सह्याद्री मराठी वाहिनी

Category: भटकंती

विविध तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे, गडकिल्ले आणि समुद्र किनाऱ्यांवर जायचंय? पर्यटनाची संपूर्ण माहिती ‘भटकंती’ या सदरात!

  • कंधारचा किल्ला

    कंधारचा किल्ला

    महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी कंधारचा किल्ला एक आहे. नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यात हा किल्ला आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास, सुरुवातीला राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात केल्याचे समजते. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. पुढील काळात हा किल्ला जिंकणारे राजे या किल्ल्याच्या बांधकामात भर घालत गेले. कंधारचे पूर्वीचे नाव ‘पंचालपुरी’ असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे. मलिक अंबर यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण करुन त्या बांधल्या असल्याचे लक्षात येते. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात नसरत सुलतान याचे नाव आहे. हा शिलालेख इ.स. १३३६ सालातील आहे.

    इ.स. १४०३ साली कंधार तुघलकाच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली होती. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदिलशहा याने बांधल्या असल्याचे समजते. या किल्ल्यावर सुंदर बगीचा होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख ‘बाग-ए-रश्के कश्मीर’ असा आहे.धनबुरुजावर ‘अंबारी’ नावाची तोफ आहे. पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. सुमारे १५ एकर जागेत असलेल्या या किल्ल्याभोवती खंदक आहे. या किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज आहे. अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत. कंधारच्या किल्याअसवर जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध आहेत. याशिवाय खासगी वाहनानेही जाता येते. किल्ल्याचे अंतर नांदेडहून ५० किलोमीटर एवढे आहे.

  • येलदरी धरण

    येलदरी धरण

    परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी महत्व्णपूर्ण असणारे येलदरी धरण हे पर्यटकांसाठी एक मनमोहक ठिकाण आहे. हे धरण पूर्णा नदीवर बांधले आहे. पूर्णा ही गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे. महत्वाचे म्हणजे या धरणामुळे परभणी, जिंतूर, वसमत व हिंगोली जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटला आहे. या धरणाजवळ पर्यटकांसाठी दोन कोटी 99 लाख रुपये खर्चून मोठ्या उद्यान निर्मितीचे काम चालू आहे. लहान मुलांसह अनेक पर्यटक या उद्यानास भेट देण्यासाठी जातात. या उद्यानात खेळणी, प्राण्यांचे पुतळे असे विविध प्रकारचे साहित्य आहे. मात्र या परिसरात राहण्याची चांगली व्यवस्था नाही. जेवणासाठी छोटी हॉटेल्स आहेत.

    जिंतूर तालुक्यातील येलदरी या गावाजवळ हे धरण असून हिंगोलीच्या वायव्येला हिंगोली-जिंतूर मार्गावर येते. शेतीसाठी पाणी पुरवून वीजनिर्मिती करण्यासाठी या धरणाची उभारणी करण्यात आली; परंतु आता परभणी आणि हिंगोलीतील अनेक शहरे पिण्याच्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून आहेत. येलदरीच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण आहे. ते भरले की येलदरी धरणात पाणी सोडण्यात येते. सन 1958 मध्ये सुरू झालेले येलदरी धरणाचे बांधकाम सन 1968 मध्ये पूर्ण झाले. एकूणच, या बांधकामास तब्बल दहा वर्षे लागली. आता या धरणाच्या दिशेने पर्यटकांची पावले आपोआप वळतात. लहान मुलांसह मोठ्या माणसांची येथे गर्दी असते. त्यामुळे हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे.

  • परभणीतील पारदेश्वर मंदिर

    परभणीतील पारदेश्वर मंदिर

    परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध शिवशंकरांचे मंदिर आहे. हे मंदिर संगमरवरी आहे. श्री स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरातील शिवलिंगास बारा ज्योतिर्लिंगाचे महत्व आहे. परभणीतील नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्वर महाविद्यालयासमोर हे ठिकाण आहे. शिवपुराणामध्ये भगवान महादेव स्वतःच्या मुखातून देवी पार्वती यांना पारदचे गुप्त ज्ञान देतात. ते म्हणतात, की ‘मम बीजं तू पारदः’ म्हणजे पारद ही माझी बीज शक्ती आहे. पारद हा धातु आहे. असे हे पारदेश्वर लिंग येथे आहे. श्री पारदेश्वर महादेवांच्या या मंदिराचा मुख्य दरवाजा दर्शनीय आहे.

    पृथ्वीतलावरील केदार, पशुपतीनाथ अशी द्वादश ज्योर्तिलिंगे असून त्यांच्या दर्शनातून जे पुण्य प्राप्त होते, तेवढे पुण्य या पारद शिवलिंगाच्या दर्शनाने प्राप्त होते, अशी मान्यता आहे. श्री पारदेश्वर महादेवांचे नामस्मरण करण्याने जन्मजन्मांतराच्या पापापासुन लवकर मुक्ती मिळते. या मंदिरात जायचे झाल्यास जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेडपासून परभणी ७० कि.मी. अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्गाने तेलंगाणा आणि महाराष्ट्र यांना जोडणारे परभणी हे शहर आहे. येथे जाण्यासाठी एसटी परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्या आहेत. या मंदिरात महाशिवरात्री तसेच सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

  • तोंडवली-तळाशील किनारा

    तोंडवली-तळाशील किनारा

    सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सागरकिनाऱ्यावर विसावलेला एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गडकिल्ले, जलदुर्ग तसेच अप्रतिम आणि सुबक अशी पुरातन मंदिरे आहेत. अशा या सौंदर्यसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेला तोंडवली-तळाशील किनारा अप्रतिम आहे. येथे डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य आणि चालण्यासाठी रुपेरी वाळू आहे. तोंडवली हे गाव मालवण तालुक्यात कालावल खाडी आणि अरबी समुद्रामध्ये आहे. हे मालवणपासून सुमारे २५ किमी आणि कणकवलीपासून ४५ किमी अंतरावर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय ओरोसवरून २८ किलोमीटरच्या अंतरावर, मालवणपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. मालवण-आचरा रस्त्यावरून तोंडवली फाट्यावरून आत गेल्यावर एका वळणावर समुद्राचे दर्शन होते.

