सह्याद्री मराठी वाहिनी

Category: भटकंती

विविध तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे, गडकिल्ले आणि समुद्र किनाऱ्यांवर जायचंय? पर्यटनाची संपूर्ण माहिती ‘भटकंती’ या सदरात!

  • महाराष्ट्र निसर्ग उद्यान

    महाराष्ट्र निसर्ग उद्यान

    मुलांना सुट्टी लागली की दर आठवड्याला कुठेतरी बाहेर फिरायला न्यावंच लागतं. मुंबईतील निसर्गाच्या सानिध्यात असलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ होय. ३७ एकरांच्या कचऱ्याच्या ढीगाऱ्याखालील जमिनीचे परिवर्तन या निसर्ग उद्यानात करण्यात आलेले आहे. १९९४ पासून या रुपांतरणास सुरुवात झाली आणि आज धारावीच्या जवळ आपल्याला हे झाडांच्या दाटीवाटीने बहरलेले उद्यान पाहायला मिळते.

    निसर्गाचे संवर्धन, शिक्षण आणि त्या विषयीची जनजागृती हे हेतू डोळ्यांपुढे ठेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (मुंमप्रविप्रा) ने पुढाकार घेऊन महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची निर्मिती केली आहे. हे निसर्ग उद्यान म्हणजे मानवनिर्मित जंगलाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. ह्या मानवनिर्मित जंगलालाच जोडून माहीमच्या खाडीतील म्हणजेच मिठी नदीच्या पात्रातील तिवरांची नैसर्गिक जंगले आहेत. नैसर्गिक संपदेचा वारसा टिकवून ठेवणे आणि त्यांचे संवर्धन करणे या दुहेरी हेतूने साकारलेल्या या निसर्ग उद्यानात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत आपण मुंबईसारख्या गच्च दाटीवाटीच्या शहराच्या मध्यभागी आहोत ह्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडतो.

    या उद्यानात विविध पक्षी, कीटक, फुलपाखरे, औषधी झाडे, दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात. या उद्यानाची सैर करण्यासाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात निसर्ग फेरी निघते. त्यात सहभागी झाल्यास संपूर्ण उद्यानाचा परिसर तज्ज्ञ अभ्यासकाच्या मार्गदर्शनासह तुम्हांला पाहता येतो. या उद्यानात निसर्गाच्या संबंधित काम करणाऱ्या संस्थांद्वारे छायाचित्रण शिबिरे, चित्रकला कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रे यांचे आयोजन केले जाते. कोणत्याही ऋतूत या उद्यानाला आपण भेट देऊ शकतो.

    या उद्यानाला जाण्यासाठी सर्वांत जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे सायन. सायन रेल्वे स्टेशनपासून चालत १० मिनिटांच्या अंतरावर हे उद्यान वसले आहे. त्याचप्रमाणे येथे जाण्यासाठी धारावी डेपोमध्ये येणाऱ्या कोणत्याही बसचा पर्याय तुम्ही निवडू शकतात. खाजगी वाहनानेही हे उद्यान तुम्ही गाठू शकतात.

  • दापोलीचे दत्तमंदिर

    दापोलीचे दत्तमंदिर

    दापोली तालुक्यात हर्णे-मुरुड-कर्दे असा प्रवास करत बुरोंडी-कोळथरेच्या दिशेने निघालो , वाटेत किनाऱ्यापाशी लागणारे गाव म्हणजे ‘लाडघर’. किनाऱ्यावरील मातीत असलेल्या विविध धातूंच्या गुणधर्मामुळे इथल्या पाण्याला तांबूस रंग आहे. त्यामुळे या पाण्याला ‘तामसतीर्थ’ असे म्हणतात. हा भाग पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. कर्दे गावातून समुद्राला लागून असलेल्या मार्गाने लाडघर गावाचे उत्तर टोक गाठायचे. तिथे रस्त्याला उतार लागण्याआधी उजवीकडे दत्त मंदिर परिसर दिसतो. तिथे दत्ताची सुबक संगमरवरी मूर्ती आहे, तसेच इथली दगडी दीपमाळ ही आकर्षणाचा विषय आहे. या दीपमाळेचा आकार खूपच आकर्षक आहे. एप्रिल २०२२ मध्ये मंदिराची डागडुजी आणि दीपमाळेच्या रंगरंगोटीचे कामही करण्यात आले आहे.

    या मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारासमोरच श्री गणेशाचे मंदिर आहे, गणपतीचे दर्शन घेऊन, मंदिर परिसरात थोडे निवांत बसायचे आणि मग नंतर कौलारू दत्तमंदिरात प्रवेश करायचा. ऐकीव माहितीप्रमाणे हे मंदिर १८८० ते १८९० मध्ये पांडुरंग संभाजी मोरे यांनी दृष्टांत झाल्यावर बांधण्यात आले. मंदिराच्या आत दरवाज्यावर केलेल्या नोंदीप्रमाणे मंदिराची स्थापना १७६८ साली झाली आहे. मंदिरात ‘नारदमुनी विरचित दत्तस्तोत्र’ देवळाच्या एका भिंतीवर लिहिलेले आहे. देवळात दत्तजयंतीसाठी वापरली जाणारी पालखी आहे आणि मूर्तीसमोर पादुकांची पूजा केली जाते.

    दत्तमंदिर परिसरात दक्षिण टोकाला एक पायवाट आपल्याला लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाते. जांभा दगडात पायऱ्या बांधल्या असल्याने हा उतार आपण अगदी सहजपणे उतरून खाली येतो. गाडी असेल, तर पर्यायी डांबरी रस्त्याने खाली गावात उतरावे लागते. या टेकडीच्या मागे समुद्रकिनाऱ्यापाशी एक खडकाळ मंच आहे. तिथे पर्यटक, कोळी बांधव, ग्रामस्थ मुले असे सायंकाळी एकत्र जमतात. त्यामुळे तिथे चैतन्यमय वातावरण निर्माण होते. हे मंदिर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याने सूर्यनारायण आपले तेज समुद्रात अर्पण करतानाचे मनमोहक दृश्य खूपच विलोभनीय वाटते.
    दत्तगुरूंचे दर्शन, तसेच समुद्राच्या लाटांची लयबद्ध आवर्तने आणि त्यांच्यात उतरलेली सोनसळी किरणे हा अनुभव घेण्यासाठी लाडघर येतील दत्त मंदिराला नक्की भेट द्या !

  • शिरोडा समुद्रकिनारा

    शिरोडा समुद्रकिनारा

    मुंबई आणि गोव्यातील समुद्रकिनारे फार वर्दळीचे वाटत असतील तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात शिरोडा किनारा हा एक शांत आणि आरामदायी समुद्रकिनारा आहे. येथे खाद्यपदार्थ, रिसॉर्ट्स, जलक्रीडा इत्यादी सुविधादेखील आहेत.
    शिरोडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. वेंगुर्ला शहरापासून ते काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक साज आहे. दांडी यात्रेप्रमाणेच मीठ सत्याग्रह चळवळीचे हे एक ठिकाण आहे.

    सन 1930 च्या दशकात येथे मिठाचा सत्याग्रह झाला. डोलणारी ताडाची झाडे, नारळाची झाडे आणि पांढरी वाळू हे येथील वैशिष्ट्य आहे. पहाटेचा तेजस्वी सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी हा 5 किमी लांबीचा समुद्रकिनारा सर्वोत्तम आहे. या किनाऱ्यावर बाहेरची रहदारी कमी आहे. समुद्रकिनाऱ्यावर ‘सीगल्स’ आणि ‘किंगफिशर’ चे आवाज ऐकू येतात. येथे मासेमारीचा व्यवसाय करणारे बांधव आपणास दिसतील.

    या किनाऱ्यावर आलात तर रेडी हा एक ऐतिहासिक किल्ला येथून जवळ आहे. ‘इस्मार्ट शंकर’ या तेलुगु चित्रपटाचे काही चित्रीकरण या किल्ल्यात झाले होते. या किल्ल्याला ‘रेडी किल्ला’ असेही म्हणतात. येथे किनाऱ्यावर खेकडे आणि कासवदेखील दिसतात. या किनाऱ्याला ‘वेळागर किनारा’ असेही म्हणतात.

