खडू निर्मिती उद्योग

शिक्षणाची सुरुवात खर्याे अर्थाने हातात खडू घेण्यापासून होते. शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण वर्गामध्ये शिकवताना फळ्यावर लिहिण्यासाठी खडू लागतो. खडू निर्मिती उद्योगाला अलीकडे डिजीटल साधनांमुळे थोडासा उतार सहन करावा लागत आहे. पण अनेक शाळांमध्ये आजही पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण खडूने पूर्ण होते. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी अजूनही गणित आणि सिद्धांत सोडवण्यासाठी पाटी आणि खडू वापरतात.
खडू बनविण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. तुम्ही हा व्यवसाय घरगुती उद्योग म्हणून सुरू करून तुमच्या कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकता. यासाठी चिनीमाती बारीक करून त्याची भुकटी केली जाते. ही भुकटी आवश्यकतेनुसार पाणी घालून तयार केली जाते. गरम पाण्यात प्रमाणानुसार डिंक घालावा लागतो. तयार केलेला लगदा जमिनीवर मऊ होईपर्यंत मळून घ्यावा लागतो. शीट तयार केल्यानंतर हा गोळा फीडरमध्ये टाकला जातो. त्यानंतर यंत्र हाताने हळूहळू फिरवले जाते.
खडू अधिक पांढरा दिसण्यासाठी आवश्यकतेनुसार त्याच्या मिश्रणात थोडा ‘इंडिगो’ घालतात. 30 ते 50 मिनिटात खडू तयार होतात. रंगीत खडू तयार करताना, लगद्यामध्ये तुम्हाला हवा तो रंग घाला. प्रत्येक घरातील विद्यार्थ्यासाठी खडू आवश्यक असल्याने, थेट घरोघरी विपणन करून तयार खडू विकल्यास अधिक नफा मिळतो. जर उत्पादन कमी असेल तर तुम्ही स्वतः विपणन करून माल विकू शकता. स्टेशनरी दुकाने, किराणा दुकान येथे खडू विकल्या जातात. विद्यार्थी, पालक हे खडूचे ग्राहक आहेत.
घाऊक व्यापारी, किरकोळ दुकानदार, शाळा, महाविद्यालये याठिकाणी जाऊन त्यांना हव्या त्या मालाची मागणी घेऊन माल तयार करून पोहोचवू शकता. या उद्योगासाठी चिनीमाती, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा जिप्सम स्टोन, गोंद, सोडियम, सिलिकेट, रंग, ग्रॅफाइट पावडर, फिल्टर प्रेस, ग्लूइंग मशीन, हायड्रॉलिक प्रेस, मिक्सर अशी उपकरणे आणि साहित्य लागेल. खडू वेष्टनबंद करण्यासाठी छोटे बॉक्स लागतील.