    सिंधुदुर्गातील गड नदी तोंडवलीकडे समुद्राला भेटायला येते. तळाशीलपर्यंत ती समुद्राला समांतर वाहते. तळाशीलला नौकेची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली की, पुढे ओसाड बेट आहे. गडनदी समुद्राला मिळते ती जागा फार सुंदर आहे. तोंडवली ते तळाशीलचा सागरकिनारा दोन ते तीन किलोमीटरचा सुंदर आणि स्वच्छ आहे. तळाशील समुद्रकिनाऱ्याच्या पुढे सर्जेकोट किल्ला आणि सर्जेकोट बंदर पहायला मिळते. सर्जेकोट बंदरापासून तळाशील बोटीनेसुद्धा पर्यटक प्रवास करू शकतात. तेथील स्थानिक आकर्षणे दाखविण्यासाठी पर्यटकांसाठी बोटीची सुविधा असते. तळाशील समुद्राच्या मध्यभागी एक लहानसे बेट असून त्याला ‘शिंपला पॉईंट’ असे म्हणतात. या किनाऱ्यावर डॉल्फिनचे सुद्धा दर्शन होते. तोंडवली गावातील सुरूचे बन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुरू होते. या बनाचे निसर्गसौंदर्य पाहताना खूप मजा येते. या सुरूच्या बनामध्ये पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात. त्यामुळे पर्यटकांना आनंद देणारा हा किनारा आहे.

  • नळदुर्ग किल्ला

    नळदुर्ग किल्ला

    नळदुर्ग हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे. हा भुईकोट किल्ला आहे. विलक्षण सौंदर्य असलेला हा किल्ला अप्रतिम आहे.तो पाहण्यासाठी पर्यटकांची फार गर्दी दिसते. किल्ल्याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरली असून तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याचा ताबा आहे. पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर हा किल्ला आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे जाताना ४८ कि.मी. अंतरावर नळदुर्ग किल्ला मिळतो. पूर्वी या किल्याादचे नाव ‘आलीयाबाद’ असे होते. हे नाव निजामशाही काळात दिले होते. नंतर नळराजाने हा किल्ला काबीज करुन हे नाव बदलले, व त्यास ‘नळदुर्ग’ हे नाव दिले.

    सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याभोवती संरक्षणासाठी लांब खंदक आहे. आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर ‘रणमंडळ’ नावाचा तटबंदीने युक्त असा भाग आहे. येथील खंदकात नदीचा प्रवाह अडवून तो वळवून आणण्यात आला. या खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून राहते. त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही.

    या किल्याण्वर टेहळणीचा बुरूज, त्यावरील लांब तोफ, धबधबा व दरवाजाचा वक्राकार मार्ग आहे. आतमध्ये बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरूज आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यामध्ये जलमहाल आहे. हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधाऱ्यामध्ये चार मजले आहेत. भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले आहेत.

  • रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय

    रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय

    संग्रहालये ही इतिहासाची सर्वंकष माहिती देणारी जिवंत दालनेच असतात, असे म्हणायला हरकत नाही ! या संग्रहालयांना इतिहासप्रेमी पर्यटक आवर्जून भेट देत असतात. देशासह विदेशातील संग्रहालये पाहणारे पर्यटकही अनेक आहेत. इतिहास जागविण्यासाठी संग्रहालये असणे गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे ऐतिहासिक रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय आहे. या संग्रहालयात तेर गावातील रहिवासी रामलिंगअप्पा लामतुरे व त्यांचे सुपूत्र भागवतप्पा लामतुरे यांनी संग्रहीत केलेल्या पुरातन वस्तू संवर्धित केल्या आहेत. मुळात या वस्तुंचे जतन लामतुरे या पिता-पुत्रांनी केले होते. रामलिंगअप्पा लामतुरे यांनी सन १९६१ मध्ये हा संग्रह शासनाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. सन १९६७ मध्ये महाराष्ट्र शासनाने हा संग्रह घेण्याचे ठरविले. त्यानंतर सन १९७१ मध्ये लामतुरे यांनी हा संग्रह शासनाकडे प्रदान केला. उस्मानाबादपासून तेर हे गाव २२ किमी अंतरावर आहे.

    हे संग्रहालय पहायचे झाल्यास आत तीन दालने आहेत. या दालनांमध्ये सुमारे पंचवीस हजार वस्तू पहायला मिळतात. लामतुरे संग्रहालयात हस्तिदंताच्या स्त्रीमूर्ती आहेत. या मूर्ती त्यावेळी आरशाच्या मुठी म्हणून वापरल्या जात. स्त्रीमूर्तीच्या माथ्यावर भोक आहे. त्यात चकचकीत तांब्याच्या पत्र्याचे आरशाचे दांडे अडकवले जात.अर्थात आरशाची प्रतिमा म्हणून या मूर्ती वापरल्या जात. या संग्रहालयात हस्तिदंतावर कलाकुसर केलेल्या वस्तू, शंखांच्या वस्तू, हाडांच्या वस्तू, मातीच्या वस्तू, खापरे, मणी, दगडांच्या मूर्ती, शाडूच्या मुर्ती तसेच वेगवेगळ्या स्त्री प्रतिमा पहायला मिळतात. येथे सातवाहनकालीन व इतर राजघराण्यांची नाणी आहेत. नाण्यांच्या मातीच्या प्रतिकृती आणि नाण्यांचे साचेसुद्धा पहायला मिळतात. या वस्तुसंग्रहालयात अनेक प्रकारच्या वस्तू आहेत.

  • चारठाणातील मंदिरे

    चारठाणातील मंदिरे

    महाराष्ट्राच्या अनेक भागांमधील मंदिरांची वास्तुरचना खरोखरच डोळे दिपविणारी अशी आहे. परभणीतील जिंतूर तालुक्यात अशी काही सुंदर मंदिरे पहायला मिळतात. त्यात चारठाणा गावाचा उल्लेख करता येईल. येथे अनेक मंदिरे असून ती पुरातन असल्याने पाहण्यासाठी पर्यटकही आवर्जून जातात. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती आहे. चारठाणा हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. येथे पर्यटकांना शिवमंदिर, गोकुळेश्वर, काशीविश्वेश्वर, श्री नृसिंहतीर्थ मंदिर, दगडी बांधकामाची अष्टकोनी बारव, झुलता मनोरा ही महत्त्वाची स्थळे पहायला मिळतात.

    गावातील ‘चारुशयना’ नदीच्या काठावर नृसिंहतीर्थ मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. नदीकाठी असलेल्या दगडी पायऱ्यांचे काही अवशेष आता दिसतात. एका प्रशस्त आवारात हे मंदिर आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. हा सभामंडप १६ खांबांवर उभा असल्याने हे मंदिर ‘सोळा खांबी नृसिंह मंदिर’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोरील नदीच्या पात्रात काही ठिकाणी खोल डोह झाले आहेत. असे म्हणतात की, तिथे प्राचीन नाणी सापडतात. येथेच एक जोड मंदिर आहे. त्यातील एक देवीचे व दुसरे महादेवाचे मंदिर आहे. देवीच्या देवळाचा सभामंडप महादेवाच्या देवळापेक्षा वेगळा आहे.

