पालखी मुक्कामाचा निर्णय लांबणीवर
आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतून हलवायचा की नाही, याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. या संदर्भात बारा एप्रिल होणारा अंतिम निर्णय आळंदी देवस्थानने पुन्हा एकदा लांबणीवर टाकला असून, आता एक मे रोजी अधिकृत वेळापत्रक जाहीर करतानाच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आळंदी देवस्थान कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठ येथील पालखी विठ्ठल मंदिर मुक्कामाच्या ठिकाणी जागेची टंचाई, अपुरी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि वाढती वाहतूक कोंडी यांमुळे मुक्काम बदलण्याचा विचार सुरू होता. या संदर्भात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि मंदिर विश्वस्त यांच्याकडून ठोस उपाययोजनांचा किंवा पर्यायी जागेचा अधिकृत प्रस्ताव बारा एप्रिलपर्यंत प्राप्त झाला नाही. कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय वारकरी समाजाला खात्री देता येणार नसल्याने संस्थानने हा निर्णय पुढे ढकलला आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढील आठ दिवसांत एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रशासन आणि पोलीस प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, भवानी पेठ विठ्ठल मंदिर विश्वस्त, दिंडी संघटनांचे पदाधिकारी, श्रीगुरू हैबतरावबाबांचे वंशज आणि मानाचे मानकरी यांचा समावेश आहे. या बैठकीत जो काही अधिकृत प्रस्ताव समोर येईल, तो २६ एप्रिल रोजी पंढरपूर मुक्कामी दिंडी समाजाच्या चर्चेसाठी ठेवला जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. मुक्कामाच्या या वादामुळे पालखी सोहळ्याचे छापील अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. दरवर्षी गुढीपाडवा किंवा त्यानंतर लगेच वेळापत्रक भाविकांच्या हातात असते. मात्र, पुणे मुक्कामाचा पेच सुटत नसल्याने यंदा वेळापत्रकासाठी वारकऱ्यांना १ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप आणि प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले की, वारीत वारकऱ्यांची सोय हीच आमची प्राथमिकता आहे. दुसरीकडे, तीनशे पन्नास वर्षांची परंपरा असलेला हा मुक्काम भवानी पेठेतून हलवण्यास स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. जागा कमी असल्यास प्रशासनाने ती उपलब्ध करून द्यावी, पण परंपरा मोडू नये, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. मुक्काम हलवल्यास परिसराच्या सांस्कृतिक ओळखीवर परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान ८ जुलै २०२६ रोजी होणार आहे. मुक्कामाचा अंतिम निर्णय १ मे रोजी जाहीर होईल. नेहरू स्टेडियम, सनस मैदान आणि रेसकोर्स या जागांची नावे चर्चेत होती, मात्र अद्याप कोणतीही जागा निश्चित झालेली नाही.