सह्याद्री मराठी वाहिनी

Category: भटकंती

विविध तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे, गडकिल्ले आणि समुद्र किनाऱ्यांवर जायचंय? पर्यटनाची संपूर्ण माहिती ‘भटकंती’ या सदरात!

  • जंगली जयगड किल्ला

    जंगली जयगड किल्ला

    सातारा जिल्यातील ‘पाटण’ तालुक्यात ‘जंगली जयगड’ला जाण्यासाठी पायथ्याचे गाव म्हणजे ‘नवजा’ आहे. येथे जाण्यासाठी कोयनानगर येथून सकाळी बस आहे. ‘नवजा’ हे ‘शिवसागर’ जलाशयाच्या काठावर वसलेले सुंदर आणि रमणीय असे गाव आहे. नवजा गावातून साधारणतः दीड ते दोन तासात पायी चालत गडावर जाणाऱ्या पायवाटेजवळ जाऊन पोहोचाल.

    आपण या पायवाटेने वर गेल्यावर गडावरील ‘घोडतळ’ दिसते. इंग्रजांच्या काळात ‘जंगली जयगड ला आल्यानंतर याठिकाणी घोडे बांधले जायचे, म्हणून याला ‘घोडेतळ’ असे संबोधले जाते. याठिकाणी पाण्याचा एक जिवंत झरा देखील बघायला मिळेल.

    कोयना नदीच्या परिसरात असलेला हा किल्ला पुढे जात असताना कोयनेचे दर्शन देत राहतो. गडावर जाणारी पायवाट दाखविण्यासाठी वन विभागाने जागोजागी दगडधोंडे रचून ठेवले आहेत. काही अंतर पुढे चालून गेल्यावर एक गोल ओटा लागतो. या ओट्यावर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. या पायऱ्यांवर चढून वर गेले की येथे ‘झेंडा बुरुज’ मिळतो.

    गडावर जाताना 2 सुळके दिसतात. याला लोक ‘दीपमाळ’ असे म्हणतात. एका डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर मुख्य गड दिसतो. ‘जंगली जयगड’ सन 1967 साली झालेल्या भयंकर भूकंपात मोडकळीस आला. गडाच्या मुख्य दरवाजाचे दगड कोसळले आहेत.

    गडाच्या दुसऱ्या टोकाकडे जाताना गडदेवता ठाणाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. मंदिरासमोर छोटीशी दीपमाळ आहे. तिथे काही दगडी भांडी आहेत. गडावर असे दुर्गावशेष पाहण्यास मिळतात. पुढे राजवाड्याच्या चौथऱ्याचे काही अवशेष बघायला मिळतात. इथून वासोटा, मधू मकरंदगड यांचे देखील दर्शन होते. पोफळी घाट देखील आपल्याला इथून बघायला मिळतो.

    ‘जंगली जयगड’ असलेल्या वनामध्ये मोठ्या औषधी वनस्पती आणि खुरट्या वनस्पतीसुद्धा आहेत. ऐन, अंजनी, वेत, कुंभा, जांभूळ आणि आंबा ही काही झाडे या भागात आढळतात. भेकर, सांबर, बिबट्या, जंगली कुत्रे, गवा आणि भरपूर विविधता असलेले प्राणीदेखील येथे आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शनही येथे होत असते. या जंगलामध्ये अस्वले देखील आहेत; परंतु शक्यतो ती दिसत नाहीत.

  • यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

    यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

    ‘यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य’ हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक आहे. सांगली जिल्ह्यातील ‘वाळवा’ तालुक्यात ‘कृष्णा’ नदीच्या खोऱ्यात असलेले हे अभयारण्य सागरोबा डोंगरावर वसले आहे. सन १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.

    धो.म. मोहिते या वनस्पती आणि वन्यजीवप्रेमीच्या ध्यासातून हे अभयारण्य साकारले आहे. वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभागातून आकाराला आलेले हे अभयारण्य आहे. येथील भरपूर पाऊस, दाट धुके, गार वारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्नता प्रदान करतो. येथे असलेले छोटे-मोठे धबधबे पर्यटकांना चिंब भिजण्याचा आनंद मिळवून देतात.

    सागरेश्वर अभयारण्य मिरज रेल्वे स्थानकापासून 60 किलोमीटर, कराडपासून 30 किलोमीटर तर ताकारी रेल्वे स्थानकापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. कराड येथून सागरेश्वरला पोहोचण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी पावसाळा उत्तम कालावधी आहे.

    या अभयारण्यात सागरेश्वर महादेवाचे मंदिर आहे. एवढेच नव्हे तर एकूण 47 प्राचीन मंदिराचा समूह येथे आहे. 13 ओवऱ्या आहेत. आंघोळीचे आणि पिण्याचे कुंड वेगवेगळे असून या कुंडात वर्षभर पाणी असते.

    सागरेश्वर अभयारण्य हे ‘कडेगाव’, ‘वाळवा’ आणि ‘पलूस’ या तालुक्यांच्या सीमा जोडणाऱ्यार सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्या माथ्यावर आहे. येथे जाण्यासाठी ‘देवराष्ट्र’ गावात जावे लागते. तेथे पोहोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो.

    सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. अंजन, धावडा, चंदन, धायटी, बाभूळ, सुबाभूळ, निलगिरी,कशिद, गुलमोहर, आपटा, सीताफळ तसेच घाणेरी आदी वृक्ष आहेत. साळींदर, हनुमान लंगूर, सांबर, चितळ, काळवीट, लांडगा, ससा, खार, खोकड, कोल्हा, तरस असे वन्यजीव आपण इथे पाहू शकतो. हे पक्ष्यांचे नंदनवन आहे. पक्षी निरीक्षणाची हौस असलेल्यांसाठी हे एक उत्तम स्थळ आहे.

    येथे १४२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. हळद्या, साळुंखी, मैना, सुगरण, चष्मेवाला, पिंगळा, गव्हाणी घुबड, मुनिया, सुर्यपक्षी, नाचण, सातभाई, चंडोल,राखी वटवट्या, कोतवाल, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, भारद्वाज, पावश्या, पोपट, कोकिळ, हरियाल, मोर, गाय बगळा असे पक्षी येथे आहेत.

    वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अभयारण्याभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. ‘रणशूळ पॉईंट’ हे अभयारण्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे.

  • विरारचे जीवदानी मंदिर

    विरारचे जीवदानी मंदिर

    महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार येथे ‘जीवदानी’ टेकडीवर ‘जीवदानी’ देवीचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. इसवी सन १७ व्या शतकात या टेकडीवर ‘जीवधन’ नावाचा किल्ला होता. या तटबंदीच्या आत काही प्राचीन दिसणाऱ्या गुहा आणि पाण्याच्या टाक्या आहेत. हे मंदिर ‘वैतरणा’ नदीच्या काठावर आणि सातपुडा डोंगराळ भागात आहे. एकेकाळी या शहराचे नाव ‘एक-वीर’ होते. या कारणास्तव या मंदिराला ‘एकवीरा देवी’ म्हणूनही ओळखले जात होते; परंतु मुघल आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यामुळे मंदिर जीर्ण अवस्थेत पोहोचले. ‘जीवदानी’ म्हणजे जीव देणारी आई ! तज्ज्ञांच्या मते, सातपुडा डोंगराच्या या साखळीत पूर्वी जीवनदायी औषधे सापडली होती. या औषधांमुळे लोकांचे प्राण वाचले. त्यामुळे या मातेचे नाव ‘जीवदानी’ ठेवले गेले, अशीही एक धारणा आहे. तेव्हापासून लोक तिला ‘जीवनाची माता’ म्हणू लागले.

