सह्याद्री मराठी वाहिनी

Category: भटकंती

विविध तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे, गडकिल्ले आणि समुद्र किनाऱ्यांवर जायचंय? पर्यटनाची संपूर्ण माहिती ‘भटकंती’ या सदरात!

  • आजा पर्वत

    आजा पर्वत

    बालाघाट रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध ‘आजा पर्वत’ उर्फ ‘आजोबाचा डोंगर’ आहे. ठाणे जिल्ह्यातील हा गड हरिशचंद्र अभयारण्याचा भाग आहे. येथे घनदाट अरण्याचे दर्शन घडते. येथे वाल्मिकी आश्रम असल्यामुळे या भागाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. गडाच्या नावाला एक इतिहास आहे. असे म्हणतात की, या गडावर बसून वाल्मिकींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला.
    लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना ‘आजोबा’ म्हणत असत. म्हणूनच या गडाचे नाव ‘आजोबाचा गड’ असे पडले, असे सांगतात. गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधी आहे. देहेणे येथून वाल्मिकी आश्रमाच्या अलिकडे दोन किलोमीटरपर्यंत पक्का रस्ता आहे. तेथपर्यंत वाहनाने जाता येते. पुढे कच्च्या रस्त्याने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो.


    येथे वाल्मिकी ऋषी, कालभैरव व शंकराची मंदिरे आहेत. येथे भक्त निवास आणि ध्यान कक्ष आहे. आश्रमासमोर असलेल्या काही पायर्या उतरल्यावर वर्षभर पाणी असणारी दोन पाण्याची टाके आहेत. या आश्रमामागून गेल्यावर डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. येथे सध्या लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीवरुन गुहेत चढून गेल्यावर लव-कुशच्या पादुका खडकात कोरलेल्या दिसतात. तेथेच लव कुशचा पाळणा लावलेला आहे.
    देहेणेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. गडावर सापांचे दर्शन होत असल्याने सावध असणे गरजेचे आहे. कल्याण – मुरबाडमार्गे देहेणे गावी जाता येते.गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

  • भद्र मारुती मंदिर

    भद्र मारुती मंदिर

    छत्रपती संभाजीनगरजवळील खुल्ताबाद येथे भद्र मारुती हे एक प्राचीन मंदिर आहे. वेरुळ लेण्यांपासून चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. येथील मारूती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. प्रयागराज येथील मंदिर आणि मध्य प्रदेशातील ‘जाम सवाली’ येथील मंदिरात अशी मूर्ती दिसते. हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा, रोजचा सूर्योदय व राम नवमीला येथे भाविकांची गर्दी असते.

    या मंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची रामावर विशेष प्रीती होती. तो नेहमी रामाची गाणी गात असे. एकदा हनुमान आकाशातून जात असतांना त्यांच्या कानावर ही गाणी पडली. ते उतरले. गाणी ऐकण्यात तल्लीन झाले. तेथेच त्यांना ‘भाव समाधी’ लागली, असे सांगतात. राजा भद्रसेनांचे गाणे सपल्यावर त्यांनी पाहिले असता त्यांना मंत्रमुग्ध झालेले हनुमान दिसले. त्यांनी दंडवत घातला. भक्तांना दर्शन व आशीर्वाद देण्यासाठी तेथेच राहण्याची विनंती केली. त्याप्रमाणे हनुमान कायमचे तेथेच राहिले, असे सांगतात.

    हे मंदिर प्रसन्नता प्रदान करणारे आहे. औरंगाबादमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम स्थळांपैकी एक आहे, येथे सकाळी 5 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत प्रवेश दिला जातो. अनेक पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून भेट देतात. हे मंदिर, मूर्ती पाहून हरखून जातात.

  • वागातोर समुद्रकिनारा

    वागातोर समुद्रकिनारा

    वागातोर हा एक गोव्यातील गजबजलेला किनारी भाग आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या सुंदरतेसाठी ओळखला जातो. हा किनारा मेजवान्यांसाठी प्रसिद्ध आहे. तरुण लोक या मेजवान्यांना हजेरी लावतात. येथील ‘सी व्ह्यू बार’ आणि क्लबमधून सूर्यास्त पाहण्यासाठी लोक येथे उपस्थित राहतात. येथील रेस्टॉरंटमध्ये जगभरातील पाककृती आढळतात.
    वागातोर किनाऱ्यावर अनेक क्रियाकलाप होताना दिसतात. येथे अनेक खाद्यपदार्थ आणि पेये, क्रिकेटचा खेळ सुरू आहे. विक्रेते ताजेतवाने नारळाचे पाणी विकतात. हा समुद्रकिनारा एका बाजूने टेकडीने नटलेला आहे.

    उत्तर गोव्यात वसलेला हा किनारा कांदोळी, कलंगुट, बागा आणि अंजुणे किनाऱ्याच्या शेवटी वसलेले आहे. शापोरा नदीने या किनाऱ्यास मोरजीपासून वेगळे केले आहे. वागातोर समुद्रकिनारा ‘मोठे वागातोर’ व ‘लहान वागातोर’ या दोन भागांमध्ये विभागलेला आहे.