  • रायरेश्वर किल्ला

    रायरेश्वर किल्ला

    महाराष्ट्रात उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये रायरेश्वर हे प्रसिद्ध पठार आहे. ११ किमी. लांब आणि १.५ किमी. रुंद पसरलेले हे पठार आहे. हा किल्ला पुण्याहून ८५ किमी. अंतरावर, तर भोरवरून ३० किमी. अंतरावर आहे. खाजगी वाहनाने किंवा एस. टी. ने आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकतो.

    रायरेश्वरावर शंकराचे मंदिर आहे. किल्ल्याच्या परिसरात अंदाजे ४० ते ५० घरे वसलेली आहेत. या पठारावर भात शेती केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात येथील दृश्य अजूनच विहंगमय होते. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.

    शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती या रायरेश्वराच्या डोंगरावर, अशी एक काल्पनिक कथा येथे ऐकायला मिळते; पण निश्चित काही पुरावे सापडलेले नाहीत.
    रायरेश्वराच्या किल्लावर राहायचे असल्यास या पठारावरील घरांमध्ये सोय केली जाते किंवा १० ते १२ जणं असल्यास रायरेश्वराच्या मंदिरातही निवासाची सोय आहे. या किल्ल्यावर पिण्याचे पाणी बाराही महिने उपलब्ध आहे.

  • कोयना वन्यजीव अभयारण्य

    कोयना वन्यजीव अभयारण्य

    महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात मध्यभागी कोयना वन्यजीव अभयारण्य आहे. घनदाट अशा हिरव्यागार जंगलात ते वसलेले आहे. भारत सरकारने सन 1985 मध्ये या संरक्षित वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.
    पश्चिम घाटामध्ये मुबलक पाण्याचा प्रवाह आणि समृद्ध वनस्पतींमध्ये असणारे हे अभयारण्य मन सुखावणारे आहे.

    संपूर्ण अभयारण्य 423 चौ.मी. क्षेत्रफळावर पसरलेले आहे. अभयारण्यात ‘कांदाटी’, ‘कोयना’ आणि ‘सोळशी’ या नद्या आहेत. या परिसरात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आहेत. सरकारच्या वन विकास प्राधिकरणाद्वारे त्यांना संरक्षित केले आहे. सन 2012 मध्ये, युनेस्कोने ‘कोयना वन्यजीव अभयारण्य’ ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले.

    कोयना वन्यजीव अभयारण्य उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान आणि पावसाळ्यात अतिवृष्टी असलेल्या भागात आहे. या अभयारण्यात विविध सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आहेत. याशिवाय, भारतीय बिबट्या, भारतीय बायसन, आळशी अस्वल, सांबर, हरीण, तपकिरी लंगूर असे अनेक प्राणी आढळतात. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे आढळतात. येथे मोठे भारतीय अजगर आणि किंग कोब्राही आढळतात. केवळ याच संरक्षित भागात ‘बुफो कोयान्सिस’ बेडूक आढळतो.

    येथे मार्च ते नोव्हेंबरमध्ये वर्षभरातील सर्वाधिक पर्यटनक भेट देतात. हे अभयारण्य सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत खुले असते.
    हे अभयारण्य पश्चिम घाटामुळे मोठ्या प्रमाणात संरक्षित आहे. हे संरक्षित क्षेत्र चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्याशी दक्षिणेला वन्यजीव कॉरिडॉरने जोडलेले आहे. कोयना नदीचे पाणलोट क्षेत्र आणि कोयना धरणाने तयार केलेला ‘शिवसागर’ जलाशय देखील येथे पाहता येतो. यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते.

  • कंकालेश्वर मंदिर

    कंकालेश्वर मंदिर

    महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले आहे. ‘बिंदुसरा’ नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने दहाव्या ते 11 व्या शतकात हे मंदिर बांधले. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. या मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे शिल्प आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. जैन धर्मियांतील आर्यनाथ, नेमिनाथ या २ तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह असून ते पाचशे वर्षांपासून बंद आहे.
    हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे.

    मुखमंडप, त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून ३ बाजूंना गर्भगृहे आहेत. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची आहेत. मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. मंडपाच्या ४ मुख्य दिशांना आणि ४ उपदिशांना सोळा स्तंभ आहेत. या स्तंभांवर घुमटाकार छत आहे. छतावर फुलांची सुंदर नक्षी असून मध्यभागी सर्वात वर कमळ आहे.
    मंदिराच्या बाहेर शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील देवदेवता आहेत. कंकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहांचे दरवाजे द्वारे पंचशाखा प्रकारचे आहेत. मुख्य गर्भगृहाच्या डोक्यावर गणेशमूर्ती आहे. या पुरातन मंदिराचा उल्लेख पुराण ग्रंथातही आहे.

    अत्री ऋषी आणि अनुसया यांनी या ठिकाणी शिधेश्वराचा अभिषेक केला. ब्रह्मा-विष्णू आणि महेशाला प्रसन्न करून घेतल्याची कथा सांगितली जाते. कंकालेश्वर मंदिर अनेक वर्षे बंद होते. महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी अर्थात हैदराबाद स्वातंत्र्य दिनादिवशी हे मंदिर खऱ्या अर्थाने मुक्त झाले.

    हे मंदिर विलक्षण सुंदर असून कोरीवकाम, शिल्पकला लक्षवेधी आहे. शेकडो वर्षे जुने मंदिर पाहताक्षणी आवडते. भाविकांची येथे वर्दळ असते. त्यातही महाशिवरात्री, श्रावणी सोमवार या दिवशी येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करताना दिसून येतात. मंदिराचे काम, स्थापत्यशैली पाहण्यासही इतिहासप्रेमी पर्यटक आवर्जून उपस्थित असतात.

    बीडमध्ये अन्य पर्यटनस्थळेही प्रेक्षणीय आहेत. येथील खंडोबा मंदिर, जामा मशीद, हजरत शहंशाह वली दर्गा, परळीतील श्री वैजनाथ मंदिर, अंबेजोगाईतील श्री योगेश्वरी माता मंदिर पाहण्यासारखी आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते.

  • तारकर्ली समुद्रकिनारा

    तारकर्ली समुद्रकिनारा

    तारकर्ली समुद्रकिनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सर्वोत्तम कोकण किनारा आहे. येथील समुद्राचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. समुद्रकिनारासुद्धा मस्त मोकळा आणि स्वच्छ आहे.

    येथे ‘स्नॉर्कलिंग’ आणि ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद लुटण्यासाठी आवर्जून पर्यटक येतात. पांढरी वाळू आणि स्वच्छ निळे पाणी, डॉल्फिन, कर्ली नदीचे रमणीय दृश्य डोळ्यांनी टिपता येते. कोकणी खाद्यपदार्थ आणि हापूस आंब्याची चव चाखता येते.

    पर्यटकांमध्ये या ठिकाणाचे आकर्षण आटा वाढले आहे. कोकण किनार्याेवरील सर्वात नयनरम्य असा हा समुद्रकिनारा आहे. येथील पाणी इतके स्वच्छ आहे की आपण 15 फूट खोलीपर्यंतचा समुद्रतळ पाहू शकता.

    गोव्याच्या किनाऱ्यावरील लोकप्रिय बोट राइड आणि पॅरासेलिंग अशा जलक्रीडांचा आनंद येथेही घेता येऊ शकतो. केरळच्या हाऊसबोट्स, स्नॉर्कलिंग आणि अंदमानचे स्कूबा डायव्हिंग हे सगळे या किनाऱ्यावर अनुभवता येते. म्हणून, येथे पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

  • पेडका किल्ला

    पेडका किल्ला

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘कन्नड’ तालुक्यात ‘पेडका’ हा एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी ‘पेडकावाडी’ धरण आहे. या धरणाच्या मातीच्या बांधावरून चालत गेल्यावर ‘पेडका’ किल्ल्याचा पायथा गाठता येतो. साधारणपणे ३० मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथून आपल्याला उत्तर आणि दक्षिण बाजूला डोंगरांचे 2 सुळके दिसतात. यांच्यामधील घळीतून वर चढायला सुरुवात केल्यास दक्षिणेकडच्या बाजूला किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार येण्यापूर्वी २५-३० बांधीव आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पठारावरून प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यास साधारण ४५ मिनिटांचा अवधी लागतो.

