सह्याद्री मराठी वाहिनी

Author: श्रध्दा

  • घृष्णेश्वर मंदिर

    घृष्णेश्वर मंदिर

    घृष्णेश्वर महादेवाचे मंदिर दौलताबादपासून 11 किलोमीटर अंतरावर छ. संभाजी महाराज नगर येथे आहे . हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. भगवान शंकराला समर्पित असल्याने, हे मंदिर शिवपुराणात नमूद केलेल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. 12वे ज्योतिर्लिंग मानले जाणारे, या मंदिरातील शिवाला कुसुमेश्वर, घृष्मेश्वर आणि घृष्णेश्वर अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. मालोजीराजे भोसले आणि राणी अहिल्याभाई होळकर यांच्या काळात मंदिराची अनेक पुनर्बांधणी झाली. शहरापासून दूर असलेल्या या मंदिरात साधेपणा आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे.

    लाल ज्वालामुखीच्या खडकाने बांधलेले, हे मंदिर त्याच्या उत्कृष्ट मध्ययुगीन वास्तुकला आणि 5-स्तरीय शिकारासाठी ओळखले जाते. आज मंदिरात गर्भगृह, अंतराळ आणि सभा मंडप आहे. महाराष्ट्रातील या ज्योतिर्लिंग मंदिरातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव असलेल्या महाशिवरात्रीच्या वेळी अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.

  • मोलमजुरी ते सीईओ – ज्योती रेड्डी

    मोलमजुरी ते सीईओ – ज्योती रेड्डी

    सन १९८९ पर्यंत पाच रुपये रोजाने मोलमजुरी करणाऱ्या आणि आज सीईओ असलेल्या ज्योती रेड्डी यांचा यशोशिखरापर्यंतचा प्रवास करणारा आहे.

    अमेरिकेतील कीज सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीच्या थक्क करणारा तर आहेच, परंतु हे शब्द तंतोतंत खरे

    ‘एव्हरी सक्सेसफुल स्टोरी हॅज अ पेनफूल बिगिनिंग ॲण्ड एव्हरी पेनफूल बिगिनिंग हॅज अ सक्सेसफुल एण्डिंग.’

    हे प्रेरणादायी शब्द आहेत माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे. हे केवळ एखादे विधान किंवा जीवनाचे तत्त्वज्ञान नसून, तुमच्या मनात प्रश्नाचे जे काहूर उठते त्याला मिळालेले भयप्रद, कनवाळू, सुखदायक आणि विदवत्तापूर्ण उत्तर असते. जीवनाच्या प्रारंभीच्या टप्प्यात ज्या वेदना किंवा धक्के सहन करावे लागतात त्याला दिलेला तो योग्य आणि अचूक प्रतिसाद असतो. ‘नो पेन्स, नो गेन्स’ म्हटले जाते ते उगाचच नव्हे, कोणताही मनुष्य जन्माला येत असताना त्याच्या मातेलाही प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. म्हणजेच जन्मापासूनच हा प्रवास सुरू होत असतो. ‘जर तुम्ही गरीब कुटुंबात जन्माला आला, तर ती तुमची चूक नसते. मात्र, तुम्ही गरीब म्हणूनच जग सोडून गेलात तर ती तुमची चूक असते’, असे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

    आज ज्योती रेड्डी प्रचंड पैसा कमावत असल्या तरी भारतीय समाजातील तळागाळाशी असलेली आपली नाळ त्यांनी अजूनही तुटू दिली नाही. हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. ज्योती रेड्डी यांचा आतापर्यंतचा प्रवास विस्मयकारक आणि थोड्याफार अडचणी आल्यामुळे खचून जाण्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. ‘शून्यातून विश्व निर्माण करणे’, हे वाक्य ज्योती रेड्डी यांनी सार्थकी लावले आहे. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो त्या शिखरापर्यंतच्या प्रवासात अनेक खाचखळगे आणि विघ्नं येतात. परंतु, त्या सर्व आव्हांनावर मात करूनच तिथे पोचावे लागते.

    शेतात मोलमजुरी करणाऱ्या एक साधारण महिलेने केवळ कौटुंबिकच नव्हे, तर आर्थिक अडचणींवर मात करून आपले स्वप्न कसे साकारले, हे जाणून घेणे खूपच प्रेरणादायी आहे. १५ दशलक्ष डॉलर्सच्या आयटी कंपनीच्या सीईओ ज्योती रेड्डी यांनी आपले यश स्वत: किंवा कुटुंबापुरते मर्यादित ठेवले नाही. एवढे यश संपादन केल्यानंतरही पाय जमिनीवरच ठेवत आज त्या आपली सामाजिक जबाबदारीही तेवढीच गांभीर्याने पार पाडत आहेत. ज्योती रेड्डी यांच्या यशस्वी प्रवासाचा विचार करायचा झाल्यास त्या जी आर्थिक मदत करतात तो फार मोठा मुद्दा नसून, असंख्य लोकांना आव्हानांचा सामना जिगरबाजपणे कसा करायचा, याची प्रेरणा त्यांच्यापासून मिळते.

    आता अनेक महिला ज्योती रेड्डी यांना आदर्श मानून वाटचाल करत आहेत. या महिला आपली क्षमता ओळखून ज्योतीसारखे यश मिळविण्याचा प्रयत्न करताहेत. ज्योतीने आज जे यश मिळविले आहे त्याचा प्रवास जाणून घेतल्यास बहुतांश लोकांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत.

    अनिला ज्योती रेड्डी यांचा जन्म वारंगल जिल्ह्यातील हनुमाकोंडा येथे झाला. आणिबाणीच्या काळात रोजगार गमावलेल्या एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेली ज्योती ही चार भावंडांपैकी सर्वात मोठी. तिचे वडील नंतर लष्करात दाखल झाले. परंतु, कुटुंबाच्या आकर्षणामुळे ते फार काळ टिकू शकले नाही. परंतु त्यांनी जे लष्करी प्रशिक्षण घेतले, त्यातून त्यांचा जो दृष्टिकोन विकसित झाला तो वारसा म्हणून ज्योतीला मिळाला. ज्योतीच्या कुटुंबाला दोनवेळचे जेवणही सहजासहजी नशिबात नव्हते. त्यामुळे त्यांना नाईलाजाने ज्योतीला हनुमाकोंडा येथील बालसदनात टाकावे लागले.

    इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत ज्योती कुटुंबापासून दूर बालसदनात राहिली. कुणीतरी येईल आणि आपली मदत करेल, या आशेवर ती दिवस काढत होती. विशेष करून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, कारण तिचे ब्लँकेट फाटलेले असल्यामुळे खूप थंडी वाजायची. बहुदा असे दिवस काढल्यामुळे तिला ती आत्मशक्ती मिळाली असावी. ज्योती दर उन्हाळ्यात आपल्या गावी जात असे. बालसदनात असताना ज्योती वॉर्डनच्या घरात राहायची आणि घरकाम केल्यानंतर तिला तिथे जेवण मिळत असे.

    ज्योतीने दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. शिक्षण पुढे सुरू ठेवण्याची तिची खूप इच्छा होती. परंतु, तिच्या मातापित्याच्या मनात काही वेगळेच होते.

    ज्योती अवघी 16 वर्षांची असतांना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पालकांनी संगा रेड्डी यांच्याशी तिचा विवाह लावून दिला. देशाच्या ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. मातापिता मुलीला ओझं समजतात आणि शक्य तेवढ्या लवकर विवाह करून हे ओझं हलकं करण्याचा त्याचा प्रयत्न असतो विवाह झाला त्यावेळी ज्योती अबोध होती. आणि वैवाहिक जीवनाबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. काळ पुढे सरकत गेला. १८ व्या वर्षी ज्योती दोन मुलींची आई झाली. मात्र दोन्ही मुलींच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि देखभाल करणेदेखील तिला शक्य होत नव्हते.

    मात्र, ‘व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे’, याप्रमाणे मुलीच्या गरजा भागविण्यासाठी तिने सासू आणि पतीसोबत शेतात मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिला पाच रुपये रोजी मिळत होती. परंतु, ज्योती ज्या निष्ठेने शेतात काम करायची त्यामुळे तिच्यासोबत काम करणारे अनेक जण प्रभावित झाले. या तिच्या वृत्तीमुळेच शेतीमधील बारीकसारीक गोष्टी तिला जाणून घेता आल्या. १९८६ ते १९८९ अशी तीन वर्ष ज्योतीने शेतात मोलमजुरी केली. परंतु, १९८९ मध्ये अचानक तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

    प्रौढांना पायाभूत शिक्षण देण्यासाठी नेहरू-युवक केंद्राने गावी एक रात्रशाळा सुरु केली. गावात कुणीही पदवीधर नव्हते आणि ज्योती हा एकच पर्याय असल्याने केंद्राने ही जबाबदारी तिच्या खांद्यावर सोपविली. याचे तिला दरमहा १५० रुपये देण्याचे निश्चित झाले. ज्योती शेतात मोलमजुरी करणाऱ्या सर्वांना सायंकाळी केद्रात आणत असे आणि अनोख्या पद्धतीने त्यांना मूलभूत शिक्षण देण्यास तिने सुरुवात केली. ज्योती ज्या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवत  होती. त्यामुळे केंद्र संचालक खूपच खुश झाले आणि तिची हनुमाकोडा येथे मंडल प्रेरक म्हणून नियुक्ती झाली.