    मंदिरात जास्त कोरीव काम केलेले नसले तरी हे मंदिर देखणे आहे. ही मंदिरे पाहण्यासाठी भाविक आवर्जून भेट देतात. श्री काशीविश्वेश्वर आणि रेणुका देवीची मंदिरे जोडलेली आहेत. याच गावात गोकुळेश्वर मंदिर असून प्रथमदर्शनी ते एका भव्य वाड्यासारखे दिसते. या गावचे ग्रामदैवत असणारे हे हे शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. हे मंदिरही आकर्षक आहे. या गावात जुनी कौलारू घरे पहायला मिळतात. चारठाणा हे गाव जिंतूरपासून २० किमी आणि परभणीपासून ६२ किमी अंतरावर वसलेले आहे. येथे जरयचे झाल्यास ‘सेलु’ हे सर्वात जवळील रेल्वे स्थानक आहे. सेलुपासुन चारठाणा अवघ्या २० किमीवर आहे.

  • आगोंद समुद्रकिनारा

    आगोंद समुद्रकिनारा

    आगोंद समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. ज्यांना किनाऱ्यावरील शांततापूर्ण वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल, गर्दी, गडबड-गोंगाटापासून दूर वेळ घालवायचा असेल अशा पर्यटकांसाठी हे चांगले ठिकाण आहे. गोव्यातील हा समुद्रकिनारा जवळजवळ दोन मैलांपर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर उत्कृष्ट खाद्यपदार्थ आणि पेये मिळतात.

    आगोंद किनारा पोहण्यासाठी योग्य आहे. येथे बोटीतून प्रवास करण्याचा मनसोक्त अनुभव घेता येतो. या किनाऱ्याजवळ कपडे आणि वेगवेगळ्या आकर्षक वस्तू विकणारी दुकाने असतात. हा समुद्रकिनारा स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी, चालत फिरण्यासाठी फार सुंदर आहे. या किनाऱ्यावर एखादी बोट भाड्याने घेऊन पर्यटक आगोंद किनाऱ्यापासून जवळच्या ‘बटरफ्लाय’ आणि ‘हनिमून’ किनाऱ्यांना भेट देण्यासाठी जाऊ शकतात. आगोंदमध्ये अनेक स्वस्त तसेच महाग रेस्टॉरंट्स, बार आणि कॅफे आहेत. येथे स्वादिष्ट अन्न आणि पेये उपलब्ध असतात. या किनाऱ्यावर आरामदायी कॉटेज, जंगलातील हॉटेल्स आणि वेलनेस रिट्रीट्स अशा प्रकारची राहण्याची सोय आहे. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा आहे. यावेळी हवामान स्वच्छ असते. पाऊस नसतो. गोव्यात गेल्यावर या किनाऱ्याला आवर्जून भेट द्यायलाच हवी. विमानाने गेल्यास येथे जाण्यासाठी वास्को विमानतळावर उतरावे लागते. तेथून अनेक वाहने उपलब्ध असतात.

  • औसा किल्ला

    औसा किल्ला

    महाराष्ट्रातील गडकिल्ले हे राज्याचे वैभव आहे. असाच एक भुईकोट किल्ला लातूरमध्ये औसा शहराच्या बाजूला आहे. हा किल्ला औसा किल्ला म्हणून ओळखला जातो. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याने वजीर असताना हा किल्ला बांधला. अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही. किल्ल्यातील काही वास्तू व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो.

    औसा येथे भुईकोट किल्ला असून त्याचे क्षेत्रफळ २४ एकर ३० गुंठे आहे. या किल्ल्याभोवती एक खंदक असून सध्याही चांगल्या स्थितीत आहे. या खंदकात अनेक विहिरी आहेत. खंदकाला लागून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मोठा दरवाजा आहे. या दरवाजाला ‘लोह्बंदी’ दरवाजा म्हणतात. लोह्बंदी दरवाजा हे पूर्वाभिमुख आहे. या दरवाजातून आत गेल्यावर ‘अह्शमा’ नावाचा दरवाजा मिळतो. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव दरवाजा आहे. किल्यायाच्या आत राणीमहाल, लालमहाल, पाणीमहाल इत्यादी अनेक इमारती आहेत. किल्ल्यात ‘परिबावडी’, ‘कटोराबावडी’ व ‘चांदबावडी’ या तीन महत्त्वाच्या विहिरी आहेत.

    शहरातील किल्ल्याला ऐतिहासिक काळात राजकीय महत्त्व होते. या शहराला यादवपूर्व काळापासून महत्त्व होते. मराठ्याच्या स्वातंत्र्ययुद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात अनेक चकमकी झाल्या होत्या. औसा किल्ला पहायला जाणारे पर्यटक येथील नंगेबाबांची समाधी, औसेकर महाराज, पडद्याप्पा मठ, कौकाडी बाबांचा मठ, गोसायाचा मठ, अशा अनेक ऐतिहासिक वास्तू पाहून येऊ शकतात. औसा भुईकोट किल्ला लातूरपासून २० किलोमीटरवर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था होऊ शकते.

  • हत्ती बेट

    हत्ती बेट

    ‘हत्ती बेट’ नावाचे निसर्गरम्य ठिकाण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. प्राचीन काळापासून या स्थळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. उदगीर या प्रसिद्ध शहरापासून साधारण पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावर आहे. हत्ती बेटावर पुरातन मंदिरे, गुहा व कोरीव शिल्पे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. या बेटास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या स्थळाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू असताना स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकारांविरुद्ध युद्ध करून शेवटपर्यंत हत्ती बेट रझाकारांना जिंकू दिले नव्हते, असे सांगितले जाते.

    हत्ती बेटावर दत्तगुरुंचे मंदिर तसेच गंगाराम महाराजांची समाधी आहे. आसपासच्या गावांसह तसेच शेजारच्या राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक येथे भेट देत असतात. पौर्णिमेला येथे भजन, कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम होतात. दत्तजयंतीला हत्तीबेटावर मोठी यात्रा भरते. यासह दर महिन्याच्या एकादशीस कीर्तन व भजनाची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. शिवाय दर पौर्णिमेला आरती, जप व महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. यावेळी हजारो भक्तगण हत्तीबेटावर येत असतात.