    आपल्या सुट्ट्यांमध्ये गोव्यातील या समुद्रकिनाऱ्याला भेट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा गोव्यातील सर्वात जास्त छायाचित्रीत केलेला समुद्रकिनारा आहे. येथे विविध प्रकारचे जलक्रीडा प्रकार देखील पाहू शकता.

  • कुंजरगड किल्ला

    कुंजरगड किल्ला

    बालाघाट डोंगररांगेवर ‘कुंजरगड’ हा एक किल्ला आहे. पायथ्याशी असलेल्या गावातून हा गड हत्तीसारखा प्रचंड दिसतो. या किल्याशीचे दुसरे नाव ‘कोंबडगड’ असेही आहे. पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस पडतो. पावसाळा ऐन भरात असताना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडसारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत. सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. कुंजरगड – भैरवगड हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनई गावी मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते.

    कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्यामधून जाणार्या वाटेने गडावर पोहोचण्यास कमी वेळ लागतो. गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. गडाला वळसा घालून जाताना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्या मुर्तीला काळोबा म्हणतात.

    किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. अर्ध्या पायर्या चढल्यावर डोंगराच्या आरपार खोदलेली एक गुहा आहे. ही गुहा पाहून पायऱ्यांच्या मार्गाने उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर पोहोचता येते. समोर उद्ध्वस्त वास्तुचे अवशेष दिसतात. उजव्या बाजूला पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवशेष दिसतात.या वाड्यामागे दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते. या गडावर राहण्याची सोय नाही. विहिर गावातील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.

  • छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

    छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

    छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे एक उल्लेखनीय ठिकाण आहे. मुख्य आकर्षणांपैकी हे एक स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापासून नेहरू बाल उद्यान जवळ आहे. हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे.

    मराठा साम्राज्यातील शासकांची शस्त्रे आणि इतर पुरातन वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये 500 वर्षे जुना युद्धाचा पोशाख, 400 वर्षांची जुनी पैठणी साडी, औरंगजेबाने स्वत:च्या हाताने लिहिलेली कुराणाची प्रत येथे पहायला मिळते. अनेक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गोष्टी येथे पहायला मिळतात. जुनी शस्त्रे, प्राचीन रायफल, तलवारी, ढाली आणि मुघलांना पराभूत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलाकृती येथे पहायला मिळतात. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या आणि त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची अनेक जुनी चित्रे येथे आहेत.

    हे संग्रहालय आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 10.30 वाजल्यापासून संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत खुले असते. येथे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक व विमानतळ जवळ आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने या संग्रहालयाची स्थापना केली. या इमारतीत एकूण 6 प्रदर्शन सभागृह आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील हिमायत बाग येथे हे संग्रहालय आहे. औरंगाबादमधील महत्व्मपूर्ण पर्यटनस्थळांपैकी हे एक ठिकाण आहे. मात्र आज जाण्यासाठी माफक प्रवेश शुल्क आकारले जाते.

  • दाक्षायणी देवीचे मंदिर

    दाक्षायणी देवीचे मंदिर

    औरंगाबादमध्ये दाक्षायणी देवीचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर लासूर गावात ‘शिवना’ नदीच्या काठावर असून निसर्गरम्य आहे. दाक्षायणी देवी लासुर गावचे आराध्य दैवत व वैजापुर तालुक्याचे ग्रामदैवत आहे. डोक्यावर चांदीचा मुकूट आणि अंगभर दागिने परिधान केलेली देवीची मूर्ती प्रसन्न आहे. देवीच्या मंदिरासमोर मोठा सभामंडप आहे. देवीच्या मूर्तीसमोर वाघाची मूर्ती असून ती एका अंखड दगडी शिळेत कोरलेली आहे. बाजूला कासवाची मूर्तीही आहे. वर्षातून दोन वेळा गावात मोठा उत्सव पार पडतो. एप्रिल-मे महिन्यात मोठी यात्रा आणि नवरात्रीत नऊ दिवस मंदिर भक्तांनी गजबजलेले असते. दाक्षायणी देवी ही दक्ष राजाची कन्या आहे. या देवीच्या लासुर गावात प्रकट होण्याची कथा सांगितली जाते. दाक्षायणी देवीचा आई-वडिलांकडून अपमान झाल्यावर तिने पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली. त्यानंतर शंकराने जटा आपटून तांडव केले.

