बल्लाळ गड

महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर बल्लाळगड हा एक डोंगरी किल्ला आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात मुंबई – अहमदाबाद महामार्गानजीक हा किल्ला आहे. हा किल्ला पायथ्यापासून ५०० मीटर उंचीवर आहे. या भागात असणाऱ्या सेगवा, असावा, अशेरीगड या इतर किल्ल्यांच्या मानाने बल्लाळगडाची उंची पायथ्याच्या काजळी गावापासून कमी असल्याने अर्ध्या तासात किल्ला सहज पाहून होतो.

काजळी गावात गोरखचिंचेचे अनेक अवाढव्य वृक्ष आहेत. पोर्तुगीजांनी भारतात आणलेली ही झाडे आहेत. काजळी हे बल्लाळगडाच्या पायथ्याचे गाव आहे. तेथे जाण्यासाठी मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील तलासरी गाठावे लागते. त्यापुढे अंदाजे १९ किमीवर काजळी गाव आहे. मुंबईपासून हे अंतर साधारण १४९ किमी आहे. या किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.बल्लाळगडाच्या माथ्याच्या अलीकडे एका झाडाखाली एक वीरगळ असून या वीरगळावर एक योद्धा घोड्यावर बसलेला दाखवलेला आहे. हा घोडा काठेवाडी पद्धतीचा आहे.

वीरगळ पाहून बलाळगडाच्या माथ्याकडे चालत गेल्यास चार बुरुजांनी व तटबंदीने संरक्षित केलेला बल्लाळगडाचा माथा लागतो. त्यावरच्या ४ बुरुजांचे आणि तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. तटबंदी १५ फ़ूट उंच असून ५ फ़ूट रुंद आहे. प्रचंड मोठे दगड वापरून ती बनवलेली आहे. तटबंदीमध्ये शौचकूप बनवलेले पहायला मिळतात. तटबंदीच्या आत दोन मोठे हौद आहेत. त्यात दगड आणि पालापाचोळा पडल्याने ते भरून गेले आहेत. काजळी गावाच्या मागे बल्लाळगड आहे. गावातील शाळेसमोर एक गोरखचिंचेचे झाड आहे. त्याच्या डाव्या बाजूच्या मळलेल्या पायवाटेने १० मिनिटाचा चढ चढून माणूस गडावर पोहोचतो.






14,862 वेळा पाहिलं