    हणमंतवाडी, धर्मापुरी, करवंदी आणि देवर्जन या गावांच्या सीमेलगत हे क्षेत्र आहे. सुमारे ४१ हेक्टर क्षेत्रावर हे पसरले आहे. पूर्वी हत्ती बेट म्हणजे उजाड डोंगर होता. येथील जमीन सकस नसल्याने पूर्वी डोंगर झाडांविना उजाड होता. नंतर अलिकडे सर्व लोकांनी प्रशासनाला सहकार्य करुन उजाड डोंगरावर अनेक झाडे लावून हे बेट हिरवेगर्द केले आहे. या बेटावर वर्षभर पर्यटक व भाविकांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणाजवळ पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद हे आहे. रेल्वेने गेल्यास रेल्वे स्थानक लातूर रेल्वे स्टेशन, लातूर रोड रेल्वे स्टेशन येथे उतरावे.

  • उस्मानाबादमधील सिद्धक्षेत्र कुंथलगिरी

    उस्मानाबादमधील सिद्धक्षेत्र कुंथलगिरी

    उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात सिद्धक्षेत्र कुंथलगिरी हे एक धार्मिक क्षेत्र आहे. कुंथलगिरी हे ठिकाण उस्मानाबाद येथून सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर ६० किमी अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी बस तसेच खासगी वाहनांची सोय आहे. हा परिसर कुलभूषण व देशभूषण या मुनिवरांचे मोक्षस्थान समजला जातो. याठिकाणी श्री शांतीसागर महाराजांची समाधी आहे. येथे असलेल्या छोट्या डोंगराच्या टेकडीवर ७ मंदिरे असून पायथ्याशी 4 मंदिरे आहेत. टेकडीवर कुलभूषण-देशभूषण मंदिर, शांतीनाथ मंदिर, बाहुबली मंदिर, आदिनाथ मंदिर, अजितनाथ मंदिर, चैत्य, नंदीश्वर जिनालय ही मंदिरे आहेत. पायथ्याशी नेमिनाथजी, महावीरस्वामी, रत्नत्रय, समवसरण मंदिरे आहेत. येथे गुरुकुल देखील आहे.

    दरवर्षी याठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेस वार्षिक जत्रा भरते. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी असते. हा एकूणच परिसर ऐतिहासिक आणि निसर्गरम्य आहे. येथे आलेले पर्यटक येथील अन्य ठिकाणांनाही भेटी देऊ शकतात. कुंथलगिरी येथून एक किलोमीटरवर रामकुंड हे गाव असून येथे रामाई देवीचे प्रसिध्द मंदिर आहे. येथून उस्मानाबाद लेणी 60 किमी. अंतरावर आहेत. तेर तीर्थक्षेत्र 60 किमी, पैठण – 140 किमी अंतरावर आहे. सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर कुंथलगिरीचा प्रसिध्द पेढा मिळतो. हे क्षेत्र बारा महिने सुरू असते. भाद्रपद शुद्ध पंचमी ते पौर्णिमा हा काळ ‘पर्यूषण पर्व’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी प्रथमाचार्य शांतिसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वंदन केले जाते. हा परिसर मनमोहक व निसर्गरम्य आहे.

  • आश्वे-मांद्रे किनारे

    आश्वे-मांद्रे किनारे

    उत्तर गोव्यातील आश्वे आणि मांद्रे सागरकिनारे देशी-विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. आश्वे किनारा हा उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्याचा एक मोठा भाग आहे. हा भाग मोरजी किनाऱ्यापासून पुढे सुरू होतो. आश्वे, मांद्रेनंतर पुढे हरमल किनाऱ्याकडे जातो. आश्वे हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. याच्या मागील बाजूस सुंदर पामची झाडे आहेत. समुद्रकिनाऱ्यावर अनेक शॅक आहेत. दुर्दैवाने, वाळूमुळे बरेच खडक वर आले आहेत. त्यामुळे तो पूर्वीसारखा सुंदर नाही; परंतु तरीही मनात भरतोच.

    इतर किनाऱ्यांपेक्षा येथे शांतता अनुभवता येते. शांत समुद्र, सर्वोत्कृष्ट फ्रूट सॅलड हवे असल्यास या किनाऱ्यावर जावे. मांद्रे किनाराही नितांतसुंदर आहे. येथे कासव संवर्धन मोहीम सुरू असल्याने फारसे शॅक्स नाहीत. तर हे दोन्ही किनारे पेडणे तालुक्यात आहेत. मनमोहकता व शांतता प्रदान करणाऱ्या या किनाऱ्यांवर जाण्यासाठी विमानमार्गे प्रवास केल्यास मोपा विमानतळ जवळ आहे. रेल्वेने प्रवास केल्यास पेडणे, थिवी रेल्वेस्थानकावर उतरावे लागेल. मोरजी किनारा इथून जवळच असून तेथे विदेशी पर्यटक जास्त असतात. आता आश्वे-मांद्रे किनाऱ्याच्या दिशेने पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

  • अंतूरगड किल्ला

    अंतूरगड किल्ला

    उत्तुंग मजबूत गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या किल्ल्यांनी जवळपास अवघा महाराष्ट्र व्यापला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या रांगेवर अंतुरगड आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली हा किल्ला आहे. अंतूरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यातील एक मार्ग कन्नडकडून गौताळा अभयारण्यामधून जातो. दुसरा मार्ग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधून आहे. हे दोन्ही मार्ग अंतूरच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येतात.

    डोंगरउतारावर भरपूर झाडी आहे.मलीक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगली वावटळीत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. गडाचा समोरचा दरवाजा चटकन दिसत नाही. या दरवाजाबाहेर पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत या दरवाजाला लाकडी दारे होती. ती आता दिसत नाहीत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. पुढचा दरवाजा मात्र भव्य आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूला अनेक शिल्पे पहायला मिळतात. येथे सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. तिसऱ्या दारावर भव्य असा फारशी शिलालेख आहे.

    गड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला मोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. टेकडीच्या माथ्यावर टेहळणीकरिता चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथऱ्यावरून संपूर्ण गडावर लक्ष ठेवता येते. या किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबर याचाही ताबा मिळवला.

  • संजीवनी बेट

    संजीवनी बेट

    महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एक लोकप्रिय हिरवीगर्द टेकडी आहे. हे एक जैवसमृद्ध असे क्षेत्र आहे. ‘वडवळ नागनाथ’ गावाजवळ असलेली ही टेकडी तिच्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे ‘संजीवनी बेट’ म्हणून ओळखली जाते. हे ठिकाण चाकूरपासून १६ किमी अंतरावर असून लातूर शहरापासून ३९ किमी अंतरावर आहे. संजीवनी बेटास ‘वडवळ नागनाथ बेट’ या नावानेही ओळखतात. हे बेट आयुर्वेदिक झाडे आणि वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजातींचे घर म्हणून ओळखले जाते. येथे जुलै ते सप्टेंबर या पावसाच्या महिन्यात अनेक दुर्मिळ वनस्पती वाढतात. अनेक ठिकाणचे आयुर्वेदिक अभ्यासक आणि संशोधक दुर्मिळ वनस्पतींच्या शोधात या ठिकाणास भेट देतात.