    लोकांच्या नवसाला पावणारी देवी अशी भक्तांमध्ये ओळख आहे. नववधू या देवीचा आशीर्वाद घेऊन सुखी संसाराला सुरुवात करतात. मंदिराचे बांधकाम पूर्वी हेमाडपंथी होते. देवीच्या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. त्यावर कोरलेल्या वाघाच्या मूर्ती लक्षवेधक आहेत. मंदिराच्या मध्यभागी छतावर कोरलेले सुंदर कमळ आहे. मंदिरावरील नक्षीकाम देखणे आहे. या मंदिराला एक मुख्य कळस आणि तीन उपकळस आहेत. मंदिराच्या रस्त्यावर अनेक दुकाने आहेत. या मंदिराची गावकरीच देखभाल करतात. लासूर गावी औरंगाबादहून रेल्वे, बस व खासगी वाहनाने जाता येते. हे क्षेत्र औरंगाबादहून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे.

  • बेनाळी समुद्रकिनारा

    बेनाळी समुद्रकिनारा

    बेनाळी हा गोव्यातील एक सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा खूप शांत आणि नयनरम्य असा आहे. संध्याकाळच्या वेळी येथे गर्दी असते. पर्यटक सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात. या किनाऱ्यावर गोव्यातील इतर समुद्रकिनाऱ्यांइतके पर्यटक नसतात. तरीही विविध प्रकारच्या जलक्रीडा पाहण्याची संधी येथे मिळते. या किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार पहायला मिळतात. हा मंत्रमुग्ध करणारा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर चंदेरी वाळू पहायला मिळते. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेला हा किनारा आराम करण्यासाठी, उत्साह निर्माण करण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे.

    एकंदरीत, आनंद घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी या बेनोळी किनाऱ्याला भेट द्यावी. येथील सूर्यास्ताचे निरीक्षण करावे. जलक्रीडांचा आनंद घ्यावा. रात्रीच्या वेळी हा समुद्रकिनारा खूप सुंदर दिसतो. विविध प्रकारच्या बीच, शॅक्स आणि रेस्टॉरंट्सनी भरलेला आहे. येथे संगीत आणि नृत्याने आपण आपली रात्र मनोरंजक बनवू शकता. मोठ्या आवाजातील संगीताचा आनंद घेऊ शकता, मेजवान्या करु शकता. जर तुम्ही गोव्याची राजधानी पणजी येथे असाल, तर या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. या प्रवासासाठी तुम्हाला 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. विमानाने जात असाल, तर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टॅक्सी भाड्याने घ्यावी. हे अंतर फक्त 31 किलोमीटर आहे.

  • इंद्राई किल्ला

    इंद्राई किल्ला

    नाशिक जिल्ह्यात अजंठा-सातमाळ रांगेत चांदवड तालुक्यात राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड हे चार किल्ले आहेत. इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव राजधेरवाडी आहे. या गावात २ दिवस थांबून राजधेर व इंद्राई हे किल्ले पाहता येतात. किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत. या किल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

    इंद्राई गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष तेवढे शिल्लक आहेत. राजधेरवाडीमार्गे गेल्यावर कातळभिंती मिळतात. या कातळकड्यापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत. यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. येथून गडावर जाण्याचा मार्ग बनविलेला आहे. या मार्गाने ५० पायर्या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. या मार्गाने अंदाजे १०० पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूच्या कातळात कोरलेला फारसीतील शिलालेख आढळतो. प्रवेशद्वारातून पुन्हा थोडे चढल्यावर कातळात खोदलेल्या गुहा दिसतात.

    हे पाहून परत मागे फिरल्यावर पुन्हा दुसरी वर जाणारी वाट पकडावी. थोडे चढून गेल्यावर बुजलेले पाण्याचे टाक आणि वास्तुचे अवशेष दिसतात. येथून सरळ पुढे जाणारी वाट माथ्‌यावर जाते. येथे कातळात खोदलेले महादेवाचे मंदिर मिळते. मंदिरासमोर दगडात बांधून काढलेला तलाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन गुहेच्या वर गेल्यावर एक मोठा तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या गडावर कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहा दिसतात. डोंगराच्या मागे नाशिक – धुळे महामार्ग दिसतो. इंद्राई किल्ला पाहण्यासाठी २ तास लागतात

  • हिमायत बाग

    हिमायत बाग

    छत्रपती संभाजीनगरच्या रौजा बाग परिसरात दिल्ली गेटजवळ हिमायत बाग हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. ही बाग १७ व्या शतकातील असून 300 एकर परिसरात पसरलेली आहे. येथे आता फळ संशोधन केंद्र आणि रोपवाटिका असून ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचा एक भाग आहे. पूर्वी या बागेची ओळख ‘मुघल गार्डन’ अशी केली जाई. औरंगजेबाच्या दरबारातील एका अधिकाऱ्याने हिमायत बाग विकसित केली. या बागेत विविध जातींची अनेक फळझाडे होती.