    मंडल प्रेरक या नात्याने वारंगल जिल्ह्यातील सर्व केंद्रांना तिला भेट द्यावी लागे. यादरम्यान तिला शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आणि उच्च शिक्षणाशिवाय आपण जीवनात पुढे काहीच करू शकणार नाही, याची तिला जाणीव झाली, हे काम करत असतानाच ज्योतीने आंबेडकर खुल्या विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबाबत तिची उत्कट इच्छा बघून विद्यापीठातील अधिकारीदेखील प्रभावित झाले. त्यानंतर ज्योतीने अण्णा युनिव्हर्सिटीमधून बी.एड. केले आणि सरकारी शिक्षिका झाली. परंतु, यानंतरही तिच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. तिला कुटुंब आणि समाजात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पती आणि मुलींसह गाव सोडून कामाच्या ठिकाणी राहणे आणि काम, घर यांचे संतुलन साधताना आर्थिक चणचण भासत असल्यामुळे तिला कमाईचे दुसरे पर्यायदेखील शोधावे लागले. ग्रामीण भारतातील जवळपास प्रत्येक महिलेला एव्हरेस्टपेक्षाही मोठ्या असलेल्या या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या अडचणीमुळे डगमगून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ज्योतीमध्ये असलेल्या उर्जेमागे संयम, चिकाटी आणि कटिबद्धता या गुणांचे फार मोठे योगदान आहे.

    इथे ज्योतीच्या वेदना संपल्या असे जर वाटत असेल तर त्यात प्रेरणादायी काहीच नाही, असे म्हणावे लागेल. ज्योती विविध शाळांची निरीक्षक म्हणून काम करत असताना अमेरिकेत स्थायिक झालेली तिची एक नातेवाईक गावी आली. ती गावात असेपर्यंत ज्योती तिच्यासोबत होती आणि या काळात तिच्या जीवनशैलीत झालेला बदल तिने जाणून घेतला. ज्याप्रकारे तिची अमेरिकेतील नातेवाईक आपल्या मुलींवर पैसा खर्च करत होती ते बघून अपल्या मुलींनाही या गोष्टी मिळाव्या, असे तिला मनापासून वाटू लागले. अमेरिकेत जाऊन पैसा कमावला तर आपल्या मुलींचेही भविष्य उज्ज्वल करता येऊ शकते. असाही विचार तिच्या मनाला स्पर्श करून गेला. तुझ्यासारखी आक्रमक महिला अमेरिकेत सहज स्थायिक होऊ शकते, असे तिने ज्योतीला सांगितले. झाले, ज्योतीने यापासून प्रेरणा घेत त्या दिशेने वाटचाल सुरू केली, जराही वेळ न दवडता तिने कॉम्प्युटर  सॉफ्टवेअरच्या क्लासेससाठी नोंदणी केली. पत्नीने बाहेर राहू नये असे पतीला वाटत असल्यामुळे ज्योतीला दररोज हैदराबाद येथे येणेजाणे करावे लागत असे. अमेरिकेला जाण्याचा जणू निर्धारच तिने केला होता. परंतु, पतीला यासाठी तयार करताकरता तिच्या नाकी नऊ आले. स्वत:ची कार हे ज्योतीचे सर्वात मोठे स्वप्न होते आणि अमेरिकेत जाऊनच ते पूर्ण होऊ शकते, असेच तिला वाटायचे. म्हणूनच तिने व्हिसा आणि पासपोर्टसाठी पैसाही जमविण्यास सुरुवात केली. प्रारंभी तिला अनेकदा अपयश आले, मात्र, ‘प्रयत्नांती परमेश्वर’ याप्रमाणे अखेर तिला प्रवासी व्हिसा मिळाला. थोडाफार पैसा आणि स्वप्नांच्या तिजोरीसह तिने अमेरिकेकडे प्रयाण केले.

    अमेरिकेच्या भूमीवर उतरताच त्याठिकाणी स्थायिक होणे वाटते तेवढे सोपे नाही, याची जाणीव तिला लगेचच झाली. आपल्याला जे लोक आसरा देतील, अशी ज्योतीला अपेक्षा होती त्यांनीच नेमकी पाठ फिरविली. सोबत आणलेला पैसा संपत आला होता. म्हणून तिने न्यूजर्सी येथील एका व्हिडिओ शॉपमध्ये सेल्सपर्सन म्हणून नोकरी पत्करली. त्यावेळी ती एका गुजराती कुटुंबाकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. या शॉपमध्ये काम करत असतानाच वारंगल भागातीलच एका भारतीयाने तिला बघितले आणि आपल्या भावाच्या कंपनीत नोकरीसाठी तिची शिफारस केली. प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला नोकरी मिळाली. त्यानंतर आयसीएसए या प्रख्यात कंपनीने तिला आकर्षक वेतनासह नोकरीचा प्रस्ताव दिला. परंतु, व्हिसाला मान्यता नसल्यामुळे पुन्हा ज्योतीला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे तिने एच-१ व्हिसासाठी अर्ज केला. यासाठी तिला आयसीएसएची नोकरी सोडावी लागली व एच-१ व्हिसा मिळेपर्यंत पाच डॉलर्स प्रतितास याप्रमाणे काम करावे लागले.व्हिसा स्टॅम्पिंगसाठी ज्योती मेक्सिकोला गेली. व्हिसा मिळण्यासाठी जे दिव्य पार करावे लागले त्याकडे बघता स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना व्हिसा मिळण्यासाठी मदत करण्याचा विचार प्रथमच तिच्या मनात आला आणि त्याच ठिकाणी कीज सॉफ्टवेअरची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. हळूहळू ज्योतीने सॉफ्टवेअर सोल्युशन्स देण्यासह रिक्रुटेंमट आणि इतर मदतही उपलब्ध करून दिली. मे २००० मध्ये ज्योती अमेरिकेत आली आणि २००१ साली ती व्यावसायिकसुद्धा झाली. आपल्या एका नातेवाईकालाच तिने भागीदार बनविले.

    अशाप्रकारे कठोर मेहनत, कटिबद्धता आणि निष्ठा या जोरावर ज्योतीने आपल्या स्वप्नांना पंख देत यशोशिखर गाठले, आपली मुलं आणि इतर नातेवाईकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, इतके पैसे तिने कमावले आहेत. तिच्या दोन्ही मुलींनी अमेरिकेतन प्रतिष्ठित विद्यापीठांमधून उच्च शिक्षण घेतले. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या दोन्ही मुली विवाह करून अमेरिकेत स्थायिक झाल्या. आपल्या मुलींना चांगले जीवन जगता येईल हे सुनिश्चित करण्याचे ज्योतीचे स्वप्न साकार झाले. मुलीदेखील खूप मेहनती आहेत आणि वेळ मुळीच वाया घालवत नाहीत, असे ती अभिमानाने सांगते. आज ज्योतीकडे शूज आणि चपलांचे २०० जोड आहेत ड्रेसवर मॅच होईल अशी जोडी शोधण्यासाठी तिला १५ ते २० मिनिटे लागतात. प्रारंभी माझ्याकडे फक्त दोनच साड्या होत्या. तिसरी साडी घेण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले आणि १३५ रुपयांची ती तिसरी साडी आजही जपून ठेवली आहे, असे ती सांगते. तिच्या लहान मुलीच्या विवाहासाठी ज्योतीने १.६० लाख रुपयांची निळ्या रंगाची साडी खरेदी केली. ज्योतीची अमेरिकेत सहा आणि भारतात दोन घरे आहेत. स्वत:ची कार चालविण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले असून, ती मर्सिडिज बैंजमधून फिरते. डोळ्यावर गॉगल आणि केस मोकळे असतात.

    वारंगलच्या खेड्यापासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांना ती धन्यवाद देते आणि इथपर्यंतच्या वाटचालीत सहन कराव्या लागलेल्या वेदना ती कधीही विसरत नाही. त्यामुळेच तिने गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. प्रतिकूल परिस्थितीचा सामना कराव्या लागणाऱ्या मुलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा ज्योतीचा निर्धार आहे. याच उच्च विचारांमुळे मानवतेची सेवा करण्याची तिची इच्छाशक्ती जागृत होते.