    प्रवेशद्वारातून किल्ल्यावर जाताना 3 भाग दिसतात. सर्वात खालच्या भागात काही वास्तुंचे चौथरे आहेत. ते पाहून मागे वळून पश्चिमेच्या दिशेने गेले म्हणजे कातळाच्या पोटात खोदलेले टाक पहायला मिळते. ते पाहून दरीच्या काठाकाठाने पुढे जावे. उजव्या बाजूच्या कातळ भिंतीखाली २ टाक दिसतात. येथे ‘म्हसोबाची देवळी’ आहे. किल्ल्याच्या दुसर्‍या टप्प्यावर चढून जावे लागते. तेथे खालच्या बाजूला ३ गुहा दिसतात. या परिसरात २ ते ३ ठिकाणी शेंदूर फासलेले दगड असून त्याच्याजवळ त्रिशूळ उभे करून ठेवलेले आहेत.

    किल्ल्यातील मोठ्या तलावाच्या बाजूला डोंगर पसरलेला आहे. या डोंगरावरून वाहत येणारे पाणी थेट या मोठ्या तलावात जाते. तलाव गाळाने भरू नये, म्हणून तलावाच्या वर २ छोटे तलाव आहेत. सर्वात वरच्या पठारावर असलेल्या तलावात पठारावरून वाहणारे पाणी आणि गाळ जमा होतो. तो तलाव पूर्ण भरला की, वरचे पाणी बाजूच्या पन्हाळीतून खालच्या बाजूला असलेल्या तलावात जाते. येथे पुन्हा एकदा पाणी स्थिर होते. त्यामुळे त्यातील गाळ खाली बसतो. या तलावाच्या बांधाच्या एका कडेला वरच्या बाजूस पाणी जाण्यासाठी पन्हाळी बनवलेली आहे. त्यातून पाणी खालच्या मोठ्या तलावात जमा होते. यामुळे मोठ्या तलावात फारच कमी प्रमाणात गाळ जमा होतो.

    किल्ल्याच्या माथ्यावर एक तलाव आहे. माथ्याच्या मध्यावर पिराचे थडगे, एका वाड्याचा चौथरा, तसेच एक मातीचा टेहळणी बुरुज आहे. या बुरुजावरून संपूर्ण गड दिसतो. गड पाहण्यास अंदाजे १ तास लागतो.
    छत्रपती संभाजीनगर शहरापासून ‘कन्नड’ हे तालुक्याचे गाव ६५ किमी अंतरावर आहे. ‘कन्नड’हून किल्ल्याजवळील ‘कळंकी’ गाव २० किमी अंतरावर आहे. ‘कळंकी’ गावात जाण्यासाठी एसटी आणि खासगी जीप गाड्यांची सोय आहे. ‘कळंकी’हून दीड तास चालत गेल्यानंतर पेडका किल्ल्याचा पायथा येतो.

  • नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ

    नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ

    ‘तोरणमाळ’ हे भारतातील नंदुरबार जिल्ह्‍यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे. अतिदुर्गम भागात असल्याने आणि जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते. उंची आणि भौगोलिक वातावरणाने येथील नैसर्गिक सौंदर्य व सुखकारक हवामान अधिकच खुलते. तोरणमाळला ‘गोरक्षनाथांचे मंदिर’ आहे. महाशविरात्रीला मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख भक्त दर्शनासाठी येतात. तसेच 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तोरणमाळच्या उंच ठिकाणाहून एकच रस्ता सात वेळा वळताना दिसतो. हा रस्ता पायऱ्यांप्रमाणे दिसतो. त्यामुळे याला ‘सात पायऱ्यांचा घाट’ असे म्हटले जाते.

    तोरणमाळ हे एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण असून येथे यशवंत तलाव, सीता खाई दरी, नैसर्गिक सौंदर्य, डोंगर – दरी, धबधबे इत्यादी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. ‘सीता खाई’ हे ठिकाण तोरणमाळपासून साधारण 3 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी एक भव्य दरी असून जवळच एक धबधबा आहे.

    ‘कमळ सरोवर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कमळ तलावावर एक रमणीय दृश्य आहे. हे ठिकाण सुंदर कमळाच्या फुलांनी झाकलेले आहे. या सरोवरातून निघणारा एक प्रवाह ‘सीता खाई’ मध्ये वाहतो. या पाण्याच्या प्रवाहाने बनलेली अद्भुत झलक पर्यटकांना भुरळ घालते.

    ‘यशवंत तलाव’ हा 1.59 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारा एक भव्य नैसर्गिक तलाव आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावापासून या तलावाला ‘यशवंत’ हे नाव पडले आहे. पर्यटकांना तलावामध्ये नौकाविहार आणि मासेमारी करता येते. ‘मच्छिंद्रनाथ गुहा’ ही नैसर्गिकरित्या तयार झालेली असून येथे संत मच्छिंद्रनाथ ध्यानस्थ असल्याचे म्हटले जाते. या गुहेच्या परिसरात ‘मच्छिंद्रनाथ मंदिर’ आणि ‘ऋषी मार्केंडयांचे आसन’ पाहायला मिळते.
    ‘खडकी पॉईंट’ हे येथील मुख्य ठिकाण आहे. ते पर्यटकांना खूप आकर्षित करते. तोरणमाळमधील लोकप्रिय ट्रेकिंग क्षेत्र याच ठिकाणी आहे. येथे एक ‘तोरणा देवीचे मंदिर’ आहे. स्थानिक लोकांच्या मते, हे मंदिर 600 वर्षापेक्षा जुने आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती तोरणा देवीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काळ्या पाषाणातून कोरलेली आहे.

    येथे उन्हाळ्यात देखील पाऊस होत असतो. यामुळे ऑक्टोबर ते मे महिन्यात तोरणमाळ फिरायला येण्यासाठी उत्तमकाळ आहे. तोरणमाळला पोहोचण्यासाठी राज्य परिवहनाच्या बस आणि खाजगी गाड्याही उपलब्ध आहेत.
    तोरणमाळमध्ये राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय आहे. स्वादिष्ट आणि मसालेदार महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवणही मिळते. विशेषतः तूर, मका, गहू आणि ज्वारी यांपासून बनवलेले पदार्थ येथे प्रसिद्ध आहेत.

  • कोल्हापूरचे रेणुका मंदिर

    कोल्हापूरचे रेणुका मंदिर

    महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये प्रसिध्द रेणुका मंदिर असून हे मंदिर कोल्हापूर बस स्थानकापासून १० मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे रेणुकादेवी, मातंग देवी आणि परशुराम अशी देवस्थाने आहेत. रेणुका देवीला ‘ओढ्यावरची यल्लमा’ असेदेखील म्हणतात.

    कर्नाटकातील बेळगाव येथील सौंदत्ती हे तिचे मुख्य स्थान आहे. ही देवता कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या प्रांतांतील लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. ‘यल्लम्मा’ या कानडी शब्दाचे ‘सर्वांची माता’ आणि ‘सप्तमातृका’ असे अर्थ आहेत.

    या स्थळाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. गंधर्वांची जलक्रीडा पाहताना रेणुका विचलित झाली. जमदग्नीच्या आज्ञेवरून परशुरामाने तिचा वध केला. तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मातंगीच्या धडाला जोडले गेले. जिवंत झालेल्या दोघींपैकी एक -‘यल्लम्मा’ व दुसरी ‘मरिअम्मा’ बनली. तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून ‘लज्जागौरी’, ‘एकवीरा’, ‘जोगुळंबा’, ‘भूदेवी’, ‘मातंगी’, ‘यमाई’ व ‘सांतेरी’ ही तिचीच रूपे होत, असे अभ्यासकांना वाटते.