    जीवदानी माता हे महाराष्ट्रातील 18 शक्तीपीठांपैकी एक आहे. या किल्ल्याच्या एका भागात जीवदानी मातेच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिरात जाण्यासाठी भाविकांना सुमारे 1300 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढू न शकणाऱ्या भाविकांसाठी मंदिरापर्यंत जाण्यासाठी ‘रोपवे’ बसवण्यात आला आहे. जीवदानी माता मंदिर परिसरात अनेक देवतांची मंदिरे स्थापन झाली आहेत. ‘नवरात्र आणि दसरा’ हे येथील मुख्य उत्सव आहेत. भक्त नवसाच्या दिवशी दिवा किंवा मेणबत्ती लावून पूजा करतात. देवीला मिठाई, बांगड्या, सिंदूर, नारळ अर्पण करतात. मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक अनवाणी पायऱ्या चढतात. रविवार हा जीवदानी मातेचा विशेष दिवस मानला जातो.

    जीवदानी देवीची एक पौराणिक कथा सांगितली जाते. पांडव त्यांच्या जंगल प्रवासादरम्यान ‘शूरपारका’ येथे आले. त्यांनी भगवान परशुरामांनी पवित्र केलेल्या विमलेश्वरच्या पवित्र मंदिराला भेट दिली. त्यांनी विरार तीर्थाच्या काठी भगवती एकवीराची पूजा केली. तेथील शांतता आणि उदात्त निसर्ग पाहून जवळच्या डोंगरात त्यांनी लेणी कोरण्याचे ठरवले. एका गुहेत एकवीरा देवीच्या योग लिंगाची स्थापना करून त्यांनी पूजा केली. यानंतर तिला ‘भगवती जीवनधानी’ असे म्हटले. पुढे पांडवांनी संन्याशांसाठी शिरगावपासून सुमारे एक मैल अंतरावर असलेल्या छोट्या गुहांचा संच निर्माण केला. तो आता ‘पांडव डोंगरी’ म्हणून ओळखला जातो. अनेक योगी ‘पांडव डोंगरी’ येथे राहून ‘जीवनधानी’ देवीचे दर्शन घेत असत.

  • वर्सोली समुद्रकिनारा

    वर्सोली समुद्रकिनारा

    अलिबागमधील वर्सोली समुद्रकिनारा हे एक नयनरम्य ठिकाण आहे. हा किनारा निर्जन नाही; परंतु अपेक्षित असणारी शांतता प्रदान करतो. पांढरीशुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी हे येथील खास वैशिष्ट्य आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या कमी असते; परंतु शनिवार-रविवार हे 2 दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक योग्य ठिकाण आहे.

    या समुद्रकिनाऱ्यावर मोठा नौदलतळ आहे. समुद्रकिनाऱ्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुबलक नारळाची झाडे आहेत. या किनाऱ्यावर जलक्रीडा सुविधा असल्याने पर्यटकांना त्यांचा लाभ घेता येतो.
    या किनाऱ्यावर जायचे झाल्यास हवाईमार्गे आणि रेल्वेने गेल्यास हे अंतर लांबचे आहे. तथापि तेथे पोहोचण्याचा जलद मार्ग म्हणजे ‘गेट वे ऑफ इंडिया’ वरून फेरी पकडणे हा आहे.

  • रोहिडा किल्ला

    रोहिडा किल्ला

    सातारा जिल्ह्यातील भोर तालुक्यात ‘रोहिडा’ किल्ला आहे. याला ‘विचित्रगड’ असेही म्हणतात. हा गड पाहण्यासाठी प्रथम संस्थानकालीन भोरला जावे लागते. येथून बसने ‘रोहिडा’ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘बाजारवाडी’ गावात पोहोचता येते. गावात पोहोचल्याबरोबर पश्चिमेकडे पाहिले असता तटबंदी आणि बुरूजांनी नटलेला ‘रोहिडा’ दिसतो. या गडावर जाण्यासाठी सोपी चढण आहे.

    बाजारवाडी येथून मळलेल्या ठळक पायवाटेने गेल्यावर तासाभरात गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ पोहोचता येते. भोरच्या रायरेश्वर प्रतिष्ठानने या किल्ल्यावरील बहुतांशी वास्तूंचा जीर्णोध्दार केला आहे. पहिल्या दरवाज्याच्या माथ्यावर गणेशपट्टी आहे. हा दरवाजा पार केल्यानंतर दोन्ही अंगास प्राण्यांची शिल्पे असलेला दुसरा दरवाजा मिळतो. या दरवाज्यातून आत गेल्यावर कातळात खोदलेले सुमधुर पाण्याचे तळे असून हे बारमाही आहे. येथून थोडे पुढे गेल्यानंतर भक्कम बांधणीचा गडाचा तिसरा दरवाजा लागतो.

    प्रवेशद्वाराच्या भिंतीवर दोन्ही बाजूस गजमुखांची शिल्पे असून डाव्या हातास मराठी शिलालेख आणि उजव्या हातास फारसी शिलालेख कोरलेले दिसतात. दोन्ही शिल्पे सरस आहेत. गडावर फत्तेबुरूज आहे. हा बुरूज पाहून सदरेच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर दगडी बांधणीचे ‘रोहिडमल्ला’चे मंदिर आहे. या मंदिरात गणपती आणि भैरवाच्या मूर्ती असून समोरच एक लहानसे तळे, दीपमाळ आहे. रोहिडा किल्ल्यास एकूण 7 बुरूज आहेत. त्यातील ‘शिरवले’ आणि ‘वाघजाई’ हे बुरूज भक्कम लढाऊ बांधणीचे आहेत. येथेच एका तळ्याजवळ शिवलिंग आणि मानवी मूर्ती जमिनीलगत बसवलेली आहे. गडफेरी व्यवस्थित करण्यासाठी 2 तास पुरेसे ठरतात.

  • नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान

    नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान

    महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान हे मन उल्हासित करणारे एक ठिकाण आहे. येथे हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला विस्तीर्ण जलाशय डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणजे विविध पक्ष्यांचे दर्शन होय. नवेगावबांधचा परिसर विशेषत्वाने डोंगराळ असून तेथील वनाचा एकूण विस्तार 133 चौरस किमी आहे. सन 1975 साली ‘नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान’ म्हणून शासनाने घोषित केले. ‘अरण्यऋषी’ नावाने प्रख्यात लेखक मारुती चितमपल्ली तसेच थोर साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांच्या लेखनातून नवेगावचा निसर्ग भेटतो.

    हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन येथे होते. नवेगावचा परिसर वनस्पती, वन्यजीव आणि पक्षी यांनी समृद्ध आहे. सारसक्रेन, उघडचोच करकोचा, मध्यम आणि मोठा बगळा अशा पाणपक्ष्यांसोबत छोटा निळा खंड्या, पाणमोर, पाणकावळा, जांभळी पाणकोंबडी, टिटवा, पाणपिपुली हे छोटे पक्षी येथे आढळतात. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात बुलबुल, सुतारपक्षी, हुदहुद, शिकरा, दयाळ, कोतवाल, सातबहिणी, ससाणा, गरुड, घुबड, घार असे पक्षी दिसून येतात. येथील वनस्पतीतही विविधता असून साग, बिजा, धावडा, पळस, कवट, बेल, बोर, मोह, बेहडा, हिरडा, उंबर, जांभूळ या वनस्पती येथे आढळतात. येथे पर्यटकांची राहण्याची सोय आहे. स्थलांतरीत पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि वन्यप्राण्यांना बघण्यासाठी मार्च, मे महिन्याचा कालावधी योग्य आहे.