    जगात कुठेही न आढळणारे असे चुंबकीय क्षेत्र येथे आहे. जिथे १०० फुटांपेक्षा अधिक व्यास असलेल्या जागेत लोटांगण अवस्थेत २ मिनिटे शरीरासह मन स्थिर करून बाजूला तीन-चार गिरकी घेतल्या की तुमचा शरीरावरील ताबा सुटतो. शरीर आपोआप घरंगळत जाते. त्या व्यक्तीला जोपर्यंत अन्य कोणी थांबवत नाही, तोपर्यंत काही अंतरापर्यंत व्यक्ती घरंगळत जाते. महाराष्ट्र सरकार आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी आणि प्राथमिक आरोग्य सेवेसाठी पारंपरिक उपायांचा वापर करणाऱ्या स्थानिक चिकित्सकांसाठी या परिसरात वैद्यसंमेलनाचे आयोजन करते.

    औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी सरकारने संशोधन केंद्रही स्थापन केले आहे. येथे राहणाऱ्या स्थानिक जमातींशी पर्यटक संवाद साधू शकतात. त्यांच्याकडून संजीवनी बेटावरील वनस्पतींची माहिती मिळू शकते. ‘वडवळ नागनाथ बेट्टा’ येथे आणि आजूबाजूला अनेक आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार रुग्णालये आणि वैद्यकीय दुकाने आहेत. तिथे आपण खरेदी करू शकता. येथील संशोधन केंद्र सकाळी ९.०० वाजता उघडते. त्यामुळे सकाळी ८.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत कधीही भेट देऊ शकता.

  • यमाई देवी मंदिर

    यमाई देवी मंदिर

    साताऱ्यापासून ४४ किमी आणि पाचगणीपासून ६३ किमी अंतरावर, यमाई देवी मंदिर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील औंध येथे डोंगरमाथ्यावर वसलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात खूप पूजनीय आहे आणि सातारा येथे भेट देण्याच्या शीर्षस्थानांपैकी एक आहे. यमाई देवी ही अनेक महाराष्ट्रीय कुटुंबांची कुलदैवत आहे. काळ्या पाषाणातील देवी महिषासुर मर्दिनीची मूर्ती आडवाटे बसलेल्या स्थितीत जवळपास २ मीटर उंच आहे. या मूर्तीला चार हात असून त्यात गडा, बाण, त्रिशूल आणि पान आहेहे शहर आणि मंदिर अनेक शतकांपासून पंत घराण्याशी जोडलेले आहे.

    या माजी सत्ताधारी कुटुंबाच्या विद्यमान प्रमुख गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी टेकडीवरील यमाई मंदिराच्या शिखरावर ७ किलोग्राम (१५ पौंड) घन सोन्याचा कलश किंवा मुकुट स्थापित केला आहे. देवी यमाईचे आणखी एक मंदिर गावात आहे; टेकडीवरील एक सोडून.टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्या वापरून मंदिरापर्यंत पोहोचता येते. डोंगरमाथ्यापर्यंत थेट रस्ता देखील उपलब्ध आहे. मंदिर संकुलात औंधच्या महाराजांच्या खाजगी संग्रहातून स्थापित श्री भवानी संग्रहालय देखील आहे. संग्रहालयात एम.व्ही. धुरंधर, बाबूराव पेंटर, माधव सातवळेकर आणि राजा रवि वर्मा यासारख्या १९व्या आणि २०व्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कलाकारांची चित्रे तसेच ब्रिटिश कलाकार हेन्री मूर यांच्या प्रसिद्ध मदर अँड चाइल्ड स्टोन स्ट्रक्चर्स आहेत.

    यमाई देवी मंदिराची वार्षिक यात्रा हजारो भाविकांना आकर्षित करते. यमाई देवी यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमा किंवा पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रात पारंपारिक हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाते. या उत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

  • बागा समुद्रकिनारा

    बागा समुद्रकिनारा

    बागा समुद्रकिनारा हा गोव्यातील सर्वात आनंददायक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे जलक्रीडा, उत्तम जेवणाची रेस्टॉरंट्स, बार आणि क्लब आढळतात. बागा किनारा हा कळंगुट आणि अंजुणा सागरकिनाऱ्यांच्या सीमेवर आहे. जलक्रीडा हे बागा किनाऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे. पॅरासेलिंग, वेकबोर्डिंग, विंडसर्फिंग, काइट सर्फिंग, जेट स्कीइंग हे काही जलक्रीडा प्रकार आहेत. या समुद्रकिनाऱ्यावरून डॉल्फिन स्पॉटिंग टूरसाठी जाता येते. बागा किनाऱ्यावरील एक अनोखे आकर्षण म्हणजे येथील ‘इनडोअर स्नो पार्क’ होय. येथे खेळण्याची जागा, स्लेडिंग क्षेत्र आणि आइस बार तसेच तिबेटी मार्केट आहे. बागा किनारा हे निसर्गप्रेमींसाठी आवडते ठिकाण आहे. येथे निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. पर्यटक येथून डॉल्फिन पाहण्यासाठी सहली काढू शकतात. बागा किनाऱ्यावरुन समुद्रातील डॉल्फिन पाहण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेल्या सुंदर बेटांचे साक्षीदार होण्यासाठी अनेक सहलींचे आयोजन केले जाते.

    बागा रोडवर तिबेटी मार्केट आहे. त्यानंतर जवळच प्रसिद्ध नाईट मार्केट आहे. बुधवारी येथे फ्ली मार्केट भरते. प्रसिद्ध टिटोज लेनमध्ये अनेक बार, कॅफे मॅम्बो, केपटाऊन कॅफे, कॉकटेल्स, ड्रीम्स आणि कावला यांसारखे क्लब आहेत. बागा किनारी भागातील प्रत्येक श्रेणीमध्ये उत्तम निवासाचे पर्याय आहेत. येथे आपण बजेट, मध्यम श्रेणी आणि लक्झरी अशा कोणत्याही प्रकारात आरक्षण करु शकता. बहुतेक हॉटेल्स समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आहेत. काही खोल्यांच्या खिडक्यांमधून बागा किनाऱ्याचे मनोहारी दृश्य दिसते. बागा किनाऱ्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो. त्यावेळेस हवामान आल्हाददायक असते. जवळपास रोज रात्री किनाऱ्यावर मेजवान्यांचे आयोजन होत असते. गोव्याची राजधानी पणजीपासून बागा सुमारे १७ किमी. अंतरावर आहे. पणजीहून बागा किनाऱ्यावर जाण्यासाठी टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा सहज उपलब्ध आहेत.

