सह्याद्री मराठी वाहिनी

Category: भटकंती

विविध तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे, गडकिल्ले आणि समुद्र किनाऱ्यांवर जायचंय? पर्यटनाची संपूर्ण माहिती ‘भटकंती’ या सदरात!

  • नाशिकचे कपालेश्वर महादेव मंदिर

    नाशिकचे कपालेश्वर महादेव मंदिर

    नाशिक शहरातील प्रसिद्ध ‘पंचवटी’ परिसरात गोदावरीच्या काठी ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. येथे भगवान शिव वास करीत होते, असे पुराणात म्हटले आहे. भगवान शंकरासमोर नंदी नसणारे हे देशातील पहिले मंदिर आहे.

    या मंदिराला खूप महत्त्व आहे. या मंदिराचे निर्माण बारा ज्योतिर्लिंगानंतर असल्याचे मानले जाते. या टेकडीवर पूर्वी भगवान शंकराची पिंडी होती, मात्र आता तेथे मोठे मंदिर आहे. पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या पायऱ्या उतरताच समोर ‘गोदावरी’ नदी वाहताना दिसते. त्यातच प्रसिद्ध ‘राम कुंड’ आहे.

    या कुंडात भगवान श्रीरामांनी आपले वडील राजा दशरथ यांचे श्राद्ध केले होते. याशिवाय या संकुलात अनेक मंदिरे आहेत. कपालेश्वर मंदिरासमोर गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. वर्षातून एकदा येथे ‘हरिहर महोत्सव’ होतो.

    त्यावेळी ‘कपालेश्वर’ आणि ‘सुंदर नारायण’ या दोघांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात. तिथे त्यांची एकमेकांशी भेट घडवून अभिषेक केला जातो. याशिवाय महाशिवरात्रीला कपालेश्वर मंदिरात मोठा उत्सव असतो. श्रावण महिन्याच्या सोमवारी येथे मोठी गर्दी असते. पर्यटकसुद्धा येथे आवर्जून येतात.

  • कुणकेश्वर सागरकिनारा

    कुणकेश्वर सागरकिनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणकेश्वर सागरकिनारा हे एक सुंदर ठिकाण आहे. येथील प्राचीन शिवमंदिरामुळे या किनाऱ्यास धार्मिक अधिष्ठान लाभले आहे.

    हा भाग स्वच्छ आणि वालुकामय किनारे तसेच डोंगराळ परिसरासाठी ओळखला जातो. स्वच्छ पांढरी वाळू व नयनरम्य दृश्यांसह लांब-स्वच्छ समुद्रकिनारा डोळ्यांना न्याहाळता येतो. आपल्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालविण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

    कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असून हे गाव ‘हापूस आंब्या’साठीसुद्धा प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावर दरवर्षी देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे १०० शिवलिंगे कोरलेली आहेत. ओहोटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात. हा फार सुंदर, स्वच्छ , कमी वर्दळ असणारा समुद्रकिनारा आहे.

    सूर्यस्नान, पोहणे तसेच जलक्रीडा यांचाही आनंद येथे घेता येतो. एका बाजूला विशाल अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला सह्याद्री डोंगर असे नयनरम्य दृश्य येथे असते. खाण्यासाठी येथील चविष्ट स्थानिक पदार्थ तयारच असतात. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद याठिकाणी घेता येतो.

  • माहिमचा किल्ला

    माहिमचा किल्ला

    मुंबईत माहिमच्या खाडीजवळ माहिमचा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. सभोवतालच्या झोपडपट्ट्या व सततच्या अतिक्रमणामु़ळे हा किल्ला सध्या सुस्थितीत नाही.

    पोर्तुगीज अधिकारी दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश करून माहीमचा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप चकमकी झाल्या. पोर्तुगीजानी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला हा किल्ला दिला. शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षणासाठी हा किल्ला ताब्यात असणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

    माहिमचा किल्ला पाहण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘माहिम’ रेल्वे स्थानकावर उतरून टॅक्सी किंवा बसने माहीम समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता येते. स्वतःची गाडी असेल तर थेट जाता येते. माहीम समुद्रकिनाऱ्याच्या मुखाशी भक्कम तटबंदी असलेला हा किल्ला आजही उभा आहे. प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्यासाठी माहीम-कोळीवाड्यातील छोट्या गल्ल्यांमधून वाट काढत जावे लागते.

    मुंबईतील प्रसिद्ध ‘मिठी’ नदीच्या तीरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावरून माहीम खाडी, अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसतो. मागच्या बाजूला मकदूमबाबाचा दर्गा आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूचे दर्शन होते. अलीकडे लोकवस्तीतून किल्ल्याचे अस्तित्व शोधून काढणे नवीन लोकांसाठी खूप जिकिरीचे काम आहे.

    माहीतगार व्यक्ती सोबत असल्यास दोन एकरवर पसरलेल्या या किल्ल्यावरील तटबंदीवर तोफा ठेवण्यासाठी असणाऱ्या खाचा, दिवे लावण्याची सोय, युरोपियन पद्धतीचे स्तंभ, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी असणारी व्यवस्था, सैनिकांची निवासस्थाने, छोटेखानी धान्यकोठार, पाण्याची विहीर इत्यादींचे अवशेष शोधून पाहता येऊ शकतात. येथे कोळी-आगरी लोकांची वस्ती आहे. आजही हे ऐतिहासिक ठिकाण दुर्लक्षित आहे. अतिक्रमणामुळे किल्ल्याची रया पार गेली आहे.

    मुंबईच्या खुल्या समुद्रावर असलेला हा पहिला किल्ला होय. एके काळी लष्करीदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणावर असणारा हा किल्ला मुंबईतील समुद्रीमार्गाचा संरक्षक शिलेदार समजला जाई. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या वास्तूला आवर्जून भेट द्यायला हवी.

  • भामरागड अभयारण्य

    भामरागड अभयारण्य

    समृद्ध निसर्गसंपदा, हेमलकसाचा ‘लोकबिरादरी प्रकल्प’, बाबा आमटेंचा ‘आनंदवन’ आश्रम अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनी भामरागड अभयारण्याला भेट द्यायला हवी. येथील स्थानिक ‘गोंड’ आणि ‘माडिया’ जमातीच्या आदिवासींची संस्कृती मन भारावून सोडते.

    चंद्रपूर जिल्ह्यात हे अभयारण्य आहे. याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.किमी. इतके आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्ग आहे. या अभयारण्यातून ‘पार्लोकोटा’ आणि ‘पामलगौतम’ नद्या वाहतात. अभयारण्यातील वन्यजीव आणि राहणाऱ्या ‘गोंड’-‘माडिया’ आदिवासी बांधवांसाठी हा पाण्याच्या प्रमुख स्रोत आहे.

    रानडुक्कर, बिबट्या, ससे, भुंकणारे हरीण, मुंगूस, अस्वल, खार, उडणारी खार, नीलगाय, जंगली कोंबडी, मोर अशा असंख्य पक्षी आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे हे ठिकाण आहे. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी इथे पहायला मिळतात.