  • कोल्हापूरचा चिन्मय गणाधीश

    कोल्हापूरचा चिन्मय गणाधीश

    पुणे-बंगळुरू महामार्गावर महाराष्ट्रात कोल्हापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर ‘चिन्मय गणाधीश’ ही श्री गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. सन 2001 मध्ये ही मूर्ती दर्शनासाठी खुली झाली. ‘चिन्मय संदीपन्य’ आश्रमात ही मूर्ती आहे. ही गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. संपूर्ण रचनेत 24 फूट उंच अशा ध्यानमंदिरावर विराजमान असलेली 61 फूट उंचीची गणपती मूर्ती आहे. ध्यानमंदिराची वास्तू वर्तुळाकार आहे. मंदिराचा व्यास सुमारे 60 फूट आहे.

    सिमेंट काँक्रीटची मंदिरासह 85 फूट उंच गणेशमूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आणि आकर्षण झाले आहे. एकूण 24 खांब गणेशमूर्तीला आधार देतात. शिमोगा-कर्नाटक येथून खास पाचारण करण्यात आलेल्या पन्नास कुशल कामगारांनी ही संरचना पूर्ण करण्यासाठी सुमारे एक वर्ष कठोर परिश्रम घेतले.

    दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी स्वामी तेजोमयानंद यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र-गुजरात-गोवाचे प्रादेशिक प्रमुख स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय सेवा ट्रस्ट, महाराष्ट्राने हे काम पूर्ण केले. ‘चिन्मय गणाधीश’ हे आता तीर्थक्षेत्र बनले आहे. संकष्टी चतुर्थीला हजारो लोक याठिकाणी भेट देतात. दररोज सकाळी वैदिक मंत्रोच्चारासह भगवानाची पूजा केली जाते. संध्याकाळी आरती केली जाते.

  • सासवणे सागरकिनारा

    सासवणे सागरकिनारा

    महाराष्ट्राच्या अलिबाग तालुक्यातील सासवणे या छोट्याशा गावात ‘सासवणे समुद्रकिनारा’ आहे. हा किनारा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. येथे पर्यटकांची फारशी वर्दळ नसते; मात्र तो निर्जनही नाही. आरामशीर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हा मस्त शांत किनारा आहे. अलिबाग शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर हा किनारा आहे. ‘करमरकर शिल्प संग्रहालय’ हे येथील प्रमुख आकर्षण आहे. ही शिल्पे श्री. नानासाहेब करमरकर यांनी कोरलेली आहेत.

    त्यांच्या वाड्यात ही शिल्पे पाहता येतात. सासवणे येथील श्री फुलाई माता मंदिरालाही आपण भेट देऊ शकता. याशिवाय सासवण्याला जवळ असणाऱ्या मांडवा बंदर आणि रेवस बंदर येथेही आपण भेट देऊ शकतात. सासवण्यापासून अंदाजे तास ते दीड तास अंतरावर असलेला रेवदंडा किल्ला, कोरलाई किल्ला, कनकेश्वर मंदिर इत्यादी प्रेक्षणीय स्थळेही आपल्याला पाहता येतील. डोळ्यांना आणि मनाला आनंद देणारा सासवणे किनारा फार सुंदर आहे. हा प्रशस्त किनारा सुट्टीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

  • बितनगड किल्ला

    बितनगड किल्ला

    महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात बितनगड किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्यास ‘बितंगा’, ‘बिताका’ या नावांनीही ओळखतात. या गडावर जायचे असेल तर प्रथम ‘घोटी’ गावात जायला हवे. इथून भंडारदरा रस्त्यावर ‘टाकेद’ गावाला जाण्यासाठी एक फाटा आहे. या फाट्यावरून पुढे गेल्यावर ‘बितनवाडी’ हे गाव मिळते. बितनवाडी गाव बितनगडाच्या पायथ्याशी आहे.

    बितनगड हा किल्ला कळसुबाई डोंगररांगेची उपरांग असलेल्या पट्टा डोंगररांगेत आहे. बितनवाडी गावामधून गडाकडे जाणारी पाऊलवाट सुरु होते. वाटेच्या बाजूला वाढलेल्या झाडीमधून वाट काढत गडाकडे जावे लागते. थोडीशी चढाई केल्यानंतर आपल्याला बालेकिल्ल्याच्या पायऱ्या दिसायला लागतात. वाटेत पाण्याच्या टाक्यांचेही दर्शन घडते.

    पायऱ्यांनी चढून वर गेल्यावर एक गुहा दिसते. ही गुहा मोठी आहे, गडावर मुक्कामाच्या हेतूने जाणारे येथे आश्रय घेतात. गुहेतून बाहेर आल्यावर गडमाथ्यावर जावे. एका बाजूला बुरुजाची ढासळलेली वास्तू अस्पष्ट दिसते. गडावरील तोफांना दिशा देण्यासाठी असणारी आरी येथे आहे. धुके नसेल तर किल्ल्यावरुन ‘औंध’ आणि ‘आड’ हे किल्ले देखील दिसतात. ‘अलंग-मदन-कुलंग’ यांचे दर्शन देखील घडते. हे सर्व विहंगम दृश्य इतिहासप्रेमींचे मन हरखून सोडते. इतिहासात डोकावल्यास एका पत्रात या गडाच्या पायथ्याशी बितनवाडी गावाचा उल्लेख आढळतो. हा किल्ला स्वराज्याचा एक भाग होता. या किल्ल्यावर एखाद-दुसरी तोफ असावी. याचा वापर जास्तीत जास्त टेहाळणीसाठीच केला गेलेला असावा असे दिसते.

  • भंडारदरा धरण

    भंडारदरा धरण

    भंडारदरा हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. येथील ‘प्रवरा’ नदीवर सन 1910 मध्ये बांधलेले ‘विल्सन धरण’ हे सर्वात मोठे मातीचे धरण आहे. या धरणाला ‘भंडारदरा धरण’ म्हणूनही ओळखले जाते. हे धरण त्या काळातील अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेबद्दल माहिती देते. या धरणाच्या पायथ्याशी असलेली घनदाट हिरवळ मनमोहक आहे. येथील मोठमोठी झाडे आणि छोटे ओढे यांनी नटलेली सुंदर बाग लक्ष वेधून घेते.

    पावसाळ्यात, जेव्हा पाण्याची पातळी वाढते, तेव्हा मैदानात पाणी सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडतात, त्यावेळी बागेतून पाण्याच्या शिंपडण्याचा आनंद घेता येतो. येथे ‘छत्री धबधबा’ हे आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा धबधबा पावसाळ्यात दिसतो.

    हे स्थान निसर्गसौंदर्याने नटलेले असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा मूळच्या सौंदर्यात अजून भर टाकतात. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाच्या जलाशयास ‘आर्थर लेक’ असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. प्रवरा नदीचे पाणी अमृतासमान असून या नदीला ‘अमृतवाहिनी’ असे म्हटले जाते.