  • धारूर किल्ला

    धारूर किल्ला

    बीड जिल्ह्यातील धारूर येथे राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी ‘महादुर्ग’ नावाचा किल्ला बांधण्यात आला. याला धारूर किल्ला असे नाव आहे. त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली. त्यामुळे आजही किल्ला व त्यातील अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत. येथे किल्ल्याबरोबरच अंबेजोगाईचे मंदिर, लेणी, धर्मापूरीचा किल्ला व प्राचीन केदारेश्वर मंदिर ही ऎतिहासिक ठिकाणे पाहता येतात.
    या भागावर वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रकुटांनी धारूर येथे किल्ला बांधला गेला. ‘महादुर्ग’ नावाने हा किल्ला त्यावेळी ओळखला जात असे. त्यावेळी साधे दगड एकमेकांवर रचून या गडाची तटबंदी बांधण्यात आली होती.

    धारूर गावातून गाडीने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते. धारूर गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे त्याला ‘भूईकोट’ म्हणत. या किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे. त्यामुळे या तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे. उरलेल्या चौथ्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४.२ मीटर रूंद व ४.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे.या खंदकाच्या उत्तर भागात एक बांधीव तलाव असून त्याला ‘सोलापूर दिंडी किंवा खारी दिंडी’ म्हणतात. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे.

    धारूर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूच्या खंदकात उतरून अष्टकोनी बुरुजाजवळ जावे लागते. या बुरुजाला ‘हाथी बुरुज’ म्हणतात. या बुरुजावर दोन शरभाची शिल्प व त्यांच्या मधोमध हत्तीचे शिल्प आहे. शरभाच्या मागे ढाल, तलवार घेतलेला योध्दा कोरलेला आहे. हा किल्ला प्रेक्षणीय आहे.

  • धाराशिव लेणीसमूह

    धाराशिव लेणीसमूह

    लेणी हा कोणत्याही भागाचा एक ऐतिहासिक ठेवा असतो. त्या लेण्या संबंधित भागातील सांस्कृतिक समृद्धी वाढवितात. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात आकर्षक एक प्राचीन लेणीसमूह आहे. येथील शैव लेणी धाराशिवपासून ५ कि.मी. अंतरावर असून त्यांना ‘चांभार लेणी’ असेही म्हणतात. या लेण्यांसमोर एक देखणे शिव मंदिर आहे. या लेण्यांकडे पायवाट तसेच पक्क्या मार्गानेही पोहोचता येऊ शकते. हातला देवी मंदिराकडून लेण्यांपर्यंत पोहोचणारी पायवाट मिळते. तर धाराशिव शहराजवळील बोंबल्या मारुती मंदिराकडून पक्क्या मार्गाने पोहोचता येते. या लेण्यांना भेट द्यायची झाल्यास हिवाळा ऋतू उत्तम असतो.उस्मानाबाद शहरापासून ६ ते ७ किमी अंतरावर धाराशिव लेण्या आहेत.

    धाराशीव लेण्या बालाघाट डोंगररांगेत कोरलेल्या आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशा लेण्या येथे आढळतात. हिंदू धर्मीयांच्या देव-देवतांच्या मूर्ती येथे कोरलेल्या आढळतात. धाराशिवपासून २० कि.मी अंतरावर सात जैन लेण्या आहेत. दुसऱ्या लेण्यामध्ये आठ स्तंभ आणि पाच प्रवेशद्वारे आहेत. गर्भगृहात भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर यांची भव्य प्रतिमा आहे. या लेण्यांमध्ये हरी नारायण नामक एका सत्पुरुष तपश्चर्या करीत होते, असे समजते. धाराशिवमध्ये या संप्रदायाचा एक मठ आहे. येथील बौद्ध लेण्या आकर्षक आहेत. या लेण्या वाकाटक शैलीतील आहे. तेथे बौद्ध भिख्खूंसाठी १४ निवारागृहे आहेत. गाभाऱ्यात पद्मासन अवस्थेतील बुद्ध मूर्ती आहे.

  • जाळीचा देव

    जाळीचा देव

    जालना जिल्ह्यात अजिंठ्यापासून २८ किलोमीटर आणि बुलढाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभावपंथीयांचे ‘जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथामधील भाविकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे श्री चक्रधरस्वामी ही काळ वास्तव्यास होते. औरंगाबादपासून जाळीचादेव अंतर १२१ किमी आहे. जळगावपासून जाळीचा देव अंतर ९३ किमी आहे. जालनापासून हे अंतर १३२ किमी. आहे. जाळीचा देव येथे जाण्यासाठी एस.टी.च्या बसेस मिळतात. हे स्थान सह्याद्री पर्वतावर उत्तर सोंडेवर पूर्वाभिमुख मंदिरात आहे.

    महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रभ्रमण करीत असताना येथे आले. ते गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, चांगदेव, हरताळा येथे पोहोचले. हरताळा येथून स्वामी सावळदबारा येथे आले. वालसावंगी येथे जाताना वाटेत त्यांना अरण्य लागले. करवंदाच्या जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी थांबले असताना त्याठिकाणी त्यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते पिल्लांना मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्याठिकाणी येऊन गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे पाहताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे वागू लागली. ही गोष्ट वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणूनच या तीर्थक्षेत्राला ‘जाळीचा देव’ हे नाव पडले. येथे जाळीच्या वेलांखाली दगडमातीचा ओटा बांधला होता. येथील सावळदेवा गावचे वृद्ध गुराखी सांगतात, की पौर्णिमेचा दिवस असल्यावर येथील गुराखी या स्थानावर आवर्जून जात. या स्थानावर तुरळक भक्तांनी अर्पण केलेले नारळ असत.. साधारण चार ते पाच नारळ मिळायचे. सर्व गुराखी एकत्र येऊन हे नारळ फोडून खात.

