
सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांच्या पद्धतीने बनविलेली शिराळ्याची (दोडके) रुचकर भाजी आज बनवूया.
साहित्य : ४ शिराळी, २ बारीक चिरलेले कांदे, २ बारीक चिरलेले टोमॅटो, ३ ते ४ लसूण पाकळ्या,
१ इंच आल्याचा तुकडा, ३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, २ ते ३ चमचे देशी तूप, १ चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा हिंग, चिमुटभर हळद, आपणास हवे त्या प्रमाणात लाल तिखट, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ.
कृती : सर्वप्रथम शिराळी स्वच्छ धुवून वरील शिरा काढून घ्या. नंतर त्याचे जरासे मोठे चौकोनी तुकडे करा. आता कढईत देशी तूप घालून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे, बडीशेप आणि हिंग घाला. जिरे लाल झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घाला. लसूण थोडा शिजला की हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे आणि चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. कांदा लालसर झाला की त्यात धणेपूड, हळद, लाल तिखट टाका. चांगले मिसळून घ्या. आता मसाल्यांसोबत चिरलेले शिराळे घालून मंद आचेवर शिजवा. कढईवर झाकण ठेऊन एक वाफ काढा. शिराळ्यात पाणी असल्याने भाजीला पाणी सुटते. ते शिजायला लागल्यावर टोमॅटोचे तुकडे घाला. चवीनुसार मीठ घालून झाकून ठेवा. ५ मिनिटांत टोमॅटो आणि शिराळी शिजतील आणि शिराळ्याची भाजी तयार होईल.