
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये धूतपापेश्वर मंदिर आहे. धोपेश्वर गावात असणारे हे प्रसिद्ध शिवमंदिर राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.
हे मंदिर ‘मृडानी’ नदीच्या काठावर आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून हे मंदिर प्राचीन आहे. प्रशस्त सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखानाआणि आवारात दीपमाळा आहेत.
मंदिराचा लाकडी सभामंडप आणि त्यावरील नक्षीकाम लक्षवेधी आहे. मंदिराच्या सभामंडपात तसेच छतावर, खाबांवर प्राण्यांची,वनस्पतींची, फुलांची नयनरम्य चित्रे काढली आहेत. शंकराला वहिल्या जाणाऱ्या ‘कैलासचाफा’ या फुलाचे झाड येथे चित्ररुपात पहायला मिळते. विशेष म्हणजे, चित्रांसाठी वापरलेले रंग पूर्णपणे नैसर्गिक म्हणजे पाने, फुले झाडाची साल यांपासून तयार केलेले आहेत. दररोज रात्री येथे शेवटची महापूजा होते.
शंकर-पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा खेळ मांडून गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. बहूते वेळा दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात, तेव्हा या सोंगट्या विखुरलेल्या दिसतात. भगवान शंकर-पार्वती सारीपाट खेळून जात असल्याची येथील भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा ‘मृडानी’ नदीचा प्रवाह आहे. येथे पावसाळ्यात सुंदर अशा धबधब्याचे दर्शन होते. धबधब्याचे पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे, त्याला ‘कोटितीर्थ’ असे म्हणतात. पावसाळ्यात येथे भाविक आणि पर्यटकांची फार गर्दी असते. गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे.
थोरल्या माधवराव पेशव्यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यांनी मंदिरासाठी शाळिग्राम भेट दिला होता. पेशवेकाळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकूट अर्पण केला होता. तो आजही पुजेत वापरतात. येथे जायचे झाल्यास मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे, तर राजापूर हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.