दातांचे सौंदर्य

दरवर्षी २० मार्च हा दिवस ‘जागतिक दंत आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाची संकल्पना ‘तुमच्या तोंडाचा अभिमान बाळगा’ अशी आहे. दातांच्या समस्यांबद्दल बोलायचे झाले तर दात पिवळे पडणे, हिरड्या दुखणे, दातदुखी आणि दात कमकुवत होणे अशा अनेक समस्या खूप त्रास देतात.

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने आपण आपले दात पांढरे आणि चमकदार बनवू शकता. वडाच्या फांदीचा वापर आपण दात साफ करण्यासाठी देखील करू शकता. वडाची मुळे तुरट असतात, जी केवळ दात पांढरे करीत नाहीत, तर दात आणि हिरड्यांचे आरोग्य देखील सुधारतात. तुळशीचा अनेक प्रकारे आपण वापर करू शकतो. हा उपाय करण्यासाठी तुळशीची पाने सुकवून त्याची भुकटी बनवावी. ही भुकटी दात घासण्यासाठी वापरावी. तुळशीची हिरवी पाने दातांची स्वच्छता सुधारतात, आणि दात पांढरे होतात. हे ‘पायोरिया’ सारख्या दंत समस्यांवर देखील उपचार करू शकते.

पांढरे निरोगी दात मिळविण्यासाठी कडुलिंब हा पारंपरिक उपाय आहे. कडुलिंबाच्या फांद्या आजही अनेक भारतीय ‘टूथब्रश’ म्हणून वापरतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये तुरट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी रोखतात, दातांमधील जंतू नष्ट करतात. दात पांढरे करण्यासाठी आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्रिफळा वापरू शकता. त्यामुळे तोंडाचे व्रण कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी त्रिफळा पाण्यात उकळवा. थंड होऊ द्या. कोमट झाल्यावर या पाण्याने दात स्वच्छ धुवा.






14,290 वेळा पाहिलं