अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा हल्ला
जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणी परिसरात मधमाशांनी पर्यटकांच्या शुक्रवार, दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी एका मोठ्या समूहावर अचानक हल्ला चढवला. या घटनेत सुमारे नव्वद पर्यटक जखमी झाले असून, लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असताना ही घटना घडली आहे. या अनपेक्षित हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात काही काळ भीतीचे सावट पसरले होते आणि पर्यटकांची मोठी पळापळ होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
याच ठिकाणी गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मोठ्या हल्ल्यात तब्बल ब्याऐंशी पर्यटक जखमी झाले होते. दोन महिन्यात सातव्यांदा असा प्रकार घडल्याने अजिंठा लेण्यांमधील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लेणी क्रमांक सव्वीस जवळ अचानक मधमाशा आक्रमक झाल्या आणि त्यांनी पर्यटकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात देशी पर्यटकांसह परदेशी पर्यटकांचाही समावेश असून, अनेक जण दंशामुळे गंभीर जखमी झाले आहेत. मधमाशांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पर्यटकांनी सैरावैरा धाव घेतल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. काही क्षणांतच परिसरात गोंधळ उडाला आणि पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. प्रशासनाने तत्काळ संबंधित भाग बंद करून पर्यटकांची वर्दळ थांबवली. मधमाशा शांत झाल्या नंतर पर्यटकांना पुन्हा लेणीत सोडण्यात आले.
मात्र पहिल्या हल्ल्यानंतर लेणी क्रमांक नऊ आणि दहा च्या परिसरातही मधमाशा पुन्हा आक्रमक झाल्या आणि दुपारनंतर दिवसभर थोडया-थोडया वेळाने मधमाशांकडून हल्ले सुरूच राहिले. त्यामुळे अनेक पर्यटकांनी लेणी न पाहताच माघार घेतली.
जखमी झालेल्या सर्व पर्यटकांना तातडीने अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात आणि परिसरातील इतर खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्या पर्यटकांची प्रकृती अधिक गंभीर होती, त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी सिल्लोड येथील मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या भीषण प्रकारामुळे अजिंठा लेणी परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या ऐतिहासिक स्थळावर यापूर्वीही अशा अनेक मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आता तरी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी सर्व स्तरांतून जोर धरत आहे.
वाढते तापमान, लेणीच्या परिसरातील मधमाशांच्या पोळ्यांची वाढती संख्या आणि पर्यटकांची होणारी गर्दी ही अशा घटनांमागची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी वनविभाग आणि संबंधित प्रशासनाने मधमाशांची पोळी सुरक्षितपणे हटविणे किंवा त्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करणे यांसारखी पावले तातडीने उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून आणि पर्यटन प्रेमींकडून केली जात आहे.