्या मनातील लोकांबद्दलचे विचार एकत्र केल्याने देखील दुःख आणि समस्या येतात. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी भूतकाळ विसरण्याची सवय लावा. लोकांना क्षमा करण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्ही केवळ नकारात्मक विचारच दूर करणार नाही, तर तुमचे मानसिक आरोग्यही सुधारू शकाल.

  • उन्हाळ्यात त्वचा सांभाळा

    उन्हाळ्यात त्वचा सांभाळा

    उन्हाळा प्रचंड वाढला आहे. या कडक उन्हात घराबाहेर पडताच चेहरा भाजल्याचा भास होतो. या उन्हाचा प्रभाव आपल्या त्वचेवर दिसून येतो. यामुळे त्वचेचे निर्जलीकरण होऊ शकते, त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. प्रखर सूर्यप्रकाशामुळे उन्हात जळजळ होणे, त्वचेवर पुरळ उठणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना हायड्रेशनकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ज्याच्या मदतीने त्वचेला थंडावा मिळेल, असे फेस पॅक सहज घरी बनवू शकता.

    उन्हाळ्यासाठी मुलतानी मातीचा फेस पॅक त्वचेला थंड ठेवते. त्वचेच्या मृत पेशी साफ करण्यास देखील मदत करते. हा फेस पॅक बनविण्यासाठी मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळावे. संपूर्ण चेहऱ्यावर पूर्णपणे लावावे. दहा-पंधरा मिनिटे तसेच ठेवावे, नंतर चेहरा थंड किंवा कोमट पाण्याने धुवावा. त्वचेला चंदन आणि गुलाब पाण्याने चांगले मसाज करावे.

    चंदन त्याच्या थंड प्रभावासाठी ओळखले जाते. हा फेसपॅक बनविण्यासाठी चंदन पावडर घ्यावी. त्यात गुलाब पाणी आणि मध मिसळावे. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर पाण्याने धुवावे. चंदनाच्या मदतीने काकडीच्या फेसपॅकपासून आराम मिळतो. कोरफड आणि काकडी दोन्ही त्वचा खूप थंड ठेवतात. त्यांचा फेस पॅक बनविण्यासाठी त्यात अर्धी काकडी किसून मिसळावी. त्यात कोरफड जेल घालावे. संपूर्ण चेहऱ्यावर लावावे. दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवून चेहरा धुवावा.

    टोमॅटो आणि दही त्वचेच्या काळजीसाठी खूप फायदेशीर आहेत. हा फेस पॅक बनविण्यासाठी टोमॅटो किसून त्यात दही आणि काही थेंब लिंबाचा रस घालावा. टोमॅटोमुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

  • डोळ्यांची काळजी

    डोळ्यांची काळजी

    बहुतेक महिलांना डोळ्यांवर काजल लावायला आवडते, परंतु काजल लावताना किंवा नंतर काजल पसरते. ही पसरलेली काजल काढणे थोडे अवघड आहे, त्यामुळे मुलींना काळजी वाटते. जर तुम्हालाही काजल पसरल्याने त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही चेहऱ्यावरील काजल सहज स्वच्छ करू शकता. चला त्या टिप्सबद्दल जाणून घेऊया.


    काजल स्वच्छ करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता. ते त्वचेला शांत करते आणि हायड्रेट होण्यास मदत करते. याशिवाय खोबरेल तेल काजल काढण्यास खूप मदत करते. तुम्ही कापसाचा गोळा आणि तेलाच्या साहाय्याने तुमच्या डोळ्याभोवती काजल स्वच्छ करू शकता. कोल्ड क्रीम हे मॉइश्चरायझिंग क्लीन्सर आहे, जे काजल काढून टाकण्यास खूप मदत करते. बेबी ऑइलच्या मदतीने तुम्ही काजलही सहज काढू शकता. यासाठी तुम्हाला एक कापसाचा गोळा बेबी ऑइलमध्ये बुडवावा लागेल, त्यानंतर तुम्ही काजल हलक्या हाताने डोळ्याभोवती पसरवून काढू शकता. मेकअप रिमूव्हर देखील काजल सहज काढण्यास मदत करते.

  • फळांचे आईस्क्रीम

    फळांचे आईस्क्रीम

    उष्ण वातावरणात नेहमीच थंड पाणी, थंड पेय आणि आईस्क्रीमची गरज भासते. तर, काही रसाळ फळे वापरून घरीच स्वादिष्ट आइस्क्रीम बनवायचे कसे? होय, आम्ही अशाच काही फळांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही स्वादिष्ट आइस्क्रीम तयार करू शकता. चला या यादीवर एक नजर टाकूया.आंबा- उष्णकटिबंधीय चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या आंब्यापासून मलईदार आणि स्वादिष्ट आइस्क्रीम तयार करता येते. त्यात तुम्ही तुमच्या आवडीचे काही ड्राय फ्रूट्सही मिक्स करू शकता.