    हे एक अतिशय जागृत देवस्थान आहे. येथे दर मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. प्रशासनाच्या वतीने गर्दी होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जाते. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथे रोज सकाळ-संध्याकाळ देवीची महाआरती करण्यात येते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. हे मंदिर हे रस्त्याला लागूनच आहे. मंदिराच्या मागे वाहनतळाचीही सोय आहे.

  • आचरा समुद्रकिनारा

    आचरा समुद्रकिनारा

    समुद्रातील डॉल्फिन पाहणे, सूर्यस्नान करणे आणि पोहणे आवडत असेल, तर सिंधुदुर्गातील आचरा समुद्रकिनाऱ्यावर जावे. हा किनारा मालवण तालुक्यात असून मालवणपासून अंदाजे 22 किलोमीटर अंतरावर आहे. जलप्रेमींना आकर्षित करणारे डॉल्फिन येथे मोठ्या संख्येने येतात.

    जलचर प्रजातींव्यतिरिक्त येथे विविध प्रजातींचे पक्षीसुद्धा आढळतात. जलक्रीडा करणारे पर्यटक आचरा किनाऱ्यावर समुद्रपर्यटन, स्नॉर्कलिंग आणि पोहणे यासारख्या क्रीडा क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकतात. आचरा समुद्रकिनाऱ्याच्या जवळ 115 वर्षे जुने असलेले वाचनालय हे सर्वात जास्त भेट दिलेल्या आकर्षणांपैकी एक आहे.

    येथून इतिहासप्रेमी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊ शकतात. तारकर्ली समुद्रकिनारा हे आचरा समुद्रकिनाऱ्यापासून जवळचे आणखी एक प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. वर्षभर आचरा समुद्रकिनाऱ्याला भेट देऊ शकता, परंतु ऑक्टोबर ते मार्च हा उत्तम काळ आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ डॉल्फिनचा हंगाम मानला जातो. त्यामुळे या कालावधीत समुद्रकिनाऱ्याला भेट दिल्यास तुम्हाला आचरा समुद्रकिनाऱ्याची खरी मोहकता अनुभवता येईल.

    मालवणमध्ये उतरून बसने आपण येथे जाऊ शकता. सर्वात जवळचे विमानतळ सिंधुदुर्गातील चिपी आणि गोव्यातील मोपा हे आहे. जर तुम्ही पर्यटन हंगामात जाण्याची योजना आखत असाल, तर आगाऊ नोंदणी करावी.

  • कोल्हापूरमधील गगनगड

    कोल्हापूरमधील गगनगड

    महाराष्ट्राचे ‘चेरापूंजी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘गगनबावडा’ गावात ‘गगनगड’ उभा आहे. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नाथपंथीय गैबीनाथांचे हे मूळ स्थान आहे. १९ व्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्धीस आले. ‘गगनगिरी महाराजां’च्या मठामुळे आजही गडावर लोकांचा राबता आहे.

    गगनगड कोल्हापूरहून ५५ किमी वर आहे. कोल्हापूरहून येथे येण्यासाठी नियमित बससेवा आहे. याशिवाय कोकणातील वैभववाडी, कणकवली येथून गगनबावडा ५० किमी अंतरावर आहे. कोकणातून कोल्हापूरला जाणार्‍या बस गगनबावडा स्थानकात थांबतात. तिथून २ किमी.चा डांबरी रस्ता गगनगडापर्यंत जातो. गगनगडाच्या जवळजवळ अर्ध्या उंचीपर्यंत गाडीने जाता येते. गाडी तळापासून पायर्‍यांनी गडावर जाण्यास साधारण अर्धा तास लागतो.

    पायर्‍यांच्या सुरुवातीला ‘म्हसोबा मंदिर’ आहे. त्यात रेड्याची प्रतिमा आहे. पायर्‍या चढून वर गेल्यावर डाव्या हाताला समोरच दगडातील एक प्रशस्त नैसर्गिक गुहा आहे. गगनगिरी महाराजांचे या गडावर वास्तव्य होते, त्यांनी याच गुहेत तपसाधना केली होती. त्यामुळे या गुहेत त्यांचे मंदिर बनवण्यात आले आहे. गुहेच्या बाहेर कातळात कोरलेली भव्य हनुमंताची प्रतिमा आहे. त्याच्या बाजूला राम, लक्ष्मण, सीता आणि शंकराची प्रतिमा आहे. गुहेपासून पायर्‍यांच्या मार्गाने वर चढत गेल्यावर भक्तनिवास आणि नवग्रह मंदिर आहे. मंदिराजवळील बुरुजावर २ तोफा आहेत. भक्तनिवासापासून वर चढत गेल्यावर आपण मोकळ्या पठारावर प्रवेश करतो.

    पठारावर डाव्या बाजूस संगमरवरी देऊळ (ध्यानमंदिर) आहे. उजव्या बाजूस शंकराचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरासमोर उभे राहिले की, किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर (बालेकिल्ल्यावर) मशिदीसारखी इमारत दिसते. ती आहे गैबी पिराची कबर किंवा गैबीनाथाची समाधी. गगनगडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी शंकर मंदिराजवळून खोदीव पायर्‍यांचा मार्ग आहे. या मार्गाने आपण १० मिनिटांत समाधीपाशी पोहोचतो. तेथून जवळच विठ्ठलाई देवीचे मंदिर आणि पाण्याची विहिर आहे. याशिवाय बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूस जुन्या घरांचे चौथरे आणि तटबंदीचे अवशेष दिसतात.

    गडावर राहण्याची सोय भक्त निवासात होऊ शकते. गडावर जेवणाची सोय (प्रसादाचे जेवण) आहे. तसेच गडावर पाण्याची सोय मोठे हौद बांधून करण्यात आली आहे. गगनगडाचे दरवाजे रात्री 9 ते सकाळी 5 बंद असतात.

  • कार्ला लेणी

    कार्ला लेणी

    लोणावळ्याच्या जवळील कार्ला या गावाजवळ ‘कार्ला लेण्या’ आहेत. या लेण्या लोणावळ्यापासून 11 किमी अंतरावर आहेत. ‘भाजा लेणी’, ‘पाटण बौद्ध लेणी’, ‘बेडसे लेणी’ आणि ‘नाशिक लेणी’ या लेण्यादेखील या भागात पाहण्यास मिळतात. या ठिकाणी ‘एकवीरा देवी’चे देवस्थान आहे. या लेण्या इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इ.स. 5 व्या शतकापर्यंत बांधल्या गेल्या. कार्ला लेण्या या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि लहान लेण्यांपैकी एक आहेत.

    ‘कार्ला लेण्या’ या बौद्धकालीन लेण्या आहेत. या एकूण 16 लेण्या आहेत. बर्‍याच लेण्या या बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या हिनयान टप्प्यातील आहेत. यातील 3 लेण्या या बौद्ध धर्माच्या महायान टप्प्यातील आहेत. या लेण्यांमध्ये ‘चैत्यगृह’ ही मुख्य लेणी आहे. ‘चैत्यगृह’ हे त्या काळचे एक भव्य प्रार्थनास्थळ होते.

    चैत्यगृहाची निर्मिती इ.स.पूर्व पहिल्या शतकात झाली होती. चैत्यगृहाच्या छतामध्ये लाकडाचे कोरीव काम पाहण्यास मिळते. चैत्यगृहात डाव्या आणि उजव्या बाजूस नक्षीदार कोरलेले खांब आपणास पाहण्यास मिळतात. या खांबांवर पुरुष, स्त्री, हत्ती, घोडे यांचे शिल्प पाहण्यास मिळते. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मोठ्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत येतो आणि थेट चैत्यगृहामध्ये असलेल्या स्तुपावर पडतो.