    हिमायत बागेत इवाझ खानने उभारलेली बारा दरी देखील आहे. येथे आच्छादित जलवाहिनी एका इमारतीवरून जाते. हे पाणी खाली अनेक कारंजे असलेल्या आयताकृती कुंडात उतरते. हे अभियांत्रिकीचे एक अद्भुत उदाहरण आहे. बारा दरीमध्ये आता फळसंशोधन केंद्राचे कार्यालय आहे. येथील ‘समर पॅलेस’ हा राजवाडा दुर्मिळ असून अर्धा भूमिगत आहे. या अष्टकोनी महालाच्या सर्व बाजूंनी वाहणारे पाणी बाहेरील तापमानापेक्षा किमान 5 अंश थंड ठेवते.
    हिमायत बाग ही पर्यटकांसाठीचे आकर्षण आहे. पर्यटक येथे विविध झाडे पाहू शकतात. या बागेत पर्यटक विविध प्रकारची कलमी रोपे खरेदी करु शकतात. येथे चिंच, आंबा अशी अनेक वनस्पतींची रोपे मिळतात. पर्यटक या बागेस आवर्जून भेट देतात.

  • गोगाबाबा मंदिर

    गोगाबाबा मंदिर

    छत्रपती संभाजीनगरमधील गोगा बाबा टेकडी ही एक छोटी टेकडी आहे. या टेकडीवर एक छोटेसे गोगाबाबा मंदिर आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण असून मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. येथील वातावरण नेहमीच शांत व आल्हाददायक असते. या टेकडीवरून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य प्रेक्षणीय असते. गोगा बाबा टेकडीच्या माथ्यावर चढण्यासाठी चाळीस ते पन्नास मिनिटे लागतात. श्रावणातील येथील परिसर हिरवागर्द असतो. या टेकडीवर सहलीही आयोजित केल्या जातात. मित्र-मैत्रिणी तसेच कुटुंबियांसोबत सहज फिरण्यासाठी ही टेकडी उत्तम आहे.

    या टेकडीच्या माथ्‌यावरुन शहराचे सुंदर दर्शन्‍ होते. ही टेकडी औरंगाबादच्या लेण्यांच्या अगदी जवळ आहे. टेकडीवर सकाळी किंवा संध्याकाळी जावे. हे ठिकाण औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे. टेकडीवर चढण्यासाठी टेकडीवर सावधगिरी बाळगावी लागते, कारण येथे पाय घसरण्याची भीती असते. मित्रमैत्रिणी तसेच कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी ही टेकडी उत्तम आहे. येथील आकर्षक वास्तू सोनेरी महालाच्या मागे ही टेकडी आहे. गोगा बाबा टेकडीजवळील देवगिरी किल्ला, हनुमान टेकडी , बीबी का मकबरा इत्यादी ठिकाणे आहेत,या टेकडीवर उत्तम छायाचित्रे टिपता येतात.

  • बांबोळी समुद्रकिनारा

    बांबोळी समुद्रकिनारा

    बांबोळी समुद्रकिनारा हा गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. सहलीचा किंवा शांत दिवसाचा आनंद लुटणाऱ्यांनी या किनाऱ्यावर जावे. गोव्यात विखुरलेल्या बहुतेक समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे या किनाऱ्यावर विक्रेते किंवा शॅक दिसणार नाहीत. या किनाऱ्यावर नारळाची झाडे, खडकाळ भाग आणि सोनेरी वाळूचा लांब पट्टा दिसतो. या किनाऱ्यावर कोणत्याही दिवशी गेले तरी कामात मग्न असणारे मच्छिमार दिसतील.
    या किनाऱ्यावर पर्यटक मनपसंत छायाचित्रे टिपू शकतात.

    येथे सर्वात जवळचे हॉटेल ‘ग्रँड हयात’ हे आहे. अत्याधुनिक सुविधा, उत्कृष्ट आदरातिथ्य आणि सर्व सोयींनी सज्ज असणारे लक्झरी हॉटेल येथे आहे. ऑक्टोबर ते मार्च हा या किनाऱ्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. येथील हवामान आल्हाददायक आणि आरामदायक आहे. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यासाठी पर्यटक टॅक्सी किंवा इतर खासगी वाहने भाड्याने घेऊ शकतात.

  • पदरगड किल्ला

    पदरगड किल्ला

    कर्जतमार्गे भिमाशंकरला जाणाऱ्या गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला रायगड जिल्ह्यात येतो. टेहळणी करणे हा या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता. पदरगडावरील दोन कातळ सुळक्यांना औरंगजेबाने पेठचा किल्ला घेताना आजूबाजूचे किल्लेही घेतले. त्यावेळी पदरगड त्याने पुन्हा बांधून घेतल्याचे सांगतात.

    पदरगडावर चढताना ‘चिमणी क्लाईंब’ व त्यानंतर प्रस्तरारोहण करावे लागते. त्यानंतर गडमाथ्याला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर खिंड मिळते. येथे उजव्या बाजूला कातळात कोरलेली मोठी गुहा आहे. या गुहेत पाच -सात माणसे राहू शकतात. डाव्या बाजूलाही कातळात कोरलेली छोटी गुहा दिसते. या गुहेत एकच माणूस बसेल एवढी जागा आहे. या खिंडीतून गडमाथ्यावर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. यातील काही पायर्या आता नाहीशा झाल्या आहेत. या पायर्या चढून गेल्यावर गडमाथ्यावर पोहोचता येते.