    ‘माडिया’ आणि ‘गोंडी’ या स्थानिक भाषा येथे बोलल्या जातात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या या आदिवासींचे जंगलावरचे अवलंबित्व कमी व्हावे, त्यांना सुरक्षित आयुष्य जगता यावे यादृष्टीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना येथे सुरू केली आहे.

    अभयारण्यात जाताना कोरडे अन्नपदार्थ सोबत नेणे गरजेचे आहे. येथे आसपास पाहण्यासारखे अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये वरोऱ्याचा आनंदवन आश्रम, चंद्रपूरच्या प्राचीन लेण्या, चंद्रपूरचा किल्ला, माणिकगड किल्ला, बल्लारपूर किल्ला, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प अशी बरीच स्थळे आहेत.

    भामरागड अभयारण्य जवळपास सर्व राष्ट्रीय महामार्गानी जोडले गेले असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भेट देणे सहज शक्य होते. ‘अहेरी’ हे येथील सर्वात जवळचे बसस्थानक आहे.
    आरोग्य आणि शिक्षण आदिवासींना मिळावे याकरिता लोकबिरादरी प्रकल्प येथे कार्यान्वित करण्यात आला. आज ही समाजसेवेची धुरा त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून मंदाकिनी आमटे यांनी यशस्वीरित्या पुढे नेत आहेत.

  • धूतपापेश्वर मंदिर

    धूतपापेश्वर मंदिर

    रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये धूतपापेश्वर मंदिर आहे. धोपेश्वर गावात असणारे हे प्रसिद्ध शिवमंदिर राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.
    हे मंदिर ‘मृडानी’ नदीच्या काठावर आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून हे मंदिर प्राचीन आहे. प्रशस्त सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखानाआणि आवारात दीपमाळा आहेत.

    मंदिराचा लाकडी सभामंडप आणि त्यावरील नक्षीकाम लक्षवेधी आहे. मंदिराच्या सभामंडपात तसेच छतावर, खाबांवर प्राण्यांची,वनस्पतींची, फुलांची नयनरम्य चित्रे काढली आहेत. शंकराला वहिल्या जाणाऱ्या ‘कैलासचाफा’ या फुलाचे झाड येथे चित्ररुपात पहायला मिळते. विशेष म्हणजे, चित्रांसाठी वापरलेले रंग पूर्णपणे नैसर्गिक म्हणजे पाने, फुले झाडाची साल यांपासून तयार केलेले आहेत. दररोज रात्री येथे शेवटची महापूजा होते.

    शंकर-पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा खेळ मांडून गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. बहूते वेळा दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात, तेव्हा या सोंगट्या विखुरलेल्या दिसतात. भगवान शंकर-पार्वती सारीपाट खेळून जात असल्याची येथील भाविकांची श्रद्धा आहे.

    मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा ‘मृडानी’ नदीचा प्रवाह आहे. येथे पावसाळ्यात सुंदर अशा धबधब्याचे दर्शन होते. धबधब्याचे पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे, त्याला ‘कोटितीर्थ’ असे म्हणतात. पावसाळ्यात येथे भाविक आणि पर्यटकांची फार गर्दी असते. गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे.

    थोरल्या माधवराव पेशव्यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यांनी मंदिरासाठी शाळिग्राम भेट दिला होता. पेशवेकाळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकूट अर्पण केला होता. तो आजही पुजेत वापरतात. येथे जायचे झाल्यास मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे, तर राजापूर हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.

  • सिंधुदुर्गातील निवती किनारा

    सिंधुदुर्गातील निवती किनारा

    सिंधुदुर्गातील निवती हा एक अप्रतिम समुद्रकिनारा आहे. कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी तसेच माडा-पोफळीच्या सहवासात असलेल्या ‘निवती’ या गावाकडील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो.

    येथे डॉल्फिन माशांना बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची रेलचेल असते. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाची छान छायाचित्रे मिळतात. येथे गेल्यावर निवती व भोगवे या दोन समुद्र किनाऱ्यांच्या मध्ये असलेल्या एका डोंगरावर बांधलेला ‘किल्ले निवती’ पाहून मन हरखून जाते. आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ चे मानांकन मिळालेला हा शुभ्र वाळूचा किनारा पहायला सर्वात योग्य जागा म्हणजे ‘किल्ले निवती’चा उत्तरेकडे असलेला बुरुज होय. तेथून हा किनारा फार मनोहर दिसतो.

    निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अतिजवळून ‘डॉल्फिन’ माशाच्या झुंडी पाहता येतात. यांत्रिकी होड्यांमधून समुद्रसफर करत डॉल्फिनचे नृत्य पाहण्याचा आनंदही अनुभवता येतो. उंच उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन पाहणे पर्यटकांसाठी आनंदी ठरते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा असणारे बीच रिसॉर्टही येथे आहे. अथांग पसरलेला सागर, निळेशार पाणी, किनाऱ्यावरील स्वच्छता आणि अर्थातच येथे येताच छत्रपती शिवरायांची होणारे स्मरण यामुळे या किनाऱ्याकडे पर्यटक वळतात.

  • पद्मदुर्ग किल्ला

    पद्मदुर्ग किल्ला

    महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘पद्मदुर्ग’ ऊर्फ ‘कासा’ हा एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला ‘मुरूड’ गावाजवळील समुद्रात आहे. ‘मुरुड’ हे रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘जंजिरा’ आणि ‘सामराजगड’ किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.
    ‘राजपुरी’ खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येला साधारण ३ किमी. अंतरावरील एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला.

    निजामशाहीच्या काळात सिद्दी लोकांनी ‘कुलाबा’आणि ‘रत्नागिरी’ या जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यावर आपली सत्ता स्थापन केली. तेथे काही जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले बांधले. ‘दांडा राजपुरी’ हा त्यांपैकीच एक किल्ला होता. हा किल्ला घेण्याचा शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केला; पण तो घेणे त्यांना शक्य झाले नाही.

    ‘दांडा राजपुरी’ कडील सिद्दींची सत्ता वाढू नये, म्हणून शिवाजी महाराजांनी ‘दांडा राजपुरी’ समोर सिद्दीला जरब बसविण्याच्या उद्देशाने नवीन भुईकोट किल्ला बांधला, आणि त्यास ‘पद्मदुर्ग’ हे नाव ठेवले. या किल्ल्याच्या आश्रयाने ‘दांडा राजपुरी’ काबीज करण्याच्या हेतूने पेशवे मोरोपंत पिंगळे सन १६६९ मध्ये ‘दांडा राजपुरी’वर चालून गेले असता, त्या प्रदेशातील शिवाजी महाराजांच्या सुभेदाराने मोरोपंतास आवश्यक सामग्री पुरविली नाही. त्यामुळे ही मोहीम फसली. सुभेदाराने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुढे शिवाजी महाराजांनी एका पत्रातून त्याची खरमरीत शब्दात कानउघाडणी केली.