    वाघोदा-जळगाव येथील भक्त कै. लक्ष्मणराव पाटील आपला कुष्ठरोग चांगला होण्यासाठी येथे आले होते. त्यांनी एकवीस दिवस उपवास करून नामस्मरण केले. एकविसाव्या दिवशी पहाटे त्यांना एक साधू स्वप्नात दिसले. त्यांनी आशीर्वाद दिला. त्यानंतर थोड्याच दिवसात श्री. पाटील निरोगी झाले. त्यानंतर त्यांनी या स्थानाभोवतीची झाडेझुडुपे काढून सन १९३८ मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. सन १९४२ मध्ये सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशारोहण समारंभ थाटात झाला. याठिकाणी भक्ताचा शारीरिक, मानसिक थकवा दूर होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

  • कोर्लई बीच

    कोर्लई बीच

    कोर्लई बीच हे मुंबईच्या लपलेल्या रत्नांपैकी एक आहे. अलिबाग शहरापासून थोड्या अंतरावर कोर्लईच्या लहान मच्छीमार गावात मुख्य समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्राच्या नेहमीच्या वाळूच्या किनाऱ्याच्या उलट, पावसाळ्यात हिरव्या-पिवळ्या तणांनी, गुलाबी ऑक्सॅलिस फुलांनी आणि गवताळ कुरणांनी भरलेला हा किनारा. गरम उन्हाळ्यात आणि अत्यंत हिवाळ्यात, तथापि, मखमली आवरणाशिवाय समुद्रकिनारा निर्जन आणि खडकाळ बनतो. गावात मच्छीमारांची वस्ती आहे आणि म्हणूनच, समुद्रकिनारा बहुतेक व्यापार आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरला जातो.

    कोर्लई समुद्रकिनार्यावर थोडेसे पर्यटन आहे कारण ते अनेकांना माहीत नाही, ज्यामुळे ते एक आदर्श वीकेंड गेटवे स्पॉट बनते. एका बाजूला निळ्याशार समुद्राची सुंदर दृश्ये आणि दुसरीकडे पाचूच्या गवताळ रंगांसोबतच, समुद्रकिनाऱ्यावर एक जुना किल्ला आणि दीपगृह देखील आहे. लहान रंगीबेरंगी घरे आणि अरुंद गल्ल्यांसह परिसरातील गावात जुने जगाचे आकर्षण आहे. गावापासून फार दूरवर एक जुने चर्च आहे जे सध्या बंद करण्यात आले आहे परंतु आता विंटेज फोटोग्राफी आणि शोधासाठी वापरले जाते. एकंदरीत, समुद्रकिनारा हा एक दिवस मित्रांसह, कुटुंबियांसोबत किंवा फक्त एकट्याने घालवण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे.

  • प्रबळगड किल्ला

    प्रबळगड किल्ला

    प्रबळगड किल्ला महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात असे आणखी दुर्गम किल्ले आहेत. जिथे कथा पर्यटकांना रोमांचित करतात. हा किल्ला माथेरान आणि पनवेल दरम्यान आहे. त्याच्या संरचनेमुळे आणि उंचीमुळे, याला भारतातील सर्वात उंच आणि सर्वात धोकादायक किल्ला म्हटले जाते. जुने किल्ले आणि वास्तू पाहणाऱ्या लोकांमध्ये हा किल्ला नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. रायगड जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्यावरून आजूबाजूच्या परिसराची विलोभनीय आणि नयनरम्य दृश्ये पाहता येतात.

    या किल्ल्यावरून पर्यटक सूर्यास्तापूर्वीच परततात. कारण संध्याकाळ झाली तर येथून परतणे कठीण होते. याशिवाय पर्यटकांना राहण्यासाठी या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. येथे पर्यटकांना वीज किंवा पाणी मिळणार नाही. त्यामुळे या किल्ल्यावरून पर्यटक संध्याकाळ होण्यापूर्वीच उतरतात. कारण संध्याकाळ झाली आणि जिने उतरताना थोडीशी चूक झाली तर जीवितहानी होऊ शकते.

    प्रबळगड किल्ला 2300 फूट उंचीवर आहे. इथून पर्यटक इर्शालगड किल्ला आणि कल्याण किल्ला पाहू शकतात. या किल्ल्याभोवती असलेली हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. या गडावर जाणाऱ्या पायऱ्यांना रेलिंग नसल्याने ते अधिक धोकादायक बनले आहे. हा किल्ला पूर्वी टेहळणी बुरूज होता आणि त्याचे नाव मुरंजन किल्ला होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याचे नाव बदलून प्रबळगड करण्यात आले. पावसाळ्यात आणि पावसात येथे जाणे पर्यटक टाळतात कारण यावेळी निसरडा होऊन जीव धोक्यात येऊ शकतो. साहसी उपक्रमांमध्ये भाग घेणारे पर्यटक येथे जाऊन ट्रेकिंग करू शकतात.

  • लवासा

    लवासा

    महाराष्ट्रात स्थित, लवासा हे भारतातील नवीन हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे शहर पोर्टोफिनो या इटालियन शहरावर आधारित एक सुंदर प्रकल्प आहे. लवासा 7 टेकड्यांवर पसरलेले आहे आणि 25000 एकर क्षेत्र व्यापलेले आहे. लवासा हे सौंदर्य आणि पायाभूत सुविधांचे एक आदर्श मिश्रण आहे जे पर्यटकांना निसर्गरम्य दृश्यांपासून हॉटेल्स, रिसॉर्ट्स, शैक्षणिक संस्था, आयटी कंपन्या, मॉल्स, निवासी मालमत्ता इत्यादींसह अतिशय विकसित पायाभूत सुविधा प्रदान करते.

    लवासा हे महाराष्ट्रातील पुण्याजवळ वसलेले खाजगी नियोजित डोंगरी शहर आहे. हे आधुनिक काळातील हिल स्टेशन सर्व अभ्यागतांसाठी एक आनंददायक माघार आहे आणि शहराच्या धकाधकीच्या जीवनातून एक छोटीशी सहल शोधत असलेल्या लोकांसाठी हे एक नवीन हँगआउट बनत आहे. हिरवाईने नटलेल्या टेकड्यांच्या मध्यभागी वसलेले हे निवांत सुट्टीचे ठिकाण आहे. लवासा शहर हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेले आहे आणि त्याच्या मंत्रमुग्ध करण्याच्या दृश्यांसह मनमोहक करते. हे पुण्याजवळील मोसे व्हॅलीमध्ये 65 किमी अंतरावर, सुमारे एक तासाच्या अंतरावर आहे आणि मुंबईपासून ते अंदाजे 200 किमी अंतरावर आहे. 25,000 एकर जमिनीवर पसरलेले, ते 65Km लेकफ्रंट व्यापते जे संपूर्ण शहराला एक मोहक रूप देते.