    अननस- त्याच्या गोड आणि आंबट चवीमुळे अननस वापरून स्वादिष्ट आइस्क्रीमही तयार करता येते. त्याचा लगदा काढण्यासाठी तुम्हाला कदाचित खूप मेहनत करावी लागेल.
    केळी – गोठवलेले आणि मिश्रित केल्यावर, केळी एक मलईदार आणि लोणीयुक्त पोत देतात, जे डेअरी-मुक्त आइस्क्रीमसाठी एक उत्तम पर्याय आहे

  • चॉकलेट उद्योग

    चॉकलेट उद्योग

    ‘चॉकलेट’ हा शब्द ऐकताच खाण्याच्या इच्छेने तोंडाला लगेच पाणी सुटते. हा एक जिभेवर चघळला जाणारा गोड पदार्थ आहे. अनेक नवीन स्टार्टअप्ससह चॉकलेट व्यवसाय उदयास येत आहे. भारतातील चॉकलेट निर्मिती व्यवसायाची वाढ, नफा, उपयोग समजून घेऊया. चॉकलेट बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी चॉकलेट उत्पादन प्रशिक्षणाद्वारे चॉकलेट कसे बनवायचे हे शिकणे आवश्यक आहे. सन 2016 च्या एका वार्षिक अहवालात म्हटले आहे की, बहुसंख्य लोक दोनशे सवीस हजार टनपेक्षा जास्त चॉकलेट वापरतात. विशेषत: भारतात चॉकलेट बनविण्याच्या व्यवसायाची क्षमता समजून घेण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. भारत असा देश आहे, जिथे प्रत्येक महिन्यात सण असतात. भारतीयांसाठी उत्सव म्हणजे अर्थातच गोड पदार्थांची रेलचेल असते. मिठाई आणि चॉकलेट्स वाटून आनंद साजरा केला जातो. दिवाळी असो किंवा रक्षाबंधन, लोकांचा एकमेकांना चॉकलेट भेटस्वरूप देण्याकडे कल असतो. यावरून चॉकलेट बनविण्याच्या व्यवसायाची व्याप्ती स्पष्ट होते.

    अनेक राज्यांमध्ये चॉकलेटचे विविध प्रकार तयार केले जात आहेत. ते मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जात आहेत. या उद्योगात नफा आणि वाढ होण्याची उच्च शक्यता असते. मग तो व्यवसाय सुस्थापित असला किंवा स्टार्ट-अप असला तरीही! अब्जावधी किंमतीच्या चॉकलेटची बाजारपेठ भारतात विस्तारत आहे. त्यामुळे लोक चॉकलेट बनविण्याच्या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. बाजाराचे सखोल विश्लेषण करणे, गुंतवणुकीची आवश्यकता, फायदे, यशोगाथा, उत्पादन प्रकार, यासारखे काही महत्त्वाचे घटक आपणास लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या व्यवसायासाठी चॉकलेट बनविणाऱ्या यंत्राची गरज भासते. चॉकलेट बनविणे खूप अवघड आहे. चॉकलेट बनविणाऱ्यांना सर्वोत्तम कोको मास कॉम्बिनेशन, कोको बटर, साखरेचे प्रकार, दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ, सुका मेवा आणि बरेच काही निवडणे आवश्यक असते. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, कंपाऊंड चॉकलेट, एगलेस चॉकलेट, मिल्क चॉकलेट असे बरेच प्रकार यात येतात.

    इतर चॉकलेट ब्रँड्सशी स्पर्धा करण्यासाठी आणि वाढण्यासाठी चॉकलेट विक्रीच्या कल्पनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या व्यवसायाची जाहिरात करता आली पाहिजे. या कल्पना चॉकलेट व्यवसायाला तत्सम उत्पादनांनी भरलेल्या बाजारपेठेत विक्रीसाठी मदत करतात. व्यवसायाने आकर्षक चॉकलेट मार्केटिंग कल्पना तयार केल्या पाहिजेत. आकर्षक वेष्टनबंद केले पाहिजे. ग्राहकांना आकर्षित करू शकणारा ब्रँड राखला पाहिजे. चॉकलेट व्यवसायासाठी परवाना आवश्यक असतो. याकरिता जीएसटी नोंदणी, फर्म नोंदणी, व्यापार परवाना, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, ट्रेडमार्क नोंदणी करणे आवश्यक आहे. या व्यवसायात गुंतवणुकीचा विचार केला जातो, तेव्हा त्याची किंमत व्यवसायाच्या प्रकारानुसार बदलते. लहान आकाराच्या चॉकलेट उद्योगाची किंमत रु. चार ते पाच लाखांपर्यंत असते, तर मोठ्या आकाराच्या चॉकलेट उद्योगाची गुंतवणूक . वीस ते चाळीस लाखांपर्यंत असते. भारतात चॉकलेट यंत्राची किंमत एक लाखांपासून सुरू होते.