    या किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला असून त्यासमोर पडकोट आहे. पडकोट नामशेष होत आला आहे. मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तम आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्यासारखा आहे. या किल्ल्याच्या बांधकामात तटबंदीच्या 2 दगडांमध्ये चुना वापरलेला आह. सागरी लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. 2 दगडांमधील चुना अजूनही आहे.

    पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष दिसतात.
    पद्मदुर्गावर महाद्वारातून जाण्यासाठी 4 – 5 पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतील बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे होते. हे कार्यालय येथून हलल्यावर देखभाल नसल्याने हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्यासाठी 4 टाक्या केलेल्या दिसतात.

  • गुगामल राष्ट्रीय उद्यान

    गुगामल राष्ट्रीय उद्यान

    गुगामल राष्ट्रीय उद्यान’ हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात स्थित असलेल्या भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. सन 1973-74 मध्ये हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्पा’चा एक भाग म्हणून ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. हे उद्यान सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे. याला ‘गाविलगड हिल्स’ असेही म्हणतात. हे उद्यान महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय वन्यजीव अभयारण्यांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात.

    ‘गुगामल राष्ट्रीय उद्याना’ची स्थापना प्रथम सन 1974 मध्ये ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्प’ म्हणून व्याघ्र संचालनालयाने केली होती. या प्रकल्पाचे उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी या प्रदेशातील समृद्ध परिसंस्थेचे संवर्धन करण्यासाठी म्हणून करण्यात आले. आजूबाजूच्या परिसरातील वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतू लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला 5 सप्टेंबर 1975 रोजी ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हापासून ते वाघांसह अनेक धोक्यात असलेल्या वन्यजीवांच्या प्रजातींचे संरक्षक म्हणून काम करीत आहे.

    ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ हे दक्षिण कोरड्या पानझडी वन श्रेणीत येते. ‘ऐन’, ‘टेक्टोना ग्रॅंडिस’, ‘लेंडिया’, ‘तिवस’, ‘आओला’, ‘धवडा’ आणि ‘कुसुम’ ही मुख्य झाडे येथे आढळतात. याव्यतिरिक्त आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. येथे एकूण 90 विविध प्रकारची झाडे, 300 हून अधिक प्रकारची वनौषधी तसेच 750 हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ किंवा

    ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्प’ हे वन्यजीवांच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
    येथे आढळणाऱ्या प्रमुख वन्यप्राण्यांमध्ये ‘बंगाली वाघ’, ‘आळशी अस्वल’, ‘उसुरी ढोल’, ‘भारतीय कोल्हा’, ‘पट्टेदार हायना’, ‘भारतीय पँथर’, ‘चौसिंगा’, ‘सांबर’), ‘गौर’, ‘बार्किंग डीअर’, ‘रॅटलस्नेक’, ‘मकाक’, ‘उडणारी खार’, ‘चितळ’, ‘नीलगाय’, ‘अजगर’, ‘रानडुक्कर’ आणि ‘लंगूर’ असे विविध प्राणी आढळतात. येथे 25 हून अधिक प्रकारचे मासे आहेत. मोठ्या संख्येने फुलपाखरे आहेत. मार्च 1990 मध्ये ‘ढाकना’ जवळील ‘गडगा’ नदीतील ‘सिद्धूकुंडा’त आणि फेब्रुवारी 1991 मध्ये ‘डोलार’ नदीतील ‘हत्तीकुंड’ मध्ये अनेक मगरी सोडल्या गेल्या. ‘गुगामल राष्ट्रीय उद्याना’त 260 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती देखील आढळतात. येथे छायाचित्रकारांना काही दुर्मिळ प्रजातींचे पक्षी टिपण्याची उत्तम संधी मिळते.

    ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ येथे गेल्यावर ‘कोरकू’ आदिवासींबद्दल जाणून घेता येईल. त्यांची संस्कृती, त्यांच्या प्रथा आणि परंपरा पाहता येतील.
    जर तुम्ही लहान मुलांसोबत जात असाल, तर मुलांना एकटे सोडू नये. पर्यटकांसाठी खुले नसलेल्या भागात राहू नये. ‘गुगामल राष्ट्रीय उद्याना’त धूम्रपान करू नये; कारण तेथे आग लागण्याचा धोका असतो. उद्यानाच्या कोणत्याही प्रतिबंधित भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये. सफारी दरम्यान, आपल्या मार्गदर्शकाच्या परवानगीशिवाय जीपमधून बाहेर पडू नये. येथे जाताना कॅमेरे, दुर्बीण आणि इतर आवश्यक गोष्टी सोबत ठेवाव्यात. उद्यानातील कोणत्याही प्राण्याला खायला घालण्याचा किंवा त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.

  • कोल्हापूरचे कोटीतीर्थ

    कोल्हापूरचे कोटीतीर्थ

    कोल्हापूरमध्ये ‘कोटीतीर्थ’ नावाचे एक जुने आणि छान देवस्थान आहे. शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या ‘शाहू मिल’जवळ एक मोठा तलाव असून या तलावात हे लहानसे मंदिर आहे. येथील निसर्गसौंदर्य अनुपम आहे. ‘एक रमणीय स्थान’ म्हणून या मंदिराकडे पहिले जाते. या तलावामध्ये महादेवाचे छोटे मंदिर आहे. हे मंदिर साधे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे.

    समोरील बाजूस अलीकडच्या काळात बांधलेला मंडप असून मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंडी आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूला आमराई आहे. नारायणदास महाराजांनी सन 1894 मध्ये बांधलेल्या इमारतीच्या मुख्य दिवाणखान्याच्या खालील लहानशा खोलीत समाधी आहे. इमारतीसमोर एक छोटा घाट असून याच्या पायऱ्या तळ्य़ाच्या पाण्यापर्यंत गेल्या आहेत.

    असुरांनी देवांवर विजय मिळवला असताना महालक्ष्मीने देवांच्या मदतीस धावून जात एक कोटी असुरांना येथे ठार मारल्याने या जागेला ‘कोटीतीर्थ’ असे नाव मिळाले, अशी कथा सांगितली जाते. महालक्ष्मीनेच येथे कोटीश्वर लिंगाची स्थापना केली, असेही म्हणतात. काहीजण कोल्हापुरात आल्यावर प्रथम कोटीतीर्थाचे दर्शन घेतात. येथे पूर्वी श्री महालक्ष्मीचे मंदिर होते. ते भूकंपात जमीनदोस्त झाल्याचीही समजूत आहे. या कोटीतीर्थाजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर असून ते शांत आणि रमणीय आहे.

  • सिंधुदुर्गातील सागरेश्वर किनारा

    सिंधुदुर्गातील सागरेश्वर किनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात वेंगुर्ला तालुक्यात असलेला उभादांडा सागरेश्वरचा किनारा फार देखणा आहे. शिवाच्या आशीर्वादाने पावन झालेले हे रम्य सागरतीर पाहताक्षणी मन वेधून घेते. येथे शांत बसून समोरचा निळाशार समुद्र पाहण्यासाठी छानपैकी बैठक व्यवस्था केलेली आहे.

