बाळाची आंघोळ

बाळाची त्वचा नाजूक असल्याने त्याला आंघोळ घालताना आईला फार भीती वाटत असते. काळजी करू नका. आंघोळीसाठी वापरलेल्या साबणाने तसेच बाळाच्या अंगावरील तेलामुळे हात चटकन निसटू शकतो. त्याबाबत सावध रहा. बाळाला आंघोळीसाठी घेऊन जाण्यापूर्वी त्याला तेलाने छान हलक्या हाताने मसाज करा. आंघोळीसाठी आणि आंघोळीनंतर आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी नेऊन ठेवा.

बाळाच्या आंघोळीसाठी कोमट पाणी वापरा. बाळाला आंगोळीसाठी नेण्यापूर्वी बादलीत पाणी भरून ठेवा. आंघोळीपूर्वी पाणी किती गरम आहे, हे बघून घ्या. बाळाची त्वचा फुलासारखी नाजूक असते. कुठल्याही रसायनांच्या संपर्कात आल्याने बाळाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे अगदी नैसर्गिक साबण वापरा. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

बाळाला आंघोळ घालताना त्याला योग्य पद्धतीने धरणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपणास सोयीस्कर पडेल अशा बेताने बाळाला गुडघ्यावर धरा. सावकाशपणे अंगावर पाणी घालून बाळाचे केस धुवा. त्यानंतर त्याचा चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. बाळाला एका हाताने आधार द्या. दुसऱ्या हाताने आंघोळ घाला. पाटावर बसून समोर पाय सोडून बाळाला पायावर ठेवून आंघोळ घालावी. शांतपणे, धीराने, न घाबरता हे काम करावे.

जर बाळाला ‘बाथटब’मध्ये आंघोळ घालायची असेल तर त्याच्या डोळ्यात, नाकात आणि कानात पाणी जाणार नाही, याची विशेष काळजी घ्या. चुकूनही बाळाला ‘बाथटब’मध्ये एकटे सोडू नका. बाळाची आंघोळ झाल्यावर सर्वप्रथम बाळाला मऊ सुती टॉवेलमध्ये गुंडाळून घ्या. बाळाचे संपूर्ण अंग हलक्या हाताने मऊ टॉवेलच्या सहाय्याने पुसून कोरडे करून घ्या. सैल सुती स्वच्छ कपडे घाला. आंघोळ केल्यावर बाळाला भूक लागते. यावेळी बाळाला पोटभर स्तनपान करा. बाळाचे पोट भरल्यावर ते छान झोपी जाईल.






170 वेळा पाहिलं