  • म्हाळसाकोरे मंदिरे

    म्हाळसाकोरे मंदिरे

    नाशिकमधील ‘म्हाळसाकोरे’ गाव मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील हेमाडपंती मंदिरे दुर्मिळ आहेत. ‘म्हाळसाकोरे’ला जायचे झाल्यास नाशिकहून सायखेडामार्गे जाता येते. हे अंतर साधारण ३०-३५ किलोमीटर आहे. नांदूरमध्यमेश्वर येथून हे अंतर अवघे ४-५ किलोमीटर आहे. गावात गेल्यावर डाव्या बाजूला ‘म्हाळसा’ देवीचे मंदिर लागते.

    ‘म्हाळसाकोरे’ निफाड तालुक्यात आहे. ही या गावची मुख्य देवता असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ पहायला मिळते. ‘म्हाळसाकोरे’ या गावाच्या नावामागे 2 देवतांच्या संगमाची आख्या‌यिका प्रसिद्ध आहे. म्हाळसाकोरे गावात एका हद्दीवर ‘म्हाळसादेवी’चे मंदिर आहे. दुसऱ्या हद्दीवर ‘साकरा’ देवीचे मंदिर आहे. एकाच गावातील 2 देवीच्या नावावरून गावाचे नाव पडणे, हे वेगळेपण ‘म्हाळसाकोरे’ गावात पहायला मिळते.

    जेजुरीचे कुलदैवत खंडेराव महाराज यांच्या 2 पत्नींपैकी म्हाळसादेवी यांचे माहेर चंदनपुरी तर आजोळ म्हणजे मामाचे गाव म्हाळसाकोरे होय. असे म्हंटले जाते की गावात ‘म्हाळसा’ नावाचा उपद्रवी राक्षस प्रजेला त्रास द्यायचा. त्याचा वध करून प्रजेला सुखी करणाऱ्या गावच्या कन्येला ‘म्हाळसादेवी’ म्हटले जाऊ लागले. मंदिरात म्हाळसादेवीची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या हाताला गणपतीची तर डाव्या हाताला सरस्वतीची मूर्ती आहे.

    म्हाळसादेवी मंदिराच्या शेजारी पुरातन दगडी विहीर असून देवी तेथे स्नान करत असे, अशी आख्यायिका सांगितली जाते. या विहिरीची सध्या दुरवस्था झाली आहे; मात्र त्याचे संवर्धन करून ती सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तेथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले.

    म्हाळसादेवी ही विशेषत: ब्राह्मण, सोनार समाजाची कुलदेवी असल्याने महाराष्ट्र तसेच गुजरातकडून येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. म्हाळसादेवीच्या मंदिराशेजारी श्री संत जनार्दन स्वामी महाराजांचा मठ पाहता येतो. चैत्र पौर्णिमेला देवीच्या यात्रेबरोबर हनुमान जयंती, खंडेराव महाराजांची यात्रा भरते. यावेळी बारागाड्या ओळणे, टांगा शर्यत, कुस्त्यांची दंगल, कलगीतुऱ्यांचा कार्यक्रम असतो. नवरात्रीत हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम गावचे वातावरण भक्तीमय करतात.

    गावाच्या पूर्वेस बाराव्या शतकातील हेमाडपंती नीळकंठेश्वर महादेव मंदिर आहे. म्हाळसाकोरे येथे पुरातन हेमाडपंती शिवमंदिर आहे. मंदिराच्या दक्षिणेस नव्यानेच बांधण्यात आलेले श्रीहरी दत्ताचे मंदिर आहे. मंदिरासमोर आसनस्थ नंदीची दगडी मूर्ती आहे. मंदिराचे काम अतिशय सुंदर पाषाण शिल्पातील आहे. या परिसरात श्रीकृष्ण मंदिरही आहे. मंदिराच्या आवारात इतर लहान मोठी शिल्पे पाहायला मिळतात. पडझड झालेल्या नीळकंठेश्वर महादेव मंदिराचे नंतरच्या काळात दुरूस्तीचे काम करण्यात आल्याने मंदिराचा खालचा भाग पुरातन तर वरचा भाग आधुनिक दिसतो.

    दुरूस्ती करताना मंदिराच्या आतील शिल्पांना सुरक्षित ठेवल्याने त्याचे सौंदर्य मनमोहक ठरते. मंदिरातील मूर्ती वेरूळ, अजिंठ्याच्या लेण्यांतील शिल्पकलेची आठवण करून देतात. नीळकंठेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार सुंदर नक्षीने सजलेले आहे. मांजरगाव रस्त्याला ‘साकरा’ देवीचे मंदिर आहे. हे गाव आणि येथील मंदिरे फार रमणीय आहेत. त्यामुळे येथे भाविकांची गर्दीही असते.

  • वेळणेश्वर समुद्रकिनारा

    वेळणेश्वर समुद्रकिनारा

    महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात ‘वेळणेश्वर’ गावाजवळ ‘शास्त्री’ नदीच्या उत्तरेला वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा फार सुंदर आहे. खडकाळ समुद्र आणि स्वच्छ वातावरणासाठी तो लोकप्रिय आहे. पोहणे, सूर्यस्नान आणि मनमुरादपणे समुद्रकिनाऱ्यावरचे फिरणे यासाठीच पर्यटक या किनाऱ्याला पसंती देतात. या समुद्रकिनाऱ्यावर तयार झालेली ‘ब्राह्मण घळ’ देखील पाहण्यासारखी आहे.

    येथे प्राचीन वेळणेश्वर मंदिर असून ते पाहण्यासारखे आहे. या मंदिरात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते. या किनाऱ्यावर गेल्यास अंजनवाले किल्ला, व्याघ्रंबरी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि उमा महेश मंदिर ही आणखी काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. गुहागरपासून जवळ असलेले ‘हेदवी’ गाव हे समुद्रकिनारे, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध असल्याने ते सुद्धा पाहण्यासारखे आहे.

    या किनार्येजवळची खडकांची रांग तसेच डोंगराच्या पोटात समुद्र घुसल्यानेत्याची झीज होऊन निर्माण झालेले वेगवेगळे आकार, त्यावर समुद्री जीवांनी केलेले नक्षीकाम आणि शिंपले फार सुंदर दिसतात. येथे वळसे घेत येत असलेली नदी समुद्रास मिळते. अशी रमणीय दृश्ये या किनाऱ्यावर पाहता येतात.

  • अर्नाळा किल्ला

    अर्नाळा किल्ला

    ‘अर्नाळा’ किल्ला हा अर्नाळा बेटावर असलेला एक सागरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार-पश्चिम भागातील ‘अर्नाळा’ या लहानशा शहराच्या किनाऱ्यावर तो वसलेला आहे.

    हा किल्ला इसवी सन १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. इसवी सन १८ व्या शतकात मराठा साम्राज्याने तो ताब्यात घेतला. हा किल्ला पोर्तुगीजांसाठी एक सामरिक तटीय संरक्षण होता. मीठ आणि मसाल्यांसारख्या वस्तूंसाठी व्यापारी वखार म्हणून त्याचा वापर करायचे. आज, हा किल्ला एक लोकप्रिय आकर्षण आहे.

    येथून समुद्राचे विहंगम दृश्य न्याहाळता येते. पर्यटक मुख्य भूमीवरून लहान बोटीतून किंवा कमी भरतीच्या वेळी बेटाला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या ‘कॉजवे’वरून किल्ल्यावर चालत जाऊ शकतात. अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम अर्नाळा शहरात जावे लागते. अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी येथून वाहतुकीचे विविध मार्ग आहेत.