    एक महिला आपल्या मेहनतीच्या जोरावर अमेरिकेला गेली, खूप पैसा कमावला आणि लोकांनी त्याला यश म्हणावे, एवढ्यापुरतीच ही गोष्ट मर्यादित नाही. ज्योतीचा दृष्टिकोन आणि साधेपणा यामुळे लोकांनी तिला जवळ केले, ज्योती आपले मूळ कधीही विसरली नाही. जेव्हा जेव्हा ती भारतात येते तेव्हा ती बालसदन, वृद्धाश्रमांना भेट देते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते. त्याठिकाणी असलेल्यांना आर्थिक मदत करते. महिला महाविद्यालयांना भेटी देऊन इतरांना प्रेरित करण्याचाही तिचा प्रयत्न असतो. आज जे काही यश मिळविले ते डोक्यात न जाऊ देता ज्योतीने हृदयात साचवून ठेवले आहे. प्रारंभीच्या काळात आसरा आणि मार्गदर्शन करून अनेक भारतीयांना अमेरिकेत स्थायिक होण्यास ज्योतीने मदत केली आहे.

    ज्योती रेड्डीची ही अद्‌भुत कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे. डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे ज्योतीचे प्रेरणास्थान होते. वयाच्या ११ ते १६ वर्षादरम्यान मुलगा किंवा मुलगी आपले व्यक्तिमत्व घडवत असतो, असे डॉ. कलाम यांचे शब्द आजही तिच्या कानावर पडतात. ज्योतीचा हा प्रवास इतरांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. अडचणी आल्या तरी खचून न जाता मेहनत व निष्ठेने काम करत राहा, यश हमखास मिळते, हाच संदेश ज्योतीच्या जीवनप्रवासातून मिळतो!

  • अब्जाधीश न्हावी… रमेश बाबू

    अब्जाधीश न्हावी… रमेश बाबू

    ज्या कामावर आपले प्रेम आहे ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक व्यावसायिक युगातही घट्ट पाय रोवून उभे राहणे शक्य होते, हे बंगळुरूच्या रमेश बाबूने आपल्या जीवनप्रवासातून दाखवून दिले आहे.

    व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये आव्हानं ही येणारच. मात्र, आव्हानाचे संधीत रुपांतर करून त्याचा धैयाने सामना केल्यास हमखास यश मिळते, असा कानमंत्र रमेशने दिला आहे.

    तुमच्याकडे दूरदृष्टी असेल, तुम्ही प्रामाणिक असाल आणि कठोर मेहनत करण्याची तुमची तयारी असेल, तर जीवन किंवा व्यवसायात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे व्यावसायिक वर्तुळात नेहमीच म्हटले जाते. त्यात तथ्यही आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेप घेत यशोशिखर गाठले आहे, अशी असंख्य उदाहरणं देता येतील. अशातीलच उदाहरणं ही इतरांचे प्रेरणास्थान बनतात आणि त्यातूनही अनेक जण जीवनात यशस्वी होतात.

    देशाचे आयटी हब म्हणून नावारुपास आलेल्या बंगळूरु शहरात राहणाऱ्या रमेश बाबू हा खऱ्या अर्थाने एक स्टार आहे. रमेश बाबूचे शहरात केशकर्तनालय (सलून) आहे. परंतु आज तो असाधारण संपत्ती असलेला साधारण व्यावसायिक आहे. रमेश बाबू आज अब्जाधीश असून, त्यांच्याकडे ६७ वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे २०० कार आहेत. मोठमोठे राजकीय नेते, लष्करी अधिकारी आणि सलमान खान, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सारखे दिग्गज कलावंत रमेश बाबूंचे ग्राहक आहेत. जवळपास दररोज रमेश बाबू आपली ३.१ कोटींची अलिशान सेल्स रॉयसी घोस्ट चालवत कामाच्या ठिकाणी येतो.

    ज्याप्रमाणे एखाद्या ग्राहकाच्या केसांना अगदी मन लावून आकार देतो. अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या रॉयसीचा डॅशबोर्ड अत्यंत काळजीपूर्वक हाताळतो, असे रमेश सांगतो. विशेष म्हणजे अशी लक्झरी कार असलेल्या बंगळुरू शहरात फक्त पाच व्यक्ती आहेत आणि रमेश बाबू हा त्यापैकीच एक. अतिशय कष्टाने कमावलेल्या पैशातून बाबूने ही सेल्स रॉयल्सी खरेदी केली आहे. केशकर्तनालयाच्या उत्पन्नातून जे पैसे वाचले त्यातून रमेशने १९९४ साली एक मारुती ओमनी खरेदी केली. केशकर्तनालयात ग्राहकांच्या केसांना विविध आकार देतानाच रमेशने ओमनी भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला. ही कल्पना रमेशची आई ज्यांच्याकडे घरकाम करायची त्या नंदिनी अक्का यांनी त्याला सुचविली होती.

    त्यानंतर आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या रमेशच्या जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने घडत गेली आणि मग खऱ्या अर्थाने इतिहास लिहिला गेला. २००४ उजाडता उजाडता रमेशचा टॅक्सी व्यवसाय चांगलाच बहरला. त्यावेळी सात नियमित कार रमेशकडे होत्या. गेल्यावर्षी मात्र त्याच्याकडे असलेल्या कारची संख्या तब्बल २०० झाली आणि यामध्ये ७५ वेगवेगळ्या प्रीमियर कार आहेत. यामध्ये मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी काही अलिशान लक्झरी व्हॅन्स आणि अर्थातच या सर्वांवर मात करणारी रोल्स रॉयसी घोस्ट. रमेशने २०११ साली ही घोस्ट खरेदी केली.

    स्वकष्टाने जीवनात यश कमावणारा पुरुष किंवा स्त्री प्रमाणे रमेश बाबूने फक्त केशकर्तनालयातून मिळणाऱ्या उत्पन्नावर हा सर्व डोलारा उभा केला, असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. केशकर्तनालयातून त्याचे उत्पन्न फारसे नसले तरी कार भाड्याने देण्याच्या म्हणजेच टॅक्सीच्या व्यवसायातून रमेश भरपूर उत्पन्न कमावतो आणि त्यातूनच आज त्याचे नशीब बदलले. म्हणूनच आज अब्जाधीश असलेला रमेश बाबू हा देशातील सर्वांत श्रीमंत हेअरस्टाईलिस्ट पैकी एक आहे. रमेश बाबूला फॅन्सी कार जवळ बाळगण्याची खूप हौस आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक कारची खूपच काळजी घेतात.

    अर्थात रमेश बाबूचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर असाच आहे. परंतु आतापर्यंतच्या जीवनप्रवासात आलेल्या कोणत्याही संकटामुळे खचून न जाता रमेशने धैर्याने प्रत्येक आव्हान पेलले आणि म्हणूनच आज तो यशाच्या शिखरावर विराजमान आहे.

    रमेश आता आपल्या ताफ्यात स्टेच लिमोजची भर घालण्यात उत्सुक आहे. रमेश आपल्या रोल्ससाठी दरदिवसाला ७५ हजार रुपये भाडे आकारतो आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी, बॉलिवूड आणि टॉलिवूडचे कलावंत हे त्यांचे विशेष ग्राहक आहेत. रमेशकडे फक्त कारचाच ताफा आहे, असे नसून त्याच्याकडे १६ लाखांची महागडी सुझुकी इंटूडर बाईक पण आहे. रमेश ही बाईक साधारणपणे आठवड्याच्या शेवटी वापरतो आणि ती त्याने खाजगी वापरासाठीच ठेवली आहे.

    विशेष म्हणजे स्वकष्टाने यश मिळवत अब्जाधीश झाल्यानंतरही रमेशचे पाय अजूनही जमिनीवरच आहे. केशकर्तनालयातील आपल्या कौशल्याचा रमेश अजूनही उपयोग करतो आणि प्रत्येक ग्राहकाकडून फक्त १०० रुपये घेतो. जोपर्यंत हातात बळ आहे, तोपर्यंत हे काम सुरुच ठेवणार असल्याचे रमेशने स्पष्ट केले. आज देशभरात एक अब्जाधीश न्हावी म्हणून नावरुपास आल्यानंतरही रमेशला आपल्या भूतकाळाची आठवण आहे.

