
आपल्या मुलांशी सख्य जोडण्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. आपल्या मुलासाठी काही वेळ राखून ठेवा. त्यांना वेळ द्या. ती निश्चितच आनंदी होतील आणि तुम्हालाही आनंद,समाधान मिळेल.
मुलांसोबत खेळण्याची सवय करून घ्या. मोकळ्या वेळातील आराम सोडून त्यावेळी मुलांसोबत खेळा. मुलांना काय खेळायचे आहे ते विचारा. हे नियमितपणे केले पाहिजे. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करा.
सकाळी उठल्यावर मुलांना जवळ घ्या. तो किंवा ती तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे सहजपणे बोलून जा. रात्री झोपण्यापूर्वी मुलांशी 10 मिनिटे बोला. तिला किंवा त्याला त्यांच्या दिवसाबद्दल विचारा. त्यांचेही एक विश्व आहे, हे लक्षात असू द्या. आजच्या काळात त्याला काय आवडते आणि काय नाही हे त्याच्याकडून जाणून घ्या. आपल्या मुलांसोबत आपण एक मूल व्हा. धावा, विनोद सांगा, मजेदार गाणी गा, गोष्ट सांगा आणि मोठ्याने हसा. यामुळे तुमचाही उत्साह वाढेल आणि तुम्ही मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवाल.
दिवसातून किमान 3 वेळा मुलांच्या चांगल्या कृत्यांची स्तुती करा. परंतु ही स्तुती अनावश्यक नसावी. त्याला सकारात्मक प्रतिक्रिया देत रहा.तुमच्या मुलांसोबत संगीत ऐका किंवा गाणी गा.दिवसातून किमान 10 मिनिटे तुमच्या मुलांसोबत बाहेर जा. खरेदी करा.जेवताना मुलांजवळ बसा. तुमच्या मुलांना पुस्तके द्या. त्यांच्यासोबत तुम्ही देखील वाचा. आपल्या जवळ बसवा. मिठीत घ्या.
आपल्या मांडीवर बसवून कथा आणि कविता वाचून दाखवा. तुमच्या मुलांना घरातील छोट्या छोट्या कामांबद्दल शिकवा. हे केवळ तुम्हाला मदत करेल असे नाही, तर जबाबदारीची जाणीव देखील देईल. मुलांच्या चुकांना कधीही पोटात ठेऊन फाजील लाड करू नका. त्यांना वेळीच चूक समजून सांगा. फक्त त्याच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.