भुवया व पापण्यांचे सौंदर्य

सुंदर डोळे चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतात. भुवया आणि पापण्या हलक्या किंवा अगदी बारीक असतील तर आपल्या डोळ्यांचे सौंदर्य कमी होणे स्वाभाविक आहे. ‘थ्रेडिंग’ आणि ‘प्लकिंग’मुळे काही महिलांच्या भुवया आणि पापण्यांवरील केस कमी होतात, किंवा काही महिलांचे केस कमी होतात. मुळातच कमी केस असल्यास ते पेन्सिलने गडद केले जातात. कधी-कधी ते अनैसर्गिक दिसते. चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्याऐवजी ते खराब होते. भुवया काळ्या आणि घट्ट करण्यासाठी काही घरगुती उपाय करणेही फायदेशीर असते. कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांना नैसर्गिकरित्या पोषण देते. भुवया लांब, काळ्या आणि जाड बनवते. म्हणून, कांद्याचा रस कापसात शोषून घेऊन भुवयांवर हलकेच लावावा. या उपायाने दोन आठवड्यांत फरक जाणवतो.


कोरफडीचा द्रवही यासाठी चांगला असतो. हा द्रवही कापसाने भुवया आणि पापण्यांवर लावावा. तो जवळपास तासभर राहू द्यावा. नंतर सामान्य पाण्याने धुवावा. यामुळे पापण्या आणि भुवया लवकर काळ्या आणि जाड होतील. कापसानेच पापण्या आणि भुवयांवर कच्चे दूध हलक्या हाताने चोळावे. पंधरा -वीस मिनिटांनी कोमट पाण्याने धुवावे. तसेच ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट पापण्या आणि भुवयांना पुरेसे पोषण देऊन वाढण्यास मदत करते.
रात्री मेथीदाणे भिजवून सकाळी बारीक करून घ्या. त्याचे वाटण बनवून आपल्या भुवया आणि पापण्यांवर लावावे. त्यानंतर पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवावे. या उपायांचे फायदे काही दिवसात दिसतील. आपल्या ब्युटीशिअनचा सल्ला घेऊन केल्यास चांगले !






14,732 वेळा पाहिलं