    संयम, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कठोर मेहनत या गुणांमुळेच रमेश आज यशोशिखरावर आहे. मला जे योग्य वाटले तेच मी प्रामाणिकपणे केले आणि हेच माझ्या यशाचे गमक आहे, असे रमेशने हसतहसत सांगितले. रमेशचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर आपल्यापैकी अनेक जण यशोशिखराच्या दिशेने वाटचाल करू शकतो, एवढे निश्चित! १९७९ साली रमेश फक्त नऊ वर्षाचा असताना छोटेसे सलून चालविणारे त्याचे वडील स्वर्गवासी झाले. लहान रमेशसह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडिलांनी मागे सोडलेले सलूनचे दुकानच फक्त होते. मात्र, रमेश लहान असल्याने आईने ते सलून पाच रुपये रोज याप्रमाणे भाडेतत्त्वावर दिले आणि मुलांचे पालनपोषण करण्यासाठी दुसरीकडे घरकाम करण्यास सुरुवात केली.

    रमेशच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच पैशावर चालत असे. परंतु, नंतर काकांसोबत वाद झाल्याने त्याने कुटुंबाचे सलून सोडले. शिक्षणाला प्राधान्य दे, या आईच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत रमेशने रात्री उशिरापर्यंत काम करून आपले कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यशही मिळाले. १९९१ साली रमेशने ‘इनर स्पेस’ नावाचे स्वत:चे सलून सुरु केले आणि तिथूनच त्याचा उत्कर्ष सुरू झाला. लवकरच शहरातील उच्चभ्रू लोकांमध्ये त्याचे सलून लोकप्रिय होत गेले. या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नापैकी जे पैसे वाचले त्यातून रमेशने एक मारुती ओम्नी घेतली आणि भाडेतत्त्वावर देण्यास प्रारंभ केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि रमेशने हळूहळू सहा ते सात कार खरेदी केल्या.

    अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या रमेशने २००४ साली आपल्या ताफ्यात ४० लाखांची एक लक्झरी कार खरेदी केली. त्यावेळी ४० लाख ही खूप मोठी रक्कम होती. रमेशच्या या अलिशान कारलाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याने आणखी काही कार खरेदी केल्या. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची वृत्ती, नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे आणि आपल्या प्रत्येक निर्णयाबाबत प्रचंड आत्मविश्वास असलेल्या रमेशचा टॅक्सी व्यवसाय चांगलाच बहरला. मात्र, आतापर्यंतच्या प्रवासात रमेशला अनेक अडथळे पार करावे लागले, अनेक आव्हानं आणि संकटेही आली. काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे असलेल्या वाहनांच्या ताफ्यामुळे त्याला तीन कोटी इतका पथकर भरावा लागला. दोन अधिक दोन चार, असे करत त्याने ही रक्कम चुकती केली. उर्वरीत काही रक्कम वर्षभरात भरण्याचे आश्वासन रमेशने दिले आहे.

  • बाकावर आयएएस कोरणारी अदीला

    बाकावर आयएएस कोरणारी अदीला

    ‘मुस्लिम समाजात मुलींना शिक्षण घेऊन स्वतंत्र होणं तसं असामान्यच. परंतु, माझे वडील वेगळे होते आणि त्यांच्या दृष्टीने शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. मलाही राष्ट्र उभारणीच्या कार्यात खारीचा वाटा उचलायचा होता आणि एक प्रशासकीय अधिकारी (आयएएस) होऊन मी सकारात्मक योगदान देऊ शकते’, हे शब्द आहेत २९ वर्षीय आयएएस अधिकारी अदीला अब्दुल्लाचे.

    शाळेत असताना मी डेस्कवर ‘आयएएस’ हे तीन शब्द कोरायची आणि माझी सुप्त इ्च्छा व्यक्त करण्याचा तो एकमेव मार्ग होता. मला राष्ट्र उभारणीत योगदान करण्याची मनोमन इच्छा होती आणि आयएएस अधिकारी झाल्यास यामध्ये सकारात्मक योगदान देऊ शकीन, असं मला सारखं वाटायचं.

    मुस्लिम मुलींना शिक्षण किंवा कामासाठी प्रोत्साहन न मिळणाऱ्या केरळच्या मलाबार परिसरातील एका छोट्या खेड्यातील मुस्लिम मुलगी अदीला. आपल्या यशस्वी प्रवासाबाबत माहिती देताना ती म्हणाली, केरळच्या कोझिकोडजवळील कुट्ट्यावाडी गावात मी लहानाची मोठी झाले. माझी आई शाळेत शिक्षिका होती. माझं प्राथमिक शिक्षण तेथेच झालं. त्यानंतर मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या शाळेत शिकावं, अशी वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी मला कोझिकोड येथील निवासी शाळेत टाकलं. माझा मोठा भाऊ-बहिणही आधीपासूनच निवासी शाळेमध्ये होते. दोन्ही मुलींनी स्वतंत्र महिला म्हणूनच वावरावं, अशीच वडिलांची इच्छा होती. परंतु मुस्लिम समुदायात मुलींनी शिक्षित आणि स्वतंत्र असणे दुर्मिळच. वडिलांनी मात्र शिक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं. सत्तरच्या दशकात ‘मुलांना शिक्षणाची भेट दे’, असं एका जर्मन महिलेनं आपल्याला सांगितलं होतं, असं वडील सांगतात. मुलगा आणि मुली असा भेदभाव वडिलांनी कधीच केला नाही. शाळेतील वातावरणामुळे मला वाचन, वक्तृत्व, निबंध लेखन, कोडे आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.

    राष्ट्राच्या उभारणीचं स्वप्न

    शाळेत असताना मी डेस्कवर ‘आयएएस’ हे तीन शब्द कोरायची आणि माझी सुप्त इ्च्छा व्यक्त करण्याचा तो एकमेव मार्ग होता. मला राष्ट्र उभारणीत योगदान करण्याची मनोमन इच्छा होती आणि आयएएस अधिकारी झाल्यास यामध्ये सकारात्मक योगदान देऊ शकीन, असं मला सारखं वाटायचं. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणे शास्त्रज्ञ व्हावं, असंही कधीकधी वाटायचं. परंतु, त्यासाठी आवश्यक असलेला वैज्ञानिक स्वभाव नसल्याची मला कल्पना होती. त्यामुळेच मी प्रशासक होण्याचा निर्णय घेतला. कधीही आयएएस अधिकारी न बघितलेल्या छोट्या गावातील एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातील मुलींच्या दृष्टीने ही खूप मोठं स्वप्न होतं. विद्यार्थी म्हणून पर्याय माझ्याकडे इंजीनियर किंवा डॉक्टर हेच पर्याय होते. एक डॉक्टर म्हणून आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. या विचाराने मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, असे अदीला म्हणाली.

    पेरुत्थलमना येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही मी येथील डेस्कवरही आयएएस हेच शब्द कोरायची. हेच आपले अंतिम स्वप्न आहे, अशी आठवण देण्याचा बहुदा तो प्रयत्न असावा. मी वैद्यकीय शिक्षण घेत असले तरी अनेक विषयांचे वाचन सुरू असायचे. वाचनालयात नियतकालिकं आणि वृत्तपत्र वाचण्यात माझा खूप वेळ जायचा. आणखी एका महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रबी सोबत माझी मैत्री झाली. दोघांच्याही आवडीनिवडी जुळत असल्याने आधी मैत्री, चार वर्षे एकमेकांना पुरते जाणून घेतल्यानंतर घरच्यांच्या संमतीने आमचा विवाह झाला, असेही ती म्हणाली.

    परंतु, आपला रस इंजेक्शन आणि प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यात नाही, हे माझ्या पुन्हा लक्षात आले. समाजासाठी काम करण्याची तीव्र इच्छा तर होती. परंतु, ती या माध्यमातून नव्हे. आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पतीने भरपूर पाठिंबा दिला. आपल्या समुदायातून अशाप्रकारचे स्वप्न कुणीही बघत नसलं तरी, मी जर हे स्वप्न पूर्ण केलं, तर आणखी महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी मी प्रोत्साहित करीन, असे त्याने सांगितले. त्याच काळात रबीच्या एका मित्राची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. मी परीक्षेसाठी त्याचा सल्ला घेतला. त्याने मला एक-दोन प्रश्न विचारले. त्याची उत्तरे दिल्यामुळे त्याने मला पुढे जाण्याचा सल्ला दिला. मी तीन महिन्यांच्या कोचिंग क्लाससाठी दिल्लीला गेले. पूर्व परीक्षेसाठी मी इंग्रजी, समाजशास्त्र यांचा अभ्यास केला माझी वैद्यकीय क्षेत्रातील कारकीर्द धोक्यात येणार याची कल्पना होती. सुदैवाने पहिल्याच प्रयत्नात मी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढचे दोन महिने दिल्लीत राहून मी मुख्य परीक्षेची तयारी केली. सामान्य प्रशासन या पेपरशिवाय वैद्यकीय क्षेत्रात अभ्यासात असलेला वैद्यकशास्त्र हा पर्यायी पेपर होता. नशिबाने मी मुख्य परीक्षादेखील पास झाले. एप्रिल २०१२ मध्ये माझी मुलाखत होती आणि त्यावेळी मी चार महिन्यांची गर्भवती होते. अट्टापडी येथे वैद्यकीय व्यवसाय करत असताना केलेल्या कामाबद्दल मला मुलाखतीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. तेथील आदिवासी, त्यांची जीवनशैली, पारंपारिक व्यवसाय, सामान्य आरोग्यविषयक समस्या इत्यादींबाबात प्रश्नांचा भडिमार केला. वैद्यकशास्त्रात तंत्रज्ञानाच्या भूमिकेबाबतही मला विचारणा करण्यात आली. मला सनदी अधिकारीच व्हायचे आहे, हे मी त्यांना पटवून सांगितले. अर्ध्या तासाम मुलाखत संपली. त्याचा निकाल लागला तेव्हा मला २३० गुण मिळाले आणि मलबार भागातून आयएएस अधिकारी होण्याची मी पहिली मुस्लिम महिला असावी, असे ती सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता.