    अर्नाळा हे मुंबई आणि ठाणे या जवळच्या शहरांशी रस्त्याने चांगले जोडलेले आहे. मुंबई किंवा ठाणे येथून अर्नाळ्याला बसने किंवा टॅक्सीने जाऊ शकता. विरार रेल्वेस्थानकावरून अर्नाळ्याला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी असतात. विरार रेल्वे स्थानक ते अर्नाळा हे अंतर सुमारे 17 किमी असून रस्त्याने अर्नाळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 30-40 मिनिटे लागतात. या किल्ल्यावर गेल्यास अर्नाळा सागरकिनारा, वसईचा किल्ला, तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान, केळवा किनारा, वज्रेश्वरी धबधबा, सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च ही स्थळेसुद्धा पाहता येतात.

  • नेहरू तारांगण

    नेहरू तारांगण

    मुंबईतील नेहरू तारांगण हे वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय शिक्षणासाठी असलेले एक प्रमुख ठिकाण आहे. नेहरू तारांगण मनोरंजनासोबतच विविध व्याख्याने, कार्यक्रम आणि प्रख्यात अवकाश संशोधकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथे मुलांना प्रत्यक्ष तारे–ग्रह कशा पद्धतीने अंतराळात विहार करतात, हे पाहता येते. हा खूप सुंदर अनुभव असतो.

    याची रचना वास्तुविशारद जे.एम. कादरी यांनी केली आहे. सुंदर घुमटाकार इमारत असलेली दंडगोलाकार रचना अनेकांना आकर्षित करते. विद्यार्थी, खगोलशास्त्रज्ञ आणि इतर अंतराळ संशोधक येथे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना आवर्जून भेट देतात. अधूनमधून, येथे सांस्कृतिक कार्यक्रमदेखील पहायला मिळतात.

    अंतराळ अभ्यासाला वाहिलेली ‘नेहरू तारांगण’ ही संस्था विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांमधील आकर्षणाचे केंद्र आहे. विज्ञान आणि अवकाश याविषयी मुलांच्या मनात आवड निर्माण करण्यासाठी मुंबईतील ‘नेहरू तारांगण’ हे एक चांगले ठिकाण आहे. नेहरू तारांगण विज्ञान आणि मानवतेच्या अभ्यासासाठी स्थापन केले गेले.

    गेल्या काही वर्षांत, नेहरू तारांगण आणि नेहरू केंद्र हे खगोलशास्त्रातील ख्यातनाम शास्त्रज्ञ, संशोधक आणि इतरांसाठी आकाशातील ग्रहांचा आणि सर्व हालचालींचा अभ्यास करण्यासाठी आवडते ठिकाण बनले आहे. येथे विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, खगोलशास्त्रावर आधारित चित्रकला स्पर्धा आणि वादविवादही होतात.

    सूर्यमालेचे दर्शन – नेहरू तारांगणातील “स्टार्स अँड वंडर्स ऑफ द युनिव्हर्स” हा नियमित कार्यक्रम आहे. प्रोजेक्टर प्रतिमा प्रदर्शित करीत असताना निवेदक सूर्यमाला, आपल्या ग्रहाची उत्क्रांती आणि आपल्या विश्वातील इतर रहस्यांबद्दल माहिती देतात. 90 मिनिटांच्या या कार्यक्रमामध्ये दिवसभरात 4 सत्रे असतात. 2 सत्रे हिंदीत दिली तर इतर दोन इंग्रजी आणि मराठीत सांगितली जातात.

    वैश्विक घटनेचे साक्षीदार – जर तुम्ही सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या दिवशी मुंबईत असाल, तर नेहरू तारांगण हे प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचे उत्तम ठिकाण आहे. याठिकाणी तुम्हाला पाहण्याचा अनुभव देण्यासाठी सुविधा आणि आवश्यक उपकरणे आहेत. स्टार गेझिंग – नेहरू तारांगणामध्ये इमारतीच्या बाहेर दुर्बिणी आहेत. दुर्बिणीद्वारे विशाल आकाशगंगेकडे पाहू शकता.

    डिस्कव्हरी ऑफ इंडिया – येथे अनेक प्रदर्शने, गॅलरी आणि प्रेक्षागृहे देखील आहेत. येथे विविध मैफिली आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ग्रंथालय – नेहरू तारांगण ग्रंथालयात सुमारे 30,000 पुस्तकांचा संग्रह आहे. ही पुस्तके धर्मापासून संबंधित विज्ञानांपर्यंत, तत्त्वज्ञानापासून सामाजिक शास्त्रापर्यंत आणि अगदी कला आणि वास्तुशास्त्रापर्यंत ग्रंथ आहेत. विद्यार्थी अनेकदा या ठिकाणी भेट देतात. हे ठिकाण सोमवार आणि काही सण वगळता वर्षभर खुले असते. ते सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुले असते.

    नेहरू तारांगण मुंबईत वरळी येथे आहे. येथून रेल्वे स्थानक व बस डेपो जवळ आहे. वरळीमध्ये दिवसभर बेस्ट बसेस असतात. खासगी कॅब देखील भाड्याने घेऊ शकता. तुम्ही शहरातील कोठूनही तारांगणात जाण्यासाठी मुंबई लोकल ट्रेनमध्ये चढू शकता. महालक्ष्मी, भायखळा आणि चिंचपोकळी ही तारांगणाच्या जवळच्या स्थानकांपैकी एक आहेत.

  • सिद्धनाथ मंदिर खरसुंडी

    सिद्धनाथ मंदिर खरसुंडी

    सिद्धनाथ हा शंकर देवांचा अवतार मानला जातो. सिद्धनाथ हा आटपाडी आणि लगतच्या प्रदेशांचा संरक्षक देव आहे व महाराष्ट्रातील अनेक प्रादेशिक क्षेत्रपाल देवांपैकी एक आहे. सिद्धनाथांचे ऐतिहासिक मंदिर, 450 वर्षांपूर्वी बांधलेले मोठे मंदिर आहे.

    या मंदिरातील शंकराचा पुनर्जन्म आहे ज्याला नाथबाबा असे म्हणतात. या देवाला दोन पत्नी होत्या एक देवी जोगेश्वरी आणि दुसरी पत्नी म्हणजे देवी जकाबाई खरसुंडीपासून काही अंतरावर राहत होत्या. नाथबाबा देवी जकाबाई यांना 3 वर्षातून एकदा भेटू शकतात आणि ही अट त्यांची पहिली पत्नी देवी जोगेश्वरीने ठेवली होती.
    खरसुंडी जवळ गोहदापूर नावाचे एक ठिकाण आहे जिथे पाण्याचा नैसर्गिक झरा युगानुयुगे वाहत आहे आणि कोरडा पडत नाही.

  • आंजर्ले सागरकिनारा

    आंजर्ले सागरकिनारा

    महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ अप्रतिम असा ‘आंजर्ले’ सागरकिनारा आहे. आपली सुट्टी कोकणात आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवायची असेल तर ‘आंजर्ले’ समुद्रकिनाऱ्याची निवड करायला काहीच हरकत नाही. या किनाऱ्यावर काळ्या आणि पांढऱ्या वाळूचे एकत्रीकरण दिसते. आंजर्लेतील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘काड्यावरचा गणपती मंदिर’ हे आहे. हे मंदिर गणेशमूर्ती आणि मंदिरासमोर भव्य बांधलेले तलाव यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरातून तुम्ही समुद्रकिनाऱ्याचे उत्तम दर्शन होते.

    आंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून जवळ श्री व्याघ्रेश्वर आणि श्री केशवराज यांची प्राचीन मंदिरे आहेत. जी आंजर्लेपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहेत. परशुराम भूमी हे येथील आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. येथे श्री परशुरामांची मोठी मूर्ती आहे. येथील भिंतीवर श्री परशुरामावरील संस्कृत श्लोक दिसतील. वर्षभरात कधीही आंजर्ले समुद्रकिनाऱ्याला भेट देऊ शकता, परंतु याठिकाणी भेट देण्याची सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आहे.

    हिंदू ‘माघ’ महिन्यात ‘काड्यावरचा गणपती’ मंदिरात गणपतीचा उत्सव आयोजित केला जातो. या कालावधीनंतर भेट देण्याची योजना आखल्यास, मार्चमध्ये होळीचा रंगीबेरंगी सण अनुभवता येईल. आंजर्लेच्या किनाऱ्यावर रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने पोहोचता येते. दापोली हे आंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून जवळचे प्रमुख शहर आहे. येथून आपण बसने जाऊ शकता. रेल्वेने गेल्यास खेडला उतरावे लागेल. दापोली ते खेड हे अंतर २९ किलोमीटर आहे. आंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. हे प्रवासाचे अंतर अंदाजे 230 किलोमीटर आहे.

  • मांजरसुभा किल्ला

    मांजरसुभा किल्ला

    अहमदनगर जिल्ह्यात ‘मांजरसुंभा’ हा किल्ला आहे. पुण्याहून हा किल्ला १४२ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. ‘वांबोरी’ घाटातील पायथ्याशी श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण सुरु झाल्यावर ‘मांजरसुभा’ गाव मिळते. ‘मांजरसुभा’ गावातून डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर किल्ल्याकडे जाणारा सिमेंटचा रस्ता लागतो. पुढे शनीमारुतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या आसपास गडाच्या खालच्या तटबंदीचे काही अवशेष सापडतात. काही काळापूर्वी इथे चुन्याचा घाना देखील बघायला मिळत होता; परंतु आत्ता तो सध्या तिथे नाही.

    गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी वाट चांगली केली आहे. १५ मिनिटामध्ये गडावर सहज पोहोचता येते. गडाचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या बाहेर २ देवड्या आहेत. आत प्रवेश केल्यावर २ भव्य दालने आहेत. या दालनांना प्रकाश येण्यासाठी झरोके आहेत. आत गेल्यावर जिना मिळतो. या जिन्याने प्रवेशद्वारावर जाऊन परिसर न्याहाळू शकता.

    प्रवेशद्वारातून आत गेल्यावर गडावर प्रवेश करतो. समोरच एक तुटलेल्या अवस्थेतील इमारत बघायला मिळते. या इमारतीच्या अगदी समोर प्रचंड मोठा हौद अथवा पाण्याची टाकी आहे. या टाकीची खोली जवळपास ५ ते ६ फुट आहे. राणी महालाच्या भिंतीच्या मागे गेल्यावर काही दालने आहेत. एका दालनात दर्गा आहे. या दर्ग्याच्या समोर हौदांची रचना असून त्यात तांब्याच्या पाईपलाईन दिसतात. तिथून थोडे पुढे गेल्यावर बुरुज दिसतो. दुमजली इमारत इथे बघायला मिळते. दुमजली इमारतीपासून पूर्वेला गेल्यावर गडाचा दुसरा दरवाजा लागतो. अनेक साहसी पर्यटक या मार्गाने गडाकडे येतात.

  • सोनावळेतील गणेश लेणी

    सोनावळेतील गणेश लेणी

    ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ‘सोनावळे’ गावाजवळ प्राचीन गणेश लेणी अथवा ‘गणेश गडद’ या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहेत. सोनावळे गावापासून साडे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे.

    इसवी सन १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची नोंद घेतली. ‘गणेश लेणी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दगडी गुहेत विविध दालने आहेत. त्यात हिंदू देवदेवतांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. पावसाळ्यात लेण्यांच्या वरच्या भागावरून कोसळणारा धबधबा फार मनमोहक असतो.

    पूर्वी हे पर्यटनस्थळ दुर्लक्षित होते; मात्र आता वन विभाग आणि सोनावळे ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लेण्यांमध्ये नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. सौर पथदिवे बसवून इथल्या दालनांमध्ये रात्री मुक्काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सोय करण्यात आली आहे.

    ग्रामस्थ आणि वन विभागाने लेण्यांकडे जाणारी पायवाट दुरूस्त केली आहे. कठीण चढ काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांची इथे सुलभ सोय झाली आहे. मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखालील ग्रामस्थांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारला जात आहे. पर्यटक आणि ग्रामस्थांच्या सूचना विचारात घेऊन याठिकाणी अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

    पाणी, वीज, चांगले रस्ते या सोयींमुळे आता ‘गणेश लेणी’ परिसरात पर्यटक येतात. वाटेत जैवविविधतेने श्रीमंत झालेले जंगल आहे. येथे अनेक दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती, रंगीबेरंगी फुले आणि फुलपाखरे आहेत. त्यातून सोनावळे ग्रामस्थांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

  • दुर्गादेवी मंदिर गुहागर

    दुर्गादेवी मंदिर गुहागर

    श्री दुर्गादेवी मंदिर, गुहागर हे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या तालुक्याच्या ठिकाणी असलेले एक प्राचीन मंदिर आहे. कोकण प्रांतातील अनेक ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता मानली जाते. हे मंदिर गुहागर गावाच्या वरच्या बाजूला आहे. मंदिर जवळच्या भागात भक्त निवासासाठी येतात. या मंदिराच्या आजूबाजूला हिरवळ आहे. गुहागर येथील हे मंदिर सर्वात जुने मानले जाते आणि अलीकडील काळात या मंदिराचे नूतनीकरण केले गेले आहे. नवरात्रोत्सवादरम्यान या मंदिरात श्री दुर्गा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी असते.

    उन्हाळ्यात आणि हिवाळ्याच्या काळात भेट देण्यासारखे हे एक सुंदर मंदिर आहे. जवळच्या ठिकाणी सर्व आवश्यक सुविधा मिळू शकतात. विनंतीनुसार पूजा करता येते. मंदिराभोवती मध्यवर्ती लाकडी खांब असलेला तलाव आहे. मुख्य मंदिराच्या चार कोपऱ्यांवर गौण देवस्थानांची 4 मंदिरे आहेत, त्यामुळे ते पंचायतन शैलीच्या मंदिरात रूपांतरित झाले. पंचायतन मंदिराच्या 4 कोपऱ्यांवर 4 गौण तीर्थे आहेत आणि व्यासपीठाच्या मध्यभागी मुख्य मंदिर आहे.

  • किहिम सागरकिनारा

    किहिम सागरकिनारा

    रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ असणारा किहिम सागरकिनारा नितांतसुंदर आहे. या किनाऱ्यावरील पांढरी वाळू आणि उन्हात चमकणाऱ्या पाण्याच्या लाटा पुढचे अनेक दिवस मनात रुंजी घालत राहतात. किनाऱ्यावरील डोलणारी नारळाची झाडे मनाला फार आनंद देतात. हा किनारा तरुण, वृद्ध, दांपत्य, कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी या सर्व वयोगटांसाठी मोठे आकर्षण आहे.

    येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे चित्र फार छान दिसते. सूर्यस्नानाबरोबर येथे पोहोण्याचाही आनंद घेऊ शकता. जलक्रीडेसाठी येथे भरपूर साधने आहेत. पॅराग्लायडिंग, बोटिंग आणि इतर राइड्स येथे आहेत. हा समुद्रकिनारा म्हणजे पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन आहे. बुलबुल, ऑरेंज-हेडेड थ्रश, ग्रीन बी-ईटर्स, मैना आणि आशियाई कोएल, प्लम असे अनेक विदेशी पक्षीसुद्धा येथे पाहता येतात. येथे स्वादिष्ट अन्नपदार्थांचाही मस्त आस्वाद घेऊ शकता.

  • सोनगीर किल्ला

    सोनगीर किल्ला

    महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यामध्ये ‘सोनगीर’ किल्ला आहे. मुघल सुभेदार अहमद फारुकी याने आपल्या शासन काळात दुसरा किल्ला बांधला. मध्ययुगीन काळात या किल्ल्यास फार महत्त्व होते. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक 3 म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच हा किल्ला आहे. येथे जाण्यासाठी धुळे येथून एस.टी. बस मिळतात. सोनगीर येथून नंदुरबारकडेही एक रस्ता जातो. एस.टी.ने या फाट्यावर उतरून 1 किमी. चालत ‘सोनगीर’ गाठता येते. सोनगीरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे.

    किल्ल्याच्या पायथ्याला घरांची लांबलचक रांग आहे. घरांच्या रांगांमध्ये बोळ आहेत. 8-10 मीटर चढल्यावर किल्ल्याच्या डावीकडे जाणारी मळलेली वाट लागते. या वाटेच्या टोकावर ‘सुवर्णगिरी’ किल्ल्याचा कसाबसा तग धरून उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. पायथ्यापासून या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ लागतो. या दरवाजावर सध्या कसलेच नक्षीकाम नाही. येथे पूर्वी एक शिलालेख लावलेला होता असा उल्लेख आहे. या शिलालेखाचा दगड येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेत ओळी कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर माथ्यावर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच दरवाजाला लागून एक कबर आहे. कबरीपासून 15-20 पायऱ्या चढून वर गेल्यावर गडमाथा लागतो. हा किल्ला लांबीने जास्त आहे.

    इ.स. १८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पाहणी केली होती. या किल्ल्याची तटबंदी रचीव दगडांची आहे. ती तटबंदीही मधूनमधून खाली ढासळलेली आहे. जमिनीखाली हौदासारख्या वास्तू बांधलेल्या आहेत. त्यामध्ये तेल आणि तूप साठवीत असल्याचे दिसते. त्यामुळे या जागांना ‘तेल टाके’ आणि ‘तूप टाके’ असे म्हणतात. गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठे, पण खोल टाके खडकात कोरलेले आहे. पाणी पाझरू नये म्हणून ते चारही बाजूने गिलावा देऊन सुरक्षित केलेले आहे. या विहिरीतून खाली गावातही पाणीपुरवठा होत असे. या किल्ल्यात आजही गुप्तधन असल्याची चर्चा होत असते. शत्रूच्या हल्ल्यापासून पळून जाता यावे याकरिता या किल्ल्यात एक गुप्त भुयार तयार करण्यात आले होते. हे भुयार जवळ जवळ १७ किमी. लांब आहे.

    महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यामध्ये ‘सोनगीर’ किल्ला आहे. मुघल सुभेदार अहमद फारुकी याने आपल्या शासन काळात दुसरा किल्ला बांधला. मध्ययुगीन काळात या किल्ल्यास फार महत्त्व होते. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक 3 म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच हा किल्ला आहे. येथे जाण्यासाठी धुळे येथून एस.टी. बस मिळतात. सोनगीर येथून नंदुरबारकडेही एक रस्ता जातो. एस.टी.ने या फाट्यावर उतरून 1 किमी. चालत ‘सोनगीर’ गाठता येते. सोनगीरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे.

    किल्ल्याच्या पायथ्याला घरांची लांबलचक रांग आहे. घरांच्या रांगांमध्ये बोळ आहेत. 8-10 मीटर चढल्यावर किल्ल्याच्या डावीकडे जाणारी मळलेली वाट लागते. या वाटेच्या टोकावर ‘सुवर्णगिरी’ किल्ल्याचा कसाबसा तग धरून उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. पायथ्यापासून या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ लागतो. या दरवाजावर सध्या कसलेच नक्षीकाम नाही. येथे पूर्वी एक शिलालेख लावलेला होता असा उल्लेख आहे. या शिलालेखाचा दगड येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेत ओळी कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर माथ्यावर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच दरवाजाला लागून एक कबर आहे. कबरीपासून 15-20 पायऱ्या चढून वर गेल्यावर गडमाथा लागतो. हा किल्ला लांबीने जास्त आहे.

    इ.स. १८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पाहणी केली होती. या किल्ल्याची तटबंदी रचीव दगडांची आहे. ती तटबंदीही मधूनमधून खाली ढासळलेली आहे. जमिनीखाली हौदासारख्या वास्तू बांधलेल्या आहेत. त्यामध्ये तेल आणि तूप साठवीत असल्याचे दिसते. त्यामुळे या जागांना ‘तेल टाके’ आणि ‘तूप टाके’ असे म्हणतात. गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठे, पण खोल टाके खडकात कोरलेले आहे. पाणी पाझरू नये म्हणून ते चारही बाजूने गिलावा देऊन सुरक्षित केलेले आहे. या विहिरीतून खाली गावातही पाणीपुरवठा होत असे. या किल्ल्यात आजही गुप्तधन असल्याची चर्चा होत असते. शत्रूच्या हल्ल्यापासून पळून जाता यावे याकरिता या किल्ल्यात एक गुप्त भुयार तयार करण्यात आले होते. हे भुयार जवळ जवळ १७ किमी. लांब आहे.

  • वेंगुर्ला बंदर

    वेंगुर्ला बंदर

    वेंगुर्ला’ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारे एक शहर आहे. काजू, आंबा, नारळ आणि विविध प्रकारच्या झाडांनी या शहराची शोभा वाढते. वेंगुर्ला हे एक बंदर आहे. या बंदरावर नेहमी वर्दळ असते. वेंगुर्ला बंदरावरून विशाल समुद्राचे मनोहारी दर्शन होते. येथे वाळूवरून चालण्याचा आनंद घेता येत नाही; पण या बंदरावर मनसोक्त फिरून सागर न्याहाळता येतो. रोज सकाळी आणि रात्री येथे स्थानिक मच्छीमार बांधवाची मोठी लगबग असते. या वेळेत माशांचा लिलाव होतो. त्यामुळे हे बंदर नेहमी गजबजलेलेच असते. येथे दीपगृह आहे. पर्यटक नेहमी बंदर पाहण्यास येथे येतात. येथून सूर्यास्ताचे मस्त दर्शन घेता येते.

    या शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. वेंगुर्ला तालुक्यात देवी सातेरी, श्री रामेश्वर ही देवस्थाने आपण पाहू शकता. हापूस आंबे आणि काजूसाठी वेंगुर्ला प्रसिद्ध आहे. वेंगुर्ला हे एक सुरक्षित आणि नैसर्गिक बंदर आहे. सन 1665 मध्ये डच व्यापाऱ्यांनी आणि नंतर ब्रिटिश शासकांनी येथे वखार स्थापन केली. 130 वर्षे जुनी वेंगुर्ला नगरपरिषद ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुन्या नगरपरिषदांपैकी एक आहे.