  • श्री क्षेत्र कपिलधार

    श्री क्षेत्र कपिलधार

    बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र कपिलधार हे एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. कपीलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. या समाधीला 459 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे क्षेत्र वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान आहे.
    येथील धबधबा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हा धबधबा ‘कपिलधार धबधबा’ म्हणूनच ओळखला जातो. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते. बीड शहरापासून १९ किलोमीटर अंतरावर मांजरसुंभा हे गाव आहे.

    पावसाळ्याच्या दिवसात कपिलधार धबधब्यावर पर्यटक तसेच भाविकांची मोठी गर्दी असते. कार्तिकी पौर्णिमेला येथे महोत्सव असतो. माघ शुद्ध पंचमीला स्वामींचा जन्मोत्सव व फाल्गुन चतुर्थीला समाधीस्थ झालेला दिवस असतो. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा असते.

    या पर्यटनक्षेत्राला पर्यटन विभागाचा ‘ब’ दर्जा मिळाला आहे. मन्मथस्वामी यांनी मानूर मठ येथे बसवराज शिवाचार्य महाराज यांच्याकडे विद्याभ्यास पूर्ण केला. त्यांनी वीरशैव धर्माचा प्रचार महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अशा राज्यात केला.
    हे मंदिर सकाळी 5 ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. सकाळी महापूजा करताना महाभोगात श्रीफळ, भात अशा प्रसाद असतो. दुपारी आरती होते. भाविकांना प्रसाद म्हणून भात दिला जातो. संध्याकाळी शिव भजन होऊन रात्री दहा वाजता मंदिर बंद केले जाते. मुंबईहून हे स्थळ 470 किलोमीटर व पुण्याहून 320 किलोमीटरवर आहे.

  • कोलवा किनारा

    कोलवा किनारा

    कोलवा हे गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक किनारपट्टीचे गाव आहे. हा किनारा साधारणपणे सुमारे 2.5 किमी आहे.या गावात आज पोर्तुगीजकालीन उच्चभ्रू घरे आणि आधुनिक व्हिला आहेत. येथे 300 वर्षांहून अधिक काळातील अनेक अवशेष पहायला मिळतात. आठवड्याच्या शेवटी येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. जगभरातील तसेच भारतीय सूर्यास्त आणि विविध क्रियाकलापांचा येथे आनंद घेतात. हा समुद्रकिनारा विशेषतः ऑक्टोबरमध्ये व्यस्त असत. त्यावेळेस येथे धार्मिक यात्रेकरूंचे जथे येतात. कोलवा चर्चला भेट देतात. या चर्चला ‘इग्रेजा दे नोसा सेन्होरा दास मर्सेस’ म्हणजेच ‘चर्च ऑफ अवर लेडी ऑफ मर्सी’ असे म्हणतात. या चर्चची स्थापना इसवी सन 1630 मध्ये रोइझ कुटुंबाने केली होती.

    येथील स्थानिक लोकांमध्ये कामगार वर्ग आजही आहे. यात प्रामुख्याने 16 व्या शतकाच्या मध्यापासून बहुसंख्य मच्छीमार आहेत. इतर कामगारांमध्ये सुतार, नारळ तोडणारे (पाडेकर), शेतात लागवड करणारे मजूर, इत्यादी होते. यामध्ये धर्मांतरित तसेच विविध पोर्तुगीज प्रदेशातील स्थलांतरितांचा समावेश होता. यात भारतीय उपखंड, अंगोला, मोझांबिक, ब्राझील येथील परदेशीची आजची विविधता मिसळली; हा किनारा पांढऱ्या वाळूचा आहे. किनाऱ्यावर नारळाची झाडे आहेत. उत्तरेला बोगमाळो किनारा आणि दक्षिण गोव्यातील ‘काबो दे रामा’ किनारा आहे.

    कोलवा आता एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हा समुद्रकिनाऱ्यामुळे आनंद लुटला जातो. येथे अनेक पर्यटन उद्योग आहेत. त्यात बजेट हॉटेल्स, गेस्ट हाऊस, बीच शॅक्स, फूड स्टॉल्स, छोटी रेस्टॉरंट्स आणि पब आणि बार विकसित झाले आहेत. जीवरक्षक आणि समुद्रकिनाऱ्यांद्वारे सतत निरीक्षण केले जाते. जलतरण क्षेत्र रंगीत ध्वजांसह ध्वजांकित केलेले आहे. गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक किनारा असल्याने वर्षातील बहुतेक वेळा खूप गजबजलेला असतो. बहुतेक पर्यटक स्थानिक भारतीय असल्याने हा समुद्रकिनारा परदेशी लोकांपासून दुर्लक्षित आहे.

  • गडगडा किल्ला

    गडगडा किल्ला

    नाशिकपासून साधारणपणे १८ किलोमीटर अंतरावर ‘गडगड सांगवी’ हे एक गाव आहे. या गावाच्या मागे ‘अंबोली पर्वत’ नावाने प्रसिद्ध असणारी डोंगररांग आहे. या पर्वतरांगेत तीन शिखरांनी डोके वर काढलेले दिसते. उजवीकडील शिखर ‘अंबोली‘ व डावीकडील शिखर ‘अघोरी’ या नावाने ओळखले जात असून या दोन शिखरांमध्ये ‘गडगडा किल्ला’ आहे. हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा, असे दिसते.

    ‘गडगड सांगवी’ गावामागून या किल्ल्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने गेल्यावर पायर्या असलेली विहीर मिळते. विहिरीजवळ शिवलींग व नंदी आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून सरळ जाणारी वाट किल्ल्याकडे जाते. उजवीकडेील वाट हनुमान मंदिराकडे जाते. या मंदिरात मुक्काम करता येतो. या किल्यावलवर चालत जाताना दगडात खोदलेली ३ फुटी उंचीची गुहा पहायला मिळते. ही मानवनिर्मित गुहा असून आत रांगत जावे लागते. स्थानिक लोक याला भुयार म्हणतात.

    किल्ल्याच्या माथ्यावर उद्ध्वस्त प्रवेशद्वार व देवड्या पहायला मिळतात. येथून दगडात कोरलेल्या पायर्या खाली उतरताना दिसतात. प्रवेशद्वार पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. या ५ टाक्या असून आत उतरण्यासाठी पायर्या आहेत. या टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर उध्वस्त वास्तू दिसतात. या गडावरुन आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश दिसतो. गडगड सांगवी गावात एसटी जात नाही. वाडीव्हीरेला उतरुन ४ किमी चालत गडगड सांगवी गावात जावे लागते. खासगी वाहनाने गडगड सांगवी गावापर्यंत जाता येते.