खोके निर्मिती उद्योग

कोणत्याही उत्पादनाचे वितरण आणि वाहतूक करताना व्यापारी आणि उत्पादकांना छोट्या-मोठ्या खोक्यांची सर्वात जास्त गरज असते. ‘कोरुगेटेड’ पेट्या वजनाने खूप हलक्या आणि लाकडी खोक्यांपेक्षा स्वस्त असतात. टिकाऊ आणि कमी किंमतीमुळे खोक्यांना व्यापारी आणि उत्पादक प्राधान्य देतात. खोके लाकडाच्या लगद्यापासून तयार केले जातात, परंतु यामध्ये 20 ते 25 टक्के लाकडाचा वापर केला जातो. हा एक मोठा उद्योग आहे. त्यासाठी भांडवल गोळा करून, अभ्यास करून, देखरेख केल्यानंतर आर्थिक नियोजनाने प्रकल्प सुरू करता येईल. यासाठी तज्ज्ञांची मदत आणि सल्ला घेणे योग्य ठरेल. पुस्तकात किंवा संकेतस्थळावर वाचून एवढा मोठा प्रकल्प सुरू करणे शक्य नाही.
तयार पत्र्यांचे गठ्ठे आणून हे खोके बांधण्याचा उद्योग सुरू केला तर तो लघुउद्योग होऊ शकतो. ‘कोरुगेटेड बॉक्स कंपनी’ उत्पादकांकडून वेष्टनाचे तयार पत्रे खरेदी करेल. ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य आकाराच्या खोक्यांची निर्मिती करून हे काम करेल. बंडल तयार करताना बंडलचे तयार पत्रे घेऊन क्रिझिंग मशीनच्या सहाय्याने खोक्याच्या आकाराचे तुकडे तयार करावेत. खोके तयार करताना तुम्हाला कुठे फोल्ड करायचे आहे ते चिन्हांकित करावे.
आकारानुसार कापलेले तुकडे फोल्ड करून खोके तयार करावेत. प्रत्येक व्यापारी, कंपनी, कारखानदार, लहान-मोठे दुकानदार, लघुउद्योजक यांना त्यांचा माल वेष्टनबंद करण्यासाठी खोक्यांची गरज असते. हे खोके वजनाने हलके असतात, दिसायला सुंदर असतात आणि ते जलरोधक देखील असू शकतात. या पेट्यांना स्ट्रॅपिंगची आवश्यकता नसते. उत्पादक खोक्यावर त्याच्या मालाच्या उत्पादनाची जाहिरात करू शकतो. हे खोके वाहतुकीसाठी सोयीचे असून उत्पादनांना सुरक्षितता देखील देतात. कमी जागेत अधिक सामग्री ठेवू शकतात.
ज्या उद्योजकांना कमी भांडवलात खोके बांधण्याचा उद्योग करायचा आहे आणि मोठा व्यवसाय करायचा आहे, त्यांनी ‘कॉसरोटेड बॉक्स’ निर्मिती प्रकल्पाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रकारचे उद्योगपती, उत्पादक, व्यापारी, विक्रेते ते वापरू शकता. ‘कोरुगेटेड बॉक्स’ ला चांगली मागणी आहे. जवळची औद्योगिक वसाहत, तेथील कंपन्या, कारखाना, उत्पादकांना भेटावे. त्यांना खोक्यांचे नमुने दाखवावे. त्यांना हवा तसा खोका तयार करून द्यावा.
यासोबतच विक्री प्रतिनिधी, चहाचे व्यापारी, स्वीट मार्ट, कापड व्यापारी, इलेक्ट्रिक उपकरणे, नाजूक काचेच्या वस्तू, तंबाखू उत्पादने, खेळणी, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, खाद्यपदार्थ, बिस्किटे, माचिस, अन्न-प्रक्रिया उद्योग यांच्यासाठीही खोके बनवू शकता. जर मालाचा दर्जा चांगला असेल तर तुम्हाला सर्व चांगली मागणी मिळत जाईल. क्रिझिंग मशीन, स्टिचिंग मशीन, कोरुगेटेड मशीन, स्लिटिंग मशीन, बोर्ड कटर मशीन, शीट प्रेसिंग मशीन, बॉक्स स्टिचिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटर इ. यंत्रसामग्री यासाठी आवश्यक असते.