    हा किनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो. येथील वाळूत असलेल्या खरखरीत शिंपल्यांनी पायांना छान मसाज होतो. त्यातील एखाद्या टोकदार तुकड्याने पायाला जखमही होऊ शकते. त्यामुळे चालताना काळजी घ्यावीच लागते. मखमली वाळूवरून चालताना दूरवर पलीकडे वेंगुर्ल्याचे दीपगृह दिसू लागते. पायाखालची वाळू लाटा खेचू लागतात.

    तोल सांभाळत वाळूवर उभे राहण्याची गंमत अनुभवता येते. याठिकाणी किनाऱ्यावर चटपटीत भेळ, चायनीज पदार्थ, इतर खाऊ विक्रेते असल्याने खाता-खाता मस्त कलंदर लाटा पाहता येतात. वेंगुर्ला बंदर आणि किनाऱ्यावरील पुळण येथून दिसते. येथे प्राचीन सागरेश्वर मंदिर असून तेसुद्धा पाहण्यासारखेच आहे.

  • वांद्रे किल्ला

    वांद्रे किल्ला

    मुंबईत असलेला वांद्रे किल्ला प्रसिद्ध आहे. सागरकिनारी असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून जातात. या किल्ल्याचे जतन केले असल्याने तो सुस्थितीत आहे. म्हणजे काही गोष्टी अवशेषरुपात आहेत; पण ज्या चांगल्या आहेत, त्यांचे संवर्धन केल्या गेले आहे. वांद्रे येथील ‘सी रॉक’ हॉटेलला लागून दक्षिणेकडे गेलेला रस्ता थेट वांद्रे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जातो. येथे जाण्यासाठी वांद्रे रेल्वे स्थानकावरुन बससेवाही आहे.

    वांद्रे म्हणजे ‘साष्टी’ बेटाचे दक्षिणेकडील टोक. इसवी सन 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात सध्याच्या महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीचा प्रदेश पोर्तुगीजांना गुजरातच्या सुलतानाकडून मिळाला. सन 1661 साली पोर्तुगालने मुंबई बेट ब्रिटीशांना आंदण म्हणून दिले.

    आज दिसणारा हा किल्ला रुढार्थाने किल्ला म्हणता येईल असा नाही; मात्र पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये त्याचा किल्ला असा उल्लेख आहे. समुद्रकिनाऱ्यावर हा किल्ला आहे. हा समुद्रकिनारा बऱ्यापैकी खडकाळ असून त्यालगतच्या एका टेकडीवर हा किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यानंतर डाव्या हातास एका कौलांचे छप्पर असलेल्या खोलीचे अवशेष दिसतात. खोलीच्या आत दरवाज्यालगतच्या डाव्या भिंतीत एक कोनाडा होता. हा कोनाडा आजही भिंतीच्या अवशेषांमध्ये टिकून आहे.

    वांद्रे किल्ल्याचे दरवाजेही मुंबईत आढळणाऱ्या युरोपीय लोकांनी बांधलेल्या इतर ‍किल्ल्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. किल्ल्याच्या भिंतीही मुंबईतील अन्य युरोपीय किल्ल्यांपेक्षा निराळ्या आहेत. या भिंती सरळ उभ्या असून त्यांची जाडी मुंबईतील अन्य किल्ल्यांच्या भिंतींच्या जाडीपेक्षा कमी आहे. तटबंदीतील तोफांच्या खाचा आज तरी दिसत नाहीत.
    या किल्ल्याची दुरुस्ती व सुशोभिकरणाची कामे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने केली आहेत. त्यामुळे हा किल्ला आजही चांगल्या स्थितीत आहे.

  • थंड हवेचे ठिकाण सापुतारा

    थंड हवेचे ठिकाण सापुतारा

    महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर ‘सापुतारा’ हे थंड हवेचे ठिकाण असून वर्षभर आल्हाददायक असते. हे ठिकाण जरी गुजरातमध्ये येत असले तरी सीमेवर असल्याने तेथे महाराष्ट्रातून जाणे सुलभ आहे. त्यामुळे येथील पर्यटकांची गर्दी असते. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 3600 फूट आहे.

    सापुतारा येथे सूर्योदय आणि सूर्यास्त ही दोन मुख्य आकर्षणे आहेत. सूर्योदय बघण्यासाठी पहाटे उठून जावे लागते. येथून उगवत्या सूर्याचे होणारे दर्शन अत्यंत विलोभनीय दिसते. या मानाने संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी असंख्य पर्यटक गर्दी करतात. अवघ्या काही मिनिटांतच सूर्य क्षितिजाला टेकतो. सूर्यास्त केव्हा होतो हे समजत नाही.

    येथील ‘रोप-वे’ चा प्रवास पर्यटकांना अनोखा अनुभव येतो. केवळ चित्रपटांत पाहण्यास मिळणाऱ्या या ‘रोप-वे’ मध्ये बसण्याचा अनुभव पर्यटकांना ‘वैती हॉटेल’ ने उपलब्ध करुन दिला आहे. हा रोप-वे सापुताऱ्याचे मुख्य आकर्षण आहे.
    गुजरात टुरिझमने येथे ‘बोट क्लब’ चालू केला आहे. यामुळे भव्य जलाशयात नौकाविहाराचा आनंद लुटता येतो. नौकेत बसून सफर करताना भोवतालचे सृष्टीसौंदर्य न्याहाळण्याचे सुख आनंददायी असते. वर्षभरात केव्हाही येथे जाता येते. एप्रिल ते जुलै या दरम्यान पर्यटकांची गर्दी सर्वात जास्त असते.

    याशिवाय येथे वेगवेगळे फुलांचे आकर्षक बगीचे आहेत. सणावारास येथे आदिवासींचे नृत्य व संगीताचे कार्यक्रम होतात. सापुताऱ्याच्या मध्यभागी एक वस्तुसंग्रहालय आहे. येथे अनेक दुर्मिळ वस्तू पहावयास मिळतात. सापाच्या काही जाती, अजगर वगैरे प्राणी येथे पहायला मिळतात. याशिवाय नागेश्वर मंदिर, स्वामी नारायण मंदिर, इको पॉईंट, स्टेपगार्डन, मत्स्यालय, ऋतुंबरा विश्वविद्यालय, वनस्पती उद्यान इ. पर्यटनस्थळे सापुतारा येथे पाहता येतात.