  • सोनेरी महाल

    सोनेरी महाल

    छत्रपती संभाजीनगर शहरात सोनेरी महाल ही एक देखणी व ऐतिहासिक वास्तू आहे. ही वास्तू सातमाळा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. येथून जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
    सोनेरी महालाच्या परिसरात झाडे, कुरणे आणि शेत आहे. या महालाच्या तळमजल्यावर दरबार महाल असून त्यातील चित्रे खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली आहेत. म्हणनच या वास्तूला ‘सोनेरी महाल’ म्हणतात.

    या महालातील हाथीखान्याचे बांधकाम भव्य व आयताकृती असून त्यात निमुळत्या कमानी आहेत. याच हाथीखान्यातून मुख्य महालाकडे एक मार्ग जातो. या मार्गाच्या दोन्ही बाजूस बाग आहे. या रस्त्याच्या मधोमध लंबाकार जलाशय आहे. सोनेरी महालाची वास्तू आयताकृती आणि दुमजली आहे. उंच चौथऱ्यावर आहे. खालच्या मजल्यावर चार अन्य खोल्या आहेत. खालच्या मजल्यावरून वर जाण्यासाठी दक्षिणोत्तर भागात जिने आहेत. सर्वात वर गच्ची असून त्यावर टेहळणीचा मनोरा आहे. इमारतीस नक्षीदार कमानी आहेत. वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावर सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन, औरंगाबाद याचे कार्यालय आहे.

    ही वास्तू दगड, लाखोरी विटा व चुन्यातील आहे. ही वास्तु महाराष्ट्र शासनाचे राज्यसंरक्षित स्मारक आहे. मुघल चित्रांमध्ये वनस्पती वास्तुशास्त्राचा अभ्यास उत्कृष्टरीत्या केलेला दिसतो. वास्तूव्या पूर्वेकडे असलेले कोनाडे पारंपरिक फुलझाडे आणि फुलदाण्यांनी सुशोभित केले आहेत. चित्रांमध्ये तपकीरी लाल, निळा, हिरवा, जांभळा, पांढरा व सोनेरी अशा भडक रंगांचा वापर केलेला दिसतो. वास्तूच्या पहिल्या मजल्यावर प्रादेशिक वस्तुसंग्रहालय सन १९७९ साली स्थापन करण्यात आले. या वस्तुसंग्रहालयात पुरातन कलावस्तूंचा संग्रह आहे.. हे संग्रहालय सोमवार व्यतिरिक्त आठवड्याच्या अन्य दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले असते.

  • राजूरचे गणेश मंदिर

    राजूरचे गणेश मंदिर

    जालना शहरातील राजूर परिसरात एक देखणे गणेश मंदिर आहे. शहरापासून पंचवीस किंमी अंतरावर हे मंदिर आहे. गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तसेच विनायकी चतुर्थीदिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून येथे परिवहन महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध असतात. गणेश पुराणानुसार, हे स्थळ भगवान गणेशाच्या संपूर्ण पिठांपैकी एक आहे, असे भाविक मानतात.

    हे गणेश मंदिर फार सुंदर आहे. येथे जाताच डोळ्यांचे पारणे फिटते. येथील गणेशमूर्ती मोहक व प्रसन्न आहे. येथे बोललेली इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. राजूरच्या या गणेश मंदिराजवळ चांदई धरण असून हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे.

    हे मंदिर दिवसभर खुले असते. मंदिरात कोणतेही शुल्क आकारले जात नसून सर्वांसाठी खुले आहे. येथे अंगारकी चतुर्थीस गर्दी असतेच. भाविक आवर्जुन जातात; परंतु हिवाळ्यापासून पुढे पावसाळ्यापर्यंत कधीही येथे जाऊ शकता.

  • मोबोर किनारा

    मोबोर किनारा

    गोव्यातील मोबोर सागरकिनारा हा पर्यटनासाठीचे एक आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे बरेच उत्सव आणि उपक्रम नेहमीच चालू असतात. निसर्गप्रेमींसाठी हे गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी हे एक आहे. फुललेल्या लिली, वाळूचे ढिगारे अशी सुंदर नैसर्गिक वैशिष्ट्ये येथे पहायला मिळतात.

    ज्या लोकांना गोव्याचे दैनंदिन जीवन संपूर्णपणे अनुभवायचे आहे, किंवा ज्यांना सुट्टी अधिक संस्मरणीय करायची आहे त्यांनी येथे प्रवास करावा. येथे पर्यटक थंड पाण्यात पोहायला जाऊ शकतात. शांत वातावरणात समुद्रकिनारी एकटे वेळ घालवू शकतात. मोबोर किनारा म्हणजे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले एक जग आहे. येथे पाम आणि कॅसुअरिनाची झाडे आढळतात. गोव्यातील सर्वात शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक किनारा आहे.