    २०१२ साली परीक्षा, मुलाखत आणि इतर प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अथीलाची कन्नूर येथे वर्षभरासाठी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी घेतलेली सुटी संपल्यानंतर २०१४ साली तिची तिरुर उपविभागात उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. शहीद भगतसिंग, महात्मा गांधी आणि डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे तिचे आदर्श आहेत. बालपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न कसे पूर्ण करावे आणि जीवनात यशाला कशी गवसणी घालावी याकरिता अगाधा निश्तिच इतरांसाठी आदर्श ठरू शकते.

  • जया एकादशी

    जया एकादशी

    वारकरी बांधवांसाठी एकादशीचा दिवस हा कोणत्याही मोठ्या सणांपेक्षा निश्चितच लाहान नसतो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात एकादशी येते. तिला ‘जया एकादशी’ असे म्हणतात. यावर्षी जया एकादशी 20 फेब्रुवारीला आहे. ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. या एकादशीचे व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. श्रद्धेनुसार जो भक्त खऱ्या भक्तिभावाने जया एकादशीचे व्रत करतो त्याला अगणित पुण्य प्राप्त होते. यादिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. त्यामुळे सकल दोषांपासून मुक्ती मिळते. ही पूजा करताना जया एकादशी व्रताची कथा वाचल्याने सौभाग्य प्राप्त होते.

    आख्यायिकेनुसार, धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना माघ महिन्याच्या एकादशीचे महत्त्व काय, असा प्रश्न विचारतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, या एकादशीचे व्रत केल्याने माणसाला भूत-प्रेतांचे भय राहत नाही. मग भगवान श्रीकृष्ण कथा सांगतात. एकदा नंदनवनात एक उत्सव चालू होता. या उत्सवास सर्व देव, सिद्धहस्त संत, दिव्यपुरुष उपस्थित होते. या उत्सवी कार्यक्रमात गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या. त्याचवेळी सभेत गात असलेल्या मल्यवन नावाच्या गंधर्वावर नर्तकी पुष्पावती मोहित झाली. मल्यवन तिच्याकडे आकर्षित झाला. त्याने संवेदना गमावल्या आणि सूर विसरला, ज्यामुळे तो गाण्याच्या प्रतिष्ठेपासून विचलित झाला.

    यामुळे देवराज इंद्र संतापला. ते दोघेही स्वर्गापासून वंचित राहतील. आणि त्यांना पृथ्वीवरील पिशाचाचे सर्वात खालचे रूप मिळेल, असा शाप इंद्राने दिला. शापाच्या प्रभावामुळे ते दोघेही भूत बनले. हिमालय पर्वतातील एका झाडावर अत्यंत वेदना सहन करू लागले. एक दिवस दोघेही अत्यंत दुःखी झाले होते. त्यांनी फक्त फळे खाल्ली. त्याच रात्री थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला. योगायोगाने त्यादिवशी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथी होती. अशा प्रकारे नकळतपणे एकादशीचे व्रत केल्यामुळे दोघांना पिशाच रूपापासून मुक्ती मिळाली. त्यानंतर ते पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले. त्यांना पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. त्या दोघांना पाहून देवराज इंद्र आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले की, ते शापातून कसे मुक्त झाले ? ज्यावर गंधर्वांनी सांगितले की, हा भगवान विष्णूच्या जया एकादशीचा प्रभाव आहे.

  • द ब्रोकन न्यूजच्या दुसरा सीझन

    द ब्रोकन न्यूजच्या दुसरा सीझन

    विनय वैकुळे दिग्दर्शित ‘द ब्रोकन न्यूज’ या वेबमालिकेचा पहिला सीझन लोकांना आवडला. आता या
    मालिकेचा दुसरा सीझन येत असून निर्मात्यांनी टीझर प्रदर्शित केला आहे. या घोषणेमुळे चाहते खूप उत्साहित
    झाले आहेत.
    ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ ने इन्टाखूग्रामवर एक छोटा व्हिडिओ जोडला आहे. ‘सत्य आणि संवेदना यातील फरक
    नाहीसा झाला तर भारत काय पाहणार?’ असे ऐकू येत आहे. ”जेव्हा मालिकेतील तिघे पुन्हा एकदा समोरासमोर
    येतील, ” असे त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.


    ‘द ब्रोकन न्यूज’ सीझन २ पत्रकारितेच्या जगातील खोटेपणा, प्रेम आणि संघर्ष पुढे आणतो. ‘पहला आवाज
    भारती’ ही एक स्वतंत्र वृत्तवाहिनी आहे. याचे प्रमुख संपादक-इन-चीफ अमिना कुरेशी (सोनाली बेंद्रे) आहेत.
    दुसरीकडे, ‘जोश 24/7 समाचार’चे मुख्य संपादक दीपंकर संन्याल (जयदीप अहलावत) आहेत.
    कमेंटमध्ये एका यूजरने लिहिले की, ”मी खूप उत्साहित आहे.” आणखी एका युजरने लिहिले की, ”अक्षय
    ओबेरॉयही या सीझनमध्ये प्रवेश करणार आहे. ” नुकतेच त्याच्या व्यक्तिरेखेचे अनावरण करताना त्याने सांगितले
    की, या मालिकेत मी एका सीईओची भूमिका साकारणार आहे, जो अमेरिकेतून परतला आहे.

  • रथसप्तमी

    रथसप्तमी

    रथसप्तमी हा वसंत ऋतुच्या आगमनाचा सण आहे. हिंदू धर्मात रथसप्तमीला फार महत्व आहे. हा सूर्याच्या उपासनेचा दिवस असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रथसप्तमी हा दिवस अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस असल्याचे मानले जाते. यादिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते. सूर्यदेवतेला लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जाते. माघ महिन्यात शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या सप्तमीला ‘अचला सप्तमी’, ‘आरोग्य सप्तमी’, ‘अर्क सप्तमी’,’माघी सप्तमी’ अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत. वसंत पंचमीनंतर दोन ते तीन दिवसांनी रथसप्तमी येते. यादिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते.

    यादिवशी काहीजण सूर्याची साग्रसंगीत पूजा करतात. सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याची पूजा केली जाते. यासाठी सूर्याची प्रतिमा रथात ठेवतात. तुळशी वृंदावनासमोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. यादिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या भांड्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात. त्यानंतर या दुधापासून खीर बनवून सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी उपवासही केला जातो. महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकू समारंभ रथसप्तमी दिवशी संपतात.

    दक्षिण भारतातही हा सण उत्साहाने साजरा केला जातो. संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. मलियप्पा मंदिरात रथयात्रा आयोजित केली जाते. विविध वाहने तयार करुन त्यातून देवांची मिरवणूक काढली जाते. प्राचीन साहित्यातही सूर्याच्या उपासनेचे महत्त्व आढळते. दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये ‘ब्रह्मोत्सव’ साजरा होतो. तिरुपती येथील बालाजी मंदिरातही हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो. कोणार्क येथील सूर्यमंदिरात रथसप्तमीला सूर्यनारायणाचा जन्मोत्सव साजरा करतात. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासनातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात. देशातील अन्य राज्यांमध्येही रथसप्तमी साजरी केली जाते.

  • पंचायत तीन लवकरच

    पंचायत तीन लवकरच

    ओटीटी मंचावरील बहुचर्चित वेबमालिकेमध्ये समाविष्ट असलेली ‘पंचायत 3’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
    निर्मात्यांनी ‘पंचायत 3’ च्या चित्रीकरणाची सुरुवात जाहीर केली होती. आता प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात
    आली आहे. ‘द व्हायरल फिव्हर’ द्वारे या मालिकेची निर्मिती केली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार
    मिश्रा यांनी केले आहे, चंदन कुमार यांनी ‘पंचायत ३’ ची कथा लिहिली आहे.