    उंच डोंगरावर संपूर्ण लाकडाने बांधलेले ‘लॉगहट’ हे गेस्ट हाऊस असून ते वन विभागाच्या अखत्यारित आहे. येथून संपूर्ण सापुताऱ्याचे मनोहर दर्शन घडते. सापुताऱ्याजवळ ‘उन्हाई’ हे गरम पाण्याचे झरे आहेत. ‘उन्हाई’ या गुजराथी शब्दाचा अर्थ ‘मी स्नान केले’ असा आहे. हे झरे आरोग्यवर्धक आहेत. त्वचारोगावर गुणकारी आहेत. तेथे स्नान केल्यावर सर्वांचा त्वचारोग नाहीसा होतो, अशी श्रद्धा आहे.

    या पर्यटन केंद्रावर जाण्यासाठी मुंबई, पुणे, शिर्डी, नाशिक, बलसाड, बिल्लीमोरा, सुरत येथून थेट बसेस आहेत. रेल्वेने येण्यासाठी नाशिकरोड व बिल्लीमोरा ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.

  • टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती

    टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती

    मुंबईजवळील टिटवाळा गावात सिद्धिविनायक महागणपती मंदिर असून येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. कल्याण-कसारा मार्गावर ‘काळू’ नदीच्या काठावर हे जागृत मंदिर आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील 8 प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. या परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथे वाढली. त्यामुळे या ठिकाणाला एक प्राचीन महत्त्व आहे.

    गणपतीचे मंदिर साधेच आहे. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेते. सिंहासनावर विराजमान असलेल्या या मूर्तीच्या 4 हातात आयुधे आहेत. डोक्यावर चांदीचा मुकुट आणि चांदीचे छत्र आहे. इथे नेहमी फुलांची सुरेख आरास केलेली असते. गणपतीच्या गाभाऱ्यात चांदीचा बारीक कलाकुसर आहे. सभामंडपात अनेक धार्मिक विधी, वाचन सुरु असते. मंदिराच्या आवारात एक छोटी दीपमाळ आहे. मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे.

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या ‘कसारा’, ‘आसनगाव’ आणि ‘टिटवाळा’ या गाड्यांनी या मंदिरापर्यंत जाता येते. स्थानकापासून हे गाव थोडे दूर आहे; मात्र तेथे बससेवा उपलब्ध आहे. हे देउळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर एका सरोवरात बांधले होते. गाळ साचून मंदिर त्यात गाडले गेले. माधवराव पेशवे यांनी दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी या तळ्याचे उत्खनन केले होते. त्यादरम्यान हे मंदिर जसेच्या तसे सापडले, आणि देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करवले आणि मूर्तीची पुनर्स्थापना केली, असा इतिहास सांगितला जातो.

  • देवगडमधील तांबळडेग किनारा

    देवगडमधील तांबळडेग किनारा

    महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडमध्ये तांबळडेग हा अप्रतिम सागरकिनारा आहे. कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणला जावा असा हा किनारा आहे. स्वच्छ पांढरी वाळू, निळेशार पाणी असणारा ही किनारा एकांत प्रदान करणारा आहे. कसलीही गर्दी नाही.. सागराच्या साक्षीने स्वगत साधण्यासाठी मस्त असे हे ठिकाण आहे. सागरवेडा पर्यटक येथे हरखूनच जाईल, असा हा किनारा !

    येथील वाळूचा किनारा तीन-साडेतीन किलोमीटर लांब आहे. किनाऱ्याच्या दक्षिण टोकाला ‘नारिंग्रे’ नदी सागराला येऊन मिळते. हे संगमाचे दृष्यसुद्धा मनमोहक असते. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेला, कोकणातील निसर्गरम्यता सभोवताली घेऊन लाटांनी फेसाळणारा गावाकडील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतोच करतो.
    शहराच्या गजबजाटापासून दूर असणाऱ्या किनाऱ्यांच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

  • शिवडीचा किल्ला

    शिवडीचा किल्ला

    शिवडीचा किल्ला हा मुंबई शहरातील चांगल्या स्थितीत असलेला किल्ला आहे. हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पूर्वेला 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे.
    बहादूरखानाने त्याच्या ताब्यात असताना शिवडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधला. सन १५३४ च्या तहात हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी या किल्ल्याची डागडुजी केली. सन १६७२ साली जंजिऱ्याच्या सिद्दीकडून मुंबईवर हल्ले झाले. त्यानंतर इंग्रजांनी अनेक नवीन किल्ले बांधून जुने किल्ले मजबूत केले. शिवडी किल्ल्याची दुरुस्ती इंग्रजांनी सन १६८० मध्ये पूर्ण केली.

    सन 2007-2008 मध्ये किल्ल्याचे नुतनीकरण पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय खात्याने केले. या किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. येथून आपण सय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या 2 लांबलचक इमारती दिसतात. किल्ल्याच्या चारही बाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. येथे त्रिकोणाकृती बुरुज येथे पहायला मिळतात.

    या किल्ल्याचे स्वरुप पाहता बाहेरच्या बाजूस एक तटबंदी, आत आणखी एक तटबंदी असे आहे. किल्ल्याची सीमा भिंत जाड असून पूर्णपणे दगडात बांधलेली आहे. किल्ल्याच्या दक्षिणआणि उत्तरेकडे 2 दरवाजे आहेत. आता फक्त दरवाजांचे आकार शिल्लक आहेत.

    हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकापासून पूर्वेला पूर्व द्रुतगती मार्गाच्या खालून एक रस्ता आहे. या रस्त्याने सरळ गेल्यावर काही मिनिटातच हजरत अली बाबांचा दर्गा लागतो. या दर्ग्याच्या लगतच या किल्ल्याचे द्वार आहे. शिवडी किल्ल्यालगतच्या समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी हिवाळ्यात सैबेरियातून हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येत येतात. फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन पर्यटकांना येथे घेता येते. चांगल्या अवस्थेत असलेला किल्ला आणि दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पक्षी यामुळे या किल्ल्यावर पर्यटक आवर्जून जातात.

  • सेवाग्राम आश्रम

    सेवाग्राम आश्रम

    भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कसे जगले आणि कसे लढले ते पहायचे असल्यास पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील एक उत्तम ठिकाण म्हणजे ‘सेवाग्राम आश्रम’ होय. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे.

    सन 1933 मध्ये जमनालाल बजाज यांच्या विनंतीवरून गांधीजी काही काळासाठी वर्ध्याला आले. ते प्रारंभी महिला आश्रमाच्या प्रार्थना मंदिरात राहत होते. पुढे सन 1936 मध्ये गांधीजींनी वर्ध्याच्या सीमेवर असलेल्या ‘सेगाव’ नावाच्या गावात आपले निवासस्थान (कुटी) बांधले. ज्याचे नाव त्यांनी ‘सेवाग्राम’ म्हणजे ‘सेवेचे गाव’ असे ठेवले.

    जमनालालजींनी या आश्रमासाठी आपली जमीन दिली. गांधीजींनी त्यांच्या झोपडीच्या बांधकामासाठी कोणत्याही परिस्थितीत पाचशे रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नये, अशी अट घातली होती. त्यासाठी वापरले जाणारे साहित्य स्थानिकांकडून खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार सेवाग्राम येथे गांधीजींचे पहिले निवासस्थान ‘आदिनिवास’ बांधण्यात आले.

