मुलांना ‘ड’ जीवनसत्वाची गरज

जीवनसतव् ‘ड’ हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात आवश्यक पोषकतत्वांपैकी एक आहे. याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. हे जीवनसत्व चरबीमध्ये विरघळणारे पोषकतत्व आहे, ते शरीरात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावते. लहान मुलांसाठी तर हे अधिक महत्त्वाचे आहे. याची शरीरातील कमतरता मुलांच्या वाढीत अडथळा आणू शकते. त्यामुळे मुलांना ‘ड’ जीवनसत्व दिले पाहिजे. वास्तविक, ड जीवनसत्व हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या जन्माच्या वेळी ‘डी’ जीवनसत्व खूप कमी प्रमाणात असते, जे गरोदरपणात आईच्या माध्यमातून बाळाला मिळते. गरोदरपणात आईमध्ये या जीवनसत्वाची कमतरता असेल तर मुलांमध्ये देखील त्याचे प्रमाण कमी होते, परंतु आईचे दूध, पूरक आहार आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने जीवनसत्व ‘डी’ची पातळी वाढवता येते.

याच्या कमतरतेमुळे मुलांना मुडदूस होतो. त्यामध्ये हाडे कमकुवत आणि वाकडी होतात. रोगप्रतिकारक शक्तीच्या चांगल्या कार्यासाठी ‘ड’ जीवनसत्व आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे मुले सहजपणे आजारांना बळी पडतात. त्यामुळे ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेपासून मुलांचे रोगांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. ‘ड’ जीवनसत्व मेंदूच्या पेशी विकसित करण्यास मदत करते, या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुलांच्या मेंदूचा पूर्ण किंवा चांगल्या पद्धतीने विकास होत नाही. जीवनसत्व ‘ड’मुळे हाडे तसेच स्नायू मजबूत होण्यास मदत होते. मजबूत स्नायूंच्या कमतरतेमुळे मूल चालणे, खेळणे इत्यादींमध्ये इतर मुलांपेक्षा मागे राहू शकते. त्यामुळे स्नायूंच्या विकासासाठीदेखील हे जीवनसत्व खूप महत्त्वाचे आहे.