    दोन सुपरहिट भागांनंतर आता तिसरा भागही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील सर्व पात्रे
    त्यांच्या विनोदाची छाप सोडतात. समाजमाध्यमांवर मालिकेतील संवादांवर अनेक मीम्सही बनवले जातात.
    प्राइम व्हिडीओने तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. हा भाग 28 मे रोजी ॲमेझॉन प्राइम
    व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि
    सानविका यांच्या यात भूमिका आहेत.
    मागील दोन हंगामात ‘फुलेरा’ गावातील रहिवासी वेगवेगळ्या आव्हानांशी झुंजताना दिसले. आता नव्या भागत
    ही मालिका नवे वळण घेणार आहे, म्हणजेच फुलेरा गावात पुन्हा गोंधळ उडणार आहे.

  • कल्की चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वीच बंपर कमाई

    कल्की चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वीच बंपर कमाई

    चाहते प्रभासच्या कल्की 2898 AD या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 10 जून
    रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर, निर्माते चाहत्यांना काही अपडेट्स देत आहेत ज्यामुळे
    लोकांमध्ये याबद्दल चर्चा आहे. प्रभाससोबत, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हसन आणि दुल्कर
    सलमान यांनी कल्की 2898 एडीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. प्रभास भारतातच नाही तर
    परदेशातही प्रसिद्ध आहे. त्याच्या सालार, बाहुबली या चित्रपटांनी अमेरिकेत चांगला व्यवसाय केला. आता
    कल्की 2898 AD देखील अमेरिकेत चमत्कार करण्यासाठी सज्ज आहे. अमेरिकेत या चित्रपटाचे ॲडव्हान्स
    बुकिंग सुरू झाले असून, या चित्रपटाने अवघ्या एका दिवसात करोडोंची कमाई केली आहे.


    कल्की 2898 एडी 27 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे आणि त्याचा ट्रेलर 10 जून रोजी रिलीज
    होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही, त्यामुळे निर्मात्यांनी अमेरिकेत
    त्याचे आगाऊ बुकिंग सुरू केले आहे.
    अमेरिकेतील काही खास स्क्रीनवर ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. ज्याला मिळालेला प्रतिसाद अप्रतिम आहे.
    वृत्तांवर विश्वास ठेवला तर अवघ्या 24 तासांत चित्रपटाची 4200 तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे
    चित्रपटाने एका दिवसात 1.1 कोटींची कमाई केली आहे. आगाऊ बुकिंगच्या पहिल्या दिवसासाठी हे कलेक्शन
    बऱ्यापैकी आहे. आतापर्यंत केवळ 116 चित्रपटगृहांमध्ये बुकिंग सुरू झाले आहे. रिलीजची तारीख जसजशी
    जवळ येईल तसतशी चित्रपटगृहांमध्येही बुकिंग सुरू होईल. चित्रपटाची चर्चा जोरात जाणार आहे. चित्रपट
    प्रदर्शित होण्यासाठी 20 दिवस बाकी असून हा चित्रपट जगभरात अनेक विक्रम मोडणार आहे.

  • सिंधु संस्कृती

    सिंधु संस्कृती

    भारतातील सिंधु संस्कृती प्राचीन आहे. सन 1924 मध्ये सिंधू नदीवरील मोहेंजोदडो आणि पंजाबमधील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात अत्यंत विकसित नागरी संस्कृतीचे अवशेष आढळून आले, ज्याला ‘सिंधू संस्कृती’ किंवा ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव देण्यात आले. या प्राचीन शहरांचा नियोजित आराखडा, रुंद रस्ते, विटांनी बांधलेली मोकळी घरे आणि भूमिगत गटारांची व्यवस्था अगदी आपल्यासारखीच आहे. येथीज लोक मातादेवीचे पूजन करीत. ही शहरे आणि ‘मेसोपोटेमिया’ यांच्यातील व्यापारी आणि राजकीय संबंधांची माहिती येथे सापडलेल्या तत्सम सुंदर मातीच्या भांड्यांवरून मिळते. मानवाने मातीपासून शिल्पकलेची सुरुवात केली. सिंधू संस्कृतीच्या या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात टेराकोटाची शिल्पे सापडली आहेत.

    हडप्पामध्ये लाल चुनखडीपासून बनवलेले वर्तुळाकार नर धड सापडले आहे. हे त्याच्या नैसर्गिक मुद्रा आणि शुद्ध संरचनेच्या दृष्टीने अद्वितीय आहे. ही सुंदर मूर्ती पाहून एखाद्या शिल्पकाराने एवढी सुंदर मूर्ती त्या प्राचीन काळात कशी तयार केली असेल, असा प्रश्न पडतो. या पुतळ्याचे डोके आणि हात स्वतंत्रपणे कोरले गेले. या शहरी संस्कृतीतील आणखी एक अद्वितीय उदाहरण म्हणजे मोहेंजोदडो येथील शाल विणत असलेल्या व्यक्तीची प्रतिमा आहे. सुमेरमधील दार आणि सुसा येथे सापडलेल्या मूर्तीमध्ये खोल साम्य आहे. हडप्पामध्ये सापडलेली त्याच काळातील पुरुष नर्तकीची मूर्ती अतिशय महत्त्वाची आहे. सुमारे 5000 वर्षांपूर्वीच्या जीवनात संगीत आणि नृत्याला महत्त्वाचे स्थान होते. हा पुतळा 5000 वर्षांपूर्वीच्या शिल्पकाराचे कौशल्य देखील दर्शवितो. दुर्दैवाने हा पुतळा जीर्ण अवस्थेत आहे.

    मोहेंजोदडो येथे सापडलेल्या त्याच काळातील नृत्य करणाऱ्या मुलीची कांस्य मूर्ती ही बहुधा हडप्पा काळातील धातूच्या कामातील सर्वात महान अवशेषांपैकी एक आहे. ही कारागिरांनी केलेली उत्कृष्ट कला आहे. या कारागिरांना कांस्य कसे वापरायचे, हे माहीत होते. चिकणमातीची बनलेली वृषभ मूर्ती या उत्खननात सापडली आहे. वृषभाच्या या मूर्तीमध्ये त्याचे डोके उजवीकडे वळलेले असून त्यांच्या गळ्यात दोरी आहे. मोहेंजोदडोमध्ये प्राण्यांच्या आकाराचे खेळणे सापडले आहे. उत्खननादरम्यान सापडलेल्या सर्वात मनोरंजक वस्तूंपैकी हे एक आहे.

    उत्खननात मोठ्या प्रमाणात शिक्के सापडले आहेत. हे शिक्के वेगवेगळ्या आकाराचे आहेत. साधारणपणे ते आयताकृती, काही गोलाकार आणि काही दंडगोलाकार आहेत. शीर्षस्थानी एक शिलालेख देखील आहे, ज्याचा अर्थ अद्याप उलगडला गेला नाही. या शिक्याेतमध्ये बसलेल्या स्थितीत एक योगी आहे, जो बहुधा शिव पशुपती आहे. या योग्याभोवती चार प्राणी आहेत -गेंडा, म्हैस, एक हत्ती आणि वाघ. सिंहासनाच्या खाली दोन हरणे दाखवली आहेत. पशुपती म्हणजे प्राण्यांचा स्वामी. हडप्पा आणि मोहेंजोदडो आता पश्चिम पाकिस्तानात आहेत. या संस्कृतीची सुमारे शंभर स्थळे भारतात सापडली आहेत. त्यापैकी काही आत्तापर्यंत उत्खननात सापडल्या आहेत. यावरून असे दिसून येते, की सिंधू संस्कृतीचा विस्तार विस्तृत क्षेत्रात होता. इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा अंत झाला. याचे कारण भारतावर आर्यांचे आक्रमण झाले असावे. 

  • बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटीवर

    बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटीवर

    बडे मियाँ छोटे मियाँ ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाला खूप प्रेम
    मिळाले, पण नंतर अक्षय कुमारच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. या चित्रपटाला थिएटरमध्ये
    लोकांचे प्रेम मिळाले नसले तरी आता बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हा
    चित्रपट कधी आणि कोणत्या OTT वर प्रदर्शित होणार हे आम्ही तुम्हाला सांगतो.

    बडे मियाँ छोटे मियाँ 2024 च्या ईदच्या खास मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर धडकला होता. या चित्रपटाने 59.17
    कोटी रुपयांचे आजीवन कलेक्शन केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या जोडीने
    निश्चितच कमाल केली. या चर्चेदरम्यान, लोक या चित्रपटाच्या ओटीटीवर प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट
    पाहत आहेत.