    गांधीजी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांच्या अनुयायांसाठी आश्रमात बांधलेली छोटी राहण्याची ठिकाणे गावातील झोपड्यांसारखीच होती. महत्त्वाच्या राष्ट्रीय बाबी आणि चळवळींचे अनेक निर्णय सेवाग्राम येथे घेण्यात आले. राष्ट्रउभारणीच्या अनेक संस्थांसाठी हे केंद्रस्थान बनले. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते गांधीजींच्या उपक्रमांचे केंद्र राहिले.

    सध्या येथील आश्रमातील माणसे प्रार्थना, सूतकताई, अंगमेहनतीची कामे, साफसफाई आणि शेती यासह आश्रमाचे दैनंदिन वेळापत्रक सांभाळतात. ‘सेवाग्राम’ हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. येथे लोक नियमितपणे येत असतात. गांधींनी सन 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत पदयात्रा सुरू केली. तेव्हा त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साबरमतीला परत न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी स्वातंत्र्य मिळाले नव्हते. गांधींना दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगावा लागला.

    सुटका झाल्यावर त्यांनी काही काळ प्रवासात घालवला. त्यांनी मध्य भारतातील एका गावाला आपले मुख्यालय बनवण्याचा निर्णय घेतला. जमनालालजी बजाज यांच्या निमंत्रणावरून ते सन १९३४ मध्ये वर्ध्याला आले. गांधीजी सेवाग्रामला आले, तेव्हा 67 वर्षांचे होते. तेव्हापासून सेवाग्राम हे प्रेरणादायी ठिकाण बनले आहे. सेवाग्राम वर्धा शहरापासून 8 किमी आणि नागपूरपासून 75 किमी अंतरावर वसलेले एक छोटेसे गाव आहे.

    अनेक व्यावहारिक अडचणी असतानाही गांधीजींनी इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत अनेक सहकारी येथे राहू लागले. सेवाग्राम येथे कोणत्याही सुविधा नव्हत्या. टपाल किंवा तार कार्यालयही नव्हते. पत्रे वर्ध्याहून आणावी लागायची.

    गांधीजींच्या अनुयायी मीरा बेन यांनी येथे एक कुटी बांधली. ती गांधीजींच्या कार्यालयाकरिता देऊन त्यांनी गावाजवळच स्थलांतर केले. या कुटीलाच आज ‘बापू कुटी’ आणि ‘बापू ऑफिस’ असे संबोधले जाते. गांधीजींना भेटायला बहुसंख्येने अनुयायी येत असत. याच कुटीत कस्तुरबाही राहत. गांधीजींना भेटण्यासाठी अनेकजण येत असल्यामुळे कस्तुरबांसाठी अन्य कुटी बांधली गेली. या कुटीलाच ‘बा’ कुटी म्हणून ओळखले जाते. जेव्हा आपण या कुटीकडे पाहतो, तेव्हा गाधींजींचे साधे राहणीमान आपल्या डोळयासमोर उभे राहते.

    या कुटीला बांबू, तट्टयांचे आच्छादन आहे. भिंती पांढऱ्या मातीने सारवलेल्या आहेत. मीरा बेन यांनी कुटीच्या भिंतीवर ओम, बांबूंचे वृक्ष, मोर, चरखा, निसर्गाची चित्रे रेखाटली होती. ती आजही कायम आहेत. खिडक्या, दरवाजे बांबूनींच बनवून स्थानिक पद्धतीने सजविण्यात आलेले आहेत. ग्रामस्थांनी बनविलेल्या तट्टयांचा वापर कुटीच्या आच्छादनासाठी करण्यात आलेला आहे. ‘सिंदी’च्या‍ झाडापासून तयार करण्या‍त आलेल्या चटयांचा वापर गांधीजी करत असत.
    बापूंच्या कार्यालयीन कुटीमध्ये आपणाला तत्कालीन दूरध्वनीही पाहायला मिळतो. गांधीजी वापरत असलेले सुंदर पेपरवेटही याठिकाणी ठेवले आहेत; तसेच चिनीमातीतील तीन माकडे सर्वांचे आकर्षण ठरतात. महाराष्ट्रातील हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

  • खानदेशातील उनपदेव

    खानदेशातील उनपदेव

    खानदेशातील ‘उनपदेव’ या तीर्थक्षेत्रावर भाविकांची सदैव गर्दी असते. जळगाव जिल्ह्यातील ‘चोपडा’ शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. वैशिष्ट्य म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्धीस पावले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे क्षेत्र म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. येथे असलेल्या स्नानकुंडाच्या वरील बाजूला शरभंग ऋषींची पुरातन गुंफा, श्री महादेव, श्री गणपती, श्रीराम-लक्ष्मण-सीतामाई आणि हनुमान यांची मंदिरे आहेत.

    विविध प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी वनस्पती या परिसरात पाहता येतात. सर्प, हरिण, मोर, तडस, निलगाय, लांडोर आदि पशुपक्ष्यांचा येथे मुक्त संचार असतो. हे तीर्थक्षेत्र प्रभू श्रीराम आणि श्री शरभंग ऋषींच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहे. येथे गोमुखातून वाहणारे गरम पाणी सतत वाहत असते. पाण्याची उष्णता कमी-जास्त होत नाही, यामुळे पर्यटक अचंबित होतात.

    प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवास भोगत असताना येथे आले होते. त्यावेळी त्वचारोगाने पीडित शरभंग ऋषींसाठी बाण मारून श्रीरामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली असल्याची अख्यायिका आहे. या गरम पाण्याने आंघोळ करून शरभंग ऋषींना पूर्ववत शरीर प्राप्त झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. सातपुड्याच्या पर्वतरांगामधील गंधकाच्या साठ्यातून या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती झाली आहे.

    गंधक हे त्वचारोगावरील उपचारांस उपयुक्त असल्याने त्वचारोग नाहीसे करण्यासाठी लोक येथे आवर्जून येतात. संपूर्ण पौष महिन्यात येथे यात्रा भरते. महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, गुजरात येथील भाविक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे उत्सवकाळात स्थानिकांनाही रोजगार मिळतो. या तीर्थक्षेत्रास शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे.

  • सिंधुदुर्गातील मिठबाव किनारा

    सिंधुदुर्गातील मिठबाव किनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड तालुका सागरकिनाऱ्यानीही समृद्ध आहे. येथील मिठबाव किनारा असाच नितांतसुंदर आणि देखणा आहे.

    ‘गजबा’ देवीच्या आशीर्वादाने पुलकित झालेला हा सागरतीर आहे. येथील स्थानिक तसेच आधी येऊन गेलेले पर्यटक संध्याकाळच्या वेळेला येथील मंदिरापाशी जाऊन बसतात. फेसाळणाऱ्या लाटांचे विहंगम दृश्य पाहतात. मावळतीच्या वेळेला येथे बसणे म्हणजे सुखाची अनुभूतीच असते.