    समुद्राचे निळे, स्फटिकासारखे स्वच्छ पाणी हे एक विलोभनीय दृश्य आहे. मोबोर बीच हे शहरी अराजकतेपासून दूर असलेले एक आश्चर्य आहे. येथे जेट स्कीइंग, पॅरासेलिंग आणि विंडसर्फिंगसारखे साहसी खेळ खेळू शकतात. विविध पक्षी आणि परिसरातील विदेशी जैवविविधता पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे पर्यटक पूर्ण शांतता आणि एकांतात आराम करू शकतात. येथील स्वच्छता आणि शांतता हे जोडप्यांसाठी आणि एकट्या प्रवाशासाठीसुद्धा सर्वात पसंतीचे ठिकाण बनवते. मोबोर किनारा हा दक्षिण गोव्यातील एक शांत समुद्रकिनारा आहे.

  • सिध्दगड किल्ला

    सिध्दगड किल्ला

    प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरणारा माल जुन्नर या बाजारपेठेत नेण्यासाठी विविध व्यापारी मार्गांचा वापर होत होता. यातील कल्याण – म्हसा – अहुपे घाट – जुन्नर हा एक मार्ग होता. हा व्यापारी मार्ग आणि अहुपे घाटावर नजर ठेवण्यासाठी सिध्दगड या किल्ल्याची निर्मिती केली होती. ठाणे जिल्ह्यातील सिध्दगड किल्ला हा भिमाशंकर अभयारण्याचा भाग आहे. हा गड वनखात्याच्या जागेत असल्यामुळे इथे फिरण्यावर बंधने आहेत.

    नारीवली गावातून या गडावर जाता येते. सिध्दगड माचीवर गाव सिध्दगडवाडी आहे. या माचीवर देऊळ आहे. देवळाजवळ शिलालेख पहायला मिळतात. मंदिराच्या मागच्या बाजूला तोफेचे गोळे आहेत. सिध्दगड माची वरून सिध्दगडाच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जातांना दोन कातळात खोदलेल्या गुहा आढळतात. यातील दुसऱ्या गुहेपासून पुढे बाले किल्ल्यावर जाणारी वाट अतिशय अरुंद आहे. माथ्यावर बुरुज व पाण्याचे टाके आहेत.

  • वृंदावन मनोरंजन उद्यान

    वृंदावन मनोरंजन उद्यान

    चाकूरमधील वृंदावन मनोरंजन उद्यान हे आबालवृद्धांचे आवडते ठिकाण आहे. लातूरच्या मुख्य शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. पर्यटकांसाठी थेट उद्यानापर्यंत जाणाऱ्या अनेक कॅब आणि टॅक्सी सेवा येथे आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित बसगाड्याही येथे उपलब्ध असतात. चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या केंद्राजवळ हे पार्क आहे.

    हं मनोरंजन उद्यान एकशेवीस एकर परिसरात पसरलेले आहे. येथे वॉटर पार्कही आहे. वृक्षांच्या सहवासातील अनेक राईड्स अतिशय हायटेक आणि सुसज्ज आहेत. येथून जवळच प्रसिद्ध शिव मंदिर आहे. यामुळे या पर्यटकस्थळावर नेहमीच गर्दी असते.

    या उद्यानात वॉटर झोर्बिंग, गो कार्टिंग, एटीव्ही बाईक राइड, झिप लाइन राइड, वुडी बोट, फ्लॅटेबल पूल राइड, बंजी ट्रॅम्पोलिन, जंगल स्विंग अशा अनेक गोष्टी पाहण्यास व अनुभवण्यास मिळतात. मनोरंजन पार्कच्या परिसरात निवास आणि निवासाची सुविधा देखील उपलब्ध आहे. या मनोरंजन उद्यानात जाण्यासाठी प्रवेश शुल्क आहे. रोज सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे उद्यान खुले असते.

    हा परिसर बराच मोठा असल्याने लहान मुलांवर लक्ष ठेवणे कधीही चांगले ! नौकानयनचा आनंद घेताना सुरक्षितता बाळगावी लागते. उन्हाळ्यामध्ये येथे हुरडा पार्टी केली जाते. याशिवाय विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

  • केशव बालाजी देवस्थान

    केशव बालाजी देवस्थान

    लातुरमधील औसा तालुक्यात केशव बालाजी देवस्थान आहे. आंध्रप्रदेशातील तिरुमलाच्या धर्तीवर हे मंदिर उभारले असून मंदिराला भव्य सभामंडप आहे. वैविध्यपूर्ण बांधकाम आहे. शहराच्या वर्दळीपासून दूर टेकडीवर निसर्गम्य वातावरणात हे मंदिर आहे. वर्षातून दोनवेळा येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात.