    जूनमध्ये ओटीटीवर रिलीज होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित
    होणार आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. तुम्ही ते तुमच्या
    कुटुंबासह घरी बसून OTT वर सहज पाहू शकता.

  • हिरामंडीतील नवे गाणे

    हिरामंडीतील नवे गाणे

    हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेले संजय लीला भन्साळी यांची पहिली
    वेबमालिका ‘हीरामंडी’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रींनी सजलेल्या ‘हिरामंडी’ची पहिली
    झलक पाहिल्यानंतर चाहते या वेबमालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबमालिकेतील आणखी एक
    नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे बोल ‘तिलस्मी बाहें’ असे असून ते सोनाक्षी सिन्हावर चित्रीत
    करण्यात आले आहे.
    या गाण्यात सोनाक्षीची किलर स्टाईल पाहण्यासारखी आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबमालिकेतील ‘सकल बन’
    चे पहिले गाणे प्रदर्शित झाले, याला रसिकांनी भरभरून दाद दिली. या दुसऱ्या गाण्यात सोनाक्षी सिन्हा तिच्या
    सौंदर्याची झलक दाखवताना दिसत आहे. संजय लीला भन्साळी यांचे संगीत हे गाणे आणखी प्रेक्षणीय बनवत
    आहे.


    गायिका सर्मिष्ठा चटर्जी यांनी ‘तिलस्मी बाहे’ ला आवाज दिला आहे, गीतकार ए.एम. तुराज यांनी हे लिहिले आहे.
    एकंदरीत ‘हिरामंडी’चे हे गाणे खूपच अप्रतिम आहे. भन्साळी म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालेल्या या
    गाण्याला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.
    या वेब मालिकेमध्ये पाकिस्तानच्या ‘रेड लाईट’ भागातील वेश्याव्यवसायांची कथा दाखविण्यात येणार आहे.
    प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी ही मालिका १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित
    होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

  • अंबरनाथमधील शिवमंदिर

    ठाण्यातील अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर आता कात टाकणार आहे. मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे १५० कोटींचा प्रकल्प राबविला जात आहे. या पुरातन मंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्याने पुरातत्व विभाग खडबडून जागा झाला असून मंदिराची झीज थांबविण्यासाठी काम सुरू केले आहे.

    मंदिरावरील शिल्पांची झीज थांबविण्यासाठी सलाईनद्वारे केमिकलचा मारा केला जात आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यात शिल्प झिजणार नाहीत आणि ते आणखी टिकाऊ होतील, अशी माहिती मंदिरावर काम करणारे सीनियर मॉड्युलर सुधीर वाघ यांनी दिली आहे. अंबरनाथचे हे शिवमंदिर तब्बल ९६३ वर्षांचे आहे. इसवी सन १०६० मध्ये शिलाहार राजा मंबवाणी यांनी हे मंदिर बांधले होते. हे शिवमंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते. या मंदिरावर अतिशय बारीक शिल्पे, देवतांच्या मूर्ती आहेत.

    अंबरनाथचे हे शिवमंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. या मंदिराची युनेस्कोनेही दखल घेतली आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीत या मंदिराचा समावेश आहे. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला ‘वालधुनी नदीचा ओढा’ असे म्हटले जाते. या ठिकाणाचे मूळ नाव ‘आम्रनाथ’ असे होते. या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव पडला आहे, असे सांगितले जाते. बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत.

  • गुलाबी साडी

    गुलाबी साडी

    सध्या समाजमाध्यमांवर ‘गुलाबी साडी’ हे गाणे चांगलेच गाजत आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या
    गाण्याची भुरळ पडलेली दिसत आहे.
    हे गाणे प्रथम फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२४ सोहळ्याच्या मंचावर सादर करण्यात आले. गाण्याचे गायन
    संजू राठोड यांनी केले आहे.


    संजू राठोड सांगतात की, गुलाबी साडी हे गाणे त्यांनी दिवाळीच्या दिवशी सकाळी लिहिले होते. काही
    कारणांमुळे ते दिवाळीला घरी गेले नव्हते. मग घरी बसून काय करायचे, असा प्रश्न पडला होता. त्यावेळेस त्यांनी
    ‘गुलाबी साडी’ हे गाणे तयार केले.
    या गाण्यानंतर त्याचे नवे गाणे चांगलेच गाजत आहेव ‘ब्राईड तुझी नवरी’ असे या गाण्याचे नाव आहे. या
    गाण्यात ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील आहे.

  • ओशिवरा नदी वाचवा

    मुंबईतील ‘ओशिवरा’ नदी प्रदूषित होत आहे. या प्रवाहात कारखान्यातील टाकाऊ माल सातत्याने टाकला जात असल्याचे स्थानिकांना आढळून आले आहे. येथे सीसीटीव्ही कधी बसवले जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीसीटीव्हीमुळे नैसर्गिक स्थळांची होणारी हानी थांबू शकेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


    पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईमध्ये दरवर्षी नालेसफाई केली जाते. नद्यांच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. या नद्यांमध्ये कचरा टाकू नये यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याची तक्रार गोरेगावमधील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप सावंत यांनी केली आहे.


    नदी-नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाणार होते. मात्र आजपावेतो कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.

  • अबीर गुलाल

    अबीर गुलाल

    ‘कलर्स मराठी’ वाहिनी टीआरपीत मागे पडल्यावर नवनव्या मालिका या वाहिनीवर येऊ लागल्या आहेत. नव्या
    विषयाच्या, नव्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. या वाहिनीवर
    ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा केचा दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यात
    आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत मोठी उत्कंठा दिसत आहे.


    ‘अबीर गुलाल’ मालिकेत अभिनेत्री गायत्री दातार शुभ्रा ही भूमिका साकारताना दिसणार आहे. शुभ्रा अतिशय
    श्रीमंत कुटुंबातून आली असून तिला काळा हा रंग आवडत नाही. अभिनेत्री पायल जाधव यात दिसणार आहे.
    अभिनेत्री पायल जाधव हिची ही पहिलीच मालिका आहे. तिने ‘बापल्योक’ या चित्रपटात काम केले आहे.

  • पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा

    नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा म्हणजे विलक्षण आकर्षण असते. रामनवमीला ही यात्रा निघत असते. ती पाहण्यासाठी विदर्भासह शेजारील राज्यांतूनही नागरिक येत असतात. यावर्षी रामनवमीला १७ एप्रिल रोजी मंदिरातून शोभायात्रा दुपारी ४ वाजता निघणार आहे. या शोभायात्रेत १०८ मंगलकलश डोक्यावर घेऊन चालणाऱ्या कन्या दिसतील.

    पौराणिक प्रसंग तसेच सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, शहनाई वादक, ढोल-ताशा व ध्वजधारी पथक, गांधीबाग स्केटिंग क्लब व शंखनाद करणारे पाचशे सदस्य आदींचा समावेश राहील. शोभायात्रेतील मुख्य रथावरील बॅकग्राऊंड हे अयोध्येतील राम मंदिराचे असेल.

    शोभायात्रेचे हे ५८वे वर्ष आहे. या सोहळ्यात शंखनाद, तांडव नृत्यासह चित्ररथांचा समावेश असणार आहे, अशी माहिती पुनित पोद्दार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. ही शोभायात्रा पोद्दारेश्वर राम मंदिर, इतवारी शहीद चौक, महाल, कॉटन मार्केट, सीताबर्डी असा राहील. जागोजागी शोभायात्रेचे विविध संस्था, संघटनांद्वारे स्वयंस्फूर्तीने स्वागत होणार आहे. महाप्रसादाचे वितरण होईल.

  • थोडं तुझं आणि थोडं माझं

    थोडं तुझं आणि थोडं माझं

    ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ लवकरच येत आहे. या मालिकेमधून शिवानी
    सुर्वे ही अभिनेत्री दिसणार आहे.
    ‘देवयानी’ मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात अभिनेत्री शिवानी सुर्वे पोहोचली होती. आता ती पुन्हा प्रेक्षकांच्या
    भेटीला येणार आहे. तिच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. ही मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता
    दिसणार आहे.


    या मालिकेत ती ‘मानसी’ ही भूमिका साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी
    आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचे साम्राज्य उभे केले आहे. आपल्या
    मुलीनेही खूप शिकून नाव कमवावे असे त्यांचे स्वप्न आहे. वडिलांचे स्वप्न मानसीला काही करुन पूर्ण करायचे
    आहे. दुसरीकडे कॉलेजमधील गायत्रीच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. जेव्हा मानसी पदवी परीक्षेत
    पहिली येते, तेव्हा वादास सुरुवात होते.