    मिठ्बावला केवळ समुद्रांच्या लाटाच नव्हे तर ‘नारिंग्रे’ नदीचा शांत प्रवाहसुद्धा मंत्रमुग्ध करतो. स्वच्छ पांढरी वाळू, हिरव्यागर्द वृक्षांची निसर्गरम्यता यामुळे या किनाऱ्यावरून लवकर जाऊ नये, असे येथे जाणाऱ्यास वाटते. येथील स्थानिक खाद्यसंस्कृतीची चव येथे चाखता येते. पर्यटकांची येथे फारशी वर्दळ नसते. सुट्टीच्या दिवसात देवगडमधील चाकरमानी या किनाऱ्यास आवर्जून भेट देतात.

  • घोडबंदर किल्ला

    घोडबंदर किल्ला

    ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ‘उल्हास’ नदीच्या किनाऱ्यावर घोडबंदर किल्ला आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला नंतर मराठ्यांच्या ताब्यात गेला. याठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत. त्यामुळे या जागेला ‘घोडबंदर’ हे नाव पडले.

    या किल्ल्याचे पोर्तुगीज नाव ‘ककाबे दी तन्ना’ असे होते. इसवी सन १७३७ पर्यंत या किल्ल्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. तेव्हा त्यांनी इथे बांधलेले चर्च अजूनही अस्तित्वात आहे. आज त्याचा वापर हॉटेल म्हणून करतात. सध्या या किल्ल्याची अवस्था वाईट आहे. या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काही प्रयत्न शासनाकडून चालू आहेत. हा किल्ला भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येतो.

    घोडबंदर किल्ल्याची पूर्ण तटबंदी आजमितीस शिल्लक नाही. तटबंदीच्या दुरवस्थेमुळे किल्ल्याला किती आणि कुठे प्रवेशद्वारे होती, हे कळणे जरा कठीणच आहे. तथापि किल्ल्यात जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने वर गेल्यानंतर तीन बाजूने इमारत व मधोमध मोकळी जागा असे स्वरुप असलेल्या इमारतीच्या भिंती आहेत.

    हा बुरुज स्पष्टपणे किल्ल्याच्या अंतर्भागात आहे. याचा अर्थ हा बुरुज फक्त टेहळणीसाठीच बांधला गेला असावा. घोडबंदर किल्ल्यातील या बुरुजात वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. पोर्तुगीज शैलीचे दरवाजे असून त्याचे ‘कमानयुक्त’ व ‘वक्राकार शीर्षयुक्त’ असे दोन उपप्रकार पडतात. या दोन्ही प्रकारचे दरवाजे येथे आढळतात. ‘घोडबंदर’ किल्ल्याला लागून असलेल्या खाडीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. वसई ते ठाणे जलमार्गावरील किल्ला म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व होते.

  • कोका अभयारण्य

    कोका अभयारण्य

    निसर्ग पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी अभयारण्य हे उत्तम प्रेक्षणीय स्थळ ठरते. येथे वनस्पतीबरोबरच प्राणी, पक्ष्यांचे दर्शन होते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ‘न्यू नागझिरा’, ‘उमरेड कऱ्हाड’ आणि ‘कोका’ अशी 3 अभयारण्ये आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या ‘न्यू नागझिरा’ अभयारण्याला लागूनच ‘कोका अभयारण्य’ घोषित करण्यात आले.

    डिसेंबर 2013 पासून या अभयारण्याच्या विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली. या क्षेत्रात 25 नैसर्गिक पाणवठे असून ज्याठिकाणी पाणी उपलब्ध नाही, त्याठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. सौरऊर्जेवर चालणारे पंप या टाक्यांवर बसविण्यात आले आहेत.

    हे अभयारण्य म्हणजे वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास आहे. त्यामुळेच या जंगलाला वन्य प्राण्यांसाठी ‘संरक्षित’ केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, काळवीट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर येथे अनेक पक्ष्यांचा अधिवास आहे. समृद्ध जैवविविधतेने हे जंगल श्रीमंत झाले आहे.

    या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूरमध्ये प्रवेशद्वार आहे. पर्यटकांना जंगलसफर करता यावी यासाठी 5-7 गाड्या सोडण्यात येतात. गावातीलच मुलांना मार्गदर्शकाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या अभयारण्यात वन्य प्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळेच पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वळला आहे.

    नागपूर-भंडारा हे 65 कि.मी. अंतर असून भंडाऱ्याहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार 19 कि.मी. आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून वाहनांची व्यवस्था आहे. स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. पर्यटकांना जंगल सफारीकरिता सकाळी 5 ते 9.30 आणि दुपारी 3 ते 6.45 या कालावधीत जाता येते. एकावेळी 5 ते 7 गाड्या सोडण्यात येतात.

  • सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर

    सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर

    श्री क्षेत्र औदुंबर हे श्री दत्तात्रेयांचे जागृत स्थान सांगली जिल्ह्यात आहे. तासगाव तालुक्यात ‘भिलवडी’ गावाजवळ ‘कृष्णा’ नदीच्या काठी निसर्गाच्या सहवासात हे सुंदर मंदिर उभे आहे. औदुंबर हे पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. दत्तावतार नृसिंहसरस्वतींचे हे स्थान आहे. याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक विधी संपन्न होतात. अनेक दत्तभक्तांची येथे वर्षभर वर्दळ असते.

    औदुंबर येथील कृष्णेचा डोह सुंदर आहे. डोहातील पाणी कमी झाल्यावर सिध्दनाथाचे मंदिर दृष्टीस पडते. नृसिंह-सरस्वातीच्या निर्वाणदिनी फुलांनी सजविलेला पाळणा या डोहात सोडला जातो. याच्या बाजूस बांधण्यात आलेला सुंदर घाट मनोहर आहे.

    औदुंबरमधील कृष्णेच्या घाटालगत श्रीगुरू शिवशंकरानंद आश्रमाची प्रशस्त वास्तू आहे. या आश्रमात वेदाचे अध्ययन होते. त्यांना पौरोहित्याचे शिक्षण दिले जाते. आश्रमात अनमोल असे संस्कृत ग्रंथ आहेत.

    येथे महायोगी ब्रह्मानंद महाराजांचा जुना मठ आहे. येथे दत्तमूर्ती शिवस्वरूपात प्रतिष्ठापित आहे. येथील शंकराची पिंड वैशिष्टयपूर्ण आहे. येथे श्री भुवनेश्वरी मंदिर आहे. नृसिंह सरस्वती औदुंबर येथे येण्यापूर्वीपासून हे मंदिर भुवनेश्वर येथे आहे. हे मंदिर दगडी असून हेमांडपंथी आहे. मंदिर परिसरात दगडी बुरूज, दगडी दीपमाळा, हनुमान, गणपती,काळभैरव, महादेवाचे छोटे मंदिर या मंदिराचा परिसर विलोभनीय जाणवतो. हे मंदिर म्हणजे वास्तुशिल्पाचा वैशिष्टयपूर्ण नमुना आहे. येथील सौंदर्य अप्रतिम आहे. दर्शनासाठी येणारे भाविक येथे आल्यावर त्यांचे मन प्रसन्न होते.