    इतर 15 लेण्या या आकाराने लहान आहेत, यांना ‘विहार’ म्हटले जाते. यांचा वापर राहण्यासाठी आणि प्रार्थनास्थळ म्हणून केला जात असे. येथील प्रवेशद्वाराजवळ सिंहांचा एक विशाल स्तंभ आहे, जो उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे सम्राट अशोकाने उभारलेल्या सिंहाच्या स्तंभाची आठवण करून देतो.

    महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील कार्ला या गावामध्ये आपणास या लेण्या पाहण्यास मिळतात. कार्ला गावाच्या वर असलेल्या डोंगरामध्ये या लेणी कोरलेल्या आहेत. कार्ला लेण्या मुंबई – पुणे महामार्गास लागूनच आहेत. या लेण्या मुंबईपासून जवळपास 2 तासाच्या अंतरावर आहेत आणि पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहेत.

    सर्वात जवळचे रेल्वे स्थानक 4 किलोमीटर अंतरावर मालवली येथे आहे. या स्थानकावर पुण्याहून लोकल ट्रेनने जाता येते. रेल्वे स्थानकावरुन लेण्यांपर्यंत येण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. कार्ला लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून 350 पायर्‍या वर चढत जावे लागते. लेण्या पाहण्यासाठी भारतीयांना 25 रुपये, तर परदेशी पर्यटकांना 300 रुपये प्रवेश शुल्क आहे.

  • रेडीचा स्वयंभू द्विभूज श्री गणेश

    रेडीचा स्वयंभू द्विभूज श्री गणेश

    सिंधुदुर्ग हा तळकोकणातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची समृद्धी या जिल्ह्यास लाभली आहे. जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात रेडी हे असेच लोकप्रिय गाव आहे. लोहखनिजांच्या खाणींनी संपन्न असलेल्या या गावाचा लौकिक येथील स्वयंभू द्विभूज श्री गणेश मंदिरामुळे वाढला आहे. रेडीच्या या देवस्थानातील श्री गणेशमूर्ती स्वयंभू आणि द्विभुज आहे. देशभरात अगदी मोजक्याच ठिकाणी द्विभुज गणेशाच्या मूर्ती आढळतात. म्हणूनच रेडी येथील गणेश मंदिराचे महत्त्व अधिक आहे.

    या मंदिराशेजारी अरबी समुद्राचा अथांग विस्तीर्ण किनारा, उंच नारळाची झाडे असे निसर्गरम्य चित्र आहे. हे शांत वातावरण भाविकांसह पर्यटकांचा ठाव घेणारे आहेत. महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील लाखो भक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या द्विभुज गणेशाचा इतिहास ५० वर्षापूर्वीचा आहे.

    सन १९७३ मध्ये १८ एप्रिलला रेडी येथील लोहखनिजाच्या खाणीवर ट्रकचालक म्हणून कामाला असणारे सदानंद कांबळी रात्री काम संपवून ट्रक लावला. थोड्या वेळाने ट्रक नेहमीच्या जागी लावून ते घरी जाण्याच्या विचारात होते; पण ट्रक काही केल्या सुरू होईना. खूप वेळ प्रयत्न करूनही यश येत नव्हते. मग ते ट्रकमधेच झोपी गेले. रात्री त्यांना एक स्वप्न पडले. ‘मी इथे आहे, मला बाहेर काढ,’ असा दृष्टांत स्वप्नात गणपतीने दिला. सदानंदना जाग आली, तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. गावात जाऊन माहिती देण्यासाठी ते उठले. रात्रभर अनेकदा प्रयत्न करूनही सुरू न झालेला ट्रक क्षणार्धात सुरू झाला.

    दुसऱ्या दिवशी गावात त्यांनी हा सारा प्रकार सांगितला. ग्रामदेवता श्री माऊलीचा कौल घेण्यात आला. स्वप्नात संकेत मिळालेल्या जागी खोदकाम सुरू झाले. आठ फूट खोल खणल्यावर १ मे १९७६ ला संपूर्ण मूर्ती दिसू लागली. ती स्वयंभू अन द्विभुज होती. नंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रेडी येथील गणेश मंदिरातील ही मूर्ती जांभ्या दगडात कोरलेली आहे. मूर्तीच्या बाहेर मकराकृती कोरीवकाम केले आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. मूर्तीला दोन हात असून एका हातात मोदक आहे. दुसरा हात आशीर्वाद देतो. मूर्तीच्या समोर मोठा उंदीर आहे. हा उंदीरही गणेश मूर्ती मिळाल्यानंतर सव्वा महिन्याने तिथूनच अर्ध्या किलोमीटरवर सापडल्याचे सांगतात.
    सावंतवाडी, वेंगुर्ल्याच्या साप्ताहिकांनी, दैनिकांनी दखल घेतली. पुढे महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा येथे हे वृत्त पसरले. रेडी येथील गणेश मंदिराच्या स्थापनेनंतर गणेश जयंती, वर्धापन दिन, संकष्टी, अंगारकी असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक संकष्टीला हजारोंच्या संख्येने तिथे भाविक येतात. अंगारकीला ही संख्या हजारोंच्या घरात असते. पर्यटनस्थळ म्हणून हे नावारुपास आलेले ठिकाण आहे.

  • आवास समुद्रकिनारा

    आवास समुद्रकिनारा

    अलिबागमधील आवास समुद्रकिनारा हा सर्वात कमी गर्दीचा आहे. येथे संपूर्ण शांतता आणि निर्मळता अनुभवता येते. शहरी जीवनातील त्रासापासून हा किनारा दूर आहे. जर तुम्ही गर्दीत जाणे टाळत असाल तर हे एक अप्रतिम ठिकाण आहे.

    येथे मनसोक्त फिरू शकता. सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. आवास समुद्रकिनारा अजूनही फारसा प्रसिध्दीस पावलेला नाही. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशा गोष्टी येथे नाहीत. या वालुकामय समुद्रकिनाऱ्यावर एकांतात दर्जेदार वेळ घालवणे हे पर्यटकांना आकर्षित करण्यासारखेच आहे. तुम्ही येथे आराम करू शकता आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. आवास किनारा हा किहिम किनाऱ्याजवळ आहे. कनकेश्वर देवस्थान मंदिर हे येथून जवळचे एक आकर्षण आहे. हे जुने शिवमंदिर डोंगराच्या माथ्यावर आहे. चढाई काहींसाठी दमछाक करणारी असली तरी, तेथे पासेहोचल्यावर तुम्ही सगळा शीण विसरुन जाल.

    अलिबाग शहरातून तुम्हाला आवास किनाऱ्यावर जाण्यासाठी वाहने असतात. पुणे आणि मुंबई ही अलिबागच्या जवळची 2 प्रमुख शहरे आहेत.

  • मल्हारगड (सोनोरी)

    मल्हारगड (सोनोरी)

    महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.

    ‘मल्हारगड’ हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धा – पाऊण तास पुरतो. किल्ल्याची तटबंदी, बुरूज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली, तरी बर्‍याच ठिकाणी ती शाबूत आहे. याशिवाय सोनोरी गावात असलेली पानसे यांची गढी, श्री लक्ष्मी – नारायणाचे मंदिर, श्री मुरलीधराचे मंदिर ही पाहण्यासारखी मंदिरे आहेत. ही सर्व ठिकाणे मुंबई – पुण्याहून एका दिवसात पाहून होतात.

    मल्हारगडावर आपल्याला प्रामुख्याने २ वाटांनी जाता येते. सासवड आणि झेंडे वाडीतून असे दोन मार्ग आहेत. सासवडपासून ६ किमी वर ‘सोनोरी’ हे गाव आहे. या गावाला एसटीने जाण्याची सोय आहे. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. सोनोरी गावातून कच्च्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. वाहनाने पायथ्यापर्यंत जाता येते.

    पुण्याहून सासवडला जाताना दिवे घाट संपल्यावर ‘झेंडेवाडी’ गावाचा फाटा लागतो. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगर रांगांमध्ये दिसणार्‍या खिंडीत जावे लागते. या खिंडीत पोहोचल्यावरच मल्हारगडाचे आपल्याला होते. तटबंदींनी सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही. खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे दीड तास लागतो.
    गडावर राहण्याची, जेवणाची, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने येथे मुक्कामास राहू नये.

  • पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

    पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

    महाराष्ट्रातील पुणे शहरात कात्रज येथे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आहे. पुणे महानगरपालिकेने पर्वती पायथ्याजवळ सन १९५३ मध्ये ‘पेशवे पार्क’ची स्थापना केली. येथे पूर्वी पेशव्यांचे स्वत:चे प्राणिसंग्रहालय होते. अवघ्या ७ एकर जागेत बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये पर्यटकांना प्राणी पाहता येत असत. केवळ लोकांचे मनोरंजन हा याचा एकमात्र उद्देश होता.
    सन १९९२ मध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची स्थापना झाली. त्यानंतर प्राणिसंग्रहालयांची स्थिती पूर्णपणे बदलून शास्त्रीय पद्धतीने वन्य प्राणी संवर्धन होऊ लागले. सन १९९६ मध्ये कात्रज येथील १३० एकर जागेत प्राणी प्रजोत्पादन, वन्यजीव संवर्धन, शिक्षण व संशोधन करण्यासाठी नवीन प्राणिसंग्रहालयाचा विकास करण्यात आला. त्यानंतर ‘राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र’ असे नामकरण करून नवीन प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. सुरूवातीला येथे हरीण, माकड, अस्वल, वाघ, हत्ती इत्यादीसाठी नैसर्गिक आभासाचे निवारे बांधण्यात आले.


    येथे प्राण्यांवर उपचार करण्यासाठी विविध साधनांनी युक्त असे हॉस्पिटल आहे. प्राण्यांवर प्रतिबंधात्मक उपचारही केले जातात. या प्राणीसंग्रहालयास दरवर्षी १८ लाखांपेक्षा अधिक लोक भेट देतात. पर्यटकांच्या सोयीसाठी बसण्याकरिता सावली, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सूचना फलक, व्हीलचेअर इ. गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात फिरण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटक आणि विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

    सन १९८६ साली स्थापन करण्यात आलेले जुने सर्पोद्यान देखील या नवीन प्राणिसंग्रहालयात समाविष्ट करण्यात आले. इ.स. १९८६ मध्ये नीलम कुमार खैरे यांनी ते वसवले. ते सर्पोद्यानाचे पहिले संचालक होते. सर्व जातींचे सर्प, सरपटणारे प्राणी आणि प्राणिजगतातील अनेक जीवांना येथे संरक्षण देऊन त्यांचे संवर्धन केले जाते. सापासारख्या प्राणघातक समजल्या जाणाऱ्या प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ही संस्था अनेक कार्यक्रम आयोजित करते.

    काही माशांच्या प्रजाती आणि माशांची शिकार करून राहणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. तसेच इतर पक्ष्यांमध्ये गरुड, ससाणा, घार, जंगली कोंबडी पहायला मिळतात. शिकारी प्राण्यांमध्ये सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे आहेत. चौशिंगा, चितळ, हरिण, ठिपके असलेले हरिण, अस्वल, नीलगाय, आशियाई हत्ती, गवा, चिंकारा असे प्राणी बघायला मिळतात. विविध विषारी, बिनविषारी सरपटणारे प्राणी, पक्षी आणि अनेक जंगली प्राणी येथे पहायला मिळतात. तेथे बसने किंवा खासगी वाहनाने जाता येते. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत भेट देऊ शकता.

  • देवगडमधील श्री देव रामेश्वर मंदिर

    देवगडमधील श्री देव रामेश्वर मंदिर

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला एक तालुका आहे. अत्यंत निसर्गरम्य असा हा भाग पर्यटकांच्या मनात भरणारा असाच आहे. तालुक्यातील ‘वेळगिवे’ या गावात श्री देव रामेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. कुणकेश्वर मंदिरासारखेच लेणे असलेले श्री रामेश्वर देव मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. हे मंदिर फार सुंदर व आकर्षक आहे. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते. प्राचीन कलाकृतीचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर आजही उत्तम स्थितीत आहे. येथील लोकांचे ते श्रध्दास्थान आहे.
    खरे पाहता ‘वाघिवरे’ व ‘वेळगिवे’ या गावांच्या सीमेवरील जांभ्या दगडात हे रेखीव मंदिर खोदले आहे.

    सद्यस्थितीत मंदिराचा कळस सिमेंट लावून रंगवला असल्याने हे देऊळ पटकन लक्षात येते. खिंडीतील पायऱ्या उतरून या मंदिराकडे जावे लागते. या मंदिराला फारशी उंची नाही. जांभ्या दगडात खोदलेल्या या मंदिरात छोटासा सभामंडप आहे. दोन्ही बाजूंना खोल्या व श्री देव रामेश्वरचा गाभारा अशा प्रकारचे हे मंदिर आहे. मंदिराच्या आत नेहमीच थंडावा असतो. बाहेर कितीही उष्मा असला तरीही मंदिरात मात्र थंडावा जाणवतो, हे खास वैशिष्ट्य आहे. थंडावा असल्यामुळे मंदिरात वटवाघळे आढळतात. या मंदिराजवळ आलोबाचे जागृत देवस्थान आहे.

    मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे या गावापासून अवघ्या 8 कि. मी. अंतरावर ‘वेळविले’ हे गाव आहे. अतिशय निसर्गसंपन्न असल्याने हे गाव फार सुंदर आहे. तेथे जाण्यासाठी चांगला रस्ता आहे. हे मंदिर पांडवकालीन असून एका खडकात कोरलेले आहे. या मंदिराला मोठे सहा दगडी खांब आहेत. आतील भागात शिवलिंग आहे. या मंदिराची रचना भुयारी स्वरूपाची आहे. या गावातील ग्रामस्थांच्या म्हणण्यानूसार, हे एक पांडवकालीन लेणे आहे. पांडव अज्ञातवासात असताना त्यांना या मंदिराचे काम एका रात्रीत पूर्ण करावयाचे होते; मात्र काम करीत असतानाच पहाट झाल्यामुळे मंदिराचे उर्वरित काम अर्धवट सोडून पांडव तेथून निघून गेले. देवगड हे तालुक्याचे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर विसावलेले आहे.

    देवगडमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. हे एक छोटे बंदर आहे. येथील देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे. देवगड तालुक्यातील दुसरा किल्ला विजयदुर्ग अर्थात घेरिया हा शिलाहार राजघराण्यातील राजा भोज द्वितीय याने बांधला. त्यानंतर आदिलशाह, शिवाजी महाराज यांनी त्यावर राज्य केले. ब्रिटिश राज्यकर्त या किल्ल्याला त्याच्या अभेद्यपणासाठी ‘पूर्वेकडचे जिब्राल्टर’ असे म्हणत. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले हे गाव देवगडमध्ये पाहता येईल. सागरकिनारा, निसर्गसंपन्नता याशिवाय अन्य कित्येक ठिकाणे पर्यटकांना देवगडमध्ये पाहता येतील.

    देवगडला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कणकवली हे आहे. कणकवली येथून देवगडला जाण्यासाठी ऑटो-रिक्षा किंवा राज्य परिवहन बसगाड्या मिळू शकतात.विमानाने जायचे असल्यास सिंधुदुर्गातील चिपी व गोव्यातील मोपा ही जवळची विमानतळे आहेत.

  • खवणे सागरकिनारा

    खवणे सागरकिनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरापासून जवळ खवणे समुद्रकिनारा हा एक स्वच्छ, निळाशार समुद्रकिनारा आहे. हा किनारा डोंगराळ प्रदेशाने वेढलेला आहे. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आणि नारळाच्या झाडांचा सुंदर मिलाफ हे या किनाऱ्याचे खास आकर्षण आहे. हा समुद्रकिनारा मात्र अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे. ज्यांना मनासाठी एकांत आणि विश्रांतीची गरज आहे, अशांसाठी हे ठिकाण अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहे.