    चॉकलेट बनवणे हा भारतातील एक फायदेशीर व्यवसाय आहे. लहान आकाराच्या चॉकलेट व्यवसायातून मासिक सरासरी रु.तीस हजार ते र. एक लाख इतका नफा मिळतो. सुपरमार्केट हे एक आदर्श ठिकाण आहे जिथे आपण चॉकलेट्सचा पुरवठा करू शकता. नफा मिळवू शकता. काही किरकोळ विक्रेते उत्पादनाच्या काही ओळींवर लक्ष केंद्रित करतात. त्यापैकी बहुतेक चॉकलेटवर अधिक लक्ष केंद्रित करतात. आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. काही लहान दुकाने, ज्यात विविध प्रकारच्या चॉकलेट वस्तूंचा साठा असेल, तिथे आपण पुरवठा करू शकता.

  • कापडापासून चटई

    कापडापासून चटई

    लोक सर्वसाधारणपणे जुने तसेच शिलाईतून उसवलेले कपडे टाकून देतात. परंतु या कपड्यांपासून दरवाजावरील पायपुसणी आकर्षकपणे बनविता येतात. या पायपुसण्यांना बाजारातही चांगला दर मिळतो. ग्राहक आवडीने विकत घेतात. टाकाऊ कापडापासून पायपुसणी बनविण्याचा व्यवसाय अलिकडे महिला करू लागल्या आहेत. यासाठी प्रथम कापड पट्ट्यामध्ये कापून घेतले जाते. ती कापल्यानंतर समान लांबी व रुंदीच्या पट्ट्या कापतात. या पट्टयांच्या वळणदार वेण्या घालून त्यापासून पायपुसणी बनविली जातात. केसांची वेणी घालण्यासारखाच हा प्रकार असतो. त्यानंतर सुई दोऱ्याने ही पायपुसणी घट्ट शिवली जातात.

    ही स्वच्छ करणे देखील सोपे आहे. घर स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यासाठी यांची खूप गरज असते. पावसाळ्यात घरातील लोक बाहेरून मातीने भरलेले बूट आणि चप्पल घेऊन येतात. घरी मुले असतील तर गोंधळ वाढतो. अशा वेळी ही पायपुसणी उपकारक ठरतात.

    अलिकडे महिला लहानमोठ्या आकारातील पायपुसणी बनवून विक्री करतात. ही प्रत्येक घराची गरज असते. त्यामुळे अर्थातच त्यांना ग्राहकही मिळतात. जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांतही विक्रीला ठेवतात. यामुळे कापडाचा वापर होतो, आणि गरजही भागते. वेगवेगळ्या आकारातील पायपुसणी आकर्षक असल्याने मन वेधून घेतात. सुती कापड वापरल्यास ती पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेतात. आकर्षक पायपुसणी घरालाही शोभून दिसतात. त्यामुळे गावागावांमध्ये अलिकडे बचत गटाच्या माध्यमातून महिला योग्य प्रशिक्षण घेऊन असा स्वयंरोजगार करून चरितार्थ चालविताना दिसत आहेत.

  • लाल बटाट्याची शेती

    लाल बटाट्याची शेती

    आता शेतकरी पारंपरिक शेती सोडत आहेत. पिकांच्या विविध जातींचा अवलंब करणे. आता विविध क्षेत्रात शेतीचे अनेक प्रयोग केले जात आहेत. पूर्वी शेतकरी गहू, मका आणि धानाची लागवड करत असत. त्यामुळे आता त्यात आणखी पिकांची भर पडली आहे. आता शेतकरीही लाल बटाट्याच्या लागवडीचा आनंद घेत आहेत. यामध्ये भरपूर नफाही मिळत आहे. लाल बटाट्याच्या लागवडीतून किती भरघोस नफा कमावता येतो ते जाणून घेऊया.  लाल बटाटे लहान ते मध्यम आकाराचे आणि काहीसे समान आकाराचे, गोल किंवा अंडाकृती असतात. लाल बटाट्याचे पीक थंड हंगामात घेतले जाते. संतारा जातीच्या लाल बटाट्याच्या बिया चांगल्या निचऱ्याच्या सुपीक जमिनीत पेरल्या जातात. थंड हंगामाच्या सुरुवातीला पेरणी करावी. यासाठी सवीस अंश ते तीस अंश दरम्यानचे तापमान योग्य आहे. यानंतर त्याची रोपे तीन इंच खोलीवर आणि एक फूट अंतरावर लावावीत. लागवडीपूर्वी खते द्या आणि सुमारे एक महिन्यानंतर आणखी काही खत घाला.

    लाल बटाट्याची फक्त चांगली भाजी बनवत नाहीत तर इतर कामांसाठीही वापरतात. खरं तर, हे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. हृदयाशी संबंधित आजारांवर लाल बटाटा अत्यंत गुणकारी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासोबतच कॅन्सरपासूनही संरक्षण मिळते.  या लाल बटाट्याच्या चिप्सना बाजारात खूप मागणी आहे. राजस्थानच्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी लाल बटाट्याची चांगली लागवड केली आणि त्यांना भरपूर नफा मिळाला. त्यांनी गुजरातच्या चिप उत्पादकांशी बटाट्याचा थेट सौदा केला होता. यानंतर त्यांनी संपूर्ण माल त्यांना दिला. जर कोणी लाल बटाट्याची लागवड केली, तर आता त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याची दारे उघडली आहेत. त्याचे चांगले पीक सुमारे दोन महिन्यांत तयार होते.