  • श्री क्षेत्र गाणगापूर

    श्री क्षेत्र गाणगापूर

    सोलापूर जिल्ह्यात गाणगापूर हे दत्तगुरुंचे पवित्र स्थान आहे. ‘भीमा’ आणि ‘अमरजा’ या नद्यांच्या संगमाकाठी हे सुंदर मंदिर आहे. येथे दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य होते. हे एक जागृत स्थान असून अनेक भक्तांचे व्याधी आणि बाधा निवारण केले जाते. येथे नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. ‘गाणगापूरग्रामी श्रीदत्तगुरू यांचा प्रत्यक्ष वास आहे’, असे ‘गुरुचरित्र’ ग्रंथात स्वत: नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे.

    गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षांपासून कायम आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन आनंदी करतात, असा अनुभव अनेक भक्ताना आला आहे. भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य दत्त महाराज करीत असल्याचे भाविक सांगतात.

    याच गावात ‘भीमा-अमरजा संगमा’वर दत्तगुरु दररोज स्नान करतात. दुपारच्या वेळेस भिक्षेसाठी कोणत्याही वेषात उपस्थित असतात, असे महाराज सांगतात. एकाग्रतेने नामस्मरणात तल्लीन झाल्यावर दत्तगुरु दर्शन देतातच, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

    गाणगापुरातून निघताना श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या पादुका शिष्याकडे देऊन सांगितले की, ”या निर्गुण पादुका आहेत. या पादुकांमध्ये माझा सगुण रुपाने वास राहील. येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका. हा आमचा आशीर्वाद आहे. त्यावर विश्वास ठेवा.”

    ‘भीमा-अमरजा या संगमात स्नान केल्याने भाविकांची पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतो’, असे भक्त सांगतात. निर्गुण मठातील पादुकांचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक संगमावर स्नान करतात.
    गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे. यामध्ये ‘षट्कुल तीर्थ’, ‘नृसिंह तीर्थ’, ‘भागीरथी तीर्थ’, ‘पापविनाशी तीर्थ’, ‘कोटी तीर्थ’, ‘रुद्रपाद तीर्थ’, ‘चक्रेश्वर तीर्थ’ आणि ‘मन्मथ तीर्थ’ अशी तीर्थे आहेत. भागीरथी तीर्थालाच ‘काशीकुंड’ असे म्हणतात.

    संगमापासून वर जाताना ‘पवित्र औदुंबर वृक्ष’ आहे. या वृक्षाखाली साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणि पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत. औदुंबरास ११,२१,१०८ प्रदक्षिणा घातल्यावर आपली कुठलीही मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.

    या दिव्य वृक्षाखाली अनेक भाविक ‘गुरुचरित्र’ या जागृत ग्रंथाचे पारायण करतात. येथे ‘भस्माचा डोंगर’ हे एक दिव्य आहे. येथे अनेक ऋषीमुनींनी तपसाधना केल्यामुळे या भूमीवरील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात.
    श्रीक्षेत्र गाणगापूर येथे अनेक उत्सव भक्तीभावाने साजरे होतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला श्री व्यासपूजा साजरी केली जाते. संपूर्ण श्रावणात भक्तमंडळी श्री गुरुचरित्राचे पारायण करतात. मठात रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो.

    भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा करतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी श्रींची पालखी भक्तमंडळींसह सायंकाळी श्री कल्लेश्वर मंदिरात जाऊन रात्री परत येते.
    श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतारसमाप्तीचा उत्सव गुरुद्वादशीला होतो. त्या वेळेस भाविकांसाठी महाप्रसाद असतो.

  • भाट्ये समुद्रकिनारा

    भाट्ये समुद्रकिनारा

    रत्नागिरी शहरापासून अवघ्या 1 किमी अंतरावर असणारा भाट्ये समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावरील संध्याकाळ पर्यटकांनी गजबजलेली असते. नैसर्गिक सौंदर्याने भारलेला हा सरळ समुद्रकिनारा अंदाजे 1.5 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे किनाऱ्यावरून दूरवर चालत जाण्याचा आनंद आपण घेऊ शकता.

    या समुद्रकिनाऱ्यावरून, आपण भाट्ये किनाऱ्याच्या पुढे प्रसिद्ध ‘मांडवी’ समुद्रकिनारा पाहू शकता. वैशिष्ट्य म्हणजे हे 2 किनारे एका खाडीने वेगळे केले आहेत. रत्नागिरी दीप गृह येथून दिसते. कोकण कृषी विद्यापीठाचे नारळ संशोधन केंद्र भाट्ये समुद्रकिनाऱ्यासमोर आहे. समुद्रकिनाऱ्याच्या टोकावर असलेले प्रसिद्ध गणेश मंदिरदेखील पाहण्यासारखे आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पोट भरण्यासाठी अनेक छोटी दुकाने आहेत.

    मांडवी समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरी जेट्टी, गुहागर समुद्रकिनारा, पूर्णगड किल्ला, थिबा पॉइंट, थिबा पॅलेस आणि राम मंदिर ही जवळपासची काही आकर्षणे आहेत. भाट्ये समुद्रकिनाऱ्यापासून 5 किलोमीटर प्रवास करण्यास तयार असाल, तर रत्नदुर्ग किल्ल्यावर श्री देवी भगवती मंदिर, गणेशगुळे किनारा आणि टिळक अली संग्रहालयसुद्धा पाहू शकता. पावस येथील स्वरूपानंद स्वामी आश्रम येथून 12 किमी अंतरावर आहे. येथील हवामान वर्षभर मस्त असते. येथे जाण्यासाठी रत्नागिरी बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर उतरून जावे लागेल.

  • अलंग किल्ला

    अलंग किल्ला

    अलंग किल्ला हा अलंगगड म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला पश्चिम घाट आणि कळसूबाई पर्वत रांगेत असलेला एक किल्ला आहे. अलंग किल्ला, मदनगड किल्ला, कुलंग किल्ला आणि त्यांना जोडणारा ट्रेक अलंग, मदन आणि कुलंग म्हणून ओळखला जातो. अलंग किल्ला हा येथील सर्वात कठीण ठिकाणांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र संस्कृती सरकारच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे, अलंग-मदन- कुलंग हा महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक ट्रेक आहे, विशेषत: त्याच्या आव्हानात्मक पसरलेल्या पाण्यामुळे आणि घनदाट जंगलांमुळे” हा मार्ग अनुभवी गिर्यारोहकांसाठी योग्य आहे. मुसळधार पाऊस आणि खराब पायवाटेमुळे किल्ल्यांमध्ये प्रवेश करणे कठीण असून हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

    हा किल्ला एका मोठ्या नैसर्गिक पठारावर वसलेला आहे. किल्ल्याच्या आत दोन गुहा, एक लहान मंदिर आणि 11 पाण्याची टाकी आहेत. दोन गुहांमध्ये 40 लोक राहू शकतात. ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष संपूर्ण किल्ल्यात पसरलेले आहेत. किल्ल्याच्या पूर्वेला काळसुबाई, औंध किल्ला, पट्टा आणि बितनगड आहे. उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड आणि अंजनेरी आणि दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा आणि रतनगड आहेत.
    या किल्ल्याच्या दुर्गम स्वरूपामुळे, अगदी अनुभवी गिर्यारोहकांनाही या ट्रेकमध्ये पुरेसे अन्न आणि पाणी सोबत ठेवण्याचा सल्ला दिला जातो.