  • वेंगुर्ल्याचा दाभोळी वायंगणी किनारा

    वेंगुर्ल्याचा दाभोळी वायंगणी किनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील सागरकिनारे मनमोहक आहेत. येथील काही किनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ असते. काही किनारे आल्हाददायक असूनही शांत आहेत. काही किनाऱ्यांवर कोळ्यांची वर्दळ असते. असाच येथील दाभोळी – वायंगणी किनारा आहे. येथे कोळ्यांची लगबग सुरु असते. उतार असलेल्या किनाऱ्यावर लाटांचा फेस, त्याची गाज अनुभवता येते. एखादी होडी वगळली, तर सगळा किनारा मस्त निवांत असतो.

    वेंगुर्ल्याच्या उत्तरेला हा अतिशय सुंदर, गर्दी नसल्याने स्वच्छ आणि शांत सागरतीर आहे. किनारा अगदी छोटासाच असला, तरीही तो नितांत सुंदर आहे. येथून सूर्यास्ताच्या विविध रंगछटा पाहता येतात. सागर पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येतो. ज्यांनी हा किनारा पाहिला त्यांना वेंगुर्ल्यात आल्यावर येथे भेट दिल्यावाचून जावेसे वाटत नाही, यातच त्याचे खरे सौंदर्य दडले आहे.

  • भुदरगड किल्ला

    भुदरगड किल्ला

    महाराष्ट्रातील कोल्हापूर तालुक्यात ‘भुदरगड’ हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला ३६ मैलावर आणि गारगोटीपासून ५ मैलावर सह्याद्री पर्वतरांगेत हा किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी २६०० फूट आणि रूंदी २१०० फूट आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत. भुदरगड तालुक्याचे सगळे महसुली कामकाज भुदरगडावरून पाहिले जात होते. अलिकडे शासकीय यंत्रणेच्या सोयीसाठी तहसीलदार कार्यालय गारगोटीला स्थलांतरीत करण्यात आले.

    राजा भोज दुसरा याने इसवी सन ११८७ मध्ये शिलाहार राजघराण्याची राजधानी वाळव्याहून पन्हाळ्यास आणली. राजा भोजने दक्षिण महाराष्ट्रात जे किल्ले निर्माण केले, त्यात ‘भुदरगड’ असावा, अशी शक्यता व्यक्त केली जाते. गडावरील भैरवाच्या देवालयासमोर एक दीपमाला आहे. तिच्या बाजूला इतिहासाची साक्षीदार म्हणून एक तोफ आहे. या गडावर दोन मोठे तलाव असून ते किल्ल्याच्या सौंदर्यात भार घालतात.

  • फणसाड अभयारण्य

    फणसाड अभयारण्य

    महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘मुरुड’ गावाच्या अलीकडे ‘फणसाड वन्यजीव अभयारण्य’ आहे. हे पर्यटकांचे खास आकर्षण ठरले असून जगभरातील प्राणी-पक्षीप्रेमी येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वर्षभर येथे भेट देत असतात.

    मुंबईपासून 154 कि.मी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर हे अभयारण्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘फणसाड अभयारण्याचे हे क्षेत्र म्हणजे मुरुड जंजिरा संस्थानाचे राखीव शिकार क्षेत्र होते. संस्थानाचे नवाब सिद्दी यांच्या मालकीचे हे शिकारस्थळ होते. महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रुवारी 1986 रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले.

    येथे शुष्क पानगळीची वने, सदाहरित वने, मिश्र सदाहरित वने व नदीकाठची वने अशी वैविध्यपूर्ण झाडे आहेत. 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात.

    साग व निलगिरीची वने यासह दुर्मिळ व औषधी वृक्ष आढळतात. यामध्ये प्रामुख्याने एैन, किंजळ, जांभूळ, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक ‘नरक्या’ वनस्पती आढळते. यासह उक्षी, सर्पगंधा, कुरडु मोठ्या प्रमाणात आहेत. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेलींचा समावेश आहे. जगातील सर्वांत लांबीची ‘गारंबीची वेल’ हे येथील वैशिष्ट्य आहे.

    येथे आढळणाऱ्या वन्य प्राण्यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर, बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले ‘शेकरु’ हमखास दृष्टीस पडते. नाग, फुरसे, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, तस्कर यासारखे अनेक बिनविषारी साप येथे आढळतात.
    ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला, सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे इत्यादी शिकारी पक्षी व सातभाई, बुलबुल, रातवा, रानकोंबड्या, धनेश, कोतवाल यासह वेडाराघू, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, हरीयाल, कोकीळ यासारखे गाणारे व रंगीबेरंगी पक्षी येथे पहायला मिळतात. पर्यटकांचे खास आकर्षण असलेला बिबट्या येथे अगदी सहजपणे पहावयास मिळतो. याव्यतिरीक्तही येथे अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

  • जेजुरीचा खंडोबा

    जेजुरीचा खंडोबा

    पुणे जिल्ह्यातील जेजुरी या गावी खंडोबाचे देवस्थान आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून ते ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने परिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने मंदिर होते, इसवी सन १७१२ मध्ये जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. या देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत.
    सुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावर ‘मल्हारी मार्तंड’ म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. या देवस्थानच्या डोंगरास ‘नवलाख पायरीचा डोंगर’ असेही म्हटले जाते. हे देऊळ अतिशय सुंदर आहे.

    मंदिरातील सभामंडप आणि गाभारा प्रेक्षणीय आहे. मंदिरात म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा 3 मुर्त्या आहेत. तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वास्तू जतन करून ठेवल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ येथे दरवर्षी खेळला जातो. जास्तीत जास्त वेळ तलवार उंच धरून ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जाते. चैत्री पैर्णिमा, विजयादशमी, चंपाषष्ठी आणि सोमवती अमावस्या या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. तसेही भाविक दर्शनासाठी नेहमी गर्दी करतात.

    खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी आणि इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत आहे. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे लक्ष वेधून घेणारी आहेत. हे ठिकाण पुण्यापासून ५२ किमी. अंतरावर आहे. येथील मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा दैवत महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही विशेष प्रसिद्ध आहे.

    पायऱ्यांच्या दुतर्फा अनेक दीपमाळा दिसतात. देवळाभोवती फरसबंदी आवार आणि तट आहे. दुसरा बाजीराव आणि अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले तलाव प्रेक्षणीय असून मल्हारराव होळकरांच्या स्मरणार्थ बांधलेले महादेवाचे मंदिरही सुंदर आहे. येथील राममंदिरात एक शिलालेख आहे. आजूबाजूचा प्रदेश सुपीक आहे. येथे नगरपालिका असून धर्मशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वगैरे आवश्यक सोयी आहेत.