  • आज्जीबाई जोरात

    आज्जीबाई जोरात

    ‘आज्जीबाई जोरात’ हे बालनाट्य सध्या चर्चेत आहे. या नाटकात ‘आज्जीबाई’ च्या भूमिकेत अभिनेत्री निर्मिती
    सावंत असणार आहेत. क्षितिज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत
    यांना अनेक वर्षांपासून बालनाट्य करण्याची इच्छा होती. २४ वर्षांपूवी त्यांची जाऊबाई जोरात’ तसेच ‘गंगूबाई
    नॉनमॅट्रिक’ ही नाटके विशेष गाजली होती

    .
    त्यांना आता नवीन बालप्रेक्षक तयार करायचा आहे. ती इच्छा ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाच्या निमित्ताने पूर्ण
    होणार असल्याने त्या खूश आहेत. निर्मिती इतर माध्यमांमध्ये अभिनय करीत असल्या तरी त्यांची नाटकाशी नाळ
    जुळलेली आहे. इतर ठिकाणी कितीही कामे केली तरी नाटकात काम करणे सुरू राहील, असे त्यां सांगतात.  या
    नाटकात पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे असे कलाकार आहेत. या नाटकात नाच,
    गाणी, धमाल असून  कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तसेच  तगडे कलाकार असल्याने हे नाटक जोरात चालणार आहे,
    अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

  • होळी

    होळी

    फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण भारतामध्ये साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशात होळीला वेगवेगळी नावे आहेत. होळी हा रंगांचा सण आहे. होळीला ‘होळी पौर्णिमा’, ‘होलिकोत्सव’, ‘होलिकादहन’ अशी विविध नावे आहेत. होळी साजरी करण्याचेही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. विविध प्रदेशात खाद्यपदार्थही वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. महाराष्ट्रात मात्र पुरणपोळीला मान असतो. कोकण तसेच गोव्यात होळीचा सण खूपच महत्त्वाचा असतो. होळीला येथे ‘शिमगा’ म्हणतात. होळी येथील गावांमध्ये सार्वजनिकरित्या साजरी केली जाते.

    फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या लोकोत्सवाला ‘फाल्गुनोत्सव’ आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंतऋतूच्या आगमनानिमित्त ‘वसंतागमनोत्सव’ किंवा ‘वसंतोत्सव’ असेही म्हणण्यात येते. होळीच्या दिवशी काही लाकडे मंत्रोच्चार म्हणून जाळण्यात येतात. आणि पेटलेल्या होळीभोवती लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. होळी नंतर रंगपंचमी येते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला ‘धुळवड’ असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते.

    धुळवड साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो. नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर होळी साजरी केली जाते. सर्व गावकरी येथे एकत्र जमतात.

  • मास्टरमाईंड

    मास्टरमाईंड

    ‘मास्टरमाईंड’ हे मराठी नाटक सद्ध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. विजय केंकरे यांनी या
    नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग येत्या १८ मे रोजी शिवाजी मंदिरात होणार
    आहे.


    जय विचारे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकात अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांच्या
    भूमिका आहेत. अशोक पत्कींचे संगीत व प्रदीप मुळ्येंचे नेपथ्य नाटकाला लाभले आहे. शीतल तळपदे यांची
    प्रकाशयोजना आहे. हे एक रहस्यप्रधान नाटक असून या नाटकाला प्रतिसादही उत्तम आहे. नाटक पाहताना
    क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते. यामुळेही रसिकांची नाटकास दाद मिळते.

  • रामनवमी

    रामनवमी

    मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. दरवर्षी हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या नवव्या तिथीला श्री रामनवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंतही हा सोहळा साजरा करतात. या दिवसात अनेक लोक उपवास करतात. हा सण विशेषतः वैष्णव समाजात साजरा करतात. या दिवशी भाविक रामायणाचे पठण करतात. रामरक्षा स्तोत्र वाचतात. अनेक ठिकाणी भजन-कीर्तनाचे आयोजनही केले जाते. प्रभू श्रीरामांची मूर्ती पाळण्यामध्ये घातली जाते व जन्मसोहळा साजरा केला जातो.

    यादिवशी श्रीरामांची पूजा करताना सर्वप्रथम स्नान करून पवित्र होऊन पूजास्थळी बसावे. पूजेत तुळशीची पाने आणि कमळाची फुले अवश्य असावीत. त्यानंतर श्री रामनवमीची षोडशोपचारे पूजा करावी. प्रसाद म्हणून खीर आणि फळे ठेवावीत. रावणाच्या अन्यायाने जनता त्रस्त झाली होती. त्याने देवांकडून अमरत्वाचे वरदान घेतले होते. त्याच्या अत्याचाराला कंटाळून देव विष्णूंकडे गेले, आणि प्रार्थना केली.

    परिणामी, रावणाचा पराभव करण्यासाठी राजा दशरथांची पत्नी कौसल्या हिच्या पोटी भगवान विष्णूंनी श्रीरामाच्या रूपात जन्म घेतला. त्यांनी रावणाचा वध केला. तेव्हापासून चैत्राची नवमी तिथी रामनवमी म्हणून साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. नवमीच्या दिवशी स्वामी तुळशीदासांनी ‘रामचरित मानस’ रचण्यास सुरुवात केली, असेही म्हटले जाते.

  • ‘ये रे ये रे पैसा ३’

    ‘ये रे ये रे पैसा ३’

    ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे फार मनोरंजन केले होते. त्यानंतर या चित्रपटाने ‘ये रे ये रे पैसा २’ सुद्धा
    आणला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा
    करण्यात आली आहे.


    या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते. दि. १ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून
    हसायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमावर जोडण्यात आले आहे. ‘ये रे ये रे पैसा ३’
    या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची असून संवाद
    लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे.


    पैसा मिळविण्यासाठीची धडपड या चित्रपटात पहायला मिळाली होती. ‘ये रे ये रे पैसा ३’ मध्ये काय वेगळे
    दाखविणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाएली आहे.


    चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश
    भोसले असे कलाकार आहेत. सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, कुमार मंगत पाठक,
    ओमप्रकाश भट्ट, नासिर शरीफ हे या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. निनाद बत्तीन हे या चित्रपटाचे
    सहनिर्माते आहेत.

  • नागपंचमी

    नागपंचमी

    नागपंचमी हा वेदकाळापासून चालत आलेला सण आजही भक्तीभावाने साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी येते. भारतीय संस्कृती मुळची कृषिप्रधान आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतीची नासधूस करणाऱ्या उंदरांचा नायनाट करतो. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागोबाची मूर्तीस्वरुपात घरोघरी पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील हा पहिला सण आहे. याद्वारे नाग या प्राण्याबद्दल आदर भावना व्यक्त केली जाते. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते.

    यादिवशी सकाळी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. रांगोळी काढतात. नागाचे चित्रे भिंतीवर काढतात. त्या चित्राखाली त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणतात, फुगड्या खेळतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी यादिवशी जिवंत नागाची पूजा केली जाते. सांगलीतील बत्तीस शिराळा याठिकाणी अशी पूजा होते. नागोबास दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखविला जातो. जेवणात गोड पदार्थ बनविले जातात. यादिवशी काही ठिकाणी पदार्थ चिरत नाहीत, भाजत नाहीत, तळत नाहीत. अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. कोकणात नागपंचमीस हळदीच्या ओल्या पानांमधील ‘पातोळी’ हा पदार्थ बनविला जातो. काही ठिकाणी पुरणाचे दिंडे बनवतात. कातरवेळेस नागोबाची उत्तरपूजा करून अळूच्या पानांमध्ये नेऊन ही मूर्ती ठेवली जाते.

    या सणाच्या निमित्ताने बहिणी भावाच्या समृद्धीसाठी उपवास करतात. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूर्वी महिला झिम्मा-फुगडी, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळे करायच्या. अर्थात, नागपंचमी हा एक उत्साहवर्धक सण आहे. नागपंचमी साजरी करण्यामागे काही काल्पनिक कथा सांगितल्या जातात, मात्र नागदेवतेप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठीच हा सण मुख्यत्वेकरुन साजरा केला जातो.

  • राजाराणीची उत्कंठा

    राजाराणीची उत्कंठा

    सत्य घटनेवर आधारित असलेली गावाकडील प्रेमकहाणी दाखविणारा ‘राजाराणी’ हा चित्रपट लवकरच
    प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाला ‘एक थरारक प्रेमकहाणी’ अशी टॅगलाईन दिलेली आहे. येत्या ४
    ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
    सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे
    यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत
    विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर यांनी गाणी गायली
    आहेत. छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे.


    अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार
    आहे. याशिवाय या चित्रपटात भारत गणेशपुरे, सूरज चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, तानाजी गलगुंडे, माधवी जुवेकर,
    भक्ती चव्हाण आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.