    हे मंदिर सर्व दिवस सकाळी 6 वा.पासून रात्री 9 वा.पर्यंत खुले असते. मंदिराला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत कधीही जाणे चांगले. हे मंदिर मानवी वस्तीपासून दूर आहे. पावसाळा तसेच हिवाळ्यात येथे निसर्गरम्यता असते. औसा बसस्थानकावरून खासगी वाहने तसेच मंदिर ट्रस्टचीही खासगी वाहने असतात.

    हे मंदिर लातूर शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर डोंगरांनी वेढलेले आहे. येथे गेल्यास या गावात एक प्राचीन किल्ला आपण पाहू शकता. सुमारे तीनशे वर्षे जुने असणारे वीरनाथ महाराजांचे मंदिर येथे आहे. येथेच भगवान गणेश, भगवान शिव, भगवान विठ्ठल आणि देवी रुक्मिणी यांचीही मंदिरे आहेत. दर शुक्रवारी येथे महाप्रसाद असतो.

  • बेताळभाटी किनारा

    बेताळभाटी किनारा

    बेताळभाटी किनारा हा कोलवा आणि माजोर्डा या किनाऱ्यादरम्यान आहे. पर्यटकांमध्ये हा ‘सनसेट बीच’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सूर्यास्ताची चित्तथरारक दृश्ये दिसतात. बेताळभाटी किनाऱ्याला भेट देण्यामागचे दुसरे कारण म्हणजे येथे डॉल्फिन पहायला मिळतात. येथे गेल्यावर स्थानिक मच्छिमारांना सुंदर डॉल्फिन स्पॉटिंगसाठी घेऊन जाण्याची विनंती केल्यास ते तुम्हाला दाखवू शकतात. या किनाऱ्यावर अनेक नारळाची झाडे आहेत.

    आपण येथे डॉल्फिन स्पॉटिंग पाहू शकता. येथून मच्छिमारांचे निरीक्षण करु शकतात. तुमच्या छायाचित्रे टिपण्याचा आनंद घेऊ शकता. सूर्यास्ताच्या दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. समुद्रकिनाऱ्यावरील शॅकवर अस्सल गोव्याच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा बेतालभाटी किनाऱ्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. हे हवामान आनंददायी आणि उत्तम वेळ घालविण्यासाठी योग्य आहे.

    बेतालभाटी किनाऱ्यावर जाण्यासाठी तुम्ही गोव्याची राजधानी असलेल्या पणजी येथून टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. ज्यासाठी तुम्हाला ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट कॅब भाड्याने घेऊन देखील पोहोचू शकता, ज्यासाठी तुम्हाला सुमारे 35 मिनिटे लागतील.

  • बिष्टा किल्ला

    बिष्टा किल्ला

    नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात बिष्टा, कर्हा , दुंधा, अजमेरसारखे किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातील दुंधेश्वर डोंगररांगेवर हे किल्ले आहेत. या किल्ल्याचा वापर चौकीचा किल्ला म्हणून जात होता. ‘बिष्टा’ किल्ला ‘बिजोट्याचा किल्ला’ या नावानेही ओळखला जातो. हा किल्ला ‘कोटबेल’ गावापासून जवळ आहे.

    ‘कोडबेल’ हे गाव ‘बिष्टा’ किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव आहे. या गावातील बस स्थानकाच्या चौकातून बिष्टा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. येथून कच्चा रस्ता चालू होतो. या रस्त्यावर डाव्या बाजूला सागाची झाडे आहेत. पुढे चालत जाताना अधुनमधून विरळ घरे, ओढा मिळतो. नदीच्या पात्रात बांधलेले धरण आहे. धरणाच्या भिंतीवरुन पलीकडे चालत गेल्यावर बिष्टा किल्ल्यासमोरचा डोंगर मिळतो. तो चढून गेल्यावर बिष्टा किल्ल्याच्या पायथ्यापाशी आपण पोहोचतो. बिष्टा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे .

    या किल्याष्वर पाण्याचे टाक आणि गुहा आहेत. हा गडमाथा लांबवर पसरलेला असून माथ्यावर सहा उद्ध्वस्त वास्तू दिसतात. ते पाहून परत टाक्यांपाशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते. गडमाथ्यावरुन कऱ्हा किल्ला, फ़ोपीरा डोंगर आणि अजमेरा किल्ला दिसतात. ‘कोडबेल’ गावातून किल्ला पाहून परत येण्यास चार ते पाच तास लागतात. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यास एक ते दीड तास, किल्ला चढण्यास अर्धा ते पाऊण तास आणि किल्ला पाहण्यास अर्धा तास लागतो.

  • कपिलधार धबधबा

    कपिलधार धबधबा

    बीड जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांपैकी श्री क्षेत्र कपिलधार हे एक मनोहर ठिकाण आहे. बीड शहराच्या दक्षिणेला १९ किमी. अंतरावर मांजरसुभा हे गाव आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते याठिकाणी एकत्र येतात. येथे टेकड्यांच्या परिसरात ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे.


    कपिलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. पावसाळ्यात येथील बरेच नदीनाले ओसंडून वाहू लागतात. निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारे धबधबे देखील खळखळून वाहतात. कपिलधार धबधबा उंचावरून कोसळत असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. कपिलधार धबधबा हा धुळे-सोलापूर राज्य महामार्गालगत आहे.

  • आनंदी स्वामी मंदिर

    आनंदी स्वामी मंदिर

    जुन्या जालन्यात आनंदी स्वामी मंदिर हे एक आकर्षक मंदिर आहे. येथे संत आनंदी स्वामींनी समाधी घेतली. हे मंदिर दर्शनासाठी सकाळी सहा पासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असते. आषाढी एकादशीला येथे मोठी जत्रा भरते. येथे जाण्यासाठी मात्र नियोजन करावे लागते.

    मराठा सरदार महादजी शिंदे यांनी हे मंदिर बांधले. या मंदिराला ऐतिहासिक वारसा असून हे मंदिर दोनसे पन्नास वर्षे जुने आहे. येथे जवळपास अनेक धार्मिक स्थळे असून मंदिरात गेल्यावर अन्य ठिकाणी भेट देऊ शकता. येथे जाण्यासाठी जालना रेल्वे स्थानक सर्वात जवळ आहे. तेथून स्वामींच्या मंदिरापर्यंत वाहतुकीची चांगली सोय आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा या मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो.

    याच ठिकाणी श्री संत आनंदी स्वामींनी समाधी घेतली. जालना रेल्वे स्थानकापासून आनंदी स्वामींच्या मंदिरापर्यंत वाहतुकीची चांगली सोय आहे. येथून औरंगाबाद हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. येथून जवळपास जाळीचा देव, मम्मादेवी मंदिर, काली मशीद इ. धार्मिक स्थळे आहेत.

  • माजोर्डा समुद्रकिनारा

    माजोर्डा समुद्रकिनारा

    माजोर्डा समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे मऊ सोनेरी वाळू आहे. आनंदाने डोलणारी नारळाची झाडे आणि वारे या किनाऱ्याच्या प्रेमात पाडतात. येथे वॉटर स्कीइंग, डॉल्फिन स्पॉटिंग, बनाना राईड, पॅरासेलिंगचा आनंद घेऊ शकता. माजोर्डा किनाऱ्यावर वाजवी किमतीत सेवा देणारी काही शॅक आहेत. काही लक्झरी हॉटेल्स अगदी जवळ आहेत.

    जर तुम्हाला गोव्यातील पेयांचा आस्वाद घ्यायचा असेल, आणि पहाटेपर्यंत रहायचे असेल, तर तुम्ही काही लोकप्रिय पब आणि नाइटक्लबला भेट देऊ शकतात. हे उत्कृष्ट सेवांमुळे प्रसिद्ध आहेत.

    माजोर्डा किनाऱ्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. गोव्याची राजधानी पणजी हे माजोर्डा किनाऱ्यापासून 29 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यासाठी तुम्ही टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच समुद्रकिनाऱ्याला भेट देण्याचे ठरविल्यास टॅक्सी भाड्याने घेऊ शकतात.

  • नंदगिरी किल्ला

    नंदगिरी किल्ला

    नांदेड जिल्ह्यात आज फक्त अवशेष शिल्लक असणारा नंदगिरी किल्ला होता. गोदावरी नदीच्या काठी हा किल्ला होता. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.

    नंदगिरी किल्ला नांदेड शहरातील अरब गल्लीत आहे. हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने देशाशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या शहरातून येथे एसटी तसेच खासगी बसगाड्या येतात. मुंबईहून नांदेडला जाण्यासाठी नंदिग्राम, देवगिरी एक्सप्रेसने जावे. नांदेडहून रिक्षाने या किल्ल्यापर्यंत जाता येते.

    नांदेड शहरास ‘नंदीतट’, ‘नंदीनगर’, इ. नावांनाही ओळखतात. हे नगर नंद वंशातील राजाने वसवले होते. नांदेड हा नगर किल्ला होता. सातवाहनांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपीठ होते. वाकाटक, चालुक्य ,राष्ट्रकुट व गंग यांच्या काळात नांदेड हे प्रसिध्द शैक्षणिक केंद्र म्हणुन प्रसिध्द होते.

  • जायकवाडी धरण

    जायकवाडी धरण

    गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून जातात. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आले आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते. पूर्ण क्षमतेने भरलेले धरण दोन वर्षांची शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय करते.

    या धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. या योजना ४०० गावांची तहान भागवितात. या धरणामुळे झालेल्या जलाशयास ‘नाथसागर’ असे म्हणतात. यावर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे पाच जिल्हे जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत.

    औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिखलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती या धरणावर अवलंबून आहेत. जायकवाडी धरण मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारे आहे. या अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हे धरण पाहण्यास लोक जातात. येथील परिसरसुद्धा फार मनमोहक आहे. शिवाय गोदावरी नदीचेही दर्शन होते.