    येथे जायचे झाल्यास सर्वात जवळचे विमानतळ सिंधुदुर्गातील चिपी, गोव्यातील मोपा ही आहेत. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कुडाळ आहे. अमाप निसर्गरम्यता लाभलेले, वर्दळहीन असलेले हे ठिकाण म्हणजे मनास शांती देणारे उत्तम ठिकाण आहे. मात्र येथे वर्दळ कमी असल्याने येथे जाताना आपणास हवे अलेले कोरडे खाद्यपदार्थ आपण सोबत नेलेले केव्हाही चांगले !

  • आंबोलीतील नारायणगड

    आंबोलीतील नारायणगड

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आंबोलीतील ‘कावळेसाद पॉंईंट’ या पर्यटन ठिकाणाच्या विरुद्ध बाजूस ‘नारायणगड’ हा किल्ला आहे. पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘नारायणगड’ हा किल्ला बांधण्यात आला.नारायणगडाच्या पायथ्याशी ‘गेळे’ गाव असून याच गावातून गडावर जावे लागते. आंबोली घाटाच्या परिसरात असल्यामुळे पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर गडावर जाता येते.

    ‘गेळे’ गावातून गडावर जातांना फारसा चढाव नसून सरळ वाट आहे. या भागात वावर नसल्यामुळे आजूबाजूला घनदाट अरण्य आहे. ‘नारायणगड’ सावंतवाडी संस्थानाच्या फोंड सावंतांनी बांधला. किल्ल्यावर सातेरीदेवीचे स्थान आहे. एका झाडाखाली काही घडीव दगड पडलेले आहेत; पण या जागी मूर्ती नाही. तसेच गडावर घराच्या जोत्यांचे काही अवशेष पहायला मिळतात. गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड, पूर्वेला ‘कावळेसाद पॉंईंट’ दिसतो. नारायण गडाच्या बाजूला ३ सुळके असलेला डोंगर दिसतो. याला स्थानिक लोक ‘गंगोत्री लगीनवाडा’ म्हणतात

    . सुळक्यांमधील मोठ्या सुळक्याला ‘म्हातारीचा गुंडा’ म्हणतात. त्याहून लहान सुळक्यांना नवरा आणि नवरी म्हणतात.
    नारायणगड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सावंतवाडीपासून ३२ किमी अंतरावर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते.

    आंबोलीपासून गेळे हे नारायणगडाच्या पायथ्याचे गाव ७ किमी अंतरावर आहे. गडावर जाण्यासाठी माहितगार सोबत असणे आवश्यक आहे. गेळे गावातून नारायण गडावर जाण्यासाठी १ तास लागतो. पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर गडावर जाता येते.

    आंबोलीत वर्षा पर्यटन दरवर्षी उल्हासित स्वरूपाचे असते. दाट धूक्यात लपेटलेल्या गारव्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आवर्जून उपस्थित असतात. ‘कावळेसाद पॉईंट’ हा तर आंबोली पर्यटनातील प्रमुख आकर्षण आहे. मात्र, नारायणगड या किल्ल्याविषयी मात्र कित्येकांना माहिती नाही. हा ऐतिहासिक ठेवासुद्धा पर्यटकांनी पाहणे गरजेचे आहे. आंबोली पावसाळ्यात तर पर्यटकांनी फुलून गेलेली असते. काळ्या कपारीतून कोसळणारे धबधबे, घनदाट निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी देशाच्या विविध भागातून पर्यटक येत असतात; परंतु त्यामध्ये नारायणगडाकडे जाणारे अत्यंत कमी म्हणण्यापेक्षा नसतातच ! यासाठी या गडाकडे जाणारी वाट प्रशासनाने व्यवस्थित करणे आवश्यक आहे. त्याकरिता याबाबत शासन स्तरावरही गडाची डागडुजी होणे गरजेचे आहे.

  • महाडमधील चवदार तळे

    महाडमधील चवदार तळे

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या रायगड~ या किल्ल्याच्या लगत असलेले महाड एक शहर आहे. या शहराची लोकसंख्या 27,536 इतकी आहे. या शहराच्या मध्यभागी चवदारतळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने या शहराची भुमी पावन झाली आहे. हे तळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक स्तरावर प्रसिध्द आहे. या तळ्याचे अंदाजे क्षेत्रफ़ळ 2.5 एकर आहे.

    अनेक पर्यटक दरवर्षी आवर्जुन या तळ्यास भेट देत असतात. महाड नगरपरिषदेने या चवदार तळ्याचे सौदर्यीकरण पूर्ण केले आहे. या तळ्याच्या सौदर्यीकरणाचे काम व या सौदर्यीकरणाचा उद्घाटन सोहळा दिनांक 2 जुन 1992 रोजी संपन्न झाला आहे. सद्यस्थितीत चवदारतळ्याच्या चारही बांजुंनी सुशोभित कठडे बांधण्यात आले आहेत. तळ्याच्या सभोवताली विजेचे खांब उभारुन त्यावर विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. चवदार तळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीपासुन सुमारे 100 फ़ुटावर पाण्यामध्ये चौथरा बांधला असून या चौथऱ्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडे दहा फ़ुट उंचीचा पुर्णाकृती ब्रॉझचा पुतळा उभारण्यात आला आहे.

    त्याठिकाणी जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. पुतळ्याच्या चबुत-यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार कोरलेले आहेत.चवदार तळ्याच्या पश्चिमेकडे एक बहूउद्देशीय सभागृह बांधण्यात आले आहे. सभागृहाच्या तळमजल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महत्वाच्या घटनांबाबत स्मृतीचित्र आहे. या सभागृहाचा उपयोग विविध सभा, कार्यक्रम इ. साठी करण्यात येतो.

    सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर वाचनालय आहे. सभागृहाच्या समोरील जागेमध्ये आकर्षक बगीचा करण्यात आला आहे.महाड शहर ‘सावित्री’ नदीच्या किनारी वसलेले आहे. मुंबई ते महाड हे अंतर 175 कि.मी. आहे. पुणे ते महाड हे अंतर 110 कि.मी तर महाड ते किल्ले रायगड हे अंतर 24 कि.मी. आहे. या शहराच्या हद्दीलगत मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग आहे.

  • पुण्यातील पाताळेश्वर लेणी

    पुण्यातील पाताळेश्वर लेणी

    राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण,लक्ष्मी,गणेश या देवतांच्याही मूर्ती आहेत.सन १८५७ च्या बंडानंतर येथे एक बाबा बसायला लागले. पाताळेश्वरच्या शेजारील टेकडीवर ते रहायचे. या बाबांचे बालपण सोलापूरजवळील होनमुर्गी या गावी व्यतीत झाले. त्यांना लोक ‘जंगली महाराज’ असे म्हणत. सन १८९० दरम्यान त्यांचे निधन झाले. भक्तांनी त्या टेकडीवर त्यांचे मंदिर बांधले.

    त्यामुळे येथील वर्दळही वाढली आहे. मोठे प्रांगण असलेल्या पाताळेश्वर लेण्याच्या या प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांवर उभा आहे. त्याच्या आत आणखी एक वर्तुळ आहे. तेथे नंदी आहे. लेण्यात प्रवेश केल्यावर समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे.

    गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. गर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवरील शिल्पे पूर्णपणे खराब झाली आहेत. त्यातील एक शिल्प श्री शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक शिलालेख आहे. पेशवे काळात या मंदिराला दक्षिणा दिल्याचे उल्लेख आढळतात. या भागात आता ‘संभाजी उद्यान’ तयार करण्यात आले आहे. येथे भाविकांसह निसर्गप्रेमी पर्यटकांची पावले आपोआपच वळू लागली आहेत.

  • हर्णे समुद्रकिनारा

    हर्णे समुद्रकिनारा

    महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात रमणीय असा ‘हर्णे समुद्रकिनारा’ आहे. हे मुंबई आणि पुण्यातील रहिवाशांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. हा विस्तारित खडकाळ किनारा आणि स्वच्छ काळ्या वाळूत विशाल पसरलेला आहे. हा समुद्रकिनारा ‘मुरुड हरणाई’ नावाच्या छोट्या शहरात आहे. येथून जवळच दुर्गादेवीचे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात विस्तीर्ण कोरीवकाम असलेले मोठे खांब आहेत. हे मंदिर इसवी सन 18 व्या शतकातील आहे. हर्णे समुद्रकिनार्यांजवळ काही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

    ‘सुवर्णदुर्ग किल्ला’ हा एक एक विशाल किल्ला येथे पाहण्यासारखा आहे. हा सुमारे 8 एकरपर्यंत पसरलेला आहे. ‘आंजर्ले समुद्रकिनारा’ आणि ‘बुरुंडी बीच’ ही इतर आकर्षणाची ठिकाणे आहेत. ही अतिशय नयनरम्य आणि प्रदूषणरहित आहेत. ‘पहाले खाझी’ हे आणखी एक ठिकाण आहे, जिथे किल्ला बनविण्यासाठी कोरलेले प्रचंड पर्वतीय खडक आहेत. हे ठिकाण हर्णेपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. मुंबई किंवा पुण्याहून प्रवास करत असाल तर, महाराष्ट्र राज्य परिवहनच्या अनेक बसेस हर्णे शहरापर्यंत ‘शटल’ बसेस आढळू शकतात. येथून चिपळूण रेल्वेस्थानक 70 किमी अंतरावर आहे.

  • अंबागड किल्ला

    अंबागड किल्ला

    महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील ‘तुमसर’ तालुक्यात ‘अंबागड’ हा एक सुंदर किल्ला आहे. किल्ल्याचे बांधकाम, त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने संवर्धन केल्यामुळे हा किल्ला उत्तम अवस्थेत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झाले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात राहण्याची सोय होवू शकेल. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही. हनुमान मंदिरापासून गडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

    गोंड राजा बख्त बुलंद याचा सरदार राजखान पठाण याने हा किल्ला इसवी सन १७०० च्या सुमारास हा किल्ला उभारला. पुढे हा किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात गेल्यावर त्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला. पायऱ्यावरुन साधारणपणे आपण अर्ध्या तासात किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पिंपळपान आणि कमलपुष्प कोरलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच देवड्यामधून बुरुजावर जाण्यासाठी जिना आहे. बुरुजावरून किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आणि किल्ल्याच्या आतील भागावर नजर ठेवता येते. बुरुज पाहून खाली उतरून पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर दिसते.

    त्यात शेंदूर लावलेला एक दगड आहे. हे मंदिर अलीकडच्या काळात बांधलेले असावे, असे वाटते. या मंदिराजवळ चुन्याच्या घाण्याचे तुटलेले चाक पडलेले आहे. देवड्यांकडून किल्ल्यात जाणाऱ्या पायवाटेने पुढे जाताना डाव्या बाजूला एक विहीर आह. उजव्या बाजूला बांधीव तलाव आहे. त्यावर एक पडकी वास्तू आह. पुढे चालून गेल्यावर काही बुरुज लागतात. थोड्या पायऱ्या चढल्यावर चौथा बुरुज लागतो. या बुरुजाच्या उजव्या बाजूला मोठा आयताकृती बांधीव तलाव आहे . या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या तलावाच्या बाजूला वास्तूचे प्रवेशद्वार आहे. ही एक जीर्ण वास्तू आहे. डाव्या कोपऱ्यात आणखी एक इमारत आहे.

    या इमारतीला एकही खिडकी नाही. इमारतीच्या रचनेवरून येथे दारु कोठार असावे, असे वाटते. दारु कोठार पाहून उजव्या बाजूला गेल्यावर एक चौकोनी बांधीव विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बाजूलाच किल्ल्याची प्रवेशद्वारापासून आलेली तटबंदी आहे. किल्ल्याचा हा भाग पाहून पुन्हा माघारी परतावे.

    बालेकिल्ल्यातील चारही बुरुज चौकोनी आहेत. किल्ल्याच्या टोकाला असलेल्या चौकोनी बुरुजात एक खोली आहे. या खोलीतून बुरुजाच्या बाहेर पडता येते. या किल्ल्यात एक महाल आहे. या महालातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला नक्षीकाम केलेले कोनाडे असलेली एक भिंत आहे. ही भिंत संपते तेथे एक चौकोनी बुरुज आहे. या बुरुजात चोर दरवाजा आहे. बुरुजात असलेल्या पायऱ्यांवरुन खाली उतरल्यावर आपण किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला येता. येथून किल्ल्याखाली जाणारी वाट आहे. याठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.

  • मुंबईतील पवई तलाव

    मुंबईतील पवई तलाव

    पवई तलाव हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी सर्वात प्रसिद्ध तलाव असून मुंबईतील एक नितांतसुंदर ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तलावाच्या बाजूला जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी लहानसे सुंदर उद्यान आहे. येथे उडणारे कारंजे पाहणाऱ्यांच्या मनास आनंद देणारे आहेत. या तलावाचे क्षेत्रफळ २.१ चौरस किमी आहे. त्याची खोली ३ ते १२ मीटर आहे.
    या तलावावर सरकारने बसण्यासाठी बांधकाम केले आहे. चालण्यासाठी पदपथाची सोय केली आहे. पूर्वी येथे ‘पवई’ नावाचे गाव होते. गावातील झोपड्या हलवून तिथे कृत्रिम तलाव बांधण्यात आला. हळूहळू सभोवतालच्या परिसराला त्याच तलावाचे नाव लाभले. ‘मिठी’ नदी आणि ‘विहार’ सरोवराला लागूनच पवई तलाव आहे.

    पवई गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मिठी नदीच्या प्रवाहात दोन धरणे बांधण्यात आली. डोंगरावरून वाहत येणारे पावसाचे पाणी साठवून दुष्काळी काळात मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी या धरणाची निर्मिती करावी, असा प्रस्ताव सन १८८९ मध्ये मांडण्यात आला होता. कालांतराने या तलावात सांडपाणी, झाडे, फुले, कचरा आणि मोठ्या प्रमाणात वाहून आणलेला गाळ साचला गेल्याने पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर बंदी घातली गेली. त्यानंतर मासेमारीसाठी या तलावाचा वापर केला जात असे.

    सध्या ज्या जागेवर तलाव आहे, ती जागा तलाव बांधण्यापूर्वी डॉ. स्कॉट यांना वार्षिक भाडेपट्टीवर दिली होती. स्कॉट यांच्या मृत्यूनंतर ती जागा सरकारने आपल्या ताब्यात घेतली. सन १८२६ मध्ये ती पुन्हा एकदा फ्रामजी कावसजी यांना भाडेपट्टीवर दिली. त्यानंतर सन १८९१ मध्ये तिथे तलाव बांधण्यात आला. या तलावाला फ्रामजी कावसजी यांचं नाव दिले गेले. आयआयटी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग (निटी) आणि हिरानंदानी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण इमारती लक्ष वेधून घेतात. रात्रीच्या वेळी तलावाच्या काठावरुन दिसणारा सभोवतालचा प्रकाश फारच सुंदर दिसतो.

    लार्सन अँड टुबरो कंपनीकडून गाडी वळली की पवई परिसराला सुरुवात होते. काहीसे पुढे गेल्यावर मध्येच हा तलाव दिसतो. तलावाला एका बाजूने संपूर्ण तटबंदी बांधण्यात आली असून तिथे बसण्याची, फिरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तिथे चालण्यासाठी आलेली कित्येक मंडळी दिसतात. आजूबाजूला लहान-मोठी शिल्पे बांधली आहेत. शांत तलाव आणि दूरवर पसरलेला आसपासचा परिसर नयनरम्य आहे. तलावावर नौकानयनची व्यवस्था आहे. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत; मात्र मगरींचे वास्तव्य असल्याने पाण्यात उतरण्यास प्रतिबंध आहे. महानगरपालिकेचा कर्मचारी येथे तैनात केलेला असतो. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईचे सौंदर्य वाढविण्यात हा तलाव मोलाची